Sunday, 3 June 2018


नव्या अवताराची नवी कथा : कलकी

लेखक का लिहितो (किंवा अधिक भारदस्त भाषेत म्हणजे साहित्यिक साहित्यनिर्मिती का करतो) हा तुमच्या-माझ्यासारख्या जनसामान्यांना नेहमीच सतावणारा प्रश्न आहे. अनेकदा अनेक लेखकांना हा प्रश्न विचारलाही गेला आहे आणि त्याची अनेक उत्तरे अनेकांनी दिली आहेत. ‘मनातली अस्वस्थता जेव्हा असह्य होते, तेव्हा तिला लेखनाद्वारे वाट मिळते’ हे बऱ्याच लेखकांचे म्हणणे आहे. ‘भोवतालच्या कठोर वास्तवाकडे लक्ष वेधणे’ इथपासून ‘सकारात्मक विचारांची प्रेरणा देणे’ इथपर्यंतची उत्तरेही आलेली आहेत. पेशवाईतले कवी मोरोपंत यांनी ‘आपण काही तरावया गावे’ म्हणजे हा दुस्तर भवसागर तरून जाण्यासाठी  उपयोगी असे काहीतरी गावे असे त्यांना वाटत असल्याचे सांगितले आहे. रामकृष्ण मठाने ‘आत्मनो मोक्षार्थं जगद्धिताय च’ असे म्हटले आहे. पण तरीही हे चित्र पूर्ण होत नाहीच. आपले म्हणणे इतरांच्या गळी उतरवण्यासाठी म्हणूनही कधी कधी साहित्य जन्म घेते. जुन्या काळात ‘मुक्तामाला’सारख्या कादंबरीत ‘आमचे म्हणणे सर्वांच्या लक्षात यावे यास्तव एक पूर्वीचा इतिहास सांगतो’ असे म्हणून कथा सांगितली जाई. आता असे न करता थेट कथा सांगून वाचकाला बोध घेण्यासाठी सोडून दिले जाते. मराठीतले ज्येष्ठ कथालेखक जी ए कुलकर्णी यांच्या कथांवर त्या ‘जीएंचे तत्वज्ञान टांगण्यासाठीच्या खुंट्या आहेत’ असा आरोप नेहमीच केला जातो. सहसा अशा साहित्यकृती फारशा वाचनीय होत नाहीत असा अनुभव आहे. पण कधीतरी का होईना, असेही घडते की प्रसारासाठी लिहिलेले असे साहित्य स्वतंत्र लेखन म्हणूनही वाचनीय ठरते. अशा मोजक्या साहित्यकृतींमध्ये आपल्याला स्वामी विज्ञानानंद यांच्या ‘कलकी’चा अंतर्भाव करावा लागेल.
कलकी ही विश्वनाथ ह्या एका सत्शील, मनमिळाऊ माणसाची कथा. या साध्या, सरळ माणसाच्या आयुष्यात अचानक एक वादळ येते. आपली पत्नी आणि रावबहादूर जोशी या धनाढ्य माणसाची कन्या प्रथमा हिचा रावबहादुरांच्या संपत्तीच्या लोभापायी खून केल्याचा आरोप त्याच्यावर येतो. कादंबरी सुरू होते ती खुनाची घटना आणि विश्वनाथचा खटला इथपासून. खून कुणी केला हे विज्ञानानंद सांगत नाहीत. त्याने अशा सर्वनामाने खुन्याचा उल्लेख येतो. एका बाजूला विश्वनाथ आणि त्याचा साडू – प्रथमेच्या बहिणीचा पती – विक्रांत आणि दुसऱ्या बाजूला समाजाची गुन्हे-अन्वेषण यंत्रणा यांचा सामना सुरू होतो. विश्वनाथला विक्रांताचे प्रयत्न ही एकच आशा असते आणि त्याचा बचाव करण्यासाठी विक्रांताने जीव गहाण टाकण्याचेच बाकी ठेवले होते असा निर्वाळा लेखक खटल्याच्या सुरवातीलाच देतात. रावबहादुरांची सर्वात धाकटी मुलगी तृतीया उर्फ तितू हिची संपूर्ण सहानुभूती तिच्या विश्वनाथभैयाच्या बाजूने असते. तिला आपल्या अनुभवाने विश्वनाथ हा खून करणे शक्य नाही ही खात्री असते. आपण खुनी नाही हे न्यायालयाला कसे पटवून द्यायचे हा मोठाच प्रश्न विश्वनाथसमोर असतो. त्याच्या साऱ्या प्रयत्नांनंतरही खटल्याचा निकाल विश्वनाथच्या विरोधात जातो आणि त्याला फाशीची शिक्षा होते. आपण निर्दोष आहोत हे विश्वनाथला माहित आहे आणि ज्या कुणी आपल्या प्राणप्रिय पत्नीचा खून केला त्याला शोधायची (आणि या हत्येचा सूड घेण्याची) त्याला तीव्र तळमळ आहे. पण एकदा न्यायालयात शिक्षेची घोषणा झाल्यानंतर आता हे घडवू शकण्याचा एकच मार्ग विश्वनाथपुढे आहे. पलायन. तेच तो करतो.
