निमित्त ‘रोमन
हॉलिडे’चे
मी ‘रोमन हॉलिडे’ पहिल्यांदा पाहिला, त्याला आता तीस वर्षांपेक्षा जास्त काळ
लोटला असेल. मी त्यावेळी कॉलेजमध्ये होतो आणि ऑड्री हेपबर्न हे त्या सिनेमाला
जाण्याचं मुख्य आकर्षण होतं. आज तीन दशकांनंतर मात्र या सिनेमाचं आकर्षण बहुपदरी
झालं आहे आणि ऑड्रीच्या जोडीला ग्रेगरी पेक, विल्यम वायलर, एडी अल्बर्ट अशा अनेक
नावांची त्यात भर पडली आहे. आज माझ्या संग्रही असलेली रोमन हॉलिडेची सीडी हा माझा
एक फार अनमोल ठेवा आहे.
रोमन हॉलिडेची कहाणी सरळ सांगता येण्यासारखी
आहे. अॅन नावाची एक राजकन्या रोमच्या शासकीय भेटीवर येते. तारुण्याच्या फुलपाखरी
वयात असणाऱ्या या मुलीला स्वातंत्र्य आणि मोकळेपणा साद घालत असतो. पण त्याला
प्रतिसाद देण्याची तिला परवानगी नसते; कारण ‘राजशिष्टाचार’ नावाचा तुरुंग चोवीस तास तिच्याभोवती कडेकोट उभा असतो. या
सततच्या बंदिवासाला कंटाळून ती रोममध्ये असताना आपल्या महालातून चक्क पलायन करते.
पण त्या आधी डॉक्टरांनी तिच्या सततच्या भुणभुणीला कंटाळून तिला झोपेचे औषध दिलेले
असते. या इंजेक्शनमुळे आलेल्या गुंगीने ही राजकन्या एका बागेच्या कठड्यावर बसते
आणि तिथेच झोपी जाते. तिथे झोपलेल्या तिला ज्यो ब्रॅडले हा अमेरिकन वार्ताहर पाहतो
आणि तिचा ठिकाणा जाणण्याचे आणि तिला घरी पोचवण्याचे सर्व प्रयत्न फसल्यामुळे
सुरक्षिततेसाठी आपल्या घरी घेऊन जातो. दुसऱ्या दिवशी ती झोपेत असतानाच तो आपल्या
ऑफिसमध्ये जातो. तिथे त्याला कळते ती एक राजकन्या आहे. अधिकृत बातमी मात्र ती
आजारी असल्याची दिली गेली आहे. तिचे बेपत्ता असणे अजून गुप्त राखले आहे हे
कळल्यावर एका राजकन्येच्या आयुष्यातला सर्वस्वी अनधिकृत आणि जगाच्या नजरेआड
राहिलेला कालखंड आपल्या नजरेसमोर उलगडतो आहे हे त्याला जाणवते. या काळातली तिची
छायाचित्रे आपल्याला बख्खळ घबाड मिळवून देऊ शकतील हेही त्याच्या लक्षात येते. ही
छायाचित्रे गोळा करण्यासाठी तो आपला मित्र रोडोविच याला हाताशी धरतो. आपली असलियत
ज्योला कळलेली आहे ही गोष्ट अॅनच्या मात्र गावीही नाही. त्यामुळे ती खुशाल रोमभर
भटकते आणि झडप घालून मिळवलेलं स्वातंत्र्य पुरेपूर उपभोगते. रस्त्यावरचे खाणे, केस
कापणे, रोममधली प्रेक्षणीय स्थळे पाहणे अशा साध्या साध्या गोष्टीतला आनंद ती भरपूर
लुटते. या भटकंतीच्या काळातच तिचं सौंदर्य, निरागस वागणं, खानदानी संस्कार या
गोष्टींकडे आकर्षित होऊन ज्यो हळूहळू अॅनच्या प्रेमात पडत जातो. त्याचवेळी त्याचं
शालीन आणि मर्यादशील वागणं, तिच्याबरोबर सर्व रोमभर काय वाटेल ते करत भटकणं, तिला
मनमुक्त वागू देतानाही तिची काळजी घेणं, तिचे सर्व हट्ट पुरवण्याची धडपड करणं
अशासारख्या गोष्टींमुळे अॅनलाही तो आवडू लागतो. दोघांना एकमेकांसाठी जगण्याची आस
वाटू लागते.
पण दरम्यान सरकारनं अॅनच्या शोधासाठी काही
खाजगी डिटेक्टीव्ह गुप्तपणे कामावर लावलेले असतात. त्यांना एका क्षणी राजकन्येचा
सुगावा लागतो. पाण्याखालून पोहून एका वेळेपुरते त्यांना चुकवण्यात अन आणि ज्यो
यशस्वी होतात. पण त्यांना चुकवण्याचा हा अनुभवच त्यांचे डोळे उघडवतो. किती काळ आपण
आयुष्यापासून असे पळत रहाणार या विचाराने मनमुराद हिंडणारे त्यांचे पाय जडावतात.
रात्री ज्योच्या घरी त्यांचा निर्णय होतो आणि ते एकमेकांपासून दूर जायचे ठरवतात.
