Tuesday, 5 June 2018


योगीकथामृत या पुस्तकाचा परिचय
अलौकिकाचे आत्मलेणे
(उत्तरार्ध)

परमहंस स्वामी योगानंद यांच्याAutobiography of a Yogi अर्थात योगीकथामृत या पुस्तकाबद्दल विचारांची सुरवात करतानाच आपल्या लक्षात आले होते की आपण आणि आपल्या भोवतीचे हे अनंत विश्व हा अनादी कालापासून माणसाच्या अमर्याद कुतूहलाचा विषय राहिला आहे. या कुतूहलाने जेव्हा बाहेरची दिशा घेतली तेव्हा निरीक्षण, निष्कर्ष, नियम आणि सिद्धांत अशा साखळीने आणि त्या साखळीद्वारे भौतिक शास्त्रांनी जन्म घेतला. पण याच कुतूहलाने जेव्हा अंतरंगाची दिशा धरली तेव्हा त्यातून तत्वज्ञान आणि धर्म जन्माला आले. भौतिक शास्त्रांमध्ये आपल्याला दिसणाऱ्या सृष्टीबद्दलच्या सर्वच शास्त्रांचा समावेश होतो.आपण सामान्यपणे या सर्व शास्त्रांना एकत्रितपणे विज्ञान म्हणून ओळखतो. मानवजातीचे भूत आणि भविष्य हा विज्ञानाचा कायमच्या कुतूहलाचा विषय आहे. आणि योग हा माणसाचा भूतकाळ जमेला धरून त्याचे भवितव्य घडवण्याचा मार्ग आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर ज्ञान-विज्ञान आणि धर्म-तत्वज्ञान या दोघांच्याही अभ्यासाचा विषय मूलतः एकच आहे. दोघे निरनिराळ्या पद्धतींनी एकाच गोष्टीचा शोध घेत आहेत. आपण आणि आपल्या भोवतीचे विश्व- त्याचा जन्म, त्याची दिशा, त्यातल्या क्रिया-प्रतिक्रिया आणि त्याचे अंतिम भवितव्य हा या दोघांच्याही अभ्यासाचा विषय आहे. मार्ग आणि पद्धती आज वेगळ्या दिसत असतील, पण विषय तोच. त्या अर्थाने विज्ञान आणि तत्वज्ञान हे सख्खे भाऊ आहेत.

परमहंसजींच्या या आत्मचरित्राचे दुसरे सामर्थ्य विज्ञानाबद्दलच्या याच भ्रातृभावात आहे. योग आणि अध्यात्माच्या क्षेत्रात आयुष्य वेचणाऱ्या अनेक योगी संतांची आत्मकथने आता उपलब्ध आहेत. अध्यात्म आणि योगाच्या आकर्षणाने भारताकडे ओढले गेलेल्या पॉल ब्रंटन यांच्यासारख्या अनेक पाश्चात्य लेखकांची पुस्तके आणि लिखाणही उपलब्ध आहे. भारतीय तर सोडाच, पण पाश्चात्य लिखाणातही हा वैज्ञानिक दृष्टीकोन अभावानेच दिसतो हे सत्य आहे. एकच ढळढळीत उदाहरण द्यायचे तर पॉल ब्रंटन यांच्या ‘A search in Secret India’ (मराठी भाषांतर- भारताच्या अध्यात्मिक रहस्याच्या शोधात किंवा आध्यात्मिक भारताचा रहस्यमय शोध) याच पुस्तकाचे देता येईल. पॉल ब्रंटन हे विसाव्या शतकाच्या सुरवातीला जन्मलेले ब्रिटीश गूढवादी. ते शाळेत स्थिरावत होते त्या वेळी अल्बर्ट आईनस्टाईन आपल्या ‘विशिष्ट सापेक्षतावादा’च्या सिद्धांतावर अखेरचा हात फिरवीत होते आणि ब्रंटनसाहेब पदवीधर झाले तेव्हाही क्वांटम मेकॅनिक्सच्या अंतिम सिद्धतेवर काम चालू होते. पण ब्रंटनसाहेब पडले ब्रिटीश; सूर्य कधीच न मावळणाऱ्या महान साम्राज्याचे नागरिक! त्यामुळे आपल्याला पटत नाही किंवा कळत नाही असे काहीही अस्तित्वातच नाही असे मानण्याचा त्यांना जन्मसिद्ध हक्कच जणू मिळालेला. अध्यात्माच्या गूढ रहस्यांच्या शोधात भारतात फिरतानाही आपला हा हक्क सोडायला ते तयार नव्हते. पुस्तकात स्पष्ट म्हटलेले नाही. पण आपण व्यवस्थितपणे परीक्षा वगैरे करूनच कुणातरी चांगल्या योग्याची आपल्या गुरुपदावर नियुक्ती करावी असा या साहेबब्रुवाचा विचार असावा अशी मला नेहमी शंका येते. (भारतीय पद्धतीत मात्र गुरुच आपला शिष्य शोधतात आणि त्याला ओळखतात.)  त्यामुळे सद्गुरुंच्या शोधात फिरताना जेव्हा त्यांना ‘प्रकाश हे एक परम गूढ आहे’ असे सांगितले गेले तेव्हा त्यांचा त्यावर विश्वासच बसला नाही. साहेबांना प्रकाश या विषयात काही समजायचे राहिले आहे असे वाटतच नव्हते. आणि त्याही पलीकडे जाऊन समजा चुकून काही माहीत व्हायचे अजून राहिले असेलच, तर ते या नेटिव्ह समाजात जन्मलेल्या अडाणी बुवाला माहीत असेल असे वाटण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळेच त्यांनी ‘आता प्रकाश या विषयात समजायचे काय आणखी शिल्लक आहे?’ असा प्रश्न या पुस्तकात विचारला.

या मूर्खपणाला जणू काही उत्तर दिल्यासारखा एक प्रसंग योगीकथामृतात येतो. हा साधारण १८९५च्या आसपासचा प्रसंग असावा. परमहंसजींचे गुरु युक्तेश्वरगिरी महाराज त्यांचे गुरु लाहिरी महाशयांना भेटायला वाराणशीच्या आश्रमात गेले होते. गुरुजींच्या बैठकीच्या खोलीत ते शिरले तेव्हा लाहिरी महाशय त्यांना म्हणाले, “ये युक्तेश्वर, ये. खोलीच्या उंबरठ्यावर तुला आता बाबाजी दिसले का?” यावर आश्चर्याने युक्तेश्वरगिरी महाराजांनी ‘नाही’ असे उत्तर दिले. लाहिरी महाशयांनी युक्तेश्वरगिरी महाराजांना जवळ बोलावले आणि त्यांच्या भ्रूमध्याला हलकासा स्पर्श केला. त्याबरोबर दाराजवळ बाबाजी त्यांना दिसू लागले. इतर काही कामाचे बोलणे झाल्यावर बाबाजी युक्तेश्वरगिरी महाराजांना म्हणाले, ‘मुला, तू ध्यान जास्त करीत जा. तुझी दृष्टी अजून निर्दोष झाली नाही. सूर्यप्रकाशाच्या पाठीमागे दडलेल्या मला तू पाहू शकला नाहीस.” मला नेहमी प्रश्न पडतो की या प्रसंगाला ब्रंटनसाहेब जर साक्षीदार असते तर काय झाले असते? एखाद्या वस्तूवर प्रकाश पडून तो परावर्तित होतो. हा परावर्तित प्रकाश आपल्या डोळ्यात शिरतो तेव्हा आपल्याला ती वस्तू दिसते हे विज्ञानाने साहेबमजकूरांना शिकवले होते. जी गोष्ट स्वतः अदृश्य राहून माणसांना दिसण्याला मदत करते तिच्या पाठीमागे कुणी कसा लपू शकेल अशा समजुतीने त्यांनी थेट बाबाजींनाही वेड्यात काढले असते का? आपल्या ज्ञानावर आणि समजण्यावर वाजवीपेक्षा जास्त विश्वास असला की असे होत असते.

याच्या नेमके उलट योगीकथामृताची भूमिका आहे. विज्ञान आणि योग हे दोघेही एकाच गोष्टीच्या शोधात आहेत याचे भान परमहंसजी चुकूनही विसरत नाहीत आणि त्यामुळेच जिथे जथे शक्य आहे तिथे तिथे प्रत्येक गोष्टीचे किंवा प्रत्येक कृतीचे तर्कशास्त्र विज्ञानाला समजावून देण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. पूर्वसूरींनी पूर्वी स्थापित केलेल्या आणि बाबाजी-लाहिरी महाशय यांच्याकरवी नव्याने पुनःप्रवर्तित झालेल्या क्रियायोगाबद्दल तर त्यांची ही भूमिका आहेच. पण त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या बाबाजी, लाहिरी महाशय आणि युक्तेश्वरगिरी यांच्या इतर क्षेत्रातल्या चिंतनाबद्दलही ते याच पद्धतीने वागताना दिसतात. एक उदाहरण जरा तपशीलात जाऊन पाहण्यासारखे आहे.

‘ग्रहांवरती मात’ या १६व्या प्रकरणात परमहंसजी गुरु युक्तेश्वरगिरी यांची संवत्सरचक्राची संकल्पना विस्तृत स्वरूपात विषद करून सांगतात. योगदा सत्संग सोसायटीने प्रकाशित केलेल्या ‘द होली सायन्स’ या पुस्तकात या कल्पनेचे पूर्ण विवेचन आहे. स्वामीजी लिहितात, ‘श्री. युक्तेश्वर यांनी २४००० वर्षांचे संवत्सरचक्र किंवा कल्प कल्पून काही गणिती पद्धतीने त्याचा आधुनिक युगाशी संबंध जोडून दाखविला आहे. प्रत्येक चक्राचे त्यांनी दोन भाग केले. प्रत्येक भाग १२००० वर्षांचा. पहिला आरोह-कमान आणि दुसरा अवरोह-कमान. प्रत्येक कमानीत चार युगे. कली, द्वापर, त्रेता व सत्य. ही चार युगे ग्रीक कल्पनेप्रमाणे लोहयुग, ब्राँझयुग, रौप्ययुग व सुवर्णयुग या चार युगांशी जुळतात.

गुरुजींनी काही निरनिराळ्या गणिती आकड्यांवरून असे शोधून काढले की आरोह-कमानीतील शेवटले कलियुग हे इस ५००च्या सुमारास सुरू झाले. हे कलियुग १२०० वर्षे टिकले. ह्या युगामध्ये भौतिकवादास, जडवादास भर आला होता. ह्या युगाची समाप्ती इस १७०० मध्ये झाली. त्या वर्षी द्वापरयुगास सुरवात झाली. द्वापरयुगाचा काळ २४०० वर्षे. ह्या युगात विद्युत आणि अणुशक्ती या शक्तींचा विकास घडून येणार आहे. हे युग म्हणजे दूरसंदेशवहन (टेलिग्राफ), आकाशवाणी (रेडिओ), हवाई जहाजे (विमाने) व आकाशावर मात करणारी इतर मानवनिर्मित यंत्रे यांचे युग.

याच्यापुढील जे त्रेतायुग ते ३६०० वर्षांचे असेल. त्याची सुरवात इस ४१००ला होणारी आहे. या युगामध्ये मनोविज्ञानाने होणारे संदेशवहन व इतर काळावर मात करणारी मानव-निर्मित यंत्रसाधने ह्याचे ज्ञान अगदी सर्वसामान्य ज्ञान होईल. नंतर आरोह-कमानीमधील शेवटचे युग जे सत्ययुग- ते येईल. त्याचा कालावधी ४८०० वर्षांचा असेल. ह्या युगामध्ये मनुष्याची बुद्धिमत्ता फारच विकसित व प्रगल्भ होईल. ह्या युगात तो परमेश्वरी योजनेनुसार किंवा ह्या योजनेशी सुसंगत असेच कार्य करील.

अवरोह-कमानीतील १२००० वर्षांचे गणित असे: पहिली सुरुवात उतरत्या कमानीतील सुवर्णयुगापासून. हे सुवर्णयुग ४८०० वर्षांचे. ह्या कमानीची सुरवात इस १२५०० मध्ये होणार. ह्या युगात मनुष्य हळूहळू ज्ञानविहीन होत जाणार. ही संवत्सरचक्रे म्हणजे मायेचे निरंतर खालीवर होत असलेले फेरे होत. या कालावधीत भौतिक विश्वात परस्परविरोध व सापेक्षता यांचे साम्राज्य माजणार. माणसे एकापाठीमागून एक अशी या सृष्टीच्या द्वैतमूल बंदीतून बंधनमुक्त होत जातील आणि तशी ती होत असताना कारणीभूत म्हणून त्यांच्या ठिकाणी विधात्याची दिव्य, कधीही अलग न होणारी अशी सायुज्यतेची, एकत्वाची जागृत झालेली जाणीवही व्यक्त होईल.’

वर दिलेला उतारा पुस्तकातून शब्दशः घेतला आहे. उताऱ्याचे अवलोकन केले तर सहजच लक्षात येईल की ही विज्ञानाची पद्धती आहे. तुलनेसाठी उदाहरण सापेक्षतावादाच्या सिद्धांताचे घेता येईल. १९०५ साली अल्बर्ट आईनस्टाईन यांनी विशिष्ट सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडला तेव्हा त्यात गुरुत्वाकर्षणाचा समावेश नव्हता. कारण गुरुत्वाकर्षण जे कार्य करते त्याचे सूत्र न्यूटनने दिले आहे. या सूत्राचे वैशिष्ट्यच हे आहे की गुरुत्वाकर्षणाचे बल तत्काळ प्रभावाने कार्य करते. उलट सापेक्षतावादानुसार विश्वात कोणतेही कार्य प्रकाशाच्या वेगापेक्षा अधिक वेगाने होऊ शकत नाही. प्रकाशाचा वेग ही विश्वाच्या कार्य करण्याच्या वेगाची मर्यादा आहे. ती कुणालाच ओलांडता येत नाही. या पेचातून आईनस्टाईन यांनी मार्ग काढला तो गुरुत्वाकर्षणाला बल नव्हे तर गुणधर्म मानून. आईनस्टाईन यांच्या मते मूळ गुणधर्म अवकाशाची वक्रता हा आहे. त्याचे दिसणारे, व्यक्त होणारे स्वरूप गुरुत्वाकर्षण हे आहे. या विचाराला अनुसरून आईनस्टाईन यांनी अवकाशाची वक्रता मोजण्याचे सूत्रही मांडले. त्याचा पडताळा पाहण्यासाठी शास्त्रज्ञांनी सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्यकिरणांचे होणारे वक्रीभवन मोजले. प्रत्यक्ष आढळून आलेले वक्रीभवन आईनस्टाईन यांनी गणिताने मांडलेल्या वक्रीभवनाशी तंतोतंत जुळले आणि आईनस्टाईन यांचे सूत्र सिद्ध झाले.

एक क्षणभर असा विचार करून पहा की प्रत्यक्ष आढळून आलेले वक्रीभवन आणि गणिताने मांडलेले वक्रीभवन जर अचूक जुळले नसते तर? तर आईनस्टाईन यांनी आपल्या संपूर्ण प्रतिपादनाचे पुनरावलोकन केले असते आणि आपले सूत्र सुधारून घेतले असते. म्हणजेच आपण सुरवातीला म्हटलेली निरीक्षण, निष्कर्ष, नियम आणि सिद्धांत ही भौतिक शास्त्रांची साखळी संपूर्ण नाही. प्रत्येक सिद्धांताचा पडताळा प्रत्यक्ष जगात पहावा लागतो आणि जिथे प्रत्यक्षातले निरीक्षण सिद्धांताशी जुळणार नाही तिथे सिद्धांताचा पुनर्विचार करून सिद्धांत सुधारावा लागतो. पृथ्वीकेंद्रित विश्वाच्या कल्पनेपासून सूर्यकेंद्रित विश्वाचा कल्पनेपर्यंत प्रवास करताना खगोलविज्ञानाने अनेक वेळा त्या वेळी अस्तित्वात असलेले सिद्धांत प्रत्यक्ष निरीक्षणांना अनुसरून सुधारून घेतले आहेत. इथे युक्तेश्वरगिरी महाराज तेच करताना दिसत आहेत. योगीजी या प्रकरणात थोडी अधिक माहिती पुरवताना लिहितात की हिंदू धर्मग्रंथांनुसार आपल्या ग्रहमालेची वयोमर्यादा ४३० कोटी वर्षांपेक्षा जास्त आहे तर अखिल विश्वाची वयोमर्यादा ३,१४,१५९ अब्ज वर्षांची आहे. या संख्या एका गणिताने काढलेल्या असून ते गणित वर्षाचा अवधी आणि ग्रीकमधली  पाय् ही संख्या यावर आधारले आहे. इथे उघडच दिसते की युक्तेश्वरगिरी यांचे संवत्सरचक्र आणि धर्मग्रंथांमधली गणिते यात फारच मोठा फरक आहे. परमहंसजींनी या फरकाचे कारण स्पष्टपणे दिलेले नाही किंवा त्याचे काही स्पष्टीकरणही दिलेले नाही. त्यामुळेच प्रामुख्याने इथे दोन शक्यता जाणवतात. एक म्हणजे हा विषय अद्याप क्रियायोग्यांच्या विचाराधीन आहे आणि हे गणित अधिकाधिक निर्दोष बनवण्याचे प्रयत्न अजूनही सुरु आहेत. यथाकाल जेव्हा हे गणित पूर्ण सुटले आहे असे वाटेल तेव्हा ते आपल्यासमोर ठेवले जाईल. दुसरी अशी शक्यताही आहे की विश्वाचा एकूण आयुर्मर्यादेत अनेक संवत्सरचक्रे होणार असतील आणि प्रत्येक चक्राचे विवक्षित नियत कार्य असेल. परंतू यापैकी कोणतीही शक्यता बरोबर असली तरी हा सारा विज्ञानाच्याच पद्धतीने सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न आहे हे अगदी स्पष्ट आहे. जे डोळ्यांसमोर दिसते आहे ते अंतिम आहे. आपले सिद्धांत जर त्याच्याशी विसंगत असतील तर अधिक खोलात जाऊन अभ्यास व्हायला हवा. या अभ्यासात कधी आपली निरीक्षणपद्धती अधिक निर्दोष बनेल आणि परिणामी आपली निरीक्षणे अधिक अचूक होतील. कधी आपले सिद्धांत सुधारावे लागतील आणि ते प्रत्यक्षाशी अधिक सुसंगत बनवावे लागतील. पण या सर्वाचा शेवट प्रत्यक्षातले सत्य आकलन करणे हाच असायला हवा हाच विज्ञानाचा आग्रह आहे. परमहंस योगानंदही इथे याच पद्धतीने काम करताना दिसतात. विज्ञान आणि क्रियायोग यांच्यातल्या भातृभावाशी परमहंस योगानंदजी किती घट्ट जोडलेले आहेत  हे इथे प्रत्ययाला येते.

गंधबाबांचे चमत्कार प्रदर्शन या ५व्या प्रकरणात परमहंसजी विज्ञानाला एका नव्या दिशेची दीक्षा देतात तीही वैज्ञानिक पद्धतीनेच. गंधबाबा एका वस्तूचे दुसऱ्या वस्तूमध्ये रूपांतर करू शकत असत किंवा हवेतून वस्तू निर्माण करू शकत असत. या सामर्थ्याचे रहस्य सांगताना ते म्हणतात, स्पर्श, रूप, चव, श्रवण व गंध या विषयींच्या ज्ञानेंद्रियांनी निर्माण केलेल्या सगळ्या प्रेरणा इलेक्ट्रॉन व प्रोटॉन यांच्या स्पंदनातील कमी जास्त फरकामुळे उत्पन्न झालेल्या असतात. हे स्पंदन पुनः प्राणा (lifetrons) करवी नियंत्रित केले जाते. Lifetrons किंवा प्राण म्हणजे सूक्ष्म जीवशक्ती किंवा अणुशक्तीहूनही सूक्ष्म अशी पाच विवक्षित संवेदनशील कल्पनावस्तूकरवी बुद्धिपूर्वक प्रेरित झालेली अशी उर्जा. गंधबाबा काही योगसाधनांच्या सामर्थ्याने ह्या प्राणशक्तीशी एकसुर, एकताल होऊन ह्या lifetronsच्या स्पंदनांच्या स्थितीत फरक घडवून आणीत व त्यांच्याकरवी आपल्याला पाहिजे ती वस्तू निर्माण करीत. ही lifetronsची कल्पना अद्याप विज्ञानाला परिचित नाही. जॉन डाल्टन आणि रुदरफोर्ड यांच्यापासून अणूच्या रचनेवर शास्त्रीय संशोधन होत आले आहे आणि विज्ञानाने अणू हा अभेद्य मानण्यापासून अणूच्या घटकांच्या घटकांचे घटक असतात इथपर्यंत मजल मारलेली आहे. परंतू प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन यांचे अणूच्या रचनेत एकत्र असतानाचे संबंध नेमके कसे असतात, त्यांच्या स्थानात किंवा त्यांच्या उर्जेच्या पातळीत होणारे फरक कसे होतात आणि त्याचे नियंत्रण करण्याची काही व्यवस्था अणूच्या अंतरंगात असते काय यावर अजून नक्की माहिती उपलब्ध नाही. योगानंदजींचे विवेचन वाचल्यानंतर एकीकडून या विषयात विज्ञानाला किती गोष्टी कळणे अजून बाकी आहे याचीही पुन्हा एकदा जाणीव होते आणि परमहंसजींच्या तर्कनिष्ठतेचेही दर्शन होते. पण गोष्टी एवढ्यावर थांबत नाहीत. सजीव आणि निर्जीव यांच्यातली सीमारेषा नेमकी कुठे आहे हा आजही विज्ञानाच्या क्षेत्रातला एक गूढ प्रश्न आहे. अजून तरी विज्ञानाला ही सीमारेषा ठरवता आलेली नाही. परमहंसजींनी या कोड्यात आणखी भर टाकली आहे. जर सर्वच अणूंमधल्या प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची स्पंदने आणि त्यांच्यामध्ये ओणारे फरक lifetronsद्वारे नियंत्रित होत असतील तर सजीव आणि निर्जीव यातला भेद जवळपास समाप्तच होऊन जातो. हे एक नवीन आव्हान विज्ञानासमोर योगीजींनी उभे केले आहे. आणि यासाठी त्यांनी वापरलेली विवेचनाची पद्धत पूर्णपणे वैज्ञानिकच आहे. सजीव आणि निर्जीव यांच्यातला फरक प्रत्यक्ष अनुभवाच्या पातळीवर दिसतो. त्याचे तात्विक पातळीवर स्पष्टीकरण कसे द्यावे हे ठरवणे हे आपल्या धाकट्या भावाला त्याच्याच पद्धती वापरून योगीजींनी दिलेले काम आहे.

हेच विज्ञानभ्रातृत्व योगीकथामृतात ठायीठायी प्रत्ययाला येते. ज्या १६व्या प्रकरणाचा वर उल्लेख केला आहे त्याच प्रकरणात फलज्योतिषाबद्दल विवेचन येते. फलज्योतिष्याचा हेतू आणि त्याच्या दिशेबद्दल हे विवेचन खूप काही सांगून जाते. स्वामी युक्तेश्वरगिरी यांचे या विषयावरचे प्रतिपादन परमहंसजींनी विस्ताराने दिले आहे. “दांभिक लोकांनी (या) प्राचीन ज्योतिष्यशास्त्राची मोठी विटंबना करून सोडली आहे” हे गुरुजींचे मत उधृत करून गुरुमत सांगताना स्वामीजी म्हणतात, “एखादे मूल त्याच दिवशी व वेळेला जन्माला येते ज्या वेळी आकाशस्थ प्रकाशकिरण त्याच्या वैयक्तिक गतकर्माशी गणितानुसार सुसंबद्ध असतात. त्याची कुंडली म्हणजे आव्हान देणारे एक चित्रच होय. त्या कुंडलीमध्ये ज्यात काही फरक होऊ शकत नाहीत असा त्याचा भूतकाळ दर्शविला जातो तसाच त्याचा संभाव्य भविष्यकाळही दर्शविला जातो. पण ही कुंडली फक्त अंतःस्फूर्तीची माणसेच बरोबर वर्तवू शकतात. अशी माणसे अर्थात फार थोडीच असतात....... जन्माच्या वेळी अंतरिक्षाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जो संदेश उजळपणे प्रकाशित केला जातो त्याचा हेतू त्याचे नशीब, त्याचे पूर्वार्जित पाप-पुण्य निश्चित करण्याचा नसून, त्याच्या इच्छाशक्तीस उद्दीपित करण्याचा असतो- की ज्या इच्छाशक्तीच्या जोरावर तो ह्या विश्वाच्या गुलामगिरीतून मुक्त होऊ शकतो. त्याने जे कर्म केले असेल ते त्याला नष्ट करता येते. ज्या कारणाचे परिणाम त्याला सध्याच्या आयुष्यात भोगावे लागतात, ती कारणे व तशी कार्ये त्याने स्वतःच करून ठेवलेली असतात, दुसऱ्या कोणी नव्हे. तो कोणतीही मर्यादा उल्लंघू शकतो. कारण ती मर्यादा आपल्या स्वतःच्या कर्माने प्रथम त्यानेच घातलेली असते आणि त्याच्या ठिकाणी अशी काही अध्यात्मिक साधनसामग्री असते की जी ग्रहांच्या शुभाशुभ दृष्टीला जुमानीत नाही. माणसाला ज्योतिषशास्त्राची त्याच्या भोळसरपणामुळे भीती वाटते आणि त्यामुळे तो एक निर्जीव यंत्रच बनतो व त्या यांत्रिक सहाय्यावरच गुलामासारखा सर्वस्वी अवलंबून राहतो. परंतू जो मनुष्य शहाणा आहे तो ह्या ग्रहांना जुमानीत नाही... आपल्या पूर्वकर्मांनी खचून जात नाही. तो आपली निष्ठा सृष्टीवरून काढून सृष्टीकर्त्याच्या ठायी अर्पण करतो..... तो ग्रहांवर व आपल्या पूर्वकर्मावर मात करू शकतो. परमात्वतत्वाशी सायुज्यतेचा जसाजसा अनुभव येत असतो तसतसा त्या सृष्ट पदार्थांचा वरचष्मा कमीकमी होत जातो. आत्मा हा सदैव मुक्तच असतो. त्याला मरण नाही. कारण त्याला जन्मही नाही. ग्रह त्याला आपल्या अधिकाराच्या चौकटीत बसवू शकत नाहीत.”

स्वामीजींना परंपरेने मिळालेले आणि त्यांना मान्य असलेले हे मत काही गोष्टी स्पष्ट करते. एक म्हणजे ज्योतिषशास्त्र हे रूढ भौतिक शास्त्रांच्या अर्थाने शास्त्र नाही. कर्म आणि त्याचे व्यक्तिनिरपेक्ष फळ हे नाते आजच्या भौतिक शास्त्रांच्या चौकटीत बसत नाही. आपल्यासाठी कर्म आणि फळ हे नाते सामाजिक आहे, शास्त्रीय नाही. त्यामुळे कर्मफलाची पद्धत प्रामुख्याने न्यायाच्या कल्पना आणि सुसंस्कृततेच्या कसोट्या या सामाजिक मूल्यांवर आधारलेली आहे. त्यामुळेच न्यायालयांचे ब्रीदवाक्य ‘दहा दोषी सुटले तरी चालेल पण एकाही निर्दोष्याला शिक्षा होता कामा नये’ असे असते. या पद्धतीने ईश्वरी न्यायालयाचे काम चालूच शकणार नाही. तिथे ब्रीदवाक्य ‘एकही दोषी सुटता कामा नये आणि एकाही निर्दोष्याला शिक्षा होता कामा नये’ हे असते. त्यामुळे कर्म हे स्वतःच फळ निर्माण करण्यास सक्षम असणे ही गरजेची गोष्ट आहे. कर्म आणि फळाचे हे नाते जोवर भौतिक शास्त्रांच्या आवाक्यात येत नाही तोवर भौतिक शास्त्रांच्या कसोट्यांवर ज्योतिष हे शास्त्र असल्याचे सिद्ध करणे अशक्य आहे.
दुसरी गोष्ट भविष्यकाळाबद्दल आहे. ज्योतिषशास्त्राने वर्तवलेला भविष्यकाळ हा फक्त एक संभावना असतो, ज्याला संख्याशास्त्रे ‘most likely scenario’ म्हणून ओळखतात तशा स्वरूपाची एक शक्यता. पण आपल्या इच्छाशक्तीच्या आणि प्रयत्नाच्या जोरावर तो बदलणे शक्य आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर कुंडलीने वर्तवलेले भविष्य हा त्या व्यक्तीसाठी घटनाप्रवाहाचा कमीतकमी विरोधाचा पट्टा असतो आणि हेच भविष्य हवे असेल तर त्याला ते तुलनेने सहज आणि कमी कष्टांत मिळणे शक्य असते. यापेक्षा वेगळे काही घडवायचे असेल तर मात्र मूळ घटनाप्रवाहाशी जितकी फारकत घ्यायची आहे, त्या प्रमाणात सशक्त इच्छाशक्ती आणि प्रयत्न यांची गरज असते. पण असे वेगळे भवितव्य घडवणे शक्य आहे. ज्योतिष हे दिशादर्शक शास्त्र आहे, घटनादर्शक नव्हे हे इथे स्पष्ट होते. अर्थातच कुंडलीच्या आधारे दिसणारे भविष्य अचूक सांगणे आणि त्याला आव्हान देऊन त्यावर मात करणे या दोन्ही गोष्टींना जबरदस्त मानसिक शक्ती लागते, हेही योगीजी स्पष्ट करतात.

तिसरी महत्वाची गोष्ट कर्तव्यांबद्दलची आहे. दुःख, दैन्य आणि कष्ट भोगत असलेली व्यक्ती तिच्या पूर्वकर्माचे फळ भोगीत असते हे जरी खरे असले तरी अशा व्यक्तीबाबत इतरांचे काय कर्तव्य आहे? अशा व्यक्तीचा पापी म्हणून तिरस्कार करणे प्रथमदर्शनी स्वाभाविक आणि सोपे दिसते खरे. पण असा तिरस्कार करणारे आपली निर्णयशक्ती तिरस्काराच्या दिशेने वापरीत असतात आणि कर्माच्या नियमानुसार पाप करीत असतात. ‘तिरस्कार पापाचा करावा, पाप्याचा नव्हे’ हेच सामाजिक व्यवहाराचे सूत्र असले पाहिजे असा सुस्पष्ट निष्कर्ष स्वामीजींच्या या विवेचनातून निघतो.

तर्कशुद्ध निष्कर्ष, शक्य असेल त्या प्रत्येक ठिकाणी भौतिकशास्त्रांना मार्गदर्शन आणि जिथे भौतिक शास्त्रांची आजची अवस्था क्रियायोगाच्या आकलनाला कोणत्याही कारणाने अपुरी पडत असेल तिथे आकलनाच्या दिशेचे सुस्पष्ट दिग्दर्शन हे स्वामीजींच्या निवेदनपद्धतीचे या पुस्तकात सर्वत्र आढळणारे विशेष आहेत.  १६व्या प्रकरणाचे उदाहरण हे दाखवण्यासाठी इथे विस्ताराने मांडलेच आहे. पण हे विशेष पुस्तकात असंख्य ठिकाणी दिसतात. कोबीच्या चोरीचे विज्ञान सांगणारे १५वे प्रकरण, क्रियायोगाचे शास्त्र समजावणारे २६वे प्रकरण, चमत्कारांचे नियम मांडणारे ३०वे प्रकरण, शिष्यांचे देहविकार गुरू कसे स्वीकारतात याचे तत्व विषद करणारे २१वे प्रकरण ही अशा पद्धतीची काही उदाहरणे आहेत. याखेरीज आज भौतिक शास्त्रांच्या कल्पनेच्याही बाहेर असणाऱ्या ‘परलोक’ या खास संपूर्ण भारतीय चिंतनाचा भाग असणाऱ्या संकल्पनेबद्दलही विवेचन इथे येते आणि गंधबाबांच्या चमत्कारी शक्तीबद्दल माहिती देतानाच अशा सिद्धींचे निरुपयोगित्वही इथे साफसूफ शब्दांत सांगितले जाते. ‘आज’बद्दल योगमार्ग मान्य करू इच्छिणाऱ्या सर्वाना एक निश्चित मार्गदर्शन आणि बाकीच्या सर्वानाही कोणत्याही मार्गाने गेले तरी उद्या इथेच पोचायचे आहे अशी एक स्पष्ट अध्याहृत जाणीव असे एक मोठे हृदयंगम चित्र या आत्मकथेच्या रूपात स्वामीजींनी इथे उभे केले आहे. ख्रिश्चन धर्मासकट सर्व धर्म एकाच सत्याच्या आकलनाचे वेगवेगळे प्रयत्न आहेत हेही स्वामीजी स्पष्ट करतात. अॅडम आणि ईव्ह यांच्या कथेमागचे रूपक उलगडून दाखवून स्वामीजी आकलनाची एक दिशाही मांडतात. हेच रूपक पुढे अधिक तपशीलवार स्वरूपात योगी अरविंदांनी मांडले. योगीकथामृतासोबत आपल्या प्रवासाची सुरवात करताना शिवमहिम्न स्तोत्राच्या ज्या ‘रुचीनाम् वैचिद्र्याद्रुजुकुटिलनानापथजुषाम् | नृणामेको गम्यस्त्वमसि पयसामर्णवव’ या निःसंदिघ्ध ग्वाहीचा आधार आपण घेतला आणि जी ग्वाही एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस विश्व सर्वधर्म संमेलनाच्या व्यासपीठावरून स्वामी विवेकानंदानी घोषित केली तीच ग्वाही सर्व भारतीय तत्वज्ञानाचा मूलाधार आहे हे इथे अधोरेखित होते.

१९५०च्या दशकाच्या सुरवातीपर्यंतचा काळ योगीकथामृतात परमहंसजींनी मांडला आहे. राजकीयदृष्ट्या भारत स्वतंत्र होण्याचा हा काळ होता. भारताच्या पुनरुत्थानातील स्वातंत्र्य ही एक महत्वाची उपलब्धी होती. ‘उद्धरेदात्मनात्मानम्’ हे ऋषीवचन प्रत्यक्ष आचरणात आणण्यासाठी स्वातंत्र्य हे आवश्यकच होते. पण अखेरीस हे स्वातंत्र्य उद्धारासाठी साधनरूप बनवण्याची जबाबदारी जशी राजकीय नेतृत्वावर होती तशीच लोकमानसाला वळण लावू इच्छिणाऱ्या नैतिक नेतृत्वावरही होती. इंग्रजांचे पाय आता उखडू लागले आहेत हे दिसू लागण्याच्या काळात एकदा योगी अरविंद म्हणाले होते, ‘स्वातंत्र्य हे आता रोखताच येणार नाही. ते निर्विवाद आहे. पण भारत आपल्या स्वातंत्र्याचा उपयोग कशा प्रकारे करणार हे ठरवण्याची ही वेळ आहे.’ परमहंसजींचे कार्यही याच काळात घडत होते. स्वातंत्र्याच्या सुरवातीला अशा नैतिकतेचा मानदंड ठरणाऱ्या महापुरुषांचे कार्य देशाच्या पायाभरणीत सामावले जावे ही ईश्वरी योजनाच होती असे दिसते आणि या दर्शनाने आपलेही मन भरून येते. पुस्तकाचा समारोप करताना परमहंस योगानंद लिहितात, “मी पुष्कळदा कृतज्ञ बुद्धीने विचार करू लागतो- परमेश्वरा, तू ह्या बैराग्याला केवढे मोठे कुटुंब दिले आहेस!” पुस्तक संपवताना परमहंसजींच्या या विशाल कुटुंबात आपल्यालाही परमेश्वराने सामावून घेतले याबद्दल कृतज्ञतेचे अश्रू आपल्यालाही अनावर झाले तर त्यात काय आश्चर्य?

योगीकथामृत या पुस्तकाचा परिचय 
अलौकिकाचे आत्मलेणे
(पूर्वार्ध)

आपण आणि आपल्या भोवतीचे हे अनंत विश्व हा अनादी कालापासून माणसाच्या अमर्याद कुतूहलाचा विषय राहिला आहे.  नजर पोचेल तिथपर्यंत सोबत करणाऱ्या या विश्वासोबतचे नाते माणसाला खोलवर जाणवते. त्यामुळे माणसाने डोळे उघडून आजूबाजूला नजर टाकली त्याच क्षणापासून हे नाते जन्माला आले आणि मग दिवसेंदिवस वाढतच गेले. या कुतूहलाने जेव्हा बाहेरची दिशा घेतली तेव्हा निरीक्षण, निष्कर्ष, नियम आणि सिद्धांत अशा साखळीने आणि त्याद्वारे भौतिक शास्त्रांनी जन्म घेतला. पण याच कुतूहलाने जेव्हा अंतरंगाची दिशा धरली तेव्हा त्यातून तत्वज्ञान आणि धर्म जन्माला आले. अर्थातच कुतूहल जितके सार्वत्रिक आहे तितकाच तत्वविचारही सार्वत्रिक आहे. जुन्या जगात माणसामाणसातला संपर्क फारसा नव्हता आणि जगाबद्दलची माहितीही मर्यादित होती. त्यामुळे अनेक ठिकाणी आपापल्या पद्धतीने माणसांनी धर्म आणि त्यांचे तत्वज्ञान निर्माण केले आणि तरीही एकमेकांच्या विशेष संपर्काविना निर्माण झालेल्या या सगळ्या तत्वज्ञानांमध्ये काही बाबतीत तरी आश्चर्यजनक म्हणावे असे साम्य आहे.
जी गोष्ट सर्व जगाबद्दल खरी आहे ती भारताबद्दल खरी नसण्याचे काही कारण नाही. इथेही एक तत्वज्ञान आणि धर्म जन्माला आला. पण एका बाबतीत भारताची निर्मिती असलेला हा वैदिक धर्म सगळ्या जगापेक्षा वेगळा ठरला. आणि ती जागतिक तत्वज्ञानांच्या मांदियाळीत अलौकिक असणारी गोष्ट म्हणजे म्हणजे अद्वैत तत्वज्ञान. अद्वैत ही खास भारताचीच निर्मिती आहे. अन्यत्र कोणाही तत्वज्ञ-विचारवंताची झेप इथपर्यंत पोचलेली दिसत नाही. सारे विश्व ही एकाच तत्वाची वैविध्याने नटलेली रूपे आहेत ही भूमिका तत्वज्ञानांच्या जगात अद्वितीय आहे. वैविध्य हे अरूपाचे रूप धारण करण्याचे सूत्र मानल्यामुळे त्याचा नैसर्गिक परिणाम ‘रुचीनाम् वैचिद्र्याद्रुजुकुटिलनानापथजुषाम् | नृणामेको गम्यस्त्वमसि पयसामर्णवव’ ही भूमिका निर्माण होण्यात होतो.

विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापासून पौर्वात्य आणि त्यातही मुख्यतः भारतीय तत्वज्ञानाबद्दल बाहेरच्या जगात जे अनिवार कुतूहल निर्माण झाले त्याचे प्रमुख कारणही हे अद्वैत तत्वज्ञान हेच आहे. सर्वसामान्य लोक, त्यांच्या आशाआकांक्षा आणि त्यांच्या कल्याणासाठी चालणारे राज्य हाच समाजकारण-राजकारणांचा मूलाधार आहे आणि या लोकांच्यासाठी चालवल्या जाणाऱ्या राज्यावर लोकांचा अंकुश असणेही योग्य आहे या भूमिकेतून जगात लोकशाहीचा उदय झाला. समाज विविधतेने शोभतो. उलट शासनव्यवस्था नैसर्गिकपणे प्रमाणीकरणाकडे (standardisation कडे) झुकते. वरपांगी परस्परविरोधी दिसणाऱ्या या दोन गोष्टींचा मेळ घालणे हा लोकशाहीचा गाभा आहे. त्यामुळे विविधतेचा आदर लोकशाही व्यवस्थेचा एक अविभाज्य घटक ठरतो. आधुनिक लोकशाहीच्या या वैशिष्ट्याशी सुसंगत असणारे तत्वज्ञान म्हणून पाश्चात्य समाज प्रथमतः अद्वैत तत्वज्ञानाकडे आकर्षित झाला. परिणामतः अनेक भारतीय योगी आणि साधक पाश्चात्य समाजाला अद्वैताचा मार्ग दाखवायला उद्युक्त झाले. अशा योगी-साधकांचे मुकुटमणी म्हणजे परमहंस योगानंद. ‘Autobiography of a Yogi’ हे त्यांचे आत्मचरित्र हा अनेक अर्थांनी एक अद्वितीय ग्रंथ आहे. याच आत्मनिवेदनाचा श्री. ग. नी. पुरंदरे यांनी केलेला मराठी अनुवाद म्हणजे आज आपल्या समोर असणारा ‘योगीकथामृत’ हा ग्रंथ.

या पुस्तकाचे अद्वितीयत्व अनेक क्षेत्रांमध्ये निर्विवाद प्रस्थापित झालेले आहे. जगातल्या ३५ पेक्षा जास्त भाषांमध्ये हा ग्रंथ अनुवादित झाला आहे. जगातल्या सर्वाधिक विक्री झालेल्या आत्मचरित्रांमध्ये याची गणना होते. मराठीतसुद्धा ‘योगीकथामृत’ हा सर्वाधिक खपाच्या ग्रंथांमध्ये समाविष्ट आहे. पाश्चात्य जगात आध्यात्मिक क्रांतीची लाट आणणारा म्हणून हा ग्रंथ ओळखला जातो. विसाव्या शतकातल्या १०० सर्वोत्कृष्ट आत्मकथनांमध्ये या पुस्तकाचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. पुस्तकाच्या छापलेल्या प्रतीवर अनुवादकाचे नाव सहसा सापडत नाही. मराठी पुस्तकक्षेत्रात गुलबकावलीच्या फ़ुलाइतकीच दुर्मिळ असणारी अकारविल्हे सूची या ग्रंथात पहिल्यापासून समाविष्ट आहे आणि ७०० पेक्षा जास्त पाने असलेले हे पुस्तक आजही १५० रुपयांच्या आसपास उपलब्ध आहे. पुस्तकाच्या बाह्य रूपातच इतके अद्वितीयत्व आहे.

पण या पुस्तकाचे खरे सामर्थ्य त्याच्या रचनेत आहे आणि तिथेच त्याचे खास स्वतःचे उठून दिसणारे अस्सल अद्वितीयत्व आहे. सहसा आत्मचरित्रांमध्ये न दिसणारी अशी या पुस्तकाची दोन महत्वाची शक्तिस्थाने आहेत. आपण त्यांचा क्रमाने परिचय करून घेण्यासाठी, प्रथम त्यापैकी योगीजींच्या आयुष्यक्रमाकडे एक नजर टाकू.

परमहंस योगानंद हे जन्माने मुकुंदलाल घोष. वडिलांचे ते चौथे अपत्य आणि द्वितीय पुत्र. या मुकुंदलाल घोष अवस्थेपासून परमहंस योगानंद या अवस्थेपर्यंतचा सारा प्रवास या पुस्तकात स्वामीजींनी रेखाटला आहे. हा प्रवास जितका रसाळ तितकाच थक्क करणारा आहे. आश्चर्याचा पहिला धक्का पुस्तकाच्या पहिल्याच पानात बसतो. स्वामीजी लिहितात, “माझ्या अगदी लहानपणच्या आठवणी म्हणजे माझ्या पूर्वजन्मीच्या, सध्याच्या कालमानास न जुळणाऱ्या अशा गूढ स्मृती. एका पूर्वजन्मी हिमालयाच्या हिमप्रदेशात योगी म्हणून मी जीवन व्यतीत करीत होतो, हे मला अगदी स्पष्ट आठवते. भूतकाळाच्या त्या अवशिष्ट स्मृतींनी जणू एखाद्या अक्षहीन-अदृश्य सूत्राने करावे तशी मला भविष्यकाळाची कल्पना करून दिली.” आपल्यासारख्या सामान्य वाचकांना हे कल्पनेपलीकडचे ठरते. जन्मोजन्मी काम करणारे एकच एक सूत्र ही कल्पना भारतीय मनात नित्य असते. परंतू आपल्यादृष्टीने ती माहीती असते, अनुभूती नव्हे. पण इथे काही वेगळेच आहे. आणि या पुस्तकाच्या वेगळेपणाची ही तर फक्त सुरवात आहे.

स्वामीजींचे निवेदन पुढे चालूच रहाते. “शैशवकालीन असहाय्य, दीन अवस्थेचे प्रसंग मला अजून आठवतात. त्यावेळी मला धडपणे चालताही येत नसे आणि स्पष्टपणे बोलताही येत नसे याचा मला त्यावेळी फार खेद वाटे. माझ्या शारीरिक असमर्थतेबद्दल खंत वाटून मनामध्ये प्रार्थनारूपी भाव उचंबळून येत असत. माझ्या तीव्र मानसिक भावनेची अभिव्यक्ती नाना भाषांच्या शब्दात येत असे.’ मागच्या जन्मातल्या गोष्टी स्वामीजींना स्पष्ट आठवतात तर हे काही विशेष नाही हे आपल्यालाही कळते. पण इथे मिळणारा धक्का आश्चर्याचा नाही, चिंतनाचा आहे. योगीजी लिहितात, “.... बालमनाचा ठाव मोठ्या माणसांना घेता येत नाही. मुलांचे मन खेळणी व अंगठा चोखण्यातच आनंद मानून राहते असे ते समजतात.” स्वामीजींचे माता-पिता हेही अध्यात्मिक प्रकृतीचे लोक होते असे या आत्मचरित्रावरून आपल्याला समजते. पण आपल्या घरी एक असामान्य बालक जन्म घेणार आहे याची काही कल्पना त्यांना होती काय हे कुठे स्पष्ट झालेले नाही. एकूण आत्मचरित्राचा  सूर अशी काही निश्चित कल्पना योगीजींच्या जन्माआधी त्यांना नव्हती असाच आहे. (स्वामीजींच्या जन्मानंतर लाहिरी महाशयांनी ‘तुझा मुलगा योगी होईल’ असे स्वामीजींच्या आईला सांगितले होते. हेच भविष्य इतरही अनेक लोकांनी नंतर स्वामीजींच्या आईला पुन्हा पुन्हा सांगितले.) आपल्या पालकत्वाला मिळालेला हा एक धडाच आहे. मुलांना समजून घेण्यासाठी थोडे अधिक प्रयत्न, सद्भावना, विचार आणि औदार्य वापरणे आवश्यक आहे हा इथे आपला धडा आहे. स्वतःच्या ज्ञानी असण्यावरचा आपला विश्वास जरासा अनाठायी तर नाही ना यावर पालक म्हणून आपण काही चिंतन केले तर बरे पडेल असा इशारा स्वामीजी इथे आपल्याला देतात.

स्वामीजींनी आपल्या आयुष्याचा जो प्रवास इथे मांडला आहे त्याचे स्वरूप कसे आहे याची कल्पना या सुरवातीपासूनच आपल्याला यायला लागते आणि पुस्तक वाचून संपेपर्यंत कुठेही अपेक्षाभंग होत नाही. आपल्या योगी म्हणून व्यतीत केलेल्या पूर्वजन्माच्या आठवणी ज्याच्या मनात जाग्या आहेत असा बालक हेच योगीजींचे स्वरूप पुस्तकभर आपल्यासमोर येत राहते. (स्वामीजींचा जन्म योगी आदित्यनाथांची कर्मभूमी असलेल्या गोरखपूरचा. हे आपले सहज आठवले म्हणून लिहिले.) उच्चपदस्थ, अधिकारी, बुद्धिवादी, घरंदाज आणि सामान्यतः शांत वडील आणि धार्मिक, श्रद्धाळू आणि प्रेमळ आई या वातावरणात त्यांचे बालपण गेले. या सर्व काळात आईवडिलांच्यातल्या निव्वळ मतभेदाचाही  फक्त एकच प्रसंग आपल्याला पहायला मिळाला असे योगीजींनी नमूद केले आहे. लग्नानंतर लवकरच योगीजींच्या आईवडीलांनी वाराणसीच्या लाहिरी महाशयांचे शिष्यत्व स्वीकारले. त्यामुळे भौतिक फायद्याकडे आणि शारीरिक आरामाकडे फारशी दृष्टी नसणे आणि त्याऐवजी आपल्या अंतरंग उन्नतीकडे सतत लक्ष पुरवणे हे त्या दोघांच्याही अंगवळणी पडले होते. योगीजींच्याही मनावरही तोच संस्कार होत गेला. आणि विचक्षण कुतूहल ही तर योगीजींची मूळप्रवृत्तीच होती. या दोन्हींच्या संगमामुळे पूर्वजन्माच्या स्मृतींनी घातलेला अध्यात्मिक पाया वेगाने बळकट होत गेला आणि मुकुंदाचा प्रवास झपाट्याने योगाच्या दिशेने होत गेला.

योगीजींच्या या प्रवासाचे रूप ही आत्मकथा वाचताना आपल्या डोळ्यांसमोर अनेक प्रकारे उलगडत जाते. अगदी बालवयातच आईवडिलांचे गुरु असलेले श्री श्यामाचरण लाहिरी उर्फ लाहिरी महाशय आपल्या तसबिरीतून बाहेर येऊन समोर बसले आहेत असे त्याना दिसे. या दर्शनामुळे ते शरीराने जिवंत राहिले नसल्याचा जो शोक सुरवातीला वाटत असे, तो हळूहळू नाहीसा झाला. बालपणीच हिमालयात तपाचरण करणाऱ्या योग्यांचे मानसिक दर्शन त्यांना झाले. अध्यात्मिक शक्तीसंपन्न व्यक्तीचे शब्द हे केवढे ताकदवान शस्त्र असतात आणि प्रार्थनेत किती सामर्थ्य असते हे त्यांना अनुभवता आले. भौतिक जन्माआधीच निश्चित झालेली त्यांच्या आयुष्याची दिशा स्वामीजींना सुलभपणे घेता यावी म्हणून वेळोवेळी दैवी हस्तक्षेपही झाला. अर्थात स्वामीजींच्या मनाची ओढही पारलौकिक आणि अलौकिक गोष्टींकडेच होती. घर सोडण्याचे प्रयत्न त्यांनी अनेक वेळा केले. ते शक्य झाले नाही हे वेगळे. पण भौतिक जड सृष्टीपलीकडचे जग वेळोवेळी त्यांच्या नजरेसमोर येतच राहिले. दोन देह धारण करणारे संत प्रणवानंद, लाहिरी महाशयांनी ज्यांच्यासाठी ‘ऋषी’ असे संबोधन वापरले ते संस्कृतपंडित स्वामी केवलानंद, ईश्वराच्या शक्ती लोकांच्या निदर्शनाला आणून देण्यासाठी काही विशिष्ट प्रकारचे चमत्कार दाखवणारे गंधबाबा, भौतिक शक्तींच्या मर्यादा एका आश्चर्यजनक पद्धतीने समजून गेलेले व्याघ्रबाबा, हवेत तरंगू शकणारे भादुरी महाशय अशा अनेक सिद्धपुरुषांनी जो ठसा त्यांच्या मनावर उमटवला तो कधीच न पुसला जाणारा होता. सर्वसामान्य जीवनाच्या भौतिक मर्यादा तोडून पलीकडे निघून जाण्याच्या पद्धतींबद्दल स्वामीजींना वाटणारे कुतूहलच त्यांच्या जीवाला ओढ लावीत होते.

परमहंसजींच्या तोपर्यंत थोड्याशा विस्कळित असलेल्या या आयुष्याला एक निर्णायक वळण लागले ते त्यांचे सद्गुरू श्री युक्तेश्वरगिरी यांच्याशी झालेल्या भेटीमुळे. पण त्या भेटीची जणू थोडी पूर्वतयारी म्हणून माध्यमिक शिक्षण संपवल्यावर स्वामीजी काही काळ वाराणसीला श्री भारत धर्म महामंडळ आश्रमात राहिले. अन्य कोणत्याही गोष्टीपेक्षा ईश्वरावरची श्रद्द्धा हीच महत्वाची आहे हा धडा इथे त्यांच्याकडून घटवून घेतला गेला आणि मगच त्यांना त्यांचे गुरु युक्तेश्वरगिरी महाराज यांच्या स्वाधीन केले गेले. ‘आयुष्यातील अत्युत्तम काळ’ अशा शब्दात ज्याचे स्वामीजींनी वर्णन केले तो दहा वर्षांचा काळ सेरामपुरच्या स्वामी युक्तेश्वर गिरी महाराज यांच्या आश्रमात त्यांनी घालवला. इथेच ते परमहंसत्वाला पोचले.

आश्रमातल्या वास्तव्याच्या पहिल्याच दिवशी आपले गुरुजी हे लाहिरी महाशयांचेच शिष्य आहेत हे समजल्यानंतर स्वामीजींची प्रतिक्रिया ईश्वराच्या या योजकतेपुढे नतमस्तक होणे हीच असावी यात काहीच आश्चर्य नाही. मुख्यतः आत्मिक आणि त्याला आवश्यक असेल तेवढ्या प्रमाणात भौतिक-शारीरिक अशी त्यांची सर्वंकष जडणघडण गुरुसान्निध्यात झाली. गुरुजींचा उपदेश, त्यांच्याबरोबरच्या चर्चा, वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आणि अशा साऱ्या गोष्टींना आधारभूत असणारी क्रियायोगाची साधना यांचा मिलाफाने स्वामीजींचे व्यक्तिमत्व घडत गेले. अमेरिकेत क्रियायोगाचा प्रसार करणे हे आपल्या आयुष्याचे कार्यही इथेच त्यांना गवसले. पतंजलीच्या योग तत्वज्ञानाचे अंतरंग गुरुंच्या द्वारे त्यांना उलगडत गेले आणि कार्य आणि कारण यांचा अध्यात्मिक पातळीवरचा संबंधही स्पष्ट होत गेला. सांघिक जबाबदारीने अध्यात्मिक कार्य करण्याचे प्रशिक्षणही गुरुजींनी त्यांना दिले. व्यक्तिगत आवडीनिवडी आणि मूल्यांचे शिक्षण यांच्यातला फरक जाणण्याची सूक्ष्म अंतर्दृष्टी विकसित झाली. गुरुशारण्य आणि गुरुकृपा यांचे सूक्ष्म धागेदोरे समजून आले.एका समर्पित कळीचा विकास होऊन तिचे सर्व विश्व सुगंधित करू शकणाऱ्या फुलात परिवर्तन झाले.

स्वामी योगानंदांच्या गाढ गुरुभक्तीचा प्रत्यय या पुस्तकातल्या जवळपास १६२ पानांच्या सेरामपुर आश्रमातले दिवस वर्णन करणाऱ्या भागात वारंवार येतो. पण सद्गुरूंनी दिलेला समाधीचा दिव्य अनुभव वर्णन करणारे १४वे प्रकरण हा त्याचा, किंबहुना या पुस्तकाचाच, कळसाध्याय म्हणावा लागेल. (एक आश्चर्यकारक योगायोग म्हणजे गुरुभक्तीचे सारभूत तत्व अशा सरस्वती गंगाधर विरचित गुरुचरित्रातही १४वा अध्याय हाच संपूर्ण ग्रंथाचा मेरुमणी मानला जातो.) चराचर सृष्टीच्या पूर्णस्वरूपाशी तादात्म्य हे योगसाधनेचे उद्दिष्ट असते. निर्विकल्प समाधी मिळाल्यानंतर साधकाला आणखी मिळवण्यासारखे फारसे काही उरतच नाही. आणि तरीही कर्मक्षय हे काम शिल्लक रहातेच. त्यासाठी कर्तव्यकर्म चालूच राहावे लागते. स्वामीजी लिहितात. ‘ते (युक्तेश्वर) मला संथपणे म्हणाले, “ह्या परमानंदामुळे तू बेहोष होऊन जाऊ नकोस. तुला ह्या जगात अजूनही पुष्कळ काम करायचे आहे.” विसाव्या शतकातल्या भारताच्या पुनरूत्थानाचे अग्रदूत स्वामी विवेकानंद यांना त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांनी केलेल्या उपदेशाची आठवण येणे इथे अपरिहार्यच आहे. पण आपला विचार इथे थांबत नाही. एक विस्मयकारक आणि तितकीच रोमहर्षक गोष्ट इथे आपल्या नजरेसमोर उलगडते आहे. भौतिक विद्यांच्या अभावी पराजित आणि पतित झालेल्या भारताच्या पुनरुत्थानाची सुरवात विसाव्या शतकात झाली. या पुनरुत्थानाचे नेतृत्व बंगाल आणि महाराष्ट्राने केले हा आता सर्वज्ञात असलेला इतिहास आहे. पुनरुत्थानाच्या सुरवातीच्या काळाचे आपल्याला दिसणारे चित्र काय आहे? महर्षी रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद या गुरुशिष्यांच्या जोडगोळीने याचा पाया घातला. स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली आणि अध्यात्माचा सामाजिक आशय आघाडीवर आणला. त्यांचा जन्म १८६३चा, तर परमहंस योगानंदांचा जन्म १८९३चा. स्वामीजींचे अवतारकार्य दक्षिणेश्वरपासून सुरू झाले तर परमहंसजींचे सेरामपूर इथून. एक क्षणभर आपली नेहमीची पुराव्यांचा शोध घेणारी तार्किकता थोडी मागे ढकलली तर स्पष्टपणे वाटू लागते की अत्यंत योजनापूर्वक कुणीतरी विसाव्या शतकातल्या भारतीय पुनरुत्थानाच्या नैतिक बाजूचे नेतृत्व बंगालकडे सोपवले होते आणि महायोगी अरविंदांच्या माध्यमातून तिचा सांधा भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामाशी अगदी घट्टपणे जोडला होता. प्रकांड शक्तीचा हा दिव्य वारसा योगानंदजींनी लीलया पेलला.

या आत्मचरित्रात योगीजींनी आपल्या समोर ठेवलेल्या सर्व तपशीलांवर आपण इथे चर्चा करू शकणार नाही. पण महावतार बाबाजी आणि त्यांनी पुनःप्रवर्तित केलेली परंपरा यावर काही न लिहिणे हा ‘योगीकथामृता’वरही अन्याय ठरेल आणि योगाच्या महान परंपरेवरही. महावतार बाबाजी क्रियायोग परंपरेचा तर आत्माच आहेत. पण दत्तात्रेय परंपरेत त्यांचा सर्वत्र संचार आहे आणि दत्त परंपरेचे साधक असलेल्या सर्वांशी कुठे ना कुठे त्यांचा संबंध असतोच असे दिसते. कोल्हापूरचे कृष्ण सरस्वती दत्त स्वामी महाराज, पुण्याचे श्री गुळवणी महाराज, दिव्यस्पर्शी साधक डॉ. राम भोसले यांच्या परंपरेत बाबाजींना दत्तगुरुंप्रमाणेच स्मर्तृगामी मानले जाते. बाबाजींचे दर्शन झालेल्या सर्वांचे काही तपशिलांवर एकमत आहे. ते २५-३० वर्षे वयाच्या तरुणासारखे दिसतात आणि काही विशिष्ट कामासाठी देह टिकवून आहेत, महावतार या स्थानी ते एकमेव आहेत अशासारख्या गोष्टी यात येतात. त्यांच्या कामाचे स्वरूप आणि पद्धती समजणे योग्यांनाही कठीण असल्याचे मानले जाते. महावतार बाबाजी हेच मुनी मतंग आहेत असाही एक विचारप्रवाह आहे. महाराष्ट्रातली दत्त परंपरा मुख्यतः शक्तिपात दीक्षेच्या मार्गाने कार्य करते. ही शक्तिपात दीक्षा किमान ७२ वेगवेगळ्या प्रकारांनी देता येते असे सांगितले जाते. क्रियायोगाच्या तुलनेत शक्तिपात ही अधिक सोपी आणि सुरक्षित साधनापद्धती असल्याचेही जाणकार सांगतात. पण क्रियायोग आणि शक्तिपात यांच्याव्यतिरिक्त शक्तीचे संक्रमण घडवण्याच्या आणखी ७ पद्धती आहेत आणि महावतार बाबाजी या सर्व ९ पद्धतींमध्ये तज्ज्ञ आहेत असे सर्वच दत्त सांप्रदायिक मान्य करतात. आपल्यासारख्या आयुष्यात नजरेच्याही पलीकडे असणाऱ्या या महात्म्यापुढे अचंब्याने नतमस्तक होण्यापलीकडे आपण काय करणार?

सद्गुरूंची शिकवण आणि आयुष्यातल्या असंख्य अनुभवांचा पेटारा यातली निवडक रत्ने वेचून स्वामीजींनी योगीकथामृतात मांडली आहेत. रंजकतेचे भान ठेवून स्वामीजींनीही इथे अनुभवांचे शक्य तितके वैविध्य राखण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या डोळ्यांनी स्वामी श्री. युक्तेश्वरांचे सामर्थ्य पाहूनही वागण्यात तोल न राखता आलेला शशी, आपल्या ज्ञानावर वाजवीपेक्षा जास्त विश्वास असणारा पशुडॉक्टर, अपघाताने सिद्धी मिळालेला आणि त्यांचा दुरुपयोग करून नंतर पश्चात्ताप करणारा अफझल, साध्या संसारी माणसांमधून परिवर्तन होऊन साधकाच्या पातळीला पोचलेले स्वामीजींचे ताई-मेहुणे अशा अनेक पात्रांच्या आणि त्यांच्या आयुष्यातल्या प्रसंगांच्या कथा सांगत परमहंसजी वाचकाला रंगवीत आणि रंजवीत ठेवतात. नर्मविनोदाची पखरण करीत आणि प्रांजळपणे कथा सांगत स्वामीजी वाचकाला गुंतवतात. आपल्या बीए होण्याबद्दल स्वामीजींना कधीच खात्री नव्हती असे ते सांगतात.पण त्यांच्या गुरूंनी, युक्तेश्वरांनी त्यांना ‘एखादे वेळी सूर्य व चंद्र आकाशामधली आपली स्थाने बदलतील; पण तुला पदवी मिळणार नाही असे होणार नाही’ अशा शब्दांमध्ये आश्वासन दिले होते. जेव्हा स्वामीजी बीएची परीक्षा पास झाले तेव्हा गुरुजींनी ‘परमेश्वराला सूर्य व चंद्र यांची परस्परांची स्थाने बदलण्यापेक्षा तुला पदवीधर करून टाकणे अधिक सोयीचे वाटले, दुसरे काय?’ अशा शब्दात त्यांना, पुन्हा एकदा परमेश्वरी कृपाप्रसाद असे स्वरूप पदवीला देत, आशीर्वाद दिला. स्वामीजी हे सर्व अगदी रंगवून सांगतात.

स्वामीजींची ही पोतडी त्यांचे अनुभव आणि त्यातून क्षणाक्षणाने-कणाकणाने घडत गेलेले त्यांचे व्यक्तिमत्व तर आपल्यासमोर उलगडत नेतेच. पण त्यासोबतच अनेक अनुषंगिक विषयांना स्पर्श करीत आपल्यासमोर माहितीचा एक खजिनाही खुला करते. १५व्या प्रकरणात आश्रमातल्या एका भजन-नामसंकीर्तनाचा अनुभव सांगताना प्राचीन काळापासून चालत आलेल्या भारतीय शास्त्रीय संगीताबद्दल सामवेदापासूनची सविस्तर माहिती ते देतात. २४व्या प्रकरणात संन्यासाश्रम व्यवस्थेबद्दल अशीच विस्तृत सखोल माहिती येते. वाचक म्हणून स्वामीजींचे अनुभव जास्त चांगले समजून यायला त्यामुळे मदत होतेच. पण इथे-तिथे सहजपणे विखुरलेल्या छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये दडलेली काही वैशिष्ट्येही अशा  माहितीमुळे अधिक प्रकाशित होतात. एक छोटेसे उदाहरण द्यायचे तर जवळजवळ संपूर्ण पुस्तकभर अध्यात्मिक व्यवस्थेतल्या गुरु-शिष्य संबंधांबद्दल भाष्य येत रहाते. आधी वरती म्हटल्याप्रमाणे २४व्या प्रकरणात संन्यासाश्रम व्यवस्थेबद्दल माहिती येते. गुरुशिष्य ही याच अध्यात्मिक व्यवस्थेतली अतिशय मजबूत आणि महत्वपूर्ण व्यवस्था आहे हे आपल्या नजरेला येतेच. पण ४२व्या प्रकरणात आपल्या भौतिक व्यवस्थेपासूनचे तिचे वेगळेपण अगदी स्पष्ट होते. या प्रकरणात स्वामीजींनी आपल्याला ‘परमहंस’ ही पदवी मिळाल्याची हकीकत सांगितली आहे. परमहंसजी सांगतात की त्यांचे गुरुजी युक्तेश्वरगिरी यांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि संन्यासधर्माची आणखी वरची परमहंस ही पदवी दिली. ते म्हनाले, ‘तुझ्या पूर्वीच्या पदवीपेक्षा ही पदवी वरची आहे. पूर्वीची पदवी वापरण्याचे आता कारण नाही.’ गंमत म्हणजे स्वतः गुरुजी युक्तेश्वरजी या वेळीही गिरी याच श्रेणीत होते. अध्यात्मिक योग व्यवस्थेत गुरू हाच शिष्याचे सर्वस्व असतो. गुरू शिष्याला फक्त मार्गदर्शनच करतो असे नव्हे तर त्याची वेळोवेळी परीक्षाही करीत असतो आणि त्याचे स्थान ठरवीत असतो. तिथे महत्व गुरु या व्यक्तीला नव्हे तर गुरुतत्वाला असते. शिष्याला कोणते स्थान द्यायचे हे सर्वस्वी गुरूच ठरवतो आणि खऱ्या साधकाला या स्थान-मानाचे काही अपरूप नसते. योगानंदांचे गुरुजी त्यांच्या समोर होते आणि त्यामुळे त्यांना परमहंस ही पदवी देऊ शकत होते. पण युक्तेश्वरांचे गुरुजी लाहिरी महाशय देह सोडून गेले होते. त्यामुळे युक्तेश्वरांना वरची पदवी कोण देणार? पण या पदवी असण्या-नसण्याचे ना युक्तेश्वरांचे काही वाटले, ना योगानंदांना. गुरु ही व्यक्ती असते आणि ती शिष्याला परमपूजनीयही असते. पण गुरु या व्यक्तीच्या माध्यमातून एक तत्व कार्य करीत असते आणि हे व्यक्तीच्या लहानमोठेपणाचे नियम त्याला लागत नाहीत. तिथले नियम एका वेगळ्या पातळीवर आणि वेगळ्याच पद्धतीने काम करतात. ते जग आपल्या भौतिक जगापेक्षा सर्वस्वी वेगळे आहे. योगीकथामृत वाचताना हे अगदी ठसठशीतपणे आपल्या नजरेसमोर येते.

योगीकथामृत या पुस्तकाची दोन महत्वाची शक्तिस्थाने आहेत हे आपण सुरवातीला पाहिले. यापैकी ग्रंथकर्त्याचे जीवन आणि त्याचे पुस्तकातून होणारे दर्शन या शक्तीस्थानाचा सविस्तर परिचय आपण करून घेतला. एका योग्याचे जीवन सामान्य सांसारिक माणसापेक्षा निराळे असणार हे आपण गृहीत धरलेले असते. ते आपले गृहीतक बरोबरच होते याची खात्री या पुस्तकात स्वामीजींच्या जीवनाचे जे दर्शन आपल्याला होते, त्यावरून पटायला काहीच हरकत नाही. पूर्वजन्माच्या आठवणी, बालपणातल्या आवडीनिवडी, व्यक्तिगत स्वभाव या सर्वच अंगांनी परमहंसजींचे जीवन वेगळेपणाने उठून दिसते. व्यक्तिगत जीवनाची जी समाजमान्य चाकोरी आपण गृहीत धरलेली असते, ती उधळून लावतच स्वामीजींचे जीवन मार्गक्रमण करते. त्यामुळे स्वामीजी समाजात वेगळे दिसले तर त्यात काहीच आश्चर्य नाही. परंतू आपण योग्यांचे-साधकांचे एक चित्र आपल्या मनाशी गृहीत धरलेले असते. त्यात योगी म्हणजे समाजविन्मुख, जगाच्या कसल्याच भानगडींमध्ये रस नसलेला आणि सांसारिक गोष्टींपासून दूर असणाराच गृहीत धरलेला असतो. समर्थ रामदासांनी केलेला ‘शहाणे करून सोडावे, सकळ जन’ हा उपदेश फारसा मनावर न घेणारे हेच आपल्या मनातले त्यांचे चित्र असते. त्यामुळेच स्वामी विवेकानंदांसारखा अध्यात्माचा सामाजिक आशय प्राधान्याने आणि जोरकसपणे मांडणारा योगी हा एक अपूर्व योग आहे. परमहंस योगानंद हे तर स्वामी विवेकानंदांचे उत्तरकालीन वारस. त्यामुळे त्यांनी स्वामी विवेकानंदांचा वारसा आधीच पचवलेला होता. दुसरी गोष्ट म्हणजे स्वामी विवेकानंदांच्या कामाचा मुख्य भाग भारतातच झाला. परमहंसजींच्या कार्याचा मुख्य भाग अमेरिकेत घडला. त्यामुळे नव्या जगाचा वैचारिक वारसाही परमहंसजींना त्याच्या मूळ स्रोतापासूनच – अमेरिकेकडूनच - मिळाला होता. परिणामतः ते स्वामी विवेकानंदांच्याही एक पाऊल पुढे गेले आणि योगीकथामृतचे ते दुसरे शक्तिस्थान ठरले. उत्तरार्धात  त्याचाच सविस्तर परिचय आपल्याला करून घ्यायचा आहे.

Monday, 4 June 2018


दास डोंगरी राहातो

संतचरित्रे आणि संतचारित्र्ये हा अगदी सुरवातीपासून मराठी भाषेचा अभिमानास्पद वारसा राहिला आहे. १०व्या-११व्या शतकात मराठी ही स्वतंत्र भाषा म्हणून प्रस्थापित झाल्यापासून अखंड चालत आलेली ही संतपरंपरा आजही महाराष्ट्राच्या हृदयात अक्षय्य टिकून आहे. कित्येकदा तिच्या कामावरच नव्हे तर उपयुक्ततेवरही अनेक आक्षेप घेतले गेले. ही परंपरा वैराग्याचा आदर्श देणारी आहेजीवन निरुपयोगी आणि जग निरर्थक असल्याचा संस्कार करणारी आहेलोकजीवनाला पराङ्मुख आहे अशा अनेक आरोपांची राळ वेळोवेळी तिच्यावर उडवली गेली. परंतू हे सर्व जर खरे असेल तर असे असतानाही संतांना इतका प्रदीर्घ काळ जनसामान्यांच्या मनावर अधिराज्य करणे कसे शक्य झाले याचे उत्तर देण्याची जबाबदारी मात्र आरोप करणाऱ्यांपैकी कुणी कधी घेतली नाही. इतिहासाचा सामाजिक अंगाने अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनीच फक्त सतराव्या शतकात स्थापन झालेल्या मराठी राज्याच्या पायाभरणीत मराठी संताचे योगदान मान्य केले. असे योगदान देणाऱ्या संतांच्या मांदियाळीतले एक झगमगते नाव म्हणजे समर्थ रामदास आणि त्यांच्या आयुष्यावरची गो. नी. उपाख्य अप्पा दांडेकरांची चरित्रात्मक कादंबरी म्हणजे दास डोंगरी राहातो’.

सावधानहा शब्द कानी येताच लग्नाच्या बोहोल्यावरून ठोसरांच्या नारायणाने पळ काढला इथून अप्पांची कादंबरी सुरु होते आणि शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावर येऊन संपते. अप्पा समर्थांना नुसते रामभक्त म्हणून नव्हे तर मराठी राज्याचा पाया भरणारे संत म्हणून पाहतात. त्यामुळे समर्थांचे व्यक्तिमत्व उभे करताना अप्पांचे लक्ष समर्थांच्या सामाजिक रूपाकडे जास्त प्रमाणात आहे. परंतु हे रूप कसे सिद्ध होणार याचा विचारही आप्पांच्या मनात आहे. कादंबरी वाचताना हे सतत जाणवते. अप्पा परिणाम आणि पद्धत दोन्हीकडे पहाता आहेत.

समर्थांच्या अवताराचा काळ इ.स. १६०६ ते १६८२ हा होता. देवगिरीचे अखेरचे मराठी राज्य चौदावे शतक उजाडता उजाडताच बुडाले आणि महाराष्ट्र परवशतेच्या पाशात सापडला. या परकी सत्तेने निव्वळ लोकांचे सामाजिक-आर्थिक आयुष्य व्यापले नाही तर त्यांच्या सांस्कृतिक अस्तित्वालाच ग्रहण लावले. एक-दोन नव्हे तर साडेतीनशे वर्षे महाराष्ट्र हे सोसत होता आणि अशा अंधाऱ्या काळात ठोसर कुळात नारायणाचा जन्म झाला. विचक्षणहूड आणि कोणत्याही गोष्टीत झोकून देण्याच्या स्वभावामुळे नारायण लहानपणापासूनच वेगळा होता. त्यातच लहान वयात पितृवियोग त्याने सोसला. वडील गेल्यानंतर थोरले बंधू आणि आई यांनीच त्याला सांभाळले. रामभक्तीची मूळ प्रेरणाही थोरल्या बंधूंकडूनच मिळाली. नारायणाच्या लग्नाचा विचार घरात सुरु झाला तेव्हा तो ते फार गंभीरपणे घेत नव्हताच. पण खरोखरच पायात बेडी पडायची वेळ झाली तेव्हा मनाने आपली दिशा निवडली.

बोहोल्यावरून पळालेल्या नारायणाचे श्रीराम’ हे ध्येय ठरलेलेच होते. प्रश्न उपासनेचे स्थान निवडण्याचा होता. पुरश्चरणासाठी लोकांतापासून थोडे दूर असणारे टाकळी हे गाव नारायणाने निवडले. नाशिकपासून ते सहज चालत जाण्याच्या अंतरातच आहे. त्यामुळे पुरश्चरणाचा नेम संपला की नारायण मधुकरीला पाच घरे फिरे आणि जिव्हालौल्याला थारा न देता झोळी झटकून तीन प्रहरी नाशकाकडे निघे. उपनिषदेवेदांततर्कसांख्य-वैशेषिकगीताभाष्य अशा पाठांना तो आळीपाळीने हजर राही. रामभक्ती तर त्याला अतिप्रिय होतीच. पण कोणत्याही अभ्यासात स्वतःची चिकित्सक बुद्धी हरवून जाऊ नये यासाठीही तो दक्ष होता. नारायणाच्या या दक्षतेकडे अप्पा कटाक्षाने आपले लक्ष वेधतात. शांकरमठातला ऐतरेय उपनिषद पाठ संपल्यावर नारायण शंका विचारतो की अपक्रामन्तु गर्भिण्यः’ असे उपनिषदाच्या पोथीतच असेल तर त्याचा अर्थ इथपर्यंतचा भाग स्त्रियांनी ऐकला तरी चालेल असा होत नाही कायआणि पर्यायाने स्त्रियांनाही वेदपठण आणि वेदाध्ययनाचा अधिकार आहे असाच याचा अर्थ निघत नाही कायशिकवणारे शास्त्रीबोवा निरुत्तर होतात. कारण परंपरा केवळ शास्त्र मानत नाही. ती शास्त्राद्रुढिर्बलीयसी’ या नियमाला जास्त बांधील असते हे त्यांना माहीत आहे. पण ते कबूल करण्याची त्यांची इच्छा नाही. नारायणाची बांधिलकी मात्र रुढींशी नाहीफक्त शास्त्राशी आहे. ज्या रूढी समाजाचे सुयोग्य धारण करीत नाहीतत्या रुढींशी नारायणाला काडीमात्र घेणे-देणे नाही.

अप्पांना समर्थांची इतकी असोशीने ओढ असण्याचे कारण समाजधारणा या गोष्टीचे अप्पांनाही वेड आहे हेच आहे. समर्थांपासून अप्पांच्यापर्यंत आणखी तीन शतके गेली असल्याने अप्पांना जगी निंद्य ते सर्व सोडोनि द्यावेजागी वंद्य ते सर्व भावे करावे’ या शिकवणीपेक्षा सद्यःकाळी समाजाला हानिकारक ते सर्व सोडोनि द्यावे आणि जे जे उपयोगी ते सर्व भावे करावे हा विचार जास्त भावतो. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 'संगीत उत्तरक्रियानाटकात यशवंतराव नावाचे एक पात्र आहे. हा यशवंतराव अत्यंत तत्वनिष्ठ आणि तर्कनिष्ठ आहे. समुद्रपर्यटन हे त्याकाळी बंदी असलेले कृत्य केल्याबद्दल त्याला स्थानिक ब्रह्मवृंद प्रायश्चित्त देऊ पाहतोतेव्हा समुद्रपर्यटनबंदी हा समाजाला घातक असणाऱ्या रूढीचा भाग आहेअसा विचार मांडून यशवंतराव तुळशीपत्राचेही प्रायश्चित्त घेण्याचे साफ नाकारतो. अप्पाही याच विचाराचे समर्थक असल्यामुळे त्यांच्या कादंबरीत समर्थांचे हे समाजधारक रूपच अतीव प्रेमाने आणि आस्थेने येते. समर्थांचे काळाच्या पुढे असणे अप्पा प्रेमाने मांडतात.

समर्थांचा एकांतही लोकांसाठी होता हे अप्पांचे ठाम मत आहे. त्यामुळे लोकांपासून दूर रहाणे हे समर्थांच्या एकांताचे रूप नाही. लोककल्याणासाठी अंतर्दृष्टी मिळवणेत्यासाठी सतत अभ्यास आणि चिंतन करणे हे या एकांताचे स्वरूप आहे. दिसामाजि काहीतरी ते लिहावेप्रसंगी अखंडीत वाचीत जावे’ हे समर्थांनी आधी स्वतः वर्षानुवर्षे आचरणात आणले तेव्हाच लोकांना सांगितले. चिंतनाने विचारांची अवस्था जसजशी परिपक्व होत जातेतसतसा नारायणाचा आचार बदलतो. मधुकरी मागताना आधी दृष्टी जमिनीवर लावून उभे राहणारा नारायणकाहीतरी निर्णयावर येऊन पोचतो तेव्हा घरांमधले वातावरण समजून घ्यायला लागतोसंस्कारक्षम वयातल्या अपरिपक्व मुलांना बरोबर घेऊन काही नवीन करू पाहतोआपले म्हणणे लोकांना समजावू पाहतो.हे अपूर्व अप्पा तपशीलाने मांडतात. बायको पळवली अशी तक्रार सांगत रडणाऱ्याला समर्थांचा उपदेश मुळातूनच वाचायला पाहिजे. ते रामाचेच उदाहरण देतात. रावणाने सीता पळवली तेव्हा रामाने कुणालाही गाऱ्हाणे सांगितले नाही. राक्षसांचा राजा असलेल्या अर्तुबळीमहारथी रावणाच्या लंकेवर तो वानरे आणि अस्वलांच्या सहाय्याने चालून गेला. अप्पांची ही मांडणी पाहिली की मला नेहमी वैचारिकदृष्ट्या अप्पांच्या उलट्या टोकाला असलेल्या विंदा करंदीकरांची आठवण येते. विंदा लिहितात,
रामायण वाचुनिया नंतर - बोध कोणता घ्यावा आपण?
श्रीरामासम मिळता नायकवानरसुद्द्धा मारिती रावण
कमी आहे ती संकल्पाचीनिर्धाराची आणि सामर्थ्य एकवटू शकणाऱ्या अपार श्रद्धेची हे समर्थ लोकांच्या मनावर बिंबवू पाहतात. त्यासाठी श्रद्धासामर्थ्य आणि संकल्प असा गुरुमंत्र नुसता देऊन थांबत नाहीत तर ज्या हनुमंताचे सारे आयुष्य याच मंत्राचे जितेजागते उदाहरण होतेत्याची दैवत म्हणून स्थापना करतातत्याचे रूप कायम लोकांच्या डोळ्यांसमोर असावे म्हणून त्याचे स्तोत्र-आरत्या रचतात. परंतू उद्दिष्टांवर समर्थांचे लक्ष सतत असते. त्यामुळे ज्या क्षणी आजवर पाहिले ते पुरेसे नाही हे जाणवते त्याच क्षणी कुणाला पत्ताही न लागू देता समर्थ उत्तर भारताच्या यात्रेला निघतातजे आपणच बनवले आहे ते क्षणात सोडून द्यायला समर्थ जराही मागेपुढे पहात नाहीत.



नारायण ठोसर या मुलाचा रामदास बनला तो नाशिकच्या पाठशाळेत. पण साध्यासुध्या रामदासमधून समर्थ उदयाला आले ते उत्तर भारताच्या यात्रेत. यात्रेत मिळवलेल्या या सामर्थ्याचे दोन पैलू होते. एक होता अपार यातनांना थेट सामोरे जाण्याचा. यातना-वेदना-दुःख- फक्त आपले नव्हेपूर्ण देशाचेसर्व मानवतेचे. दुष्काळ! साऱ्या देशालाच खायला उठलेला दुष्काळअसा एक दुष्काळ की ज्याचे गाऱ्हाणे प्रत्यक्ष रामरायाशिवाय कुणाला सांगावेज्याचे वर्णन करताना समर्थांची वाणी कळवळून आली.
पदार्थ मात्र तितुका गेलानुस्ता देशचि उरला....
.... येणेकारणे बहूतालासंकट जाले...
माणसा खावया अन्न नाहीअंथरूण-पांघरूण तेही नाही...
...अखंड चिंतेच्या प्रवाहीपडिले लोक
आणि ही अस्मानी कमी पडली म्हणूनच की काय- तिच्या जोडीला एक सुलतानी-
देश नासला नासला उठे तोचि कुटी
पिके होताचि होताचि होते लुटालुटी
काळाकरितां जिवलगां झाली ताटातुटी
अवघ्या कुटुंबा कुटुंबां होत फुटाफुटी

१९४३-४४मध्ये बंगालमध्ये तीव्र दुष्काळ पडला. (याच दुष्काळावर हरिवंशराय बच्चन’ यांनी १९४६ साली बंगाल का काल’ हे काव्य लिहिले आणि पुढे १९७३मध्ये सत्यजित राय यांनी अशनि संकेत’ नावाचा सिनेमा बनवला.) विसाव्या शतकाच्या मध्यावरसुद्धा हा दुष्काळ एक महाभयंकर नैसर्गिक आपत्ती ठरला. मग सतराव्या शतकात लोकांचे काय झाले असेल याची कल्पनाही करवत नाही. माणसांच्या हालांना पारावार राहिला नसेल हे सहज समजू शकते. आणि तरीही जीवन थांबत नाही. जीवमात्रांची प्राणरक्षण ही एक अनैच्छिकनैसर्गिक प्रेरणा आहे. प्राणरक्षणासाठी त्यांना काही कारण लागत नाही. या राखलेल्या जिवाचे काय करायचे याचा विचार कधी त्यांना सुचतच नाही. कादंबरीतही अंमलदाराने ओझे वाहायला जबरदस्तीने नेलेली गाढवेओझे जागेवर पोचल्यावर काय केली याची माहिती मिळण्यासाठी शिपायांच्या हातापाया पडून आलेल्या कुंभाराला आपण पराकाष्ठेने वाचवलेल्या या जिवाचे काय करायचे याचा काही थांगपत्ता नव्हता. अप्पांचे वैशिष्ट्य हे की या प्रश्नाचे उत्तर तेव्हा स्वामींकडेही नव्हते हे त्यांनी कबूलच केले आहे. इतरेजनांकडे नसलेली एक गोष्ट मात्र समर्थांच्या जवळ होती. श्रद्धा- अतूटअविचल श्रद्धा आणि त्या श्रद्धेसाठी कोणत्याही थराला जाण्याचीकसलेहीदिव्य करण्याची तयारी. त्यामुळे सुभेदार कतलूखानाच्या शासनातही स्वामी निभावून जाऊ शकले. त्यांच्या देशभ्रमणाचे हेच तर प्रयोजन होते- सर्व देश ज्या यातनांचक्रातून जात होता त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणे. त्यांचे आंतरिक सामर्थ्य त्यांना यातूनच मिळालेले होते.

देशभ्रमणातून समर्थांनी मिळवलेल्या सामर्थ्याचा दुसरा पैलू होता साऱ्या समाजाच्या जीवनमरणाचा एक प्रश्न आणि त्याचे त्यांना जाणवलेले उत्तर. नाशिक-टाकळीपासून समर्थांची भ्रमणयात्रा सुरु आली.नाशिकहून निघालेले समर्थ विदिशेला पोचलेवेत्रवती ओलांडली. सागरदमोह मागे पडले. देश बदललावेश बदललेभाषा बदलली. पण धर्मश्रद्धापूजा-अर्चाराम-कृष्ण-महादेवांची मंदिरे यापैकी काहीही बदलले नाही. पण इतकेच नाही. आणखीही काही गोष्टी बदलल्या नाहीत. कमालीचे प्राणभयभ्याडपणाअसेल ते उचलून मागे न बघता पळणेधैर्याचा पूर्ण अभावमुजोरांपुढे वाकणे आणि अन्यायाला मुकाट्याने शरण जाणेआजचे मरण उद्यावर ढकलण्याची धडपड- सगळे अगदी तेच आणि तसेच. मग प्रश्न पडायला लागले.हे असे काहे लोक झुंजत का नाहीतकुठेही पाय रोवून सरळताठ उभे का रहात नाहीतसगळ्यांच्याच पाठीचे कणे असे मोडले काकथेच्या ओघात अप्पांनी एक सुंदर प्रसंग सांगितला आहे.एका गावी रामायणपाठ सुरु असतो. कथावाचक कथा रंगवून रंगवून सांगत असतो आणि श्रोते भक्तिभावाने ऐकत असतात. शेजारीच एक मोठी थोरली सराई (धर्मशाळा) असते. व्यापारीमाल वाहून नेणारे लमाणांचे तांडेइतर प्रवासी असे अनेक जण तिथे उतरलेले असतात. तेवढ्यात एक लुटारू टोळी तिथे चालून येते आणि सगळे दृश्य अचानक बदलून जाते. रामकथा सांगणारा कथेकरी पोथी उचलून पळ काढतो. लमाण आणि सौदागरांबरोबरचे संरक्षक नावापुरती झुंज देतात.पण खऱ्या अर्थाने लुटारूंना विरोध करणारा तिथे कुणीच नव्हता. फार कष्ट न पडता त्यांना लूट मिळाली. थक्क होऊन हे सगळे पाहणाऱ्या समर्थांना प्रश्न पडला की लुटण्यासाठी आलेले धावेकरी शंभर. ही माणसे चार-पाचशे. त्यांच्यापाशी शस्त्रे होती. यांच्यापाशीही ती होतीच. मग हे एकमेळ करून उभे ठाकले का नाहीतका होष्यमाणास सामोरे गेले नाहीतअसे कुस्करले गेले काय म्हणूनसारा देश पायाखाली घातल्यानंतर आणि असंख्य लोकांशी बोलल्यानंतर जे उत्तर त्यांच्या मनात साकार झाले ते होते विखुरलेपणा. हे माझे लोक गुणी आहेतत्यांच्यात कर्तृत्व आहेइच्छा आहेधमक आहे. पण ते सारे एकेकटे आहेत. स्वतःपुरते पाहणारे हजार-पाचशे लोक हे शंभर लुटारूंना उत्तर नव्हे.

समर्थांना त्यावेळी जाणवलेले हे उत्तर फक्त तेव्हाच्या भारताचेच नव्हे तर आजच्याही साऱ्या जगाचे चित्र आहे. प्रख्यात जर्मन कवी मार्टिन नीमोलर यांची एक अप्रतिम कविता आहे. ते म्हणतात-
First they came for the Communists
And I did not speak out - Because I was not a Communist
Then they came for the Socialists
And I did not speak out - Because I was not a Socialist
Then they came for the trade unionists
And I did not speak out - Because I was not a trade unionist
Then they came for the Jews
And I did not speak out - Because I was not a Jew
Then they came for me
And there was no one left - To speak out for me.
अत्याचारी लोकांची मुख्य शक्ती त्यांची शस्त्रे ही नसते. बहुसंख्य लोकांचा विखुरलेपणा हे त्यांचे मुख्य भांडवल असते. समर्थांना हे जाणवले त्याला आता अर्धे सहस्रक उलटून गेले. पण आजचे चित्र तरी काय वेगळे आहेलंडनपॅरिसटोकियोस्पेनपाकिस्तानभारतसिरीयाइराक- सर्वत्र तेच. आक्रमक मूठभरजनता अनेकपट. पण आक्रमकच जोरात आणि जनता फक्त हैराण.

समर्थांना जाणवले की यात या जनतेचा दोष फार थोडा आहे. पायापुरते पाहणे हा दोष कसा म्हणावापायापुरते नको तर कुठे आणि कसे पहायचे हे यांना कुणी कधी सांगितलेच नाही आहेी. माणसे अयोग्य नाही आहेतत्यांचा योग्य जागी अचूक वापर करून घेणारा कुणी नाही आहे.
अमन्त्रम् अक्षरं नास्तिनास्ति मूलमनौषधम् ।
अयोग्यः पुरुषो नास्तियोजकस्तत्र दुर्लभः ||
हवा आहे योजक. बळाला तोटा नाही. हवा आहे रचनाकार. पण तो येणार कुठून आणि कसाएका शतकापूर्वी येऊन गेलेल्या संत एकनाथांनी बयादार उघड’ अशी निकराची हाक का दिली हे स्वामींच्या लक्षात आले आणि मग त्या बयालाच त्यांनी थेट रोखठोक गाऱ्हाणे घातले-
तुझा तू वाढवी राजा। शीघ्र आम्हाचि देखता
दुष्ट संहारिले मागे। ऐसे ऊदंड ऐकतो
परंतु रोकडे काही। मूळ सामर्थ्य दाखवी
कथा-पुराणांतून ऐकलेल्या राक्षस आणि दैत्यांच्या संहाराच्या कथांमध्ये समर्थांना काहीच रस नव्हता. मला आज तू काय देणार आणि हा दुर्लभ असणारा योजक कधी जन्माला घालणार’ हे ते जगन्मातेला विचारत होते. स्वतःसाठी एक काडीही न मागणाऱ्या या भक्ताची प्रार्थना बयेलाही ऐकावीच लागली आणि साऱ्या जगाला ललामभूत ठरू शकणारा इतिहास महाराष्ट्रात घडला.

मराठी राज्याच्या स्थापनेचा इतिहास हा महाराष्ट्राचा मानबिंदू आणि अभिमानबिंदू. शिवछत्रपतींच्या या इतिहासावर अप्पांचेही अपार प्रेम. राजांच्या स्वराज्यस्थापनेला आणि पुढेही राज्याच्या संरक्षण-संवर्धनाला समर्थांचा सक्रीय आशीर्वाद होता. साहजिकच दास....मध्येही मराठी राज्याच्या या इतिहासाला उठाव येतो. हे राज्य जोपासण्यातला समर्थांचा हात सहजच दिसू शकतो. त्यांची बद्रीकेदारची यात्रा ही जणू याच कामाची पूर्वतयारी होती. मुलांची मने कशी घडवावीतशरीरावर आपला ताबा असावा – शरीराचा आपल्यावर नव्हे हे कसे व्हावेकुणाबरोबर बोलताना कशी भाषा कामाला येतेदैवाच्या हवाल्याने जीव जगवणारे हे लोक रामोपासनेकडेबलोपासनेकडे कसे वळवावेतकसे कुणाला आपल्या नादी लावावे आणि कुणाचा नाद सोडून द्यावाविवेके सदा स्वस्वरूपी कसे रहावे आणि कसा यातनांची कितीही परमावधी झाली तरी मनी राम चिंतीत जावा तो कसा याचा सगळा स्वाध्याय या उत्तरयात्रेत समर्थांनी केला होता. आता महाराष्ट्रात त्याची अंमलबजावणी सुरु झाली. जनसामान्यांना आपले वाटणारे राज्य इथे आकाराला येत होते. त्याचा पाया भगवंताच्या अधिष्ठानाने बळकट करायचे समर्थांनी आरंभले.
मुख्य हरिकथा निरूपण दुसरे ते राजकारण
तिसरे ते सावधपण | सर्वांविषयी
याचे समूर्त प्रात्यक्षिक समर्थांनी महाराष्ट्राला दाखवले. अप्पांच्या कादंबरीचा अर्धा भाग समर्थांच्या याच कार्याला वाहिला आहे आणि अप्पांनी हे अतिशय डोळसपणे केले आहे. मुख्य हरिकथा निरूपण हे खरे. पण या क्रमामागे विवेक पाहिजे. राजकारण पूर्ण बुडता उपयोगी नाही. राजकारण सशक्त रहावे याचे तारतम्य राखलेच पाहिजे. तिथे जर नौका बुडाली तर हरिकथा निरूपण तरी कसे चालेलकुणाच्या बळावरतेव्हा नेमून दिलेल्या कामाचे धारे शिस्तीने सांभाळले पाहिजेत हे खरे. पण आपले राज्य स्वराज्य- टिकणे अत्यावश्यक आहे हे मनात पक्के पाहिजे. सर्वनाशे समुत्पन्ने अर्धं त्यजन्ति पण्डिताः’ हे तर आम्हाला प्राचीन काळापासून माहित आहे. पण कोणत्या वेळी कोणत्या अर्ध्या भागाचा त्याग करायचा हे देशकालपरिस्थिती पाहून ठरवायचे असते. केव्हा अस्तित्वाचा प्रश्न सोडवण्यासाठी तत्वाला मुरड घालायची आणि केव्हा तत्वांसाठी पंचप्राणही पणाला लावायला मागेपुढे पहायचे नाही हे समजणे हेच समर्थांचे शिक्षण होते. अप्पा समर्थांचे हे कार्य नेमक्या शब्दांत नेटकेपणाने मांडतात. मराठी मुलुखातल्या सगळ्या घडामोडींचे तपशील राजांना आणि स्वामींना कुठूनकसे मिळत होते याचे अप्पांनी या कादंबरीत रेखाटलेले चित्र मनोरम तर आहेचपण डोळे उघडणारेही आहे. अचूक माहितीसूक्ष्म तारतम्य आणि नीरक्षीर विवेक याचे जागते उदाहरण अप्पा इथे उभे करतात.

शिवछत्रपतींचा राज्याभिषेक हा समर्थांसाठी कृतार्थतेचा क्षण होता. त्या अतीव रोमहर्षक अनुभवाचे सार्थ वर्णन करण्यासाठी एकनाथांच्या प्रेरणांचे धागेदोरेच पुढे चालवणाऱ्या समर्थांना नाथांनीच बनवलेला चपखल शब्द आठवला- आनंदवनभुवन’. राज्याभिषेकाला समर्थ स्वतः उपस्थित नव्हते. पण त्या प्रसंगाचे संपूर्ण वर्तमान कानी आल्यावर त्यांना कसे वाटले असेल याचे अप्पांचे वर्णन अतिसुंदर म्हणावे असे आहे. तसेच दुसरे वर्णन शाहिस्तेखानाच्या पारिपत्यासाठी महाराज स्वतः निवडक लढावांसह थेट लाल महालात शिरले यावर समर्थांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया सांगतानाचे आहे. महाराजांच्या निर्णयासाठी समर्थ आगोचार’ असा शब्द वापरतात. या शब्दात कौतुकअभिमानकाळजी अशा अनेक छटा सहज सामावतात.

दास डोंगरी राहातो’ ही अप्पांची कादंबरी मला आवडते हे खरे. पण याचा अर्थ इथे सर्व काही अगदी साजिरेगोजिरे आहे असे नव्हे. कधीकधी वाटते अप्पा गोष्टी अतीच सोप्या करीत जातात. अप्पा स्वतः सरळसोट निर्मळ स्वभावाचे. त्यामुळेच ते सगळ्या गोष्टी सोप्या करतात की काय समजत नाही. समर्थांच्या उत्तर भारताच्या यात्रेत अप्पा एक प्रसंग वर्णन करतात. समर्थांची गाठ वाटमाऱ्यांच्या एका टोळीशी पडते. बरोबरचे यात्रेकरू प्राणभयाने पळू पाहतात. पण समर्थ त्यांना थांबवतात आणि थेट वाटमाऱ्यांच्या नायकाशी बोलतात. स्वधर्म आणि धर्माचे कर्म यांची त्याला आठवण करून देतात. त्यामुळे वाटमाऱ्यांचे हृदय परिवर्तन होते आणि ते वाटमारी सोडून जंगलातून जाणाऱ्या वाटसरूंना सुरक्षित जंगलापार पोचवण्याचे काम अंगिकारतात. प्रसंग मोठा हृदयस्पर्शी आहे. पण वाचताना मला काही प्रश्न पडतात. वाटमाऱ्यांनी तर त्यांच्या उपजीविकेचे साधनच त्यागले. आता त्यांच्या पोटापाण्याचे कायघोड्याने गवताशी मैत्री करायला हरकत नाही. पण मग घोड्याची उपजीविका कशी चालणारआता हे वाटमारे नेमके काय करतीलशेती किंवा शिलेदारी हीच दोन उत्तरे शक्य आहेतपण यांपैकी काहीही त्यांनी निवडले तरी मग हे वाटसरूंना जंगलापार पोचवण्याचे काम ते कसे करणारआणि स्वतः त्यांच्यावर धाडी येतीलइतर सर्वसामान्य माणसांसारखे तेही निर्नायकी अवस्थेला सामोरे जातील तर त्यांचे धैर्य आणि हे अंगीकृत कार्य किती काळ चालणारआपल्यासमोर यांची काहीही उत्तरे येत नाहीत. अप्पांकडे याची काही उत्तरे असावीत असे वाटतही नाही. मग इथे गांधीजींची आठवण आल्याशिवाय रहात नाही. महात्मा गांधी एकदा रवीन्द्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतनात गेले होते. सकाळी सूर्योदयाआधी गांधीजी आणि टागोर फेरफटका मारायला गेले. हलके हलके उजाडू लागलेले होते. झाडांवर पक्षी किलबिलत होतेवाऱ्याच्या मंद झुळुका वाहात होत्या. त्या शांतथंड वातावरणाने सारा आसमंत आनंदी झाल्यासारखा वाटत होता. कविराज त्या वातावरणाने उल्हासित होत गांधीजींना म्हणाले, ‘बापूतुमच्या सत्याग्रहाच्या तत्वज्ञानात पक्षांच्या या गीतांना काय स्थान आहेकाही आहे का?’ महात्म्याने तितक्याच सहजतेने कविराजांना उत्तर दिले, ‘अहो स्थान काय म्हणताहे पक्षांचे गाणे सत्याग्रहाच्या तत्वज्ञानाचे अधिष्ठानच आहे. त्यांच्या गाण्यासाठीच तर ते तत्वज्ञान आहे. फक्त सत्याग्रहाचे तत्वज्ञान पक्षांच्या गाण्यापासून सुरु होत नाही. सकाळी उठून त्यांना मोकळेपणाने गाण्याची तान घ्यावीशी वाटावी यासाठी आदल्या रात्री झोपताना त्यांची पोटे भरलेली असावीत याचीही काळजी सत्याग्रहाचे तत्वज्ञान घेते.’ अप्पांच्या कादंबरीतला प्रसंग मला तीव्रतेने याचीच आठवण करून देतो. वाटमारे नव्या सात्विक जीवनक्रमात टिकतील याची काहीच हमी अप्पा देत नाहीतदेऊ शकत नाहीत.

दास डोंगरी राहातो’ वाचताना ही कादंबरी आहे याचे भान विसरायचे नाही. समर्थांच्या आयुष्याची ही ऐतिहासिक मांडणी नव्हे. हे समर्थांचे अप्पांना भावलेलेअप्पांनी निर्माण केलेले रूप आहे. अप्पांना समर्थ कसे असावेत असे वाटत होते याचे हे दर्शन आहे.या अप्पांच्या मताला ऐतिहासिक आधार कुठे आणि किती हा प्रश्न इथे गैरलागू आहे. हे समर्थ रामदासांचे इतिहासात सिद्ध होणारे रूप नव्हे. मग एक प्रश्न उरतोच. समर्थांचे हे रूप ऐतिहासिक म्हणता येत नाही. अप्पा अनेक गोष्टी जरा जास्तच सोप्या करीत जातात हेही दिसते. तरीही दास डोंगरी राहातो’ मला पुन्हा पुन्हा वाचावाशी का वाटते?

दोन कारणे मला दिसतात. एक कारण असे की कादंबरीत समर्थांचे व्यक्तिमत्व उभे करताना अप्पांनी अपार मेहनतीने जनमानसाची मशागत करणारा’ हे त्यांचे रूप नेमके पकडले आहे. केल्याने होत आहे रेमराठा तितुका मेळवावाउदंड जाहले पाणीशिवरायास आठवावे जीवित तृणवत मानावेजनांचा प्रवाहो चालिला म्हणजे कार्यभाग आटोपलाशाहाणे करून सोडावे सकळ जन’ असे समर्थांचे अनेक उद्गार आपल्याला अगदी लहानपणापासून माहिती असतात. पण त्या सगळ्या विचारांना सामावून घेणारे एक व्यक्तिमत्व अप्पांच्या कादंबरीत आकार घेताना दिसते. आणि हे व्यक्तिमत्व नुसते उपदेश करीत नाही. काय हवे आहे ते सांगताना ते कसे कमवायचेजमवायचे हेही ते सांगतात. रामाचा दास म्हणवणाऱ्या समर्थांनी रामापेक्षा हनुमानाची मंदिरेच जास्त संख्येने उभी केली याचे काहीतरी कारण तर आहेच. शक्तीचा सुयोग्य वापर करणारे आणि बुद्धी वापरून अचूक कार्य साधणारे एक दैवत समर्थांनी मारुतीच्या रूपाने महाराष्ट्राला दिले. हनुमंताची उपासना इतक्या प्रदीर्घ प्रयत्नांनी उभे करण्याचे कारण रामदासां शक्तीचा शोध’ घ्यायचा होता हेच आहे. मराठी संत समाजविन्मुख होते या आक्षेपाला अप्पा इथे एक सणसणीत उत्तर देताना दिसतात. मला हे उत्तर आवडते. आणि हे सगळे प्रयत्न जेव्हा फळाला येत असतातशिवछत्रपती जेव्हा सिंहासनाधीश्वर होत असतात त्या क्षणी मात्र समर्थ तिथे नसतात. समाजाला आपले सर्वस्व देणारा हा अवलिया स्वामी अंतरंगी संपूर्ण निस्संगविरक्त आहे. साऱ्या समाजाचा संसार तो मांडतो. पण असला अप्रूपाचा संसार मांडणारा स्वतः मात्र एकांतप्रिय आहे. धर्मयज्ञाची मुहूर्तमेढ तो रोवतो. पण समारंभाच्या वेळी मात्र दास डोंगरी राहातोयात्रा देवाची पाहातो.समर्थांच्या व्यक्तिमत्वातला हा निस्संग वैराग्याचा हृदयंगम धागाही अप्पांनी अचूक हेरला आहे. मला हे फार आवडते आणि समाधानाचे वाटते.

एक दुसरेही लहानसे कारण आहे. आपल्याला गुंतागुंतीच्या वाटणाऱ्या असंख्य गोष्टी या कादंबरीत अप्पा सोपेपणाने मांडतात असे वर म्हटले आहे. आयुष्य हे आपल्याला वाटते तितके गुंतागुंतीचे नाही हा मनाला एक मोठाच दिलासा असतो. अप्पा हा दिलासा फार मोकळेपणाने देतात. आपल्या लेखनाने वाचणाऱ्याला शांत वाटावेदिलासा वाटावा याहून वेगळे अप्पांना तरी काय हवे असणार?