जाफर या सराईत गुन्हेगाराच्या मदतीने विश्वनाथ, फाशीसाठी तुरुंगात नेताना, वाटेतच पळ काढतो. मध्येच त्याला पुन्हा पोलिसांच्या स्वाधीन करण्याचाही एक प्रयत्न होतो. पण मरता क्या न करता या अवस्थेत असलेला विश्वनाथ प्रसंगावधान दाखवून या प्रसंगातून सुटतो आणि स्वतःला महापुराने ओसंडून वहाणाऱ्या नर्मदेत झोकून देतो. पुराचा अंदाज चुकून पाण्यात पडलेल्या नर्मदानंद या परिक्रमावासीशी या वाहत्या नदीप्रवासात त्याची गाठ पडते आणि त्याच्याच मदतीने विश्वनाथ नरमांसभक्षक टोळीत पोचतो. इथून विश्वनाथचा जणू नवा जन्म सुरू होतो.
नरमांसभक्षकांच्या टोळीचा राजा जनक याच्या सहवासात विश्वनाथच्या कल्पनाशक्तीला नव्यानव्या विचारांचे अनेक धुमारे फुटतात आणि त्याच्या मनात सूडाची एक अतिशय अभिनव कल्पना जन्म घेते. ही कल्पना म्हणजे सत्यकिरण. विश्वनाथ तपश्चर्येने असे सामर्थ्य मिळवतो की तो ज्याच्या डोळ्याला डोळे भिडवून बोलेल तो माणूस विश्वनाथशी खोटे बोलू शकणार नाही. या नव्या हत्याराचा उपयोग फक्त सूडासाठीच करण्याची प्रतिज्ञा विश्वनाथ घेतो. या तपस्येच्या काळात कठोर शारीरिक श्रमांनी विश्वनाथचे रूपही पालटून जाते. त्यामुळे तो कलकी हे नवे नाव धारण करून आपल्या जीवनमरणाच्या लढ्यात उतरतो आणि अंती यश प्राप्त करतो. या सगळ्या प्रयत्नात त्याला खुन्याचा तर शोध लागतोच. पण आयुष्याचे सार्थक करू शकणाऱ्या सत्याशीही त्याचा परिचय होतो. खुनी कोण असतो आणि विश्वनाथ उर्फ कलकी त्याला न्यायापर्यंत कसा पोचवतो, विश्वनाथला यश मिळेपर्यंत कायकाय झेलावे लागते, या सगळ्या उद्योगात त्याच्या भोवतीचे नेहेमीचे जगच नव्हे तर त्याचे विचारविश्वही कसे उलटेपालटे होऊन जाते आणि प्रौढांच्या मनाच्या काळ्या बाजूशी बालकांच्या निरागसपणाचा सामना होतो तेव्हा काय होते याचे एक छान जमून आलेले दर्शन म्हणजे ही कादंबरी.