ज्यो अॅनला तिच्या निवासापाशी आणून सोडतो. एक अखेरचं चुंबन घेऊन दोघेही आपापल्या
वाटांनी जातात. भातुकलीतल्या राजा-राणीसारखी त्यांचीही प्रेमकहाणी अर्ध्यावरच
संपून जाते.
दुसऱ्या दिवशी ‘आजारातून बरी झालेली’ अॅन एका अधिकृत पत्रकार
परिषदेत उपस्थित होते. ज्यो आपल्या कामाचा भाग म्हणून आपल्या वृत्तपत्रातर्फे तिथे
येतो. तिथे दोघेही नजरेनेच एकमेकांचा पुन्हा एकदा निरोप घेतात. रोडोविचने घेतलेले
अॅनचे फोटो रोडोविच तिला परत करतो. अॅन तिच्या विश्वात निघून जातो, ज्यो आपल्या
आयुष्यात परत येतो.
हिंदी सिनेमा पाहणाऱ्याना ही कथा नवीन
वाटणारच नाही. गरीब-श्रीमंत, नोकर-मालक, सताधारी-सामान्य अशा परस्परविरोधी
जोड्यांवर हिंदीत आजवर शेकडो सिनेमे येऊन गेले आहेत. क्वचित काही सिनेमांचा शेवटही
रोमन हॉलिडेच्या धर्तीचाच होता. प्रेमात विफल होण्याची वेदना हिंदी सिनेमांनी
सैगलच्या देवदासच्याही आधीपासून चित्रित केलेली आहे. रोमन हॉलिडेचं मुख्य
वैशिष्ट्य आणि वेगळेपण या कथेत नाही तर त्याच्या हाताळणीत आहे, मांडणीत आहे.
या सिनेमाची सारी सूत्रे ज्या विल्यम
वायलरच्या हाती होती, त्याने ज्या ताकदीने सिनेमा उभा केला आहे ती ताकदच सिनेमाला
अविस्मरणीय करते. याची सुरवात पात्रांच्या निवडी पासूनच होते. ब्रॅडलेच्या भूमिकेत
ग्रेगरी पेक आणि अॅनच्या भूमिकेसाठी ऑड्री हेपबर्न ही त्या काळाचा विचार करता
खरेतर थोडी ‘हटके’ निवडच म्हणायला हवी.
ग्रेगरी पेक हा तेव्हाचा आघाडीचा आणि लोकप्रिय अभिनेता होता. तरी त्याला
ही दुय्यम महत्वाची भूमिका वायलरने दिली. पेकने ती स्वीकारली हीच मोठी आश्चर्याची
गोष्ट आहे. त्या मानाने ऑड्री हेपबर्न नवशिकी आणि अद्याप पाय जमवण्यासाठी धडपडणारी
अभिनेत्री होती. तरीही तिला चित्रपटातली मध्यवर्ती भूमिका मिळाली. वायलरने
लोकप्रियता, प्रतिमा किंवा नावलौकिक यापेक्षा भूमिका आणि कलावंत यांची कुंडली किती
जुळते हे पाहून या निवडी केल्या. त्या अचूक ठरल्या. रोडोविचच्या भूमिकेत एडी अल्बर्ट हा
गुणी पण त्या मानाने दुर्लक्षित नट शोभून दिसला. भूमिका जिवंत करणे म्हणजे काय हे
या त्रिकुटाने पडद्यावर अक्षरशः प्रात्यक्षिक करून दाखवून दिले. हॉटेलमधल्या
पार्टीतली धुमश्चक्री या गोष्टीची साक्ष द्यायला पुरेशी आहे. ज्यो, अन आणि रोडोविच
या सर्वांचीच स्वतःला विसरून दुसऱ्याला मदत करण्याची आणि त्यांना वाचवण्याची धडपड
आणि त्या डिटेक्टीव मंडळींच्या हातून निसटून पळाल्यानंतर अनला झालेला मुक्ततेचा
दुप्पट आनंद तिघांनी पडद्यावर अक्षरशः जिवंत करून दाखवला आहे. रोडोविच आणि अॅनच्या
पहिल्या भेटीच्या वेळेस ज्यो आपला खोटेपणा अॅनसमोर उघडकीला येऊ नये म्हणून जे काही
प्रकार करतो आणि ज्योच्या थापा माहित नसलेला रोडोविच एकाचवेळी रागावतोही आणि
गोंधळतोही. हे सारे पडद्यावर प्रत्यक्ष पाहण्यातच खरी मजा आहे.
