दास डोंगरी राहातो
संतचरित्रे
आणि संतचारित्र्ये हा अगदी सुरवातीपासून मराठी भाषेचा अभिमानास्पद वारसा राहिला
आहे. १०व्या-११व्या शतकात मराठी ही स्वतंत्र भाषा म्हणून प्रस्थापित झाल्यापासून
अखंड चालत आलेली ही संतपरंपरा आजही महाराष्ट्राच्या हृदयात अक्षय्य टिकून आहे.
कित्येकदा तिच्या कामावरच नव्हे तर उपयुक्ततेवरही अनेक आक्षेप घेतले गेले. ही
परंपरा वैराग्याचा आदर्श देणारी आहे, जीवन
निरुपयोगी आणि जग निरर्थक असल्याचा संस्कार करणारी आहे, लोकजीवनाला पराङ्मुख आहे अशा अनेक आरोपांची राळ वेळोवेळी तिच्यावर
उडवली गेली. परंतू हे सर्व जर खरे असेल तर असे असतानाही संतांना इतका प्रदीर्घ काळ
जनसामान्यांच्या मनावर अधिराज्य करणे कसे शक्य झाले याचे उत्तर देण्याची जबाबदारी
मात्र आरोप करणाऱ्यांपैकी कुणी कधी घेतली नाही. इतिहासाचा सामाजिक अंगाने अभ्यास
करणाऱ्या अभ्यासकांनीच फक्त सतराव्या शतकात स्थापन झालेल्या मराठी राज्याच्या
पायाभरणीत मराठी संताचे योगदान मान्य केले. असे योगदान देणाऱ्या संतांच्या
मांदियाळीतले एक झगमगते नाव म्हणजे समर्थ रामदास आणि त्यांच्या आयुष्यावरची गो.
नी. उपाख्य अप्पा दांडेकरांची चरित्रात्मक कादंबरी म्हणजे ‘दास डोंगरी राहातो’.
‘सावधान’हा शब्द कानी येताच
लग्नाच्या बोहोल्यावरून ठोसरांच्या नारायणाने पळ काढला इथून अप्पांची कादंबरी सुरु
होते आणि शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावर येऊन संपते. अप्पा समर्थांना नुसते
रामभक्त म्हणून नव्हे तर मराठी राज्याचा पाया भरणारे संत म्हणून पाहतात. त्यामुळे समर्थांचे
व्यक्तिमत्व उभे करताना अप्पांचे लक्ष समर्थांच्या सामाजिक रूपाकडे जास्त प्रमाणात
आहे. परंतु हे रूप कसे सिद्ध होणार याचा विचारही आप्पांच्या मनात आहे. कादंबरी
वाचताना हे सतत जाणवते. अप्पा परिणाम आणि पद्धत दोन्हीकडे पहाता आहेत.
समर्थांच्या
अवताराचा काळ इ.स. १६०६ ते १६८२ हा होता. देवगिरीचे अखेरचे मराठी राज्य चौदावे शतक
उजाडता उजाडताच बुडाले आणि महाराष्ट्र परवशतेच्या पाशात सापडला. या परकी सत्तेने
निव्वळ लोकांचे सामाजिक-आर्थिक आयुष्य व्यापले नाही तर त्यांच्या सांस्कृतिक
अस्तित्वालाच ग्रहण लावले. एक-दोन नव्हे तर साडेतीनशे वर्षे महाराष्ट्र हे सोसत
होता आणि अशा अंधाऱ्या काळात ठोसर कुळात नारायणाचा जन्म झाला. विचक्षण, हूड आणि कोणत्याही गोष्टीत झोकून देण्याच्या
स्वभावामुळे नारायण लहानपणापासूनच वेगळा होता. त्यातच लहान वयात पितृवियोग त्याने
सोसला. वडील गेल्यानंतर थोरले बंधू आणि आई यांनीच त्याला सांभाळले. रामभक्तीची मूळ
प्रेरणाही थोरल्या बंधूंकडूनच मिळाली. नारायणाच्या लग्नाचा विचार घरात सुरु झाला
तेव्हा तो ते फार गंभीरपणे घेत नव्हताच. पण खरोखरच पायात बेडी पडायची वेळ झाली
तेव्हा मनाने आपली दिशा निवडली.