या कादंबरीतला नरभक्षकांचा राजा जनक हा विज्ञानानंदांच्या सगळ्या वैचारिक भूमिकेच्या केंद्रस्थानी आहे. विज्ञानानंद त्याच्या रूपाने आपले नवतत्वज्ञान मांडतात. आपले तत्वज्ञान क्रांतिकारी आहे याची स्वामीजींना पुरेपूर खात्री होती. तरीही विरोधाने हे तत्वज्ञान उठून दिसावे यासाठी की काय, पण ते जनकाचे शारीरिक रूप काहींसे ओंगळवाणे वाटेल असे दाखवतात. चिखलातील कमळ किंवा वाळवंटात ओअॅसिस अशासारख्या काही कल्पनांच्या आकर्षणामुळे हे घडते अशी शक्यता दिसते. परंतू त्याचा एक फायदा निश्चितच होतो. जनकाचा सहवासात विश्वनाथमध्ये जे परिवर्तन होत जाते त्यावर वाचकाचे लक्ष पूर्णपणे केंद्रित होते. गंमत म्हणजे विश्वनाथ आणि जनक यांच्या भेटीच्या संपूर्ण काळात जनक एक अवाक्षरही बोलत नाही आणि तरीही विश्वनाथ निष्कर्षांपर्यंत येऊन पोचतो. जनकाच्या फक्त उपस्थितीनेच विचारांचा प्रवाह सुरू होतो असे स्वामीजींचे गृहीतक दिसते. अर्थात हा प्रवाह अधांतरी जन्म घेत नाही. नरभक्षक आदिवासी टोळीतला जनकाचा विश्वासू आणि ज्ञानी शिष्य पीराल याच्याकडून आणि स्वतः जनकाच्या लिखित नोंदी वाचून विश्वनाथने जनकाचे तत्वज्ञान समजून घेतलेलेच असते. त्यामुळे जनकाची विचारांची पद्धत त्याला माहित आहे. तरीही केवळ उपस्थितीने आपल्याच नव्हे तर कुणाचाही विचारप्रवाहाला गती देण्याची जनकाची कुवत आहे असे विश्वनाथलाही वाटते. ज्या तात्विक-सैद्धांतिक विचारांमधून हे सगळे जन्म घेते ते नवतत्वज्ञान आहे तरी काय?
स्वामी विज्ञानानंदांच्या नवतत्वज्ञानाची ओळख करून घेताना एक गोष्ट लक्षात ठेवण्याची गरज आहे की स्वामीजींनी कलकी कादंबरी नवतत्वज्ञानाच्या प्रचारासाठी लिहिली हे खरे. पण जेव्हा ती लिहिली तेव्हा नवतत्वज्ञानाची बाल्यावस्था अजून संपली नव्हती. अजूनही ते घडत-वाढत होते. त्यामुळे सुरवातीच्या काळात कोणत्याही नव्या विचारसरणीत दिसणारे लहान-सहान अंतर्विरोध इथेही दिसतात. एक साधेसे उदाहरण द्यायचे तर सूडाचा आसूड या नवव्या प्रकरणातील पीराल आणि विश्वनाथ यांच्यातल्या नवतत्वज्ञानाबद्दलच्या चर्चेचे देता येईल. चर्चेच्या सुरवातीला पीराल सांगतो की जनकराज चमत्कार मानत नाहीत, तर चमत्कार ही आपल्या अज्ञानाची तत्कालीन मर्यादा मानतात. पाठोपाठ दोनच मिनिटात पीराल सांगतो की ... फार शास्त्रीय चर्चा चालते तेव्हा जनक माझ्या मुखातून बोलायला मदत करतो. पण हा चमत्कारच आहे या विश्वनाथच्या म्हणण्याशी तो सहमत होत नाही. ...रेडिओ आज काय करतो? .... हे .... शक्तीच्या अदलाबदलीचे तत्व आहे. असे पीरालचे म्हणणे आहे. आता इथे अदलाबदल शक्तीची होत नसून व्यक्तीची होते आहे आणि एका व्यक्तीच्या तोंडून दुसराच बोलत आहे हे आपल्याला दिसते आहे. त्यामुळे पीरालचा मुद्दा पटण्यासारखा वाटत नाही. अशाच प्रकारे काही गोष्टींची स्पष्टीकरणेही मिळत नाहीत. तपश्चर्येने सामर्थ्य मिळते हे जगातली सर्वच तत्वज्ञाने मानतात. पण सामर्थ्य कोणते मिळावे हे ठरण्यासाठी सामान्यपणे एखादे दैवत किंवा कुणातरी विवेकी शक्तीची उपस्थिती मान्य केली जाते. ब्रह्मदेव किंवा शंकराकडून वर मिळण्यासाठी तप हे तपश्चर्येचे सर्वसामान्य रूप आहे असे आपण समजतो ते त्यामुळेच. स्वामीजी या कथेत दैवत येऊ देत नाहीत. आता अशा अवस्थेत कशी तपश्चर्या केल्यानंतर कोणते सामर्थ्य (किंवा आपल्या भाषेत ‘वर’) मिळणार हे कसे ठरणार याचे काही उत्तर कादंबरीत नाही. तपश्चर्या करणाऱ्याचा संकल्प हे उत्तर असावे असे कथा वाचताना वाटते खरे. पण समजा एखाद्याचा संकल्प कुणाला त्रास देण्याचा किंवा जगाच्या अकल्याणाचा असेल तर काय हा प्रश्न राहतोच. एखाद्या हिटलरने उद्या ज्यूंच्या विनाशाचा संकल्प घेऊन तपश्चर्या केली तर काय होईल? स्वामीजी कादंबरीत कसलाही खुलासा देत नाहीत. असे काही छोटे छोटे अंतर्विरोध इथे दिसतात. पण सुरवातीच्या काळात हे स्वाभाविक आहे. गाय- एक उपयुक्त पशू असा लेख लिहून तर्कवादी विचारांच्या प्रसारासाठी प्रयत्न करणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘संगीत उःशाप’ नाटकात नाटकाच्या शेवटी जातिभेद वाईट हे सांगण्यासाठी साक्षात भगवान श्रीकृष्ण प्रकट होतात. असे होत असते. अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे जरा दुर्लक्ष केले तरच नवतत्वज्ञान समजून घेता येईल.
