Tuesday 5 June 2018


योगीकथामृत या पुस्तकाचा परिचय 
अलौकिकाचे आत्मलेणे
(पूर्वार्ध)

आपण आणि आपल्या भोवतीचे हे अनंत विश्व हा अनादी कालापासून माणसाच्या अमर्याद कुतूहलाचा विषय राहिला आहे.  नजर पोचेल तिथपर्यंत सोबत करणाऱ्या या विश्वासोबतचे नाते माणसाला खोलवर जाणवते. त्यामुळे माणसाने डोळे उघडून आजूबाजूला नजर टाकली त्याच क्षणापासून हे नाते जन्माला आले आणि मग दिवसेंदिवस वाढतच गेले. या कुतूहलाने जेव्हा बाहेरची दिशा घेतली तेव्हा निरीक्षण, निष्कर्ष, नियम आणि सिद्धांत अशा साखळीने आणि त्याद्वारे भौतिक शास्त्रांनी जन्म घेतला. पण याच कुतूहलाने जेव्हा अंतरंगाची दिशा धरली तेव्हा त्यातून तत्वज्ञान आणि धर्म जन्माला आले. अर्थातच कुतूहल जितके सार्वत्रिक आहे तितकाच तत्वविचारही सार्वत्रिक आहे. जुन्या जगात माणसामाणसातला संपर्क फारसा नव्हता आणि जगाबद्दलची माहितीही मर्यादित होती. त्यामुळे अनेक ठिकाणी आपापल्या पद्धतीने माणसांनी धर्म आणि त्यांचे तत्वज्ञान निर्माण केले आणि तरीही एकमेकांच्या विशेष संपर्काविना निर्माण झालेल्या या सगळ्या तत्वज्ञानांमध्ये काही बाबतीत तरी आश्चर्यजनक म्हणावे असे साम्य आहे.
जी गोष्ट सर्व जगाबद्दल खरी आहे ती भारताबद्दल खरी नसण्याचे काही कारण नाही. इथेही एक तत्वज्ञान आणि धर्म जन्माला आला. पण एका बाबतीत भारताची निर्मिती असलेला हा वैदिक धर्म सगळ्या जगापेक्षा वेगळा ठरला. आणि ती जागतिक तत्वज्ञानांच्या मांदियाळीत अलौकिक असणारी गोष्ट म्हणजे म्हणजे अद्वैत तत्वज्ञान. अद्वैत ही खास भारताचीच निर्मिती आहे. अन्यत्र कोणाही तत्वज्ञ-विचारवंताची झेप इथपर्यंत पोचलेली दिसत नाही. सारे विश्व ही एकाच तत्वाची वैविध्याने नटलेली रूपे आहेत ही भूमिका तत्वज्ञानांच्या जगात अद्वितीय आहे. वैविध्य हे अरूपाचे रूप धारण करण्याचे सूत्र मानल्यामुळे त्याचा नैसर्गिक परिणाम ‘रुचीनाम् वैचिद्र्याद्रुजुकुटिलनानापथजुषाम् | नृणामेको गम्यस्त्वमसि पयसामर्णवव’ ही भूमिका निर्माण होण्यात होतो.

विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापासून पौर्वात्य आणि त्यातही मुख्यतः भारतीय तत्वज्ञानाबद्दल बाहेरच्या जगात जे अनिवार कुतूहल निर्माण झाले त्याचे प्रमुख कारणही हे अद्वैत तत्वज्ञान हेच आहे. सर्वसामान्य लोक, त्यांच्या आशाआकांक्षा आणि त्यांच्या कल्याणासाठी चालणारे राज्य हाच समाजकारण-राजकारणांचा मूलाधार आहे आणि या लोकांच्यासाठी चालवल्या जाणाऱ्या राज्यावर लोकांचा अंकुश असणेही योग्य आहे या भूमिकेतून जगात लोकशाहीचा उदय झाला. समाज विविधतेने शोभतो. उलट शासनव्यवस्था नैसर्गिकपणे प्रमाणीकरणाकडे (standardisation कडे) झुकते. वरपांगी परस्परविरोधी दिसणाऱ्या या दोन गोष्टींचा मेळ घालणे हा लोकशाहीचा गाभा आहे. त्यामुळे विविधतेचा आदर लोकशाही व्यवस्थेचा एक अविभाज्य घटक ठरतो. आधुनिक लोकशाहीच्या या वैशिष्ट्याशी सुसंगत असणारे तत्वज्ञान म्हणून पाश्चात्य समाज प्रथमतः अद्वैत तत्वज्ञानाकडे आकर्षित झाला. परिणामतः अनेक भारतीय योगी आणि साधक पाश्चात्य समाजाला अद्वैताचा मार्ग दाखवायला उद्युक्त झाले. अशा योगी-साधकांचे मुकुटमणी म्हणजे परमहंस योगानंद. ‘Autobiography of a Yogi’ हे त्यांचे आत्मचरित्र हा अनेक अर्थांनी एक अद्वितीय ग्रंथ आहे. याच आत्मनिवेदनाचा श्री. ग. नी. पुरंदरे यांनी केलेला मराठी अनुवाद म्हणजे आज आपल्या समोर असणारा ‘योगीकथामृत’ हा ग्रंथ.