तिघांचे एकत्रित असे प्रसंग तर इथे
अविस्मरणीय झाले आहेतच. पण इतर अनेक छोटे-छोटे प्रसंगही या तिघा कलावंतांनी यादगार
करून दिले आहेत. अगदी सुरवातीपासून याची प्रचीती येते. अॅनची सहाय्यिका तिला
दुसऱ्या दिवशीच्या कामांची यादी वाचून दाखवत असते. हा सगळा प्रकार कमालीचा कृत्रिम
आहे हे ऑड्री नुसत्या चेहऱ्यावरच्या कंटाळ्यातून दाखवत नाही तर अशा प्रसंगी कसं
वागायचं याच्या ज्या सूचना तिथे लिहिलेल्या असतात त्या सहाय्यिका वाचत असताना तिच्या
बरोबरीने तोंडपाठ म्हणून दाखवते. तिच्या अशा आयुष्यातला सारा कंटाळा आणि साचेबद्ध
तोचतोचपणा या एका बोलक्या कृतीतून चटकन जिवंत होतो. दिवसभराचं काम संपवून वेळ
घालवण्यासाठी पत्ते खेळत बसणं हा रोडोविच आणि ज्योचा छंद आहे. तिथून बाहेर
पडलेल्या ज्योच्या चेहऱ्यावरचे ‘चाललं आहे आपलं रोजच्यासारखं’ हे भाव बागेच्या कट्ट्यावर झोपलेल्या अॅनला पाहताना आणि
तिच्याशी बोलताना ज्या वेगानं बदलत जातात ते खरोखर बघण्यासारखं आहे.
रोमन हॉलिडेच्या कथा-पटकथेची एक वेगळीच
चित्तरकथा आहे. या पटकथेचा मूळ लेखक होता जेम्स डाल्टन ट्रंबो. १९४७ मध्ये
अमेरिकन संसदेच्या अन-अमेरिकन अॅक्टिव्हिटीज कमिटी नावाच्या समितीसमोर शपथेवर
साक्ष देणं त्यानं नाकारलं. त्याची शिक्षा म्हणून जगातल्या सर्वात जुन्या
लोकशाहीनं त्याला काळ्या यादीत टाकून त्याच्यावर बहिष्कार घातला. पण या गोष्टीनं
वायलरपुढे धर्मसंकट उभं राहिलं. चुकीच्या कारणासाठी सिनेमाला प्रसिद्धी मिळणं
त्याला नको होतं. पण त्याच्या डोळ्यांसमोर सिनेमाचं जे लोभस रुपडं उभं होतं ते
सोडावं आणि एवढी प्रभावी कथा जाऊ द्यावी हेही त्याला रुचेना. अखेर त्यानं या
पेचातून बाहेर पडण्यासाठी एक्सोडस आणि स्पार्टाकस या सिनेमांच्या निर्मात्यांनी
दाखवून दिलेला मार्गच स्वीकारला आणि कथा-पटकथा यांचं श्रेय मॅकलेलन हंटरला दिलं.
पटकथेचं ऑस्करही त्यामुळे हंटरनंच स्वीकारलं. अखेर १९९३ मध्ये अकॅडमी ऑफ मोशन
पिक्चर्सनं अधिकृतपणे या चुकीची दुरुस्ती केली आणि ट्रंबोला मरणोत्तर रोमन
हॉलिडेच्या लेखनाचं ऑस्कर बहाल केलं. सिनेमा बनल्यानंतर ४० वर्षांनी लेखकाला
पुरस्कार मिळण्याची जगात ही पहिली आणि शेवटची घटना आहे. २००३ मध्ये रोमन
हॉलिडेची सीडी बाजारात येताना तिच्या श्रेयनामावलीत ट्रंबो झळकला आणि २०११ मध्ये
चित्रपटाशी संबंधित सर्व रेकॉर्डस दुरुस्त करून ट्रंबोचं श्रेय पूर्णपणे त्याला
दिलं गेलं.
तर कथा-पटकथा. मूळ कथाही स्वतःची असल्यामुळे
असेल, पण डिग्टन-ट्रंबो जोडगोळीनं या सिनेमासाठी एक अगदी रेखीव पटकथा बनवली आहे.
पटकथेतून स्वभावचित्रण कसं खुलवावं याचा एक नमुनाच जणू इथे त्यांनी पेश केला आहे.
गर्दीचा स्पर्श अनुभवत, वाट काढत रस्त्यातून चालणारी अॅन, ज्योच्या घरातल्या
बाथरूममध्ये अॅन असतानाच थेट बाथरूममध्ये सफाईसाठी घुसणारी ज्योची हाऊसकीपर,
ज्योनं निक्षून सांगितल्यामुळे काही न कळल्यानं गोंधळलेला पण तरीही ज्योला हवा तसा
–खांद्यावर बंदूक
घेऊन- घराबाहेर पहारा देणारा सिक्युरिटी गार्ड, सुरवातीला आपल्या बॉसशी एका
अभूतपूर्व न्यूजस्टोरीसाठी कमालीच्या आत्मविश्वासानं पैज लावणारा आणि शेवटी ‘मी फक्त थट्टा करीत
होतो’ असं त्याच बॉसला
सांगून १००० डॉलर्स गमावणारा ज्यो, अॅनच्या नकळत सिगरेट-लायटरच्या आकाराच्या
कॅमेऱ्यानं तिचे फोटो घेणारा आणि सिनेमाच्या शेवटी आपल्या चौर्य-कृत्याचा स्वतःच
पर्दाफाश करणारा रोडोविच. सिनेमाच्या पहिल्या १५-२० मिनिटात डिग्टन-ट्रंबो ही सारी
व्यक्तिमत्वं आपल्यासमोर सघन उभी करतात आणि तिथून सारा सिनेमाच जिवंत होऊन उठतो.
सारा चित्रपटभर त्यांनी छोट्या-छोट्या प्रसंगांची खुमासदार पेरणी केली आहे आणि एका
हृदयस्पर्शी विषयाची खेळकर मांडणी हा तोल सतत सांभाळला आहे. अगदी सुरवातीला एका
गंभीर आणि औपचारिक प्रसंगात अॅनच्या पायातला बूट निसटणं, अॅननं ज्योच्या घरून
बाहेर पडल्यावर पुन्हा परत येऊन त्याच्याकडे पैसे मागणं आणि ‘किती पैसे हवेत ते तर
मलाही माहित नाही’ अशी
प्रांजळ कबुली देणं, अगदी आपल्याला हवे तसेच केस कापून घेऊन एकट्याच्या मनासारखं
वागण्याचा आनंद घेणं, गुच्छातल्या फक्त एका फुलासाठी हातात असणारे सारेच्या सारे
पैसे देऊ करणं, अॅन राजकन्या आहे हे माहित नसताना त्याची तिच्याशी असणारी वागणूक
आणि सत्य कळल्यानंतर त्याच्या वागण्यात झालेलं परिवर्तन – किती प्रसंग
आठवावेत! संस्मरणीयता हा या पटकथेचा जणू एक अंगभूत गुणधर्मच आहे.
वायलरची प्रसंगांची मांडणी आणि त्याचा
कॅमेरा यांचा या सिनेमात अत्यंत महत्वाचा वाटा आहे. कॅमेरामन हेन्री अलकेन आणि
फ्रांझ प्लॅनर यांनी हातातला कॅमेरा अगदी वायलरला हवा तसा बोलका करून दाखवला आहे.
रोमच्या महत्वाच्या स्थळांची जी सफर हा कॅमेरा प्रेक्षकांना घडवतो ती तर अतिशय
प्रेक्षणीय आहेच. पण प्रसंगांचा जो तोल या त्रयीनं इथे कॅमेऱ्याच्या माध्यमातून
उभा केला आहे त्याचा प्रत्यय प्रत्यक्ष चित्रदर्शनातूनच येऊ शकेल. सिनेमाच्या
शेवटच्या पत्रकार परिषदेच्या प्रसंगात अॅन आत निघून गेल्यानंतर ज्यो परत फिरतो आणि
त्या दालनातून बाहेर पडतो. वायलरनं बॅकवर्ड-मूव्हिंग-अँड-ट्रॅकिंग पद्धतीनं हा शॉट
घेतलाय. त्यामुळे पडद्यावर तो पाहताना ज्यो आपल्या आयुष्यात परत निघालाय हे तर
कळतंच. पण त्याच्या प्रत्येक पावलासरशी अॅनचं जग ज्योच्या जगापासून दूरदूर चाललंय
असा जो परिणाम वायलर साधतो तो खरोखर मनाला चटका लावून जातो. रंगीत नसूनही हा
सिनेमा आजही देखणा वाटतो त्यात या कॅमेऱ्याचा फार मोठा वाटा आहे.
मी हा चित्रपट पहिल्यांदा पाहिला तेव्हा फार
काही कळण्याचं वय नव्हतंच. पण तरीही या सिनेमाचा परिणाम कुठेतरी फार खोलवर गेला
होता. त्यानंतरच्या गेल्या तीस वर्षांत मात्र या चित्रपटानं प्रश्नांचं अक्षरशः मोहोळ
उठवून दिलेलं आहे आणि ते कुठेही कमी होण्याची कसलीही चिन्हे दिसत नाही आहेत.
आपल्या हिंदी सिनेमाने या प्रश्नाला अतिशय ढोबळ आणि बटबटीत रूप दिले आहे. तेही
एकवेळ क्षम्य म्हणता आलं असतं. पण बहुतेक वेळा शक्य तितक्या लवकर प्रश्नातून पळ
काढण्याचा आपला प्रयत्न असतो. ‘सजनी अमीर - साजन गरीब’ किंवा ‘साजन अमीर - सजनी गरीब’ अशा पद्धतीनं आपण कथेची सुरवात करतो. त्यात पहिल्या
पर्यायाकडे आपला कल जरा जास्त. (कदाचित ‘स्त्री’ नामक देवीला ऐहिकाचा त्याग करायला लावणं सोपं जात असावं,
म्हणून?) आणि मग बहुतेक वेळा दो दिलों के बीच उभी राहिलेली चांदी-सोने की दीवार हे दोघे
प्रेमी चाहत की ताकतपर तोडून जातात. पुलंनी बहुधा आपल्या या ठोकळेबाजपणाला
उद्देशूनच ‘सुखांत’ची व्याख्या सुखाचा
अंत अशी केली आहे. प्रत्यक्ष आयुष्याला आणि त्यातही जडणघडणीच्या काळात तोंडही न
पाहिलेल्या खऱ्या अडचणींना हे बहाद्दर प्रेमी सिनेमाचा सुखी ‘द एंड’ झाल्यावर कसे तोंड
देणार याचं उत्तर आपण कधीच देत नाही. राकेश रोशन सारखे महाधूर्त निर्माते तर एका
घोटात अगस्तीनं सारा समुद्र प्यावा तसा हा सारा प्रश्न एका घोटात पिऊन टाकतात. मग
त्यांच्या ‘कहो
ना प्यार है’
मध्ये, रोहितच्या प्रेमात आकंठ बुडालेली नायिका प्रियकराच्या ‘सब काम मै ही करूंगा, या तुम भी कुछ करोगी’ या प्रश्नाला ‘करूंगी ना! तुम्हारे
हाथसे खाऊँगी’असे
उत्तर देते. पण मध्यंतरापर्यंत येता येता स्वतःच्या हाताने आग जलानेवाला आणि खाना
पकानेवाला रोहित
सिनेमातून एक्झिटच घेतो आणि त्याच्या जागी त्याच्याच चेहऱ्या-मोहऱ्याचा पण अगदी
गर्भश्रीमंत असणारा राज येतो. त्यामुळे ही गरीब-अमीर जोडी पाहून तुम्हा-आम्हाला
पडलेला ‘हे नायक-नायिका जगणार
कसे?’ हा प्रश्न मुळापासून
पुरा छाटला जातो आणि गरिबीच्या चेहऱ्यावर श्रीमंतीचं आरोपण होतं. आम्ही प्रश्नच
मुळात इतका तकलादू करून ठेवल्यावर आमचं उत्तर कुचकामी ठरावं यात काय आश्चर्य आहे?
त्यामुळे एतद्देशीय सिनेमाकडून उत्तराची तर सोडाच, पण प्रश्नाच्या धड मांडणीचीही
कुणी अपेक्षा करत नाही. प्रश्नाचं मोहोळ दुसऱ्याच दिशेनं भिरभिरत येत असतं.
या चित्रपटात एक प्रसंग आहे. केस कापून रूप
बदललेली अॅन एका पार्टीत सुखाने गात, नाचत असते. सरकारने नेमलेल्या डिटेक्टीव्हजपैकी
दोघे तिथे तिला पाहतात आणि तिला ओळखतात. तिला ते सोबत नृत्य करण्यासाठी बोलावतात
आणि नृत्य करता करता तिला आपण ओळखल्याचं सांगून परत चलायला सांगतात. अॅन अर्थातच ते नाकारते. त्यावर ते
लोक तिला जबरदस्तीनं परत नेण्याचा प्रयत्न करतात. अॅन प्रतिकार करते, रोडोविच आणि
ज्यो तिला मदत करतात. एका फिल्मी स्टाईल धूमधमाल हातघाईनंतर ज्यो आणि कंपनी
पाण्यात उड्या टाकतात, पाण्याखालून पोहत दुसरीकडे बाहेर निघतात आणि पळून जाण्यात
यशस्वी होतात.
मला हा प्रसंग पडद्यावर पाहताना तेव्हाही त्या
डिटेक्टीव्हजनी इतका या लोकांचा पिच्छा पुरवणं पटलं नव्हतं. कदाचित तेव्हा तारुण्यासुलभ
भावनेतून अॅन आणि ज्योचाच नेहमी विजय व्हावा असे वाटत असणे शक्य आहे. पण मग आज पन्नाशीत ते न
आवडणं जास्त धारदार का झालं आहे? त्या डिटेक्टिव्ह मंडळींवर शासनानं राजकन्येला
शोधण्याचं काम सोपवलं आहे, तिला पळवून आणायचं नव्हे. त्यामुळे त्यांनी तिचा शोध
घ्यावा आणि पत्ता लागल्यावर आपल्या कामाचा अहवाल सरकारला सादर करून बाजूला व्हावं.
तिच्या आयुष्यात अशी हुकमी ढवळाढवळ करण्याचा त्यांना काही अधिकार नाही असं
वाटायचं. हे वाटणं तीस वर्षांपूर्वीचं आहे. आज तर प्रसिद्ध लोकांच्या पूर्णपणे
खाजगी आयुष्यात खुशाल, बेधडक दखलंदाजी करणाऱ्यांची अख्खी फौजच्या फौज तयार झाली
आहे. पूर्वी याला सत्ता शासन पोलीस अशी नावं होती, आज त्याला मीडीया असं नाव आहे.
मीडियावाल्यांच्या या सततच्या
ससेमिऱ्यानं आपल्या आयुष्यातल्या कांही खऱ्याखुऱ्या शोकांतिकांना जन्म दिला आहे.
त्यातल्या ज्या कथेचं गारूड आजही आपल्या मनावरून उतरलेलं नाही ती शोककथा म्हणजे
प्रिन्सेस डायना. तिचा विवाह ब्रिटनच्या राजपुत्राशी झाला होता, तो तिथला भावी
राजा होता, त्याचं आयुष्य लोकांसाठी असणार, डायनाला हे लग्नाआधीच माहित होतं, एक
उच्चपदस्थ नेहमीच लक्षवेधक असणार, चार्ल्सशी जमेनासं झाल्यावर डायनाची प्रतिक्रिया
बालिश, अपरिपक्व आणि संयम नावाच्या गुणापासून कोसोगणती दूर अशीच होती हे सारे
आक्षेप मला माहीत आहेत आणि मान्यही आहेत. मला पडणारा प्रश्न फक्त एकच आहे- डायनाचा
ज्या पद्धतीनं सतत माग काढण्याचा प्रयत्न झाला तो पाहता प्रश्न अधिकाधिक फणा
काढतोय. एका उच्चपदस्थ, अपरिपक्व, उतावळ्या, पदाला न शोभणाऱ्या (सरळ मूर्ख म्हणूया
का?) पण सुंदर स्त्रीला तिचं नवऱ्याशी पटत नसेल तर ते दुःख एकांतात आपल्या
मित्राबरोबर वाटण्याचं स्वातंत्र्य असावं की नसावं? नसावं तर कुणीकुणी तिच्या
एकांतात घुसावं? तिच्या मित्राबरोबर चार भिंतीआड तिनं जपलेली तिची नाती चक्क
चव्हाट्यावर आणणे कोणत्या सामाजिक नीतिमत्तेत बसतं? या प्रकरणात तिच्या
नवऱ्याचा संबंध आहे हे मान्य व्हायला हरकत नाही, पण बाकी कुणाला यात डोकवायचा काय
हक्क आहे? थेट कायदे मोडून माझ्या एकांतात कुणी डोकावू नये एवढी अपेक्षा
करण्याचाही तिला अधिकार नसावा का? डायनाच्या मानवी हक्कांची अशी पायमल्ली का
म्हणून व्हावी?
रोमन हॉलिडेवर हे प्रश्न चपखलपणे कलम करता
येतात. समजा
अॅननं ज्योसमवेत एका गुप्त स्थळी दडी मारली, तर शासकीय यंत्रणा आणि त्याहीपेक्षा
मीडिया त्यांच्या त्या गुप्त स्थानापर्यंत माग काढून थांबेल का? का जमीन आणि
दरवाजा यांतल्या फटी, दरवाजाची की होल्स, खिडकीच्या झडपा यांसारख्या जागी सूक्ष्म,
छुपे कॅमेरे लावून त्यांच्या एकांताचा या मंडळींनी बाजार मांडला असता? दुसरी
शक्यताच जास्त वाटते ना? पण असा बाजार मांडण्याचा या मंडळींना काय अधिकार आहे?
सुसंस्कृतपणाच्या कोणत्या व्याख्येत हे सर्व बसतं? आणि अशा धश्चोटपणाचा त्याच
पातळीवर उतरून प्रतिकार करू पाहणाऱ्या साऱ्या सेलेब्रिटीजना देवयानी चौबळसारखे
मीडियावंत खुनशी, आक्रमक हल्लेखोर ठरवणार! उलटा चोर कोतवालको डांटे? वा रे न्याय!
मुळात अशी साहसे करायला आणि वेळप्रसंगी
न्याय-नीतीचीच नव्हे तर कायद्याचीही पर्वा न करायला मिडीया तयार होतो ते या
मालमसाल्याला भरगच्च गिऱ्हाईक मिळेल ही खात्री त्यांना पूर्णपणे असते म्हणून. मग
जे तुम्ही-आम्ही या मालाचं गिऱ्हाईक असतो त्यांचीही मानसिकता नेमकी काय असते आणि
वेळप्रसंगी अशा क्रौर्याच्या पातळीवर जाण्याइतकी ती हीन का होते? ‘आपला सारा
सुसंस्कृतपणा हा फक्त एक बुरखाच असतो, बुरख्याच्या आत आपण कुठल्याही कारणासाठी
लढाई हाच एक मार्ग माहीत असलेले, सर्वात उत्क्रांत असलेले पशूच असतो आणि लढाईत तर
सगळंच क्षम्य असतं असं आपण मानतो’ असा आपल्या वागण्यावरून जर कुणी निष्कर्ष काढला तर आपण
त्यावर काय बोलणार आहोत आणि त्याविरुद्ध कोणता युक्तिवाद करणार आहोत?