नवतत्वज्ञानाच्या मते जगातली सर्व कारणे आणि परिणाम न्यूटनच्या तिसऱ्या नियमाने मापली गेली आहेत. त्यामुळे कारणेपरिणाम आणि प्रतिकारणेप्रतिपरिणाम यांची एकूण बेरीज शून्यच राहते आणि विश्व स्थिर रहाते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे व्यक्तीसापेक्ष न्याय नवतत्वज्ञानाला मान्य नाही. व्यक्तिनिरपेक्ष आणि भावनांची सरमिसळ न होऊ देता जाणलेले सत्यच नवतत्वज्ञानातल्या न्यायाच्या त्यातल्या त्यात जवळ जाईल. तिसरे महत्वाचे तत्व म्हणजे नवतत्वज्ञान ज्ञान हा गुरु आणि व्यक्तीची विवेकबुद्धी हे निर्णय घेण्याचे साधन मानते. कोणतीही गोष्ट विवेकाच्या कसोटीवरच मान्य किंवा अमान्य केली जावी असे त्याचे म्हणणे आहे. नवतत्वज्ञानात या तीन नियमांना मूलभूत महत्वाचे स्थान आहे. मुख्यतः त्यांच्या पायावरच बाकीच्या तत्वज्ञानाचा डोलारा उभा रहातो. एक उदाहरण जीवनातल्या सुख-दुःखांचे देता येईल. भावनेच्या द्वारा मन हे स्वास्थ्य व सुख यासाठी शरीरावर किंवा तद्-द्वारा जगावर क्रिया करते. त्याची प्रतिक्रिया म्हणून जग शरीराच्याच माध्यमाने अस्वास्थ्य आणि दुःख मनाला परत देते असे नवतत्वज्ञान मानते. याचीच दुसरी बाजू काही विशेष सामर्थ्य किंवा शक्ती हवी असेल तर त्याच्या किंमतीएवढे दुःख स्वीकारले पाहिजे ही आहे.परंतू फायदा आणि त्याची अपरिहार्य किंमत याच्यात काळाचा काही फरक असू शकेल, हे नवतत्वज्ञानाला मान्य आहे.
कथानकाच्या संदर्भात पहायचे तर हे नवतत्वज्ञान पात्रांच्या मार्फतच कथेत यावे लागणार हे उघडच आहे. विश्वनाथच्या नवतत्वज्ञानाच्या प्रवेशासाठी अत्यंत महत्वाची असणारी जनक-विश्वनाथ भेट कादंबरीच्या दहाव्या प्रकरणात होते. आधी सांगितल्याप्रमाणे तिची सुरवात स्वामीजी करतात ती जनकाच्या गलिच्छ शारीरिक दर्शनाने. आपण जी प्रतिमा राजपूत किंवा रोमन वीरासारखी रंगवली होती, त्याचे भूतही याच्यापेक्षा बरे सजले असते असे जनकाच्या दर्शनाने विश्वनाथला वाटते. भेटीत संभाषणाची सुरवातही विश्वनाथ करतो आणि शेवटही. या संपूर्ण प्रकरणात जनकराजाच्या तोंडी एकही वाक्य नाही. पण मध्ये मध्ये विश्वनाथला,‘आपल्याला बोलायचे असलेले वाक्य मेंदूच्या आज्ञाकेंद्रात कोणीतरी अडवले आहे असे वाटे असे स्वामीजी लिहितात. हे असे वाटण्याचे कारण विश्वनाथला समजते ते पीरालच्या उदाहरणानेच. पीराल अवघड कल्पना सांगताना डोळे मिटत असे तेव्हा जनकच त्याला आज्ञा देतो आहे असा विश्वनाथला भास होई. या भेटीत त्या भासाचे सत्यतेत रूपांतर होते. पण विश्वनाथसमोर एक फार मोठी अडचण आहे. नवतत्वज्ञान व्यक्तिसापेक्ष न्याय मान्य करीत नाही. त्यामुळे वैयक्तिक सूडही आपोआपच अमान्य झाला. पण सध्या विश्वनाथचे मन फक्त सूडाच्या कल्पनेभोवतीच एकवटले आहे. एकीकडे नवतत्वज्ञानाची चिरेबंदी तार्किक मांडणी नाकारता येत नाही. दुसरीकडे मन सूड पूर्ण झाल्यावाचून ऐकायला तयार नाही. या शृंगापत्तीतून विश्वनाथ अखेरीस एक मधला मार्ग एका वैचारिक प्रवासाद्वारे शोधून काढतो. नवतत्वज्ञान अचानकपणे एका रात्रीत कुणाचे स्वभावपरिवर्तन करण्याचा अट्टाहास करीत नाही. त्यात सावकाशपणाला वाव आहे. एका अर्थाने नवतत्वज्ञानही क्रांतीकारी (revolution) मार्गाने होणाऱ्या बदलांपेक्षा उत्क्रांतीचा  (evolutionचा)  मार्ग अधिक चिरस्थायी असल्याचे स्वीकारते. याचा वापर करून विश्वनाथ एका वेळेपुरती सूड घेण्याची कल्पना मांडतो. नवतत्वज्ञानाच्या पद्धतीने पाहताना जरी हे त्याचे अधःपतन ठरले तरी, मन एका नव्या आयुष्याला सन्मुख करण्याची किंमत म्हणून तो हे स्वीकारतो आहे. स्वामीजींनी विश्वनाथचा हा प्रवास कादंबरीत अतिशय सूक्ष्मतेने आणि सहृदयतेने मांडला आहे.
सूडाच्या या कल्पनेला आणि त्यासाठी करायच्या प्रयत्नांना विश्वनाथ काही मर्यादा घालून घेतो. एक म्हणजे यातना ही किंमत आणि सामर्थ्य हे फळ यांचे परस्पर नाते विश्वनाथ मान्य करतो. या सामर्थ्यातला जो भाग संपत्तीच्या स्वरूपात असेल तो काम झाल्यावर जनकाकडे परत करण्याची तो हमी देतो. दुसरी मर्यादा म्हणजे सूड या उद्दिष्टाला आवश्यक असेल तरच तो असत्य बोलेल. अन्यथा नाही. तिसरी म्हणजे खुनी माणसाला तो न्यायासनापर्यंत नेऊ शकेल. पण स्वतः त्याची हत्या करणार नाही. सत्यकिरण ही कल्पना विश्वनाथला या भेटीतच स्फुरते. ज्या कुणाशी विश्वनाथ नजरेला नजर भिडवून बोलेले तो माणूस त्या वेळी खोटे बोलू शकणार नाही. याचा आपल्याला दिसणारा अर्थ हा आहे की तपश्चर्येने मिळवलेले सामर्थ्य तीन प्रकारचे असणार आहे- शारीरिक, मानसिक आणि आर्थिक. काम झाल्यावर आर्थिक सामर्थ्य पुन्हा जनकाकडे परत करण्याचे विश्वनाथने पत्करले आहे. पण इतर दोन प्रकारच्या सामर्थ्याचे पुढे काय होणार हे स्वामीजी स्पष्ट करत नाहीत.
विश्वनाथाच्या तपश्चर्येला अपेक्षित ते फळ मिळते आणि तो सूडाच्या कामाला सिद्ध होतो. हे सूडसत्राचे कथानक हा या कादंबरीतला सर्वात रंजक, वेगवान आणि पकड घेणारा भाग आहे. तपश्चर्येने विश्वनाथमध्ये जे शारीरिक आणि मानसिक बदल होतात ते योग्य आणि  समर्पक शब्दांमधून स्वामीजी आपल्यापुढे थेट उभे करतात. विश्वनाथ आता कभिन्नकाळा झाला आहे. त्यामुळेच सूडासाठी काम करण्याच्या काळात मुळातली ओळख तो सोडून देतो आणि कलकी हे नवे नाव धारण करतो. स्वामीजी या सर्व घटना अशा पद्धतीने पुढे नेतात की विश्वनाथने मिळवलेले तिन्ही प्रकारचे सामर्थ्य कसाला लागते आणि अखेर विश्वनाथ उर्फ कलकी सूड मिळवण्यात यशस्वी होतो. प्रत्यक्ष आपल्या हाताने एकही हत्या न करता विश्वनाथ सर्व दोषींना न्यायापर्यंत पोचवण्यात यशस्वी होतो. अर्थातच इथला स्वामीजींचा विश्वनाथ हा हिंदी सिनेमाचा हिरो नसल्यामुळे या लढाईत त्याला सुरवातीला काही अडचणी आणि संकटे येतात आणि अपयशाचाही सामना करावा लागतो. विश्वनाथ नवतत्वज्ञानाच्या क्षेत्रात नवा आहे. त्यामुळे त्याला सूडाचा भाव सजग राखणे तुलनेने सोपे जाते. पण आपले मन सांभाळणे हे मात्र महाकठीण ठरते. अर्थातच अखेरीस सत्य विश्वनाथाच्या बाजूला असल्याने तो उद्दिष्ट साधण्यात यशस्वी ठरतो.
सामान्यपणे सूडकथा अपेक्षित कार्य साध्य होण्यासोबतच संपली पाहिजे. पण कलकीमध्ये असे होत नाही आणि इथेच कलकीचे वेगळेपण दिसते. विश्वनाथच्या सूडसत्रातल्या घटना अशा प्रकारे घडत जातात की अपेक्षित परिणाम मिळत असतानाही विश्वनाथ सामर्थ्याचा किंवा यशाचा आनंद घेऊ शकत नाही. एकीकडून मानवी स्वभावाचे सामान्यतः नजरेआडच रहाणारे अनेक पैलू त्याच्या डोळ्यांसमोर येत जातात आणि दुसऱ्या बाजूने नवतत्वज्ञानाचा सर्वात नवा पाईक म्हणून आपल्या स्वतःच्या मानसिक आणि वैचारिक मर्यादाही त्याच्या नजरेसमोर उघड होऊ लागतात. प्रथमेच्या खुनातला एक सहभागी जॉर्ज हा कलकत्त्यात रहात असतो. सूडसत्रातल्या भागीदारांच्या कलकीच्या यादीत जॉर्जचे नाव असतेच. जॉर्जचा उत्कर्ष मुंबईत बेकायदा मोटार व्यवसायांमुळे सुरू होतो. पण त्याचे फळ त्याची वाट पहात शांतपणे उभे असते आणि योग्य वेळी ते जॉर्जच्या भेटीला येते. त्याचे वर्णन करण्यासाठी स्वामीजी जे शब्द वापरतात ते अतिशय चिंतनीय आहेत. ते म्हणतात, ‘आंधळा एक डोळा मागतो तेव्हा देव कधीकधी दोन देतो असे म्हण म्हणते. तिचा उत्तरबिंदू असा आहे, की शिक्षेची वेळ आली की डोळस एक डोळा द्यायला तयार होतो, पण देवाला दोन्ही हवे असतात.’ जॉर्ज याच अनुभवातून जातो. त्याला पोटाचा कॅन्सर तर असतोच. पण मुंबईत सदाशिव नावाचा जॉर्जच्या व्यवहारांना बळी पडलेला एकजण त्याला कलकत्यात गाठतो आणि जशा जॉर्जने त्याला वेदना भोगायला लावल्या तशाच यातना पाठीवर अॅसिड ओतून तो जॉर्जला भोगायला लावू इच्छितो. पण जॉर्जला आपल्या पापांची जाणीव आहे आणि त्याला त्यांचा खराखुरा पश्चात्तापही झाला आहे. त्यामुळे पाठीवर जंबियाने जखम करून आपल्याजवळचे अॅसिड त्यात ओतण्याची इच्छा जेव्हा सदाशिव त्याला सांगतो तेव्हा जॉर्ज सदाशिवसमोर आपली पाठ उघडी करायची तयारी करतो. परंतू जॉर्जचा पश्चात्ताप प्रत्यक्ष डोळ्यांसमोर पाहून कलकी आणि सदाशिव दोघांचाही हात मागे येतो आणि जॉर्ज कॅन्सरने मरण पावतो. स्वामीजी याचे जे सार सांगतात ते असे- ‘सूड घेण्याच्या त्यांच्या भावनेचाच सूड घेतला गेला असे दोघांनाही त्याक्षणी वाटले.’ एका वाक्यात अनेक गोष्टी सांगितल्या जातात आणि नवतत्वज्ञान एक सर्वस्वी नवीन कल्पना आपल्याही मनात घट्ट कोरून ठेवण्यात यशस्वी ठरते. अर्थात सूड आणि न्याय यांच्या स्वामी विज्ञानानंदप्रणित कल्पनांचा कळस यायला अजून अवकाश आहे हेही इथे सूचित केले जाते.
स्वामी विज्ञानानंद यांनी ही कादंबरी स्वतःच प्रवर्तित केलेल्या नवतत्वज्ञानाची पायाभूत वैचारिक भूमिका मांडण्यासाठी लिहिली हे आपण पाहिले. कादंबरी वाचताना वाचकांच्याही ते उघड लक्षात येते. विश्वनाथच्या परिवर्तनाला कारणीभूत असणारे जनकराज कादंबरीत ज्ञानाचे प्रतीक म्हणून येतात. त्यामुळेच विश्वनाथशी झालेल्या संपूर्ण भेटीत ते अवाक्षरही बोलत नाहीत. ज्ञान ही आपण स्वतः ग्रहण करायची वस्तू आहे आणि त्यासाठी आवश्यक असणारे सर्व प्रयत्न हे मुख्यतः इच्छुकाने करायला हवेत हे स्वामी या प्रतीकाद्वारे स्पष्ट करतात. विश्वनाथ हा नवतत्वज्ञानाने परिवर्तित झालेला माणूस आहे. त्याचे स्वभावचित्रण मात्र तो ‘सामान्य’ माणूस आहे असे म्हणू देत नाही. साधारणतः सामान्य माणसांच्यात दिसत नाहीत असे अनेक गुण विश्वनाथमध्ये आहेत. चिकाटी, निग्रह, नैतिकता, जीवनाचे सर्वांगीण आकलन करण्याची क्षमता आणि इच्छा, बौद्धिक उंची, तर्कनिष्ठ तात्विकता असे त्यापैकी काही गुण सहजपणे आपल्या नजरेसमोर येतात. त्यामुळेच मला एक शंका नेहमी सतावते. विश्वनाथचे कलकीमध्ये झालेले परिवर्तन हे इतक्या सहृदयतेने आणि तपशीलाने रंगवता आले त्याचे कारण ते मुळात पु. रा. भिडे या बुद्धिवान गृहस्थांच्या विज्ञानानंद या स्वरूपात झालेल्या परिवर्तनाचेच वाङ्मयीन रूप आहे काय? तसे असेल तर आपल्यालाही या कादंबरीच्या निमित्ताने स्वामी विज्ञानानंदांच्या अंतरंगात आणि त्यांच्या मूळ पुरुषोत्तम भिडे या रूपात जरा डोकावून पाहण्याची संधी मिळते आहे असेच म्हणावे लागेल. विश्वनाथमधल्या परिवर्तनाच्या सर्व पायऱ्या स्वामीजींनी स्वतः अनुभवल्या आहेत. प्रत्यक्षात त्या कदाचित जरा दीर्घकालीन ठरल्या असतील. पण प्रवासाचा आणि प्रवाहाचा वेग कमीअधिक असला तरी त्यातले टप्पे तेच आहेत. एका अर्थाने कलकी ही कादंबरी हे त्यांचे कादंबरीमय आत्मवृत्तच त्यांनी लिहिले आहे.
मूळची कादंबरी ज्यांनी वाचली नसेल त्यांचे वाचनाचे कुतूहल कमी होऊ नये म्हणून काही तपशील मी इथे सांगितलेले नाहीत. रहस्यकथेतला खुनी कोण हे जर आधीच समजले तर संपूर्ण कथा वाचण्यातली गोडी निघून जाते हे खरेच आहे. त्यामुळेच जसे प्रथमेचा खुनी कोण असतो हे मी सांगितलेले नाही तसेच जनकराज मूळचे कोण असतात हे रहस्यही गुप्तच राखलेले आहे. परंतू एक गोष्ट सांगितल्यावाचून गत्यंतरच नाही. कथेतली प्रथमेची सर्वात लहान बहीण तृतीया विश्वनाथ उर्फ कलकीकडून नवतत्वज्ञानाचे पहिले धडे घेते. ती वयाने, अनुभवाने आणि विचारांनी कलकीपेक्षा वेगळी असणे स्वाभाविक आहे. त्याहूनही जास्त महत्वाचे हे आहे की ती तारुण्याच्या ऐन भरात आहे. त्यामुळे नवतत्वज्ञान शिकण्याच्या काळात तिला आधीपासून असणारे विश्वनाथबद्दलचे ममत्व वाढत जाते आणि ते हळूहळू प्रेमामध्ये परिवर्तित होत जाते. उलट विश्वनाथचा सूड पूर्ण झाला असला तरी आपल्यातली अपूर्णता अगदी प्रकर्षाने त्याच्या नजरेसमोर आलेली आहे. तृतीयेचे प्रेम त्याला समजते आहे आणि तिच्याबद्दल आपणही तसाच विचार करतो आहोत अशी शंका त्याला छळते आहे. त्यामुळे आता दुसऱ्यांदा विश्वनाथाला दोन बाजूंनी खेचणाऱ्या दोन प्रेरणांचे संतुलन करण्याची गरज आहे. याशिवाय त्याच्या मनात आणखीही काही वादळे घोंगावत आहेत. त्यावरही त्याला उपाय शोधायचा आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे इथून पुढे कोणत्या दिशेने जायचे हे त्याला ठरवायला पाहिजे. कलकीने शोधलेला मार्ग स्वामीजींनी सांगितलाच आहे. कलकी रात्रीच्या वेळी तृतीयेसाठी एक पत्र लिहून तिच्या उशाशी ठेवतो आणि मग मात्र ‘...तो बाहेर पडला. खोलीबाहेर, शहराबाहेर, प्रांताबाहेर आणि – .
कलकी ही स्वामी विज्ञानानंदांनी आत्मचरित्राऐवजी लिहिलेली कादंबरी असेल तर कलकी कादंबरीत जे तत्वज्ञान त्यांनी मांडले तेच त्यांनी जगून दाखवले हे मान्य करण्यावाचून गत्यंतर नाही. कादंबरीच्या शेवटी कलकीने तृतीयेला लिहिलेल्या पत्रात स्वामीजी लिहितात ‘जडदेहात संपूर्णाला अपूर्ण रूप येते. अमर्यादाला मर्यादा पडते. ज्याला सत्याचे ज्ञान झाले, त्याने....स्वतःला उंच न्यावे.’ जीवनाच्या अपूर्णतेचा साक्षात्कार झाल्यानंतर आणि सगळेच मोह मायेनेच निर्मिले आहेत हे कळल्यानंतर ज्ञानी मनाने अपूर्णतेचे बंध तोडण्याचा ध्यास घ्यावा यात आश्चर्य मानायचे काहीच कारण नाही. ज्ञानोत्तर कर्म हा भगवद्गीतेबद्दलच्या सर्व चिंतनातला सर्वात जास्त चर्चिला गेलेला भाग आहे. नवतत्वज्ञान हेही अखेर जीवनाचे एक तत्वज्ञान असल्यामुळे हाच प्रश्न त्यालाही पडला तर त्यात काहीच आश्चर्य नाही. जो मार्ग नवतत्वज्ञानाने सांगितला त्यावर मतभेद होऊ शकेल. पण नवतत्वज्ञानाच्या मूलभूत प्रामाणिकपणावर शंका येण्याचे कारण नाही. स्वामी विज्ञानानंदांनीही स्वेच्छेने देह समर्पण करून आयुष्याचा शेवट केला. पण ती आत्महत्या नव्हे. ज्ञानदेवांची संजीवन समाधी, जैन धर्मात घेतले जाणारे संथारा व्रत, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे प्रायोपवेशन या आत्महत्या असू शकत नाहीत. वैफल्य आणि भकासपणा यांचा परिणाम म्हणून होते ती आत्महत्या. तिथे मन खचते, मोडते आणि अखेर पळ काढते. आत्मसमर्पणाची गोष्ट उलट असते. तिथे मन वाढते, विस्तारते आणि शेवटी अधिक मोठे होण्यासाठी शरीराच्या मर्यादाही झुगारून देते. अडचण असते ती तुमच्या-माझ्यासारख्या सामान्यांची. कलकीची पहिली आवृत्ती १९६५ साली निघाली. म्हणजे कादंबरी १९६२-६४ इतकी तरी जुनी असणार. पण तेव्हा स्वामीजी आयुष्याकडे काय नजरेने पाहतात हे आपल्याला पूर्णपणे कळले नाही. अखेर स्वामीजींनी जेव्हा आत्मार्पण केले तेव्हा काय काय घ्यायचे राहून गेले याची जाणीव झाली. सगळ्या गोष्टी होऊन गेल्यावर ज्यांना कळतात ते सामान्य आणि जे नव्या गोष्टी घडवतात तेच असामान्य. आज तरी याला आपल्याकडे काही इलाज नाही.

No comments:

Post a Comment