छत्रपती शिवाजी आणि त्यांचे गुरू
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवताच आहे. छत्रपती महाराष्ट्राचे आणि महाराष्ट्र छत्रपतींचा असे हे भक्कम अद्वैत आहे. त्यामुळे सामान्यपणे महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी हा वादविषय होऊच शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. पण बहुधा हीच गोष्ट कुठेतरी या सगळ्या विषयाला नजर लागायला कारणीभूत झाली असे दिसते. त्यामुळे 'छत्रपती नाहीत तर नाहीत, त्यांच्या गुरूंबद्दल भांडू' यावर एकमत झाले असावे अशा पद्धतीने वादंग सुरु झालेले दिसते. आजचे स्वार्थ आणि जातीय राजकारणाच्या गरजा यांच्यामुळे सुरु झालेले हे वादंग एकीकडून अस्थानी तर दुसरीकडून अडाणी आहे हे मात्र उघड दिसते आहे.
एक राजकारणी, एक राजा आणि एक नेता या सर्व अंगानी शिवाजी भोसले या पुरुषाचे मूल्यमापन अनेक जणांनी आपापल्या पद्धतीप्रमाणे आणि मगदुराप्रमाणे केले आहे. या सर्वांच्या प्रतिपादनात अनेक ठिकाणी वेगळेपणा आहे आणि अनेक तपशिलाच्या जागा प्रत्येकाने वेगवेगळ्या प्रकारे दिल्या आहेत. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेबद्दलचा प्रसंग घडला की नाही यावर दुमत आहे. शेलारमामा हा संपूर्णपणे काल्पनिक आहे यावर आता सामान्यपणे एकमत आहे. पण तरीही या मामाने मामा बनवलेले लोक अजूनही
आहेत. अशा अनेक गोष्टींची एक जंत्री देता येईल. पण प्रवृती म्हणून शिवाजी या व्यक्तीबद्दल मात्र फार मतभेद नाहीत ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी. वर दिलेले उदाहरणाच पुन्हा घ्यायचे तर कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेबद्दलचा प्रसंग घडला की नाही यावर दुमत आहे; पण असा प्रसंग छत्रपतीच्या आयुष्यात जर आला असता तर तो याच दिशेने गेला असता यावर सामान्यपणे एकमत आहे. असेच एकमत शिवाजी राजांचे कर्तृत्व युगप्रवर्तक होते याही गोष्टीवर आहे. शिवाजीवर अनेक इतिहासकारांनी आणि विचारवंत लेखकांनी लेहिले आहे आणि त्याच्या जीवनाचे अनेक पैलू उलगडून दाखवले आहेत. सर्व लेखकांची नावे देत न बसता त्यातले महत्वाचे मुद्दे संक्षेपाने पाहता येतील. मुद्दाम ही गोष्ट पुन्हा सांगितली पाहिजे की या सर्व विवेचनात माझा वाटा अतिशय क्षुल्लक आहे. जागेच्या सोयीसाठी सर्व संदर्भ आणि नावे दिलेली नाहीत.
शिवाजीच्या आयुष्याचा अतिशय महत्वाचा घटक त्याचे नियोजन हा आहे. युद्ध, लूट, तह, स्वाऱ्या हे सारे तर
नियोजनबद्ध आहेच आहे. पण बऱ्याच
ठिकाणी माघार घेणेही नियोजनबद्ध असल्याचे दिसते. या नियोजनबद्धतेची सुरवात स्वराज्याच्या स्थापनेपासूनच झालेली दिसते. पुण्याजवळचा, विजापूरच्या वाटेवरचा, लक्ष ठेवायला आणि मदत पोचवायला सोपा आणि किल्लेदार ओळखीचा
असल्याने जरा सहज असा पुरंधर
किल्ला ताब्यात घेणे, त्याचा अतिशय योग्य वापर करून आदिलशाही फौजांना टक्कर देणे, सिंहगड ताब्यात घेणे आणि मग प्रकरण फार वाढू न देण्यासाठी सिंहगड परत करणे हे सारे कसे सूत्रबद्ध दिसते. दीर्घकालीन योजनेच्या आधारे असे नियोजन ही शिवाजीपर्यंत हिंदू राजांची पद्धत नाही. अकराव्या शतकातल्या सिंधच्या राजा दाहीरपासून सोळाव्या शतकातल्या विजयनगरच्या रामराजापर्यंत कोणीही याला अपवाद नाही. हे सर्व राजे मुख्यतः प्रतिक्रिया देणारे आहेत, पश्चात बुद्धीचे धनी