बोहोल्यावरून
पळालेल्या नारायणाचे ‘श्रीराम’ हे ध्येय ठरलेलेच होते. प्रश्न उपासनेचे स्थान
निवडण्याचा होता. पुरश्चरणासाठी लोकांतापासून थोडे दूर असणारे टाकळी हे गाव
नारायणाने निवडले. नाशिकपासून ते सहज चालत जाण्याच्या अंतरातच आहे. त्यामुळे
पुरश्चरणाचा नेम संपला की नारायण मधुकरीला पाच घरे फिरे आणि जिव्हालौल्याला थारा न
देता झोळी झटकून तीन प्रहरी नाशकाकडे निघे. उपनिषदे, वेदांत, तर्क, सांख्य-वैशेषिक, गीताभाष्य अशा पाठांना तो आळीपाळीने हजर राही.
रामभक्ती तर त्याला अतिप्रिय होतीच. पण कोणत्याही अभ्यासात स्वतःची चिकित्सक बुद्धी
हरवून जाऊ नये यासाठीही तो दक्ष होता. नारायणाच्या या दक्षतेकडे अप्पा कटाक्षाने
आपले लक्ष वेधतात. शांकरमठातला ऐतरेय उपनिषद पाठ संपल्यावर नारायण शंका विचारतो की ‘अपक्रामन्तु गर्भिण्यः’ असे उपनिषदाच्या पोथीतच असेल तर त्याचा अर्थ
इथपर्यंतचा भाग स्त्रियांनी ऐकला तरी चालेल असा होत नाही काय? आणि पर्यायाने स्त्रियांनाही वेदपठण आणि
वेदाध्ययनाचा अधिकार आहे असाच याचा अर्थ निघत नाही काय? शिकवणारे शास्त्रीबोवा निरुत्तर होतात. कारण
परंपरा केवळ शास्त्र मानत नाही. ती ‘शास्त्राद्रुढिर्बलीयसी’ या नियमाला जास्त बांधील असते हे त्यांना माहीत
आहे. पण ते कबूल करण्याची त्यांची इच्छा नाही. नारायणाची बांधिलकी मात्र रुढींशी
नाही, फक्त
शास्त्राशी आहे. ज्या रूढी समाजाचे सुयोग्य धारण करीत नाहीत, त्या रुढींशी नारायणाला काडीमात्र घेणे-देणे
नाही.
अप्पांना समर्थांची इतकी असोशीने ओढ असण्याचे कारण समाजधारणा या गोष्टीचे अप्पांनाही वेड आहे हेच आहे. समर्थांपासून अप्पांच्यापर्यंत आणखी तीन शतके गेली असल्याने अप्पांना ‘जगी निंद्य ते सर्व सोडोनि द्यावे, जागी वंद्य ते सर्व भावे करावे’ या शिकवणीपेक्षा सद्यःकाळी समाजाला हानिकारक ते सर्व सोडोनि द्यावे आणि जे जे उपयोगी ते सर्व भावे करावे हा विचार जास्त भावतो. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 'संगीत उत्तरक्रिया' नाटकात यशवंतराव नावाचे एक पात्र आहे. हा यशवंतराव अत्यंत तत्वनिष्ठ आणि तर्कनिष्ठ आहे. समुद्रपर्यटन हे त्याकाळी बंदी असलेले कृत्य केल्याबद्दल त्याला स्थानिक ब्रह्मवृंद प्रायश्चित्त देऊ पाहतो, तेव्हा ‘समुद्रपर्यटनबंदी हा समाजाला घातक असणाऱ्या रूढीचा भाग आहे’असा विचार मांडून यशवंतराव तुळशीपत्राचेही प्रायश्चित्त घेण्याचे साफ नाकारतो. अप्पाही याच विचाराचे समर्थक असल्यामुळे त्यांच्या कादंबरीत समर्थांचे हे समाजधारक रूपच अतीव प्रेमाने आणि आस्थेने येते. समर्थांचे काळाच्या पुढे असणे अप्पा प्रेमाने मांडतात.
समर्थांचा
एकांतही लोकांसाठी होता हे अप्पांचे ठाम मत आहे. त्यामुळे लोकांपासून दूर रहाणे हे
समर्थांच्या एकांताचे रूप नाही. लोककल्याणासाठी अंतर्दृष्टी मिळवणे, त्यासाठी सतत अभ्यास आणि चिंतन करणे हे या
एकांताचे स्वरूप आहे. ‘दिसामाजि काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडीत वाचीत जावे’ हे समर्थांनी आधी स्वतः वर्षानुवर्षे आचरणात
आणले तेव्हाच लोकांना सांगितले. चिंतनाने विचारांची अवस्था जसजशी परिपक्व होत जाते, तसतसा नारायणाचा आचार बदलतो. मधुकरी मागताना आधी
दृष्टी जमिनीवर लावून उभे राहणारा नारायण, काहीतरी निर्णयावर येऊन पोचतो तेव्हा घरांमधले
वातावरण समजून घ्यायला लागतो, संस्कारक्षम वयातल्या अपरिपक्व मुलांना बरोबर घेऊन काही नवीन करू
पाहतो, आपले
म्हणणे लोकांना समजावू पाहतो.हे अपूर्व अप्पा तपशीलाने मांडतात. बायको पळवली अशी
तक्रार सांगत रडणाऱ्याला समर्थांचा उपदेश मुळातूनच वाचायला पाहिजे. ते रामाचेच
उदाहरण देतात. रावणाने सीता पळवली तेव्हा रामाने कुणालाही गाऱ्हाणे सांगितले नाही.
राक्षसांचा राजा असलेल्या अर्तुबळी, महारथी रावणाच्या लंकेवर तो वानरे आणि
अस्वलांच्या सहाय्याने चालून गेला. अप्पांची ही मांडणी पाहिली की मला नेहमी
वैचारिकदृष्ट्या अप्पांच्या उलट्या टोकाला असलेल्या विंदा करंदीकरांची आठवण येते.
विंदा लिहितात,
रामायण वाचुनिया नंतर -
बोध कोणता घ्यावा आपण?
श्रीरामासम मिळता नायक, वानरसुद्द्धा मारिती रावण
कमी
आहे ती संकल्पाची, निर्धाराची
आणि सामर्थ्य एकवटू शकणाऱ्या अपार श्रद्धेची हे समर्थ लोकांच्या मनावर बिंबवू
पाहतात. त्यासाठी श्रद्धा, सामर्थ्य
आणि संकल्प असा गुरुमंत्र नुसता देऊन थांबत नाहीत तर ज्या हनुमंताचे सारे आयुष्य
याच मंत्राचे जितेजागते उदाहरण होते, त्याची दैवत म्हणून स्थापना करतात, त्याचे रूप कायम लोकांच्या डोळ्यांसमोर असावे
म्हणून त्याचे स्तोत्र-आरत्या रचतात. परंतू उद्दिष्टांवर समर्थांचे लक्ष सतत असते.
त्यामुळे ज्या क्षणी आजवर पाहिले ते पुरेसे नाही हे जाणवते त्याच क्षणी कुणाला
पत्ताही न लागू देता समर्थ उत्तर भारताच्या यात्रेला निघतात, जे आपणच बनवले आहे ते क्षणात सोडून द्यायला
समर्थ जराही मागेपुढे पहात नाहीत.
नारायण
ठोसर या मुलाचा रामदास बनला तो नाशिकच्या पाठशाळेत. पण साध्यासुध्या रामदासमधून
समर्थ उदयाला आले ते उत्तर भारताच्या यात्रेत. यात्रेत मिळवलेल्या या सामर्थ्याचे
दोन पैलू होते. एक होता अपार यातनांना थेट सामोरे जाण्याचा. यातना-वेदना-दुःख-
फक्त आपले नव्हे, पूर्ण
देशाचे, सर्व
मानवतेचे. दुष्काळ! साऱ्या देशालाच खायला उठलेला दुष्काळ, असा एक दुष्काळ की ज्याचे गाऱ्हाणे प्रत्यक्ष
रामरायाशिवाय कुणाला सांगावे? ज्याचे वर्णन करताना समर्थांची वाणी कळवळून आली.
पदार्थ मात्र तितुका
गेला, नुस्ता
देशचि उरला....
.... येणेकारणे बहूताला, संकट जाले...
माणसा खावया अन्न नाही, अंथरूण-पांघरूण तेही नाही...
...अखंड
चिंतेच्या प्रवाही, पडिले
लोक
आणि
ही अस्मानी कमी पडली म्हणूनच की काय- तिच्या जोडीला एक सुलतानी-
देश नासला नासला उठे तोचि कुटी
पिके होताचि होताचि होते लुटालुटी
काळाकरितां जिवलगां झाली ताटातुटी
अवघ्या कुटुंबा
कुटुंबां होत
फुटाफुटी
१९४३-४४मध्ये बंगालमध्ये तीव्र दुष्काळ पडला. (याच दुष्काळावर हरिवंशराय ‘बच्चन’ यांनी १९४६ साली ‘बंगाल का काल’ हे काव्य लिहिले आणि पुढे १९७३मध्ये सत्यजित राय यांनी ‘अशनि संकेत’ नावाचा सिनेमा बनवला.) विसाव्या शतकाच्या मध्यावरसुद्धा हा दुष्काळ एक महाभयंकर नैसर्गिक आपत्ती ठरला. मग सतराव्या शतकात लोकांचे काय झाले असेल याची कल्पनाही करवत नाही. माणसांच्या हालांना पारावार राहिला नसेल हे सहज समजू शकते. आणि तरीही जीवन थांबत नाही. जीवमात्रांची प्राणरक्षण ही एक अनैच्छिक, नैसर्गिक प्रेरणा आहे. प्राणरक्षणासाठी त्यांना काही कारण लागत नाही. या राखलेल्या जिवाचे काय करायचे याचा विचार कधी त्यांना सुचतच नाही. कादंबरीतही अंमलदाराने ओझे वाहायला जबरदस्तीने नेलेली गाढवे, ओझे जागेवर पोचल्यावर काय केली याची माहिती मिळण्यासाठी शिपायांच्या हातापाया पडून आलेल्या कुंभाराला आपण पराकाष्ठेने वाचवलेल्या या जिवाचे काय करायचे याचा काही थांगपत्ता नव्हता. अप्पांचे वैशिष्ट्य हे की या प्रश्नाचे उत्तर तेव्हा स्वामींकडेही नव्हते हे त्यांनी कबूलच केले आहे. इतरेजनांकडे नसलेली एक गोष्ट मात्र समर्थांच्या जवळ होती. श्रद्धा- अतूट, अविचल श्रद्धा आणि त्या श्रद्धेसाठी कोणत्याही थराला जाण्याची, कसलेहीदिव्य करण्याची तयारी. त्यामुळे सुभेदार कतलूखानाच्या शासनातही स्वामी निभावून जाऊ शकले. त्यांच्या देशभ्रमणाचे हेच तर प्रयोजन होते- सर्व देश ज्या यातनांचक्रातून जात होता त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणे. त्यांचे आंतरिक सामर्थ्य त्यांना यातूनच मिळालेले होते.
देशभ्रमणातून समर्थांनी मिळवलेल्या सामर्थ्याचा दुसरा पैलू होता साऱ्या समाजाच्या जीवनमरणाचा एक प्रश्न आणि त्याचे त्यांना जाणवलेले उत्तर. नाशिक-टाकळीपासून समर्थांची भ्रमणयात्रा सुरु आली.नाशिकहून निघालेले समर्थ विदिशेला पोचले, वेत्रवती ओलांडली. सागर, दमोह मागे पडले. देश बदलला, वेश बदलले, भाषा बदलली. पण धर्मश्रद्धा, पूजा-अर्चा, राम-कृष्ण-महादेवांची मंदिरे यापैकी काहीही बदलले नाही. पण इतकेच नाही. आणखीही काही गोष्टी बदलल्या नाहीत. कमालीचे प्राणभय, भ्याडपणा, असेल ते उचलून मागे न बघता पळणे, धैर्याचा पूर्ण अभाव, मुजोरांपुढे वाकणे आणि अन्यायाला मुकाट्याने शरण जाणे, आजचे मरण उद्यावर ढकलण्याची धडपड- सगळे अगदी तेच आणि तसेच. मग प्रश्न पडायला लागले.हे असे का? हे लोक झुंजत का नाहीत? कुठेही पाय रोवून सरळ, ताठ उभे का रहात नाहीत? सगळ्यांच्याच पाठीचे कणे असे मोडले का? कथेच्या ओघात अप्पांनी एक सुंदर प्रसंग सांगितला आहे.एका गावी रामायणपाठ सुरु असतो. कथावाचक कथा रंगवून रंगवून सांगत असतो आणि श्रोते भक्तिभावाने ऐकत असतात. शेजारीच एक मोठी थोरली सराई (धर्मशाळा) असते. व्यापारी, माल वाहून नेणारे लमाणांचे तांडे, इतर प्रवासी असे अनेक जण तिथे उतरलेले असतात. तेवढ्यात एक लुटारू टोळी तिथे चालून येते आणि सगळे दृश्य अचानक बदलून जाते. रामकथा सांगणारा कथेकरी पोथी उचलून पळ काढतो. लमाण आणि सौदागरांबरोबरचे संरक्षक नावापुरती झुंज देतात.पण खऱ्या अर्थाने लुटारूंना विरोध करणारा तिथे कुणीच नव्हता. फार कष्ट न पडता त्यांना लूट मिळाली. थक्क होऊन हे सगळे पाहणाऱ्या समर्थांना प्रश्न पडला की लुटण्यासाठी आलेले धावेकरी शंभर. ही माणसे चार-पाचशे. त्यांच्यापाशी शस्त्रे होती. यांच्यापाशीही ती होतीच. मग हे एकमेळ करून उभे ठाकले का नाहीत? का होष्यमाणास सामोरे गेले नाहीत? असे कुस्करले गेले काय म्हणून? सारा देश पायाखाली घातल्यानंतर आणि असंख्य लोकांशी बोलल्यानंतर जे उत्तर त्यांच्या मनात साकार झाले ते होते विखुरलेपणा. हे माझे लोक गुणी आहेत, त्यांच्यात कर्तृत्व आहे, इच्छा आहे, धमक आहे. पण ते सारे एकेकटे आहेत. स्वतःपुरते पाहणारे हजार-पाचशे लोक हे शंभर लुटारूंना उत्तर नव्हे.
समर्थांना त्यावेळी जाणवलेले हे उत्तर फक्त तेव्हाच्या भारताचेच नव्हे तर आजच्याही साऱ्या जगाचे चित्र आहे. प्रख्यात जर्मन कवी मार्टिन नीमोलर यांची एक अप्रतिम कविता आहे. ते म्हणतात-
First they came for the Communists
And I did not speak out - Because I was not a Communist
Then they came for the Socialists
And I did not speak out - Because I was not a Socialist
Then they came for the trade unionists
And I did not speak out - Because I was not a trade unionist
Then they came for the Jews
And I did not speak out - Because I was not a Jew
Then they came for me
And there was no one left - To speak out for me.
अत्याचारी
लोकांची मुख्य शक्ती त्यांची शस्त्रे ही नसते. बहुसंख्य लोकांचा विखुरलेपणा हे
त्यांचे मुख्य भांडवल असते. समर्थांना हे जाणवले त्याला आता अर्धे सहस्रक उलटून
गेले. पण आजचे चित्र तरी काय वेगळे आहे? लंडन, पॅरिस, टोकियो, स्पेन, पाकिस्तान, भारत, सिरीया, इराक- सर्वत्र तेच. आक्रमक मूठभर, जनता अनेकपट. पण आक्रमकच जोरात आणि जनता फक्त
हैराण.
समर्थांना जाणवले की यात या जनतेचा दोष फार थोडा आहे. पायापुरते पाहणे हा दोष कसा म्हणावा? पायापुरते नको तर कुठे आणि कसे पहायचे हे यांना कुणी कधी सांगितलेच नाही आहेी. माणसे अयोग्य नाही आहेत, त्यांचा योग्य जागी अचूक वापर करून घेणारा कुणी नाही आहे.
अमन्त्रम् अक्षरं
नास्ति, नास्ति
मूलमनौषधम् ।
अयोग्यः पुरुषो नास्ति, योजकस्तत्र दुर्लभः ||
हवा
आहे योजक. बळाला तