रणजीत देसाई यांच्या ‘श्रीमान योगी’ कादंबरीच्या प्रस्तावनेवरून अलीकडच्या काळात बरीच चर्चा झाली आहे आणि अजूनही कुठे कुठे होत आहे. याचे मुख्य कारण हेच आहे की सध्या बाजारात असलेल्या आणि मेहता प्रकाशनाकडून प्रकाशित झालेल्या श्रीमान योगीच्या प्रतीला जी प्रस्तावना आहे तिचे स्वरूप पत्राचे आहे. पुस्तकांची प्रस्तावना अशा नसतात. दुसरे म्हणजे ही प्रस्तावना काही मुद्देसूद सांगते आहे असेही दिसत नावही. पण याचे खरे कारण हेच आहे की छापलेली प्रस्तावना ही खरे तर प्रस्तावनाच नाही. श्रीमान योगीच्या विषयावर श्री देसाई यांचे चिंतन चालू असताना त्यांची आणि कै. प्रा. नरहर कुरूंदकर यांची एकदा भेट झाली. या भेटीत श्रीमान योगीच्या विषयावर चर्चा झाली. त्या चर्चेला अनुलक्षून कुरूंदकरांनी एक पत्र देसाई यांना नांदेडहून पाठवले. ते पत्रच मेहता यांनी प्रस्तावना म्हणून छापले आहे. ही प्रस्तावना नाही. परंतु ‘श्रीमान योगी’ला कुरूंदकरांची प्रस्तावना आहे हे खरे आहे. फक्त ती प्रस्तावना श्रीमान योगीच्या पहिल्या आवृत्तीचे प्रकाशक कै. रा. ज. देशमुख यांच्यासाठी लिहिली होती. त्या प्रस्तावनेचे हक्क मेहतांना मिळाले नसावेत. पण श्रीमान योगीची कुरूंदकरांची प्रस्तावना ही अतिशय सुविख्यात प्रस्तावना आहे. त्यामुळे ती पूर्णपणे वगळून पुस्तकाची नवी आवृत्ती प्रकाशित करणे मेहतांना अडचणीचे वाटले असावे. त्यामुळे त्यांनी हा मधला मार्ग काढून कुरूंदकरांनी देसाईंना लिहिलेले पत्रच प्रस्तावना म्हणून छापले. मुळातल्या पहिल्या आवृत्तीला जी प्रस्तावना होती ती मी वाचलेली आहे आणि ती पुस्तकाचे लेखन पूर्ण झाल्यानंतर लिहिलेली होती. त्यामुळे त्यात कादंबरीचे काही मूल्यमापनही समाविष्ट होते. हे सगळे मी अनेक वेळा लिहिले असले तरी मूळची प्रस्तावना पुस्तकप्रेमींना कशी मिळणार हा प्रश्न मला सतावत होताच. परवाच सुदैवाने हा प्रश्न सुटला, म्हणून ही पोस्ट.
देशमुख आणि कंपनीने कुरूंदकरांनी लिहीलेल्या प्रस्तावना आता संकलित करून दोन भागात प्रकाशित केल्या आहेत. त्यातल्या पहिल्या भागाची (निवडक नरहर कुरूंदकर खंड : दोन ग्रंथवेध भाग :एक) सुरवातच ‘श्रीमान योगी’च्या प्रस्तावनेने होते. प्रयासाने आणि दीर्घ काळाने उपलब्ध झालेली ही प्रस्तावना सर्वांनी आवर्जून वाचावी अशी आहे. सध्याच्या श्रीमान योगीमधले कुरूंदकरांचे पत्र म्हणजे प्रस्तावना नव्हे हे पुन्हापुन्हा का जाणवते आणि सांगावेसे वाटते याचे उत्तर त्यात सापडेल अशी माझी खात्री आहे.
कुरूंदकरांच्या पत्रात शिवाजी या व्यक्तिमत्वाची, त्यातल्या ऐतिहासिक सत्याची, ते सत्य कुठे आणि कसे शोधायचे याची सखोल आणि विस्तृत चर्चा आहे. शिवाजीच्या व्यक्तित्वाचे विविध पैलू कुठे कुणी आणि कसे उलगडून दाखवले आहेत याचे संदर्भ त्यात आहेत. पण प्रस्तावनेत त्यापेक्षा काहीतरी वेगळे आहे. ते पत्र (सध्याच्या श्रीमान योगीची प्रस्तावना) आणि आता या पुस्तकात समाविष्ट असणारी मुळातली प्रस्तावना यांच्यात चार महत्वाचे फरक सहजपणे कळू शकतील इतके स्पष्ट आहेत. पहिला आणि सर्वात महत्वाचा फरक म्हणजे पत्र सर्वसाधारण स्वरूपाचे आहे. साधारणपणे ‘शिवाजीच्या व्यक्तिमत्वाचे आकलन’ असा त्याचा विषय म्हणता येईल. पण शिवाजी हे एक नाव सोडल्यास या पत्राला बाकी काही संदर्भ नाहीत. म्हणजे कुरूंदकरांच्या या पत्राला विषय आहे पण संदर्भचौकट नाही असे म्हणता येईल. या उलट पुस्तकातल्या प्रस्तावनेला ‘श्रीमान योगी ही कादंबरी’ अशी संदर्भचौकट आहे. ती संदर्भचौकट सोडून प्रस्तावना कुठे भरकटत नाही. जे काही म्हणायचे आहे ते ती कादंबरीच्या संदर्भातच म्हणते. ही चौकट पडण्याचे आणि कुरूंदकरांनी ती मान्य करण्याचे कारण हेच आहे की प्रस्तावना कादंबरीचे लेखन पूर्ण झाल्यावर कादंबरीचा प्रस्ताव मांडण्यासाठी म्हणून जन्माला आली आहे. याउलट पत्र कादंबरीलेखनाच्या बर्याच आधीचे असल्याने त्याला संदर्भाची कुठली चौकट नाही.
दुसरा महत्वाचा फरक म्हणजे एका कादंबरीचा संदर्भ या प्रस्तावनेला असल्यामुळे तिची सुरवात ‘ऐतिहासिक कादंबरी’ या वाङ्मयप्रकाराबद्दलच्या चर्चेने होते. या चर्चेमुळे आता प्रस्तावनेला संदर्भाचा आणखी एक अक्ष जोडला जातो. म्हणजे प्रस्तावनेला कथा आणि कथानायकाचे व्यक्तिमत्व हा एक आणि साहित्यप्रकाराचा एक असे संदर्भाचे दोन अक्ष संदर्भासाठी स्वीकारले जातात आणि त्या चौकटीत प्रस्तावना वावरते. मराठी साहित्यात ऐतिहासिक कादंबर्यांचा मुख्य प्रवाह, त्याची लक्षणे आणि त्या संदर्भात शिवाजीबद्दल देसाईंच्या आकलनाचे महत्व अशा गोष्टींची चर्चा प्रस्तावनेत येते ती त्यासाठी.
तिसरा मोठा फरक हाही प्रस्तावना कादंबरीलेखनानंतरची असल्यामुळे पडतो. प्रस्तावना लिहिताना कादंबरी समोर असल्यामुळे प्रस्तावनेत कादंबरीचे काही मूल्यमापनही येते. कुरूंदकरांनी हे मूल्यमापन मुख्यतः तीन कसोट्यांवर मांडले आहे. एक म्हणजे शिवाजी या व्यक्तीचे देसाईंना झालेले आकलन, दुसरे म्हणजे मराठी ऐतिहासिक कादंबरीच्या प्रांतात या कादंबरीने घातलेली भर आणि तिसरे म्हणजे या कादंबरीचे एक कलाकृती म्हणून व्यक्तिमत्व कसे दिसते. शिवाजीच्या मृत्युला ऐतिहासिक प्रथा आणि परंपरा बाजूला सारून रणजित देसाईंनी दिलेला न्याय आणि स्वामीसारख्या कादंबर्या आणि श्रीमान योगी यातला फरक ही या मूल्यमापनाची अप्रतिम उदाहरणे आहेत. शिवाजी-तुकाराम भेट आणि मनोहारी ही व्यक्तिरेखा याबद्दलची कुरूंदकरांची निरीक्षणे आणि मते यांची त्यात भर घातली तर या प्रस्तावनेचे महत्व स्पष्ट अधोरेखित होईल.
मला अतिशय मौल्यवान वाटणार्या कुरूंदकरांच्या प्रस्तावनांमध्ये श्रीमान योगीच्या या प्रस्तावनेचा समावेश आहे हे मी याआधीही अनेकदा सांगितले आहे. आता ही प्रस्तावना पुस्तकात आली या निमित्ताने तिच्याकडे पुस्तकप्रेमी मित्रांचे लक्ष वेधावे एवढाच सध्या हेतु आहे.