आहेत. आपण होउन पुढाकार घेणे, शत्रूंबद्दलचेअनुभव जमेला धरून त्याचे नियोजन करणे अशा काही गोष्टी गोष्टी त्यांच्या आसपासही येत नाहीत. शिवाजी या बाबतीत पूर्णपणे स्वतंत्र आणि परंपरेपेक्षा वेगळा आहे. त्याला कुणी पूर्वसूरी नाहीच आहे. हीच गोष्ट दगा, धोका या बाबतीत झाली आहे. दगे द्यायचे, तह मोडायचे आणि आक्रमण करायचे ते फक्त शत्रूने; आपण दगा खावा, तो देणाऱ्या शत्रूबद्दल वांझ चीड मनात ठेवावी आणि दग्याने केलेल्या आक्रमणातून शिल्लक राहिलोच तर पुन्हा पुढच्या वेळी दगा खावा या मार्गाने भारतीय राजांची वाटचाल शिवाजी आधी शेकडो वर्षे चालली होती. साधारण रीत अशी की एतद्देशीय राजे चैन-विलासात मग्न असत. शत्रू त्यांच्यावर चाल करून येणार, तो शे-पन्नास मैल आत आल्यावर हे लोक जागे होणार. त्यामुळे लढाई यांच्याच प्रदेशात. कोणीही जिंको आणि कोणीही हारो, यांचा प्रदेश तर बरबाद होणारच. आपण आक्रमण करणे वगैरे तर फारच लांबच्या गोष्टी. त्यामुळे लढाईत विजय मिळाला तरी नुकसान आहेच. म्हणजे विजय मिळाला तर कमजोर होऊन जिवंत राहायचे पण पराभव झाला तर समूळ नाश हीच भारतीय राजांची तोपर्यंतची पद्धत होती. पण शिवाजीपासून शत्रूंनी दगा खाण्याची सुरवात होते. शिवाजी दगा देतो ते शत्रूला बेसावध पकडायला. दगा हा शेवट नव्हे, ती सुरवात. शत्रू भानावर येण्याच्या आत शिवाजीने आक्रमण करून नवीन प्रदेश राज्याला जोडलेला असायचा. त्यामुळे शत्रूचा जोर खरेच जास्त असेल तर या नव्याने जिंकलेल्या प्रदेशातला काही भाग परत देऊन तह होतो. अफझलखानाच्या वधानंतर १८ दिवसात शिवाजीने वाई ते पन्हाळा हा पट्टा हस्तगत केला आणि जौहरला वाकुल्या दाखविल्यानंतर शाहिस्तेखानाशी लढण्यावर लक्ष द्यायला पाहिजे म्हणून पन्हाळा किल्ला आदिलशाहीला देऊन त्यांच्याशी तह केला. आता हा असा सल्ला शिवाजी कुणाकडून घेणार? होतेच कोण अशा गोष्टी शिवाजीला शिकवायला?
शिवाजीचे अद्वितीयत्व हा अनेक गोष्टींचा एक समुच्चय आहे. त्याचा स्वतःचा मृत्यू झाला १६८०मध्ये. संभाजीचा मृत्यू १६८९चा तर राजारामाचा १७००मध्ये. त्यामुळे १७०२-०३ची परिस्थिती कशी आहे पहा. शिवाजी-संभाजी-राजाराम मरण पावले होते, येसूबाई आणि संभाजीचा मुलगा शाहू मोगलांच्या कैदेत होते आणि महाराष्ट्रात ताराबाई आणि काही सरदार फक्त होते. पण याही परिस्थितीत कोणी शरण जाण्याचा फार गंभीरपणे विचार केल्याचे दिसत नाही. ज्याला जसे सुचेल तसा तो लढत होता. याच स्थितीला उद्देशून औरंगझेबाने त्याचे ते सुप्रसिद्ध उद्गार ‘इथे गवताला भाले फुटतात असे दिसते’ काढले होते. हे सर्व लोक मिळेल तसे मिळेल तिथे कशासाठी लढत होते? शिवाजीच्या नावासाठी आणि रयतेच्या राज्यासाठी हेच या प्रश्नाचे उत्तर नाही काय?
वर केलेल्या चर्चेवरून राजा म्हणून शिवाजीकडे काही असामान्य गुणविशेष होते हे पुरेसे स्पष्ट झाले आहे. पण ज्या वादाच्या संदर्भात हा प्रश्न आपण उपस्थित करतो आहोत, त्याचाच संदर्भ पुढे चालवायचा तर फक्त हे गुणविशेष आणि शिवाजीचे असामान्यत्व दाखवून देणे पुरेसे नाही. त्यामुळेच इथे हेही स्पष्टपणे म्हणावे लागेल की या सर्व गुणांच्या क्षेत्रात, खुद्द शिवाजीचा पिता शहाजी किंवा त्याचे आजोबा मालोजी आणि लखुजी हेही त्याचे पूर्वसूरी ठरू शकत नाहीत. शहाजी हा शिवाजीची पार्श्वभूमी आहे हे उघडच दिसते. पण शिवाजी अशा पार्श्वभूमीवरही उठून दिसण्याइतका कर्तृत्ववान आहे हेही स्पष्ट आहे आणि शिवाजीची बरीचशी विचारप्रक्रिया ही त्याची स्वतःची आहे हेही मान्य करावे लागते.
आणि हे सर्व मान्य केल्यानंतरही मानवी जीवनाच्या सर्व मर्यादा शिवाजीलाही लागू आहेत हे विसरता येत नाही. अबिबी बिकिला, जेसी ओवेन्स, कार्ल लुईस आणि ह्युसेन बोल्ट हे जगातले त्यांच्यात्यांच्या काळातले सर्वोत्कृष्ट धावपटू होते यावर वाद असण्याचे काहीच कारण नाही. पण त्या अवस्थेत पोचण्याआधी त्यांना कुणीतरी हाताला धरून चालायला शिकवलेच होते हेही विसरू नये. आजचा सचिन तेंडूलकर आपोआप तयार झालेला नाही. तसेच शिवाजीला न्यायाच्या तत्कालीन कल्पना, राज्यकारभाराची अंगे, राजाच्या कामाच्या मर्यादा आणि राजाकडून अपेक्षा, समकालीन सामाजिक आणि राजकीय परिस्थिती या सर्वच गोष्टींबद्दल कुणीतरी सांगितले असेलच ना?
औरंगजेब दीर्घकाळ दक्षिणेचा मोगल सुभेदार असल्याने इथल्या परिस्थितीचा चांगला माहितगार होता. त्याच्या मते दक्षिणेत जमीन महसूल, न्याय आणि कज्जे-खटले या क्षेत्रात दादोजी कोंडदेव हा फार कर्तृत्ववान माणूस आहे. शिवाजीच्या सदरेवर सारे आयुष्य काढलेल्या या माणसाकडून शिवाजी काहीच शिकला नसेल असे मानायचे का? तसे मानले तर ते शिवाजीचे कर्तृत्व नव्हे, अपयश ठरेल याचे भान आपण असू द्यावे. आणि इतका अप्रत्यक्ष वळसा तरी कशाला घ्यायचा? १६६५ला मिर्झाराजे जयसिंग यांच्यासमोर शरणागती पत्करावी लागल्यावर शिवाजीला एकदा आग्र्याला जाऊन यावे लागले हा इतिहास आपण सर्व जण जाणतो. औरंगजेबाच्या कैदेतून सुटून आल्यानंतर लगेचचा काही काळ शिवाजीने स्वस्थ बसून काढला. त्याला मधल्या काळातल्या सर्व घटनांचे धागेदोरे जुळवून घ्यायचे होते. या मोकळ्या वेळात त्याने जमीन महसुलाच्या आणि कर वसुलीच्या आपल्या मनातल्या कल्पना मांडल्या आणि अंमलातही आणल्या. या महसुली सुधारणा आणि दादोजी कोंडदेवाच्या कारभारातले महसुली नियम आणि कायद्यांचे स्वरूप या दोन गोष्टीत फारसा फरक दिसतच नाही. दादोजीच्याच कल्पना परिस्थितीनुरूप किंचित सुधारून शिवाजीने अंमलात आणल्या हे अगदी स्पष्ट दिसते. शिवाजी सदरेवर बसून दादोजीकडून बरेच काही शिकला ही गोष्ट अगदी उघड स्पष्ट दिसते.
महसुलाचे कायदे, नियम आणि दर यांचे हे उदाहरण यासाठी दिले की या गोष्टीवर कागदोपत्री पुरावा दाखवता येतो. पण ज्याला स्पष्ट नोंदीचा प्रत्यक्ष पुरावा एका मर्यादेतच देता येईल अशा आणखी अनेक गोष्टी सांगता येतील. शिवाजीला लिहिणे-वाचणे शिकवायला शिक्षक नेमले होते अशी नोंद दाखवता येते. पण शिवाजी त्यांच्याकडून नेमके काय काय शिकला आणि लिहिणे-वाचणे त्याला कितपत जमत होते हे प्रत्यक्ष पुराव्याने कसे दाखवणार? तीच गोष्ट युद्धकलेबद्दलची. या क्षेत्रातल्या शिवाजीच्या कर्तृत्वाची काही उदाहरणे फारतर दाखवता येतील. पण ती गोष्ट कुणाकडून आणि कशी शिवाजीने आत्मसात केली हे सिद्ध करायला काय मार्ग आहे? प्रत्यक्ष पुरावा सहजासहजी अशा व्यवहारांमध्ये मिळताच नाही.
या सर्व विचारात आणखी एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. ज्या क्षेत्रात शिवाजीचे कार्य पुराव्याने सिद्ध आहे आणि जे प्रत्यक्ष आणि थेटपणे शिवाजीशी नेऊन भिडवता येते अशा गोष्टींमध्ये ही परिस्थिती आपल्याला दिसते. पण राजा म्हणून अनेक गोष्टींचे शिवाजीशी असे थेट नाते दाखवता येणार नाही. तिथे आपण काय करणार आहोत? लाल महालावर छापा घालण्याचा किंवा कार्तलबखानाला उंबरखिंडीत गाठण्याच्या योजनेचा तपशील नेमका कुणी ठरवला हे कळणार तरी कसे? शिवाजीच्या नेतृत्वाचा आवाका आणि अनपेक्षित पण हमखास यश देणारे डाव टाकण्याचे त्याचे इतर ठिकाणाचे कौशल्य पाहूनच आपण निर्णय देणार ना? एका माणसाच्या असण्याने आणि नसण्याने परिस्थिती आणि परिणाम या गोष्टींवर जो फरक पडतो तोच त्या माणसाच्या दर्जाकडे बोट दाखवतो. शिवाजीच्या असण्याने इतिहासाच्या प्रवाहाची दिशाच बदलली गेली ही गोष्ट नाकारताच येत नाही. या परिणामाला कारणीभूत असणाऱ्या शिवाजी या माणसाचे मूल्यमापन काही प्रमाणात तरी परिणाम पाहूनच करावे लागते. जी गोष्ट राजकीय कर्तृत्वाच्या बाबतीत खरी आहे तीच इतर घटना आणि तपशील यांच्याही बाबतीत खरी आहे. महसुली व्यवस्था आणि कायदे यात दादोजी कोंडदेव शत्रूंनी दाद द्यावी इतक्या दर्जाचा तज्ञ होता. शिवाजीच्या व्यवस्थेत जर या गोष्टी तत्कालीन सत्तांच्या तुलनेत ढळढळीतपणे उठून दिसत असतील तर त्याचे श्रेय मोठ्या प्रमाणावर दादोजीकडे जायला पाहिजे हे सहज स्पष्ट असायला हवे.
मुद्दा इतकाच, की शिवाजीसारखा युगपुरुष या दर्जाचा माणूस जवळजवळ सर्वच क्षेत्रात असामान्य असतो. पूर्वसूरींपेक्षा त्याचे वेगळेपण हेच त्याला असामान्यत्व प्राप्त करून देते. पण या असामान्य मानवालाही इतर सर्वसामान्यांप्रमाने
काही जडणघडणीच्या काळातून जावेच लागते. या त्याच्या घडणीत अनेकांचा वाटा असतोच असतो. त्यांच्यामुळेच हा असामान्य ‘युगपुरुष’
ठरला हे म्हणणे अतिशयोक्तीचे असेल तर त्यांचा या असामान्याच्या बनण्यात काहीच वाटा नाही, ते याचे गुरु किंवा शिक्षक नव्हेतच, हे म्हणणे करंट्या संकुचितपणाचे आहे. दत्तात्रेयांना २४ गुरु होते हेही खरे आणि दत्तात्रेय स्वयंभू होते हे ही खरे. अद्वितीय किंवा युगप्रवर्तक या जीवनात अनुभवाला येणाऱ्या गोष्टी आहेत. पण म्हणून त्यांचे अर्थ पूर्णपणे ‘आहेच’
आणि ‘नाहीच मुळी’ अशा दोन्ही टोकांना खेचण्यात आपण आपल्याच अडाणीपणाचे प्रदर्शन करत असतो हे लक्षात ठेवणे बरे. सत्य या दोन्ही टोकांच्या मध्ये कुठेतरी आहे. स्वतः शिवाजीला दादोजीच काय पण लाठी-तलवारीचे डाव शिकवणाऱ्यालाही गुरुचे स्थान द्यायला संकोच वाटला नसता. ज्याचे स्वतःचे कर्तृत्व वादातीत आहे त्याला या असल्या श्रेयाच्या वादाशी काहीच देणेघेणे नसते. कर्तृत्वशून्य, अडाणी आणि स्वार्थी मंडळीचा हा खेळ असतो. 'नाव शिवाजीचे आणि काम माझ्या तूप-पोळीचे' याशिवाय या वादाला वेगळे काही नाव देणे कठीण आहे.