अर्थात हा प्रश्न विचारल्यानंतरही या कथेबद्दलची
हळहळ संपून जात नाही. उच्चपदस्थांच्या किंवा सिलेब्रिटींच्या आयुष्याला पडणाऱ्या
या मर्यादा एक सामाजिक वास्तव म्हणून मान्य केल्यानंतरसुद्धा सिनेमाचा हा एकच शेवट
शक्य होता का हे खात्रीनं सांगता येत नाही. हा प्रश्न पहिल्यांदा पडण्याच्या वयात
फारशी माहितीही नव्हती. त्यामुळे हाच शेवट आवश्यक नाही असं वाटायचं. पण हे वाटणं
कुणाच्या डोक्यावर देता येईल हे कळायचं नाही. नंतर कालांतरानं असं एक मस्तक गवसलं
आणि त्या कथेपुढं आपसूकच आदरानं मान लवली. त्या माथ्याच्या मालकाचं नाव आहे
इंग्लंडचा राजा आठवा एडवर्ड. १८९४च्या जूनमध्ये जन्मलेला एडवर्ड २० जानेवारी
१९३६ला राजा झाला आणि काही दिवसातच तो इंग्लंडचा सर्वात वादग्रस्त राजा ठरला. एक
घटस्फोटित
अमेरिकन महिला वॉलिस सिंपसन हिच्याशी विवाह करायचा निर्णय त्यानं घेतला आणि देशभर
एकच वादळ उठलं. ब्रिटीश कायद्यात कुठेही राजाला घटस्फोटित किंवा ब्रिटीश
नसलेल्या महिलेशी लग्न करायला प्रतिबंध नाही. पण इंग्लंडचे त्यावेळचे पंतप्रधान
बाल्डविन यांनी अशी भूमिका घातली की ब्रिटीश जनता या महिलेला राणी म्हणून
स्वीकारायला कदापि तयार होणार नाही. राजानं ठरवल्याप्रमाणे हा विवाह तडीला नेलाच
तर मंत्रीमंडळाचा राजीनामा सादर करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि एडवर्डला कळून
चुकलं की या परिस्थितीत राजघराण्याच्या अंतर्गत प्रश्नावरून पुन्हा निवडणुका
घ्याव्या लागतील आणि राजाचं तटस्थ स्थान नष्ट होईल. त्यानं या प्रश्नावर दीर्घ
विचार केला आणि राजाचं तटस्थ स्थान राखण्याचा निर्णय घेतला. ११ डिसेंबर १९३६ ला
त्यानं राजसिंहासनाचा त्याग केला आणि मगच श्रीमती सिंपसनशी विवाह केला. याचा अर्थ
असा की अवघे ३२५ दिवस राजा म्हणून काढल्यावर उर्वरित आयुष्य त्यानं निवृत्त
पद्धतीनं घालवलं. २८ मे १९७२ ला तो मरण पावला म्हणजे त्याच्या सेवानिवृत्तीचा काळ
होता ३५ वर्षे साडेचार महिने. त्यापैकी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात सुमारे चार
वर्षे त्याला फ्रान्समधल्या मोहिमेत आणि बहामाचा गव्हर्नर म्हणून काम करण्यास
सांगीतलं गेलं तर साडेएकतीस वर्षे राजाचा औरस पुत्र आणि ब्रिटीश राज्याचा निष्कलंक
वारस असलेल्या या गृहस्थानं एक सामान्य आयुष्य घालवलं. आपल्या प्रेमाशी एकनिष्ठ
रहाण्याची एवढी जबर किंमत या प्रेमवीरानं चुकवली. (कँमिला पार्करच्या आकंठ प्रेमात
असताना डायनाशी लग्न करणारा आणि लग्नानंतर पत्नीला महालात कोंडून स्वतः
प्रेमपात्राबरोबर हिंडणारा चार्ल्स हा बहुधा या एडवर्डचा विरुद्धार्थी शब्द
असावा.)
केवळ आपल्या देशापुरतं पाहायचं तर मग एवढा इंग्लंडपर्यंतचा
प्रवास करण्याचीही काही गरज नाही. आपल्याच देशातल्या एका राजघराण्याचा
औरस वारस एका सामान्य स्त्रीच्या प्रेमात पडला. दोघांना जोडणारा समान धागा होता
संगीताचा. पण राजघराणं तर शेवटी राजघराणंच असतं! तख्तनशीन राजानं आपल्या मुलाच्या
प्रेमाच्या विरोधात उभे रहाण्याचा निर्णय त्याला ऐकवला. थेट बापाच्या पावलावर पाऊल
ठेवत मुलानं आपला, या सामान्य गाणारणीशी विवाह करण्याचा, निर्णय कायम ठेवला आणि
त्यासाठी राजघराण्याचाच नव्हे तर राज्याचाही त्याग केला. एका तुलनेनं साध्याशा घरात सारा
जन्म घालवतानाही तुम्हा-आम्हाला चिरतरुण सुरांनी न्हाऊ घालण्याचं आपलं व्रत त्यानं
आजन्म सांभाळलं आणि आपल्या मुलाला गाण्याचा हा वारसा सोपवूनच त्यानं जगाचा निरोप
घेतला. आपल्यालाच नव्हे तर हिन्दी सिनेमा पाहिला जातो अशा सर्व ठिकाणी हा संगीतकार चांगला
माहित आहे- सचिनदेव
बर्मन!
त्यामुळेच सचिनदादा आणि एडवर्ड यांच्यापुढे
आदरानं नम्र होतानाही ‘अॅनला हे खरोखरच शक्य नव्हतं का’ हा प्रश्न माझ्या
मनासमोरून हलत नाही. ती अद्याप तरी राणी झाली नव्हती, ज्यो हा अमेरिकन असल्यामुळे अॅनला
त्याच्यापर्यंत पोचायला कोणतीही आडकाठी नव्हती, सिनेमा स्पष्टपणे तसं सांगत नाही-
पण अॅनचा मायदेश हा युरोपातला एखादा छोटासाच देश असावा. तिथे या विचाराला प्रतिकार
होणार तरी किती? मग तिने का नाही केलं हे? कर्तव्यभावना, मोह की दोन्ही? यावर तिला
मार्ग सापडलाच नसता का? समजा, तिनं ‘मला ज्यो शी संसार मांडायचा आहे. तुम्हाला हे मान्य नसेल,
तर मी राजघराण्याचा आणि त्याबरोबर येणाऱ्या प्रतिष्ठा, आदर आणि संपत्तीचा त्याग
करायला तयार आहे’ हे
आपल्या लोकांना सरळ सांगितलं असतं तर तिला बाल्डविन आणि ब्रिटीश जनतेसारखाच
प्रतिसाद मिळाला असता का? मग आपण अनुभवांनी शहाणे होतो म्हणजे नेमकं काय? हे असं
का असतं? का असावं? प्रश्न, प्रश्न आणि आणखी प्रश्न!