या पुस्तकाचे अद्वितीयत्व अनेक क्षेत्रांमध्ये निर्विवाद प्रस्थापित झालेले आहे. जगातल्या ३५ पेक्षा जास्त भाषांमध्ये हा ग्रंथ अनुवादित झाला आहे. जगातल्या सर्वाधिक विक्री झालेल्या आत्मचरित्रांमध्ये याची गणना होते. मराठीतसुद्धा ‘योगीकथामृत’ हा सर्वाधिक खपाच्या ग्रंथांमध्ये समाविष्ट आहे. पाश्चात्य जगात आध्यात्मिक क्रांतीची लाट आणणारा म्हणून हा ग्रंथ ओळखला जातो. विसाव्या शतकातल्या १०० सर्वोत्कृष्ट आत्मकथनांमध्ये या पुस्तकाचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. पुस्तकाच्या छापलेल्या प्रतीवर अनुवादकाचे नाव सहसा सापडत नाही. मराठी पुस्तकक्षेत्रात गुलबकावलीच्या फ़ुलाइतकीच दुर्मिळ असणारी अकारविल्हे सूची या ग्रंथात पहिल्यापासून समाविष्ट आहे आणि ७०० पेक्षा जास्त पाने असलेले हे पुस्तक आजही १५० रुपयांच्या आसपास उपलब्ध आहे. पुस्तकाच्या बाह्य रूपातच इतके अद्वितीयत्व आहे.

पण या पुस्तकाचे खरे सामर्थ्य त्याच्या रचनेत आहे आणि तिथेच त्याचे खास स्वतःचे उठून दिसणारे अस्सल अद्वितीयत्व आहे. सहसा आत्मचरित्रांमध्ये न दिसणारी अशी या पुस्तकाची दोन महत्वाची शक्तिस्थाने आहेत. आपण त्यांचा क्रमाने परिचय करून घेण्यासाठी, प्रथम त्यापैकी योगीजींच्या आयुष्यक्रमाकडे एक नजर टाकू.

परमहंस योगानंद हे जन्माने मुकुंदलाल घोष. वडिलांचे ते चौथे अपत्य आणि द्वितीय पुत्र. या मुकुंदलाल घोष अवस्थेपासून परमहंस योगानंद या अवस्थेपर्यंतचा सारा प्रवास या पुस्तकात स्वामीजींनी रेखाटला आहे. हा प्रवास जितका रसाळ तितकाच थक्क करणारा आहे. आश्चर्याचा पहिला धक्का पुस्तकाच्या पहिल्याच पानात बसतो. स्वामीजी लिहितात, “माझ्या अगदी लहानपणच्या आठवणी म्हणजे माझ्या पूर्वजन्मीच्या, सध्याच्या कालमानास न जुळणाऱ्या अशा गूढ स्मृती. एका पूर्वजन्मी हिमालयाच्या हिमप्रदेशात योगी म्हणून मी जीवन व्यतीत करीत होतो, हे मला अगदी स्पष्ट आठवते. भूतकाळाच्या त्या अवशिष्ट स्मृतींनी जणू एखाद्या अक्षहीन-अदृश्य सूत्राने करावे तशी मला भविष्यकाळाची कल्पना करून दिली.” आपल्यासारख्या सामान्य वाचकांना हे कल्पनेपलीकडचे ठरते. जन्मोजन्मी काम करणारे एकच एक सूत्र ही कल्पना भारतीय मनात नित्य असते. परंतू आपल्यादृष्टीने ती माहीती असते, अनुभूती नव्हे. पण इथे काही वेगळेच आहे. आणि या पुस्तकाच्या वेगळेपणाची ही तर फक्त सुरवात आहे.