पुढे या प्रश्नांमध्ये आणखी एक प्रश्न येऊन
मिळाला. अॅनबरोबरचे दोन दिवस हे ज्यो च्या आयुष्यातले मंतरलेले दिवस होते. अवघ्या
दोन दिवसात ‘तिला
फोटोंमध्ये कैद करून एक बख्खळ पैसा मिळवून देणारी भक्कम स्टोरी बनवावी’ इथपासून ‘तिच्या प्रेमानं
भारलेल्या एका क्षणापुढे बाकी सारं काही तुच्छ आहे’ इथपर्यंत त्याचा प्रवास झाला आहे. संस्कारांची ही दिशा
टिपिकल अमेरिकन म्हणून ओळखली जाते ती नाही. ती जास्त प्रमाणात ‘नको क्षुद्र शृंगार तो दुर्बलांचा तुझी दूरता त्याहुनी
साहवे’ असं म्हणणाऱ्या
पृथ्वीच्या जातकुळीशी नातं सांगणारी आहे. पण एकदा या उंचीला पोचलेल्या ज्यो ला
उद्यापासून वृत्तसंस्थेच्या कचेरीत त्याच्या त्या टकल्या बॉससमोर उभं राहून पुन्हा
एकदा उथळ सेलेब्रिटीज आणि भंपक नेत्यांच्या कार्यक्रमांचे वृत्तांत बनवावे लागतील
तेव्हा तो काय करणार आहे? त्याचं मन आता यात रमेल का? आपली सारी उंची गमावून
पुन्हा एकदा याच चिखलात उतरणं त्याच्या मनाला आज रुचेल का? जमेल का? चार्ल्स
डिकन्सनं ‘ए टेल
ऑफ टू सिटीज’
सारख्या भव्योदात्त शोकांतिकेत या प्रश्नाचं एक उत्तर देऊन ठेवलं आहे. आयुष्यात
अशा उंचीला पोचण्याचा क्षण हा त्या क्षुद्र मानवाच्या मृत्यूचा क्षण असणं हेच
योग्य असतं. त्यामुळे डिकन्सचा सिडने कार्टन येशू ख्रिस्ताच्या उंचीला क्षणभर
स्पर्श करतो आणि त्याच वेळी आपली मान गिलोटिनखाली देतो. जणू फ्रेंच
राज्यक्रांतीतल्या सर्वसामान्य मानवांच्या असामान्य क्रौर्यासाठी पुन्हा एकदा एक
येशू सुळावर बलिदान करतो, साऱ्या मानवजातीचं हे पाप आपल्या शिरावर घेऊन!
सिडने कार्टन ही काल्पनिक व्यक्ती आहे
म्हणून त्याकडे दुर्लक्ष करावं तर अर्नेस्ट हेमिंग्वे त्याच्या पिस्तुलाच्या
नळीसकट समोर येऊन उभा राहतो. ‘फेअरवेल टू आर्म्स’, ‘फॉर हूम द बेल टोल्स’, आणि ‘द ओल्ड मॅन अँड द सी’चा हा महालेखक कंपवाताच्या विकारामुळे उत्कट उंचीवर
विहरणारं मन दुर्बल शरीरात जखडलं जातंय हे फार काळ सहन करू शकत नाही. स्वतःचंच पिस्तुल
स्वतःच्या डोक्यात रिकामं करून तो देहाचा हा बंध कायमसाठीच तोडून टाकतो. मला या
गोष्टीची विलक्षण भीती आणि काळजी वाटते- उद्या ज्यो ब्रॅडलेही सिडने कार्टन आणि
पपा हेमिंग्वेच्या वाटेनं जाणार नाही ना? रोमन हॉलिडेची खरी आणि अखेरची शोकांतिका पडद्यावर दिसणाऱ्या सिनेमाचा
शेवट झाल्यानंतर तर होणार नाही?
चांगल्या सिनेमाचे माझे काही निकष आहेत.
एखादा प्रश्न किंवा एखादी लक्ष्यवेधक घटना किंवा एक जगावेगळी व्यक्ती सर्व
कंगोऱ्या-बारकाव्यांसहित आपल्या डोळ्यांसमोर साक्षातच उभी करणारा सिनेमा अभिजात
म्हणावा लागेल हे निर्विवाद आहे. पण जो सिनेमा समोर दिसतो त्यापेक्षा जास्त मोठा
होतो, आपल्या मनात संस्कृतीविषयीच्या प्रश्नांचं एक वादळ उठवतो आणि सर्व आयुष्यभर
ते वादळ घोंघावतच राहील, त्याची व्याप्ती वाढत वाढतच जाईल आणि त्याची अस्वस्थता
कधी कधी झोप उडवून देईल एवढं सारं घडवून आणतो तो सिनेमाही खराच अभिजात असतो
याबद्दल माझ्या मनात तरी काहीही शंका नाही. मग रोमन हॉलिडेला मी अभिजात नाही तर
काय म्हणू?