स्वामीजींचे निवेदन पुढे चालूच रहाते. “शैशवकालीन असहाय्य, दीन अवस्थेचे प्रसंग मला अजून आठवतात. त्यावेळी मला धडपणे चालताही येत नसे आणि स्पष्टपणे बोलताही येत नसे याचा मला त्यावेळी फार खेद वाटे. माझ्या शारीरिक असमर्थतेबद्दल खंत वाटून मनामध्ये प्रार्थनारूपी भाव उचंबळून येत असत. माझ्या तीव्र मानसिक भावनेची अभिव्यक्ती नाना भाषांच्या शब्दात येत असे.’ मागच्या जन्मातल्या गोष्टी स्वामीजींना स्पष्ट आठवतात तर हे काही विशेष नाही हे आपल्यालाही कळते. पण इथे मिळणारा धक्का आश्चर्याचा नाही, चिंतनाचा आहे. योगीजी लिहितात, “.... बालमनाचा ठाव मोठ्या माणसांना घेता येत नाही. मुलांचे मन खेळणी व अंगठा चोखण्यातच आनंद मानून राहते असे ते समजतात.” स्वामीजींचे माता-पिता हेही अध्यात्मिक प्रकृतीचे लोक होते असे या आत्मचरित्रावरून आपल्याला समजते. पण आपल्या घरी एक असामान्य बालक जन्म घेणार आहे याची काही कल्पना त्यांना होती काय हे कुठे स्पष्ट झालेले नाही. एकूण आत्मचरित्राचा  सूर अशी काही निश्चित कल्पना योगीजींच्या जन्माआधी त्यांना नव्हती असाच आहे. (स्वामीजींच्या जन्मानंतर लाहिरी महाशयांनी ‘तुझा मुलगा योगी होईल’ असे स्वामीजींच्या आईला सांगितले होते. हेच भविष्य इतरही अनेक लोकांनी नंतर स्वामीजींच्या आईला पुन्हा पुन्हा सांगितले.) आपल्या पालकत्वाला मिळालेला हा एक धडाच आहे. मुलांना समजून घेण्यासाठी थोडे अधिक प्रयत्न, सद्भावना, विचार आणि औदार्य वापरणे आवश्यक आहे हा इथे आपला धडा आहे. स्वतःच्या ज्ञानी असण्यावरचा आपला विश्वास जरासा अनाठायी तर नाही ना यावर पालक म्हणून आपण काही चिंतन केले तर बरे पडेल असा इशारा स्वामीजी इथे आपल्याला देतात.

स्वामीजींनी आपल्या आयुष्याचा जो प्रवास इथे मांडला आहे त्याचे स्वरूप कसे आहे याची कल्पना या सुरवातीपासूनच आपल्याला यायला लागते आणि पुस्तक वाचून संपेपर्यंत कुठेही अपेक्षाभंग होत नाही. आपल्या योगी म्हणून व्यतीत केलेल्या पूर्वजन्माच्या आठवणी ज्याच्या मनात जाग्या आहेत असा बालक हेच योगीजींचे स्वरूप पुस्तकभर आपल्यासमोर येत राहते. (स्वामीजींचा जन्म योगी आदित्यनाथांची कर्मभूमी असलेल्या गोरखपूरचा. हे आपले सहज आठवले म्हणून लिहिले.) उच्चपदस्थ, अधिकारी, बुद्धिवादी, घरंदाज आणि सामान्यतः शांत वडील आणि धार्मिक, श्रद्धाळू आणि प्रेमळ आई या वातावरणात त्यांचे बालपण गेले. या सर्व काळात आईवडिलांच्यातल्या निव्वळ मतभेदाचाही  फक्त एकच प्रसंग आपल्याला पहायला मिळाला असे योगीजींनी नमूद केले आहे. लग्नानंतर लवकरच योगीजींच्या आईवडीलांनी वाराणसीच्या लाहिरी महाशयांचे शिष्यत्व स्वीकारले. त्यामुळे भौतिक फायद्याकडे आणि शारीरिक आरामाकडे फारशी दृष्टी नसणे आणि त्याऐवजी आपल्या अंतरंग उन्नतीकडे सतत लक्ष पुरवणे हे त्या दोघांच्याही अंगवळणी पडले होते. योगीजींच्याही मनावरही तोच संस्कार होत गेला. आणि विचक्षण कुतूहल ही तर योगीजींची मूळप्रवृत्तीच होती. या दोन्हींच्या संगमामुळे पूर्वजन्माच्या स्मृतींनी घातलेला अध्यात्मिक पाया वेगाने बळकट होत गेला आणि मुकुंदाचा प्रवास झपाट्याने योगाच्या दिशेने होत गेला.

योगीजींच्या या प्रवासाचे रूप ही आत्मकथा वाचताना आपल्या डोळ्यांसमोर अनेक प्रकारे उलगडत जाते. अगदी बालवयातच आईवडिलांचे गुरु असलेले श्री श्यामाचरण लाहिरी उर्फ लाहिरी महाशय आपल्या तसबिरीतून बाहेर येऊन समोर बसले आहेत असे त्याना दिसे. या दर्शनामुळे ते शरीराने जिवंत राहिले नसल्याचा जो शोक सुरवातीला वाटत असे, तो हळूहळू नाहीसा झाला. बालपणीच हिमालयात तपाचरण करणाऱ्या योग्यांचे मानसिक दर्शन त्यांना झाले. अध्यात्मिक शक्तीसंपन्न व्यक्तीचे शब्द हे केवढे ताकदवान शस्त्र असतात आणि प्रार्थनेत किती सामर्थ्य असते हे त्यांना अनुभवता आले. भौतिक जन्माआधीच निश्चित झालेली त्यांच्या आयुष्याची दिशा स्वामीजींना सुलभपणे घेता यावी म्हणून वेळोवेळी दैवी हस्तक्षेपही झाला. अर्थात स्वामीजींच्या मनाची ओढही पारलौकिक आणि अलौकिक गोष्टींकडेच होती. घर सोडण्याचे प्रयत्न त्यांनी अनेक वेळा केले. ते शक्य झाले नाही हे वेगळे. पण भौतिक जड सृष्टीपलीकडचे जग वेळोवेळी त्यांच्या नजरेसमोर येतच राहिले. दोन देह धारण करणारे संत प्रणवानंद, लाहिरी महाशयांनी ज्यांच्यासाठी ‘ऋषी’ असे संबोधन वापरले ते संस्कृतपंडित स्वामी केवलानंद, ईश्वराच्या शक्ती लोकांच्या निदर्शनाला आणून देण्यासाठी काही विशिष्ट प्रकारचे चमत्कार दाखवणारे गंधबाबा, भौतिक शक्तींच्या मर्यादा एका आश्चर्यजनक पद्धतीने समजून गेलेले व्याघ्रबाबा, हवेत तरंगू शकणारे भादुरी महाशय अशा अनेक सिद्धपुरुषांनी जो ठसा त्यांच्या मनावर उमटवला तो कधीच न पुसला जाणारा होता. सर्वसामान्य जीवनाच्या भौतिक मर्यादा तोडून पलीकडे निघून जाण्याच्या पद्धतींबद्दल स्वामीजींना वाटणारे कुतूहलच त्यांच्या जीवाला ओढ लावीत होते.

परमहंसजींच्या तोपर्यंत थोड्याशा विस्कळित असलेल्या या आयुष्याला एक निर्णायक वळण लागले ते त्यांचे सद्गुरू श्री युक्तेश्वरगिरी यांच्याशी झालेल्या भेटीमुळे. पण त्या भेटीची जणू थोडी पूर्वतयारी म्हणून माध्यमिक शिक्षण संपवल्यावर स्वामीजी काही काळ वाराणसीला श्री भारत धर्म महामंडळ आश्रमात राहिले. अन्य कोणत्याही गोष्टीपेक्षा ईश्वरावरची श्रद्द्धा हीच महत्वाची आहे हा धडा इथे त्यांच्याकडून घटवून घेतला गेला आणि मगच त्यांना त्यांचे गुरु युक्तेश्वरगिरी महाराज यांच्या स्वाधीन केले गेले. ‘आयुष्यातील अत्युत्तम काळ’ अशा शब्दात ज्याचे स्वामीजींनी वर्णन केले तो दहा वर्षांचा काळ सेरामपुरच्या स्वामी युक्तेश्वर गिरी महाराज यांच्या आश्रमात त्यांनी घालवला. इथेच ते परमहंसत्वाला पोचले.

आश्रमातल्या वास्तव्याच्या पहिल्याच दिवशी आपले गुरुजी हे लाहिरी महाशयांचेच शिष्य आहेत हे समजल्यानंतर स्वामीजींची प्रतिक्रिया ईश्वराच्या या योजकतेपुढे नतमस्तक होणे हीच असावी यात काहीच आश्चर्य नाही. मुख्यतः आत्मिक आणि त्याला आवश्यक असेल तेवढ्या प्रमाणात भौतिक-शारीरिक अशी त्यांची सर्वंकष जडणघडण गुरुसान्निध्यात झाली. गुरुजींचा उपदेश, त्यांच्याबरोबरच्या चर्चा, वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आणि अशा साऱ्या गोष्टींना आधारभूत असणारी क्रियायोगाची साधना यांचा मिलाफाने स्वामीजींचे व्यक्तिमत्व घडत गेले. अमेरिकेत क्रियायोगाचा प्रसार करणे हे आपल्या आयुष्याचे कार्यही इथेच त्यांना गवसले. पतंजलीच्या योग तत्वज्ञानाचे अंतरंग गुरुंच्या द्वारे त्यांना उलगडत गेले आणि कार्य आणि कारण यांचा अध्यात्मिक पातळीवरचा संबंधही स्पष्ट होत गेला. सांघिक जबाबदारीने अध्यात्मिक कार्य करण्याचे प्रशिक्षणही गुरुजींनी त्यांना दिले. व्यक्तिगत आवडीनिवडी आणि मूल्यांचे शिक्षण यांच्यातला फरक जाणण्याची सूक्ष्म अंतर्दृष्टी विकसित झाली. गुरुशारण्य आणि गुरुकृपा यांचे सूक्ष्म धागेदोरे समजून आले.एका समर्पित कळीचा विकास होऊन तिचे सर्व विश्व सुगंधित करू शकणाऱ्या फुलात परिवर्तन झाले.

स्वामी योगानंदांच्या गाढ गुरुभक्तीचा प्रत्यय या पुस्तकातल्या जवळपास १६२ पानांच्या सेरामपुर आश्रमातले दिवस वर्णन करणाऱ्या भागात वारंवार येतो. पण सद्गुरूंनी दिलेला समाधीचा दिव्य अनुभव वर्णन करणारे १४वे प्रकरण हा त्याचा, किंबहुना या पुस्तकाचाच, कळसाध्याय म्हणावा लागेल. (एक आश्चर्यकारक योगायोग म्हणजे गुरुभक्तीचे सारभूत तत्व अशा सरस्वती गंगाधर विरचित गुरुचरित्रातही १४वा अध्याय हाच संपूर्ण ग्रंथाचा मेरुमणी मानला जातो.) चराचर सृष्टीच्या पूर्णस्वरूपाशी तादात्म्य हे योगसाधनेचे उद्दिष्ट असते. निर्विकल्प समाधी मिळाल्यानंतर साधकाला आणखी मिळवण्यासारखे फारसे काही उरतच नाही. आणि तरीही कर्मक्षय हे काम शिल्लक रहातेच. त्यासाठी कर्तव्यकर्म चालूच राहावे लागते. स्वामीजी लिहितात. ‘ते (युक्तेश्वर) मला संथपणे म्हणाले, “ह्या परमानंदामुळे तू बेहोष होऊन जाऊ नकोस. तुला ह्या जगात अजूनही पुष्कळ काम करायचे आहे.” विसाव्या शतकातल्या भारताच्या पुनरूत्थानाचे अग्रदूत स्वामी विवेकानंद यांना त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांनी केलेल्या उपदेशाची आठवण येणे इथे अपरिहार्यच आहे. पण आपला विचार इथे थांबत नाही. एक विस्मयकारक आणि तितकीच रोमहर्षक गोष्ट इथे आपल्या नजरेसमोर उलगडते आहे. भौतिक विद्यांच्या अभावी पराजित आणि पतित झालेल्या भारताच्या पुनरुत्थानाची सुरवात विसाव्या शतकात झाली. या पुनरुत्थानाचे नेतृत्व बंगाल आणि महाराष्ट्राने केले हा आता सर्वज्ञात असलेला इतिहास आहे. पुनरुत्थानाच्या सुरवातीच्या काळाचे आपल्याला दिसणारे चित्र काय आहे? महर्षी रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद या गुरुशिष्यांच्या जोडगोळीने याचा पाया घातला. स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली आणि अध्यात्माचा सामाजिक आशय आघाडीवर आणला. त्यांचा जन्म १८६३चा, तर परमहंस योगानंदांचा जन्म १८९३चा. स्वामीजींचे अवतारकार्य दक्षिणेश्वरपासून सुरू झाले तर परमहंसजींचे सेरामपूर इथून. एक क्षणभर आपली नेहमीची पुराव्यांचा शोध घेणारी तार्किकता थोडी मागे ढकलली तर स्पष्टपणे वाटू लागते की अत्यंत योजनापूर्वक कुणीतरी विसाव्या शतकातल्या भारतीय पुनरुत्थानाच्या नैतिक बाजूचे नेतृत्व बंगालकडे सोपवले होते आणि महायोगी अरविंदांच्या माध्यमातून तिचा सांधा भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामाशी अगदी घट्टपणे जोडला होता. प्रकांड शक्तीचा हा दिव्य वारसा योगानंदजींनी लीलया पेलला.

या आत्मचरित्रात योगीजींनी आपल्या समोर ठेवलेल्या सर्व तपशीलांवर आपण इथे चर्चा करू शकणार नाही. पण महावतार बाबाजी आणि त्यांनी पुनःप्रवर्तित केलेली परंपरा यावर काही न लिहिणे हा ‘योगीकथामृता’वरही अन्याय ठरेल आणि योगाच्या महान परंपरेवरही. महावतार बाबाजी क्रियायोग परंपरेचा तर आत्माच आहेत. पण दत्तात्रेय परंपरेत त्यांचा सर्वत्र संचार आहे आणि दत्त परंपरेचे साधक असलेल्या सर्वांशी कुठे ना कुठे त्यांचा संबंध असतोच असे दिसते. कोल्हापूरचे कृष्ण सरस्वती दत्त स्वामी महाराज, पुण्याचे श्री गुळवणी महाराज, दिव्यस्पर्शी साधक डॉ. राम भोसले यांच्या परंपरेत बाबाजींना दत्तगुरुंप्रमाणेच स्मर्तृगामी मानले जाते. बाबाजींचे दर्शन झालेल्या सर्वांचे काही तपशिलांवर एकमत आहे. ते २५-३० वर्षे वयाच्या तरुणासारखे दिसतात आणि काही विशिष्ट कामासाठी देह टिकवून आहेत, महावतार या स्थानी ते एकमेव आहेत अशासारख्या गोष्टी यात येतात. त्यांच्या कामाचे स्वरूप आणि पद्धती समजणे योग्यांनाही कठीण असल्याचे मानले जाते. महावतार बाबाजी हेच मुनी मतंग आहेत असाही एक विचारप्रवाह आहे. महाराष्ट्रातली दत्त परंपरा मुख्यतः शक्तिपात दीक्षेच्या मार्गाने कार्य करते. ही शक्तिपात दीक्षा किमान ७२ वेगवेगळ्या प्रकारांनी देता येते असे सांगितले जाते. क्रियायोगाच्या तुलनेत शक्तिपात ही अधिक सोपी आणि सुरक्षित साधनापद्धती असल्याचेही जाणकार सांगतात. पण क्रियायोग आणि शक्तिपात यांच्याव्यतिरिक्त शक्तीचे संक्रमण घडवण्याच्या आणखी ७ पद्धती आहेत आणि महावतार बाबाजी या सर्व ९ पद्धतींमध्ये तज्ज्ञ आहेत असे सर्वच दत्त सांप्रदायिक मान्य करतात. आपल्यासारख्या आयुष्यात नजरेच्याही पलीकडे असणाऱ्या या महात्म्यापुढे अचंब्याने नतमस्तक होण्यापलीकडे आपण काय करणार?

सद्गुरूंची शिकवण आणि आयुष्यातल्या असंख्य अनुभवांचा पेटारा यातली निवडक रत्ने वेचून स्वामीजींनी योगीकथामृतात मांडली आहेत. रंजकतेचे भान ठेवून स्वामीजींनीही इथे अनुभवांचे शक्य तितके वैविध्य राखण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या डोळ्यांनी स्वामी श्री. युक्तेश्वरांचे सामर्थ्य पाहूनही वागण्यात तोल न राखता आलेला शशी, आपल्या ज्ञानावर वाजवीपेक्षा जास्त विश्वास असणारा पशुडॉक्टर, अपघाताने सिद्धी मिळालेला आणि त्यांचा दुरुपयोग करून नंतर पश्चात्ताप करणारा अफझल, साध्या संसारी माणसांमधून परिवर्तन होऊन साधकाच्या पातळीला पोचलेले स्वामीजींचे ताई-मेहुणे अशा अनेक पात्रांच्या आणि त्यांच्या आयुष्यातल्या प्रसंगांच्या कथा सांगत परमहंसजी वाचकाला रंगवीत आणि रंजवीत ठेवतात. नर्मविनोदाची पखरण करीत आणि प्रांजळपणे कथा सांगत स्वामीजी वाचकाला गुंतवतात. आपल्या बीए होण्याबद्दल स्वामीजींना कधीच खात्री नव्हती असे ते सांगतात.पण त्यांच्या गुरूंनी, युक्तेश्वरांनी त्यांना ‘एखादे वेळी सूर्य व चंद्र आकाशामधली आपली स्थाने बदलतील; पण तुला पदवी मिळणार नाही असे होणार नाही’ अशा शब्दांमध्ये आश्वासन दिले होते. जेव्हा स्वामीजी बीएची परीक्षा पास झाले तेव्हा गुरुजींनी ‘परमेश्वराला सूर्य व चंद्र यांची परस्परांची स्थाने बदलण्यापेक्षा तुला पदवीधर करून टाकणे अधिक सोयीचे वाटले, दुसरे काय?’ अशा शब्दात त्यांना, पुन्हा एकदा परमेश्वरी कृपाप्रसाद असे स्वरूप पदवीला देत, आशीर्वाद दिला. स्वामीजी हे सर्व अगदी रंगवून सांगतात.

स्वामीजींची ही पोतडी त्यांचे अनुभव आणि त्यातून क्षणाक्षणाने-कणाकणाने घडत गेलेले त्यांचे व्यक्तिमत्व तर आपल्यासमोर उलगडत नेतेच. पण त्यासोबतच अनेक अनुषंगिक विषयांना स्पर्श करीत आपल्यासमोर माहितीचा एक खजिनाही खुला करते. १५व्या प्रकरणात आश्रमातल्या एका भजन-नामसंकीर्तनाचा अनुभव सांगताना प्राचीन काळापासून चालत आलेल्या भारतीय शास्त्रीय संगीताबद्दल सामवेदापासूनची सविस्तर माहिती ते देतात. २४व्या प्रकरणात संन्यासाश्रम व्यवस्थेबद्दल अशीच विस्तृत सखोल माहिती येते. वाचक म्हणून स्वामीजींचे अनुभव जास्त चांगले समजून यायला त्यामुळे मदत होतेच. पण इथे-तिथे सहजपणे विखुरलेल्या छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये दडलेली काही वैशिष्ट्येही अशा  माहितीमुळे अधिक प्रकाशित होतात. एक छोटेसे उदाहरण द्यायचे तर जवळजवळ संपूर्ण पुस्तकभर अध्यात्मिक व्यवस्थेतल्या गुरु-शिष्य संबंधांबद्दल भाष्य येत रहाते. आधी वरती म्हटल्याप्रमाणे २४व्या प्रकरणात संन्यासाश्रम व्यवस्थेबद्दल माहिती येते. गुरुशिष्य ही याच अध्यात्मिक व्यवस्थेतली अतिशय मजबूत आणि महत्वपूर्ण व्यवस्था आहे हे आपल्या नजरेला येतेच. पण ४२व्या प्रकरणात आपल्या भौतिक व्यवस्थेपासूनचे तिचे वेगळेपण अगदी स्पष्ट होते. या प्रकरणात स्वामीजींनी आपल्याला ‘परमहंस’ ही पदवी मिळाल्याची हकीकत सांगितली आहे. परमहंसजी सांगतात की त्यांचे गुरुजी युक्तेश्वरगिरी यांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि संन्यासधर्माची आणखी वरची परमहंस ही पदवी दिली. ते म्हनाले, ‘तुझ्या पूर्वीच्या पदवीपेक्षा ही पदवी वरची आहे. पूर्वीची पदवी वापरण्याचे आता कारण नाही.’ गंमत म्हणजे स्वतः गुरुजी युक्तेश्वरजी या वेळीही गिरी याच श्रेणीत होते. अध्यात्मिक योग व्यवस्थेत गुरू हाच शिष्याचे सर्वस्व असतो. गुरू शिष्याला फक्त मार्गदर्शनच करतो असे नव्हे तर त्याची वेळोवेळी परीक्षाही करीत असतो आणि त्याचे स्थान ठरवीत असतो. तिथे महत्व गुरु या व्यक्तीला नव्हे तर गुरुतत्वाला असते. शिष्याला कोणते स्थान द्यायचे हे सर्वस्वी गुरूच ठरवतो आणि खऱ्या साधकाला या स्थान-मानाचे काही अपरूप नसते. योगानंदांचे गुरुजी त्यांच्या समोर होते आणि त्यामुळे त्यांना परमहंस ही पदवी देऊ शकत होते. पण युक्तेश्वरांचे गुरुजी लाहिरी महाशय देह सोडून गेले होते. त्यामुळे युक्तेश्वरांना वरची पदवी कोण देणार? पण या पदवी असण्या-नसण्याचे ना युक्तेश्वरांचे काही वाटले, ना योगानंदांना. गुरु ही व्यक्ती असते आणि ती शिष्याला परमपूजनीयही असते. पण गुरु या व्यक्तीच्या माध्यमातून एक तत्व कार्य करीत असते आणि हे व्यक्तीच्या लहानमोठेपणाचे नियम त्याला लागत नाहीत. तिथले नियम एका वेगळ्या पातळीवर आणि वेगळ्याच पद्धतीने काम करतात. ते जग आपल्या भौतिक जगापेक्षा सर्वस्वी वेगळे आहे. योगीकथामृत वाचताना हे अगदी ठसठशीतपणे आपल्या नजरेसमोर येते.

योगीकथामृत या पुस्तकाची दोन महत्वाची शक्तिस्थाने आहेत हे आपण सुरवातीला पाहिले. यापैकी ग्रंथकर्त्याचे जीवन आणि त्याचे पुस्तकातून होणारे दर्शन या शक्तीस्थानाचा सविस्तर परिचय आपण करून घेतला. एका योग्याचे जीवन सामान्य सांसारिक माणसापेक्षा निराळे असणार हे आपण गृहीत धरलेले असते. ते आपले गृहीतक बरोबरच होते याची खात्री या पुस्तकात स्वामीजींच्या जीवनाचे जे दर्शन आपल्याला होते, त्यावरून पटायला काहीच हरकत नाही. पूर्वजन्माच्या आठवणी, बालपणातल्या आवडीनिवडी, व्यक्तिगत स्वभाव या सर्वच अंगांनी परमहंसजींचे जीवन वेगळेपणाने उठून दिसते. व्यक्तिगत जीवनाची जी समाजमान्य चाकोरी आपण गृहीत धरलेली असते, ती उधळून लावतच स्वामीजींचे जीवन मार्गक्रमण करते. त्यामुळे स्वामीजी समाजात वेगळे दिसले तर त्यात काहीच आश्चर्य नाही. परंतू आपण योग्यांचे-साधकांचे एक चित्र आपल्या मनाशी गृहीत धरलेले असते. त्यात योगी म्हणजे समाजविन्मुख, जगाच्या कसल्याच भानगडींमध्ये रस नसलेला आणि सांसारिक गोष्टींपासून दूर असणाराच गृहीत धरलेला असतो. समर्थ रामदासांनी केलेला ‘शहाणे करून सोडावे, सकळ जन’ हा उपदेश फारसा मनावर न घेणारे हेच आपल्या मनातले त्यांचे चित्र असते. त्यामुळेच स्वामी विवेकानंदांसारखा अध्यात्माचा सामाजिक आशय प्राधान्याने आणि जोरकसपणे मांडणारा योगी हा एक अपूर्व योग आहे. परमहंस योगानंद हे तर स्वामी विवेकानंदांचे उत्तरकालीन वारस. त्यामुळे त्यांनी स्वामी विवेकानंदांचा वारसा आधीच पचवलेला होता. दुसरी गोष्ट म्हणजे स्वामी विवेकानंदांच्या कामाचा मुख्य भाग भारतातच झाला. परमहंसजींच्या कार्याचा मुख्य भाग अमेरिकेत घडला. त्यामुळे नव्या जगाचा वैचारिक वारसाही परमहंसजींना त्याच्या मूळ स्रोतापासूनच – अमेरिकेकडूनच - मिळाला होता. परिणामतः ते स्वामी विवेकानंदांच्याही एक पाऊल पुढे गेले आणि योगीकथामृतचे ते दुसरे शक्तिस्थान ठरले. उत्तरार्धात  त्याचाच सविस्तर परिचय आपल्याला करून घ्यायचा आहे.

No comments:

Post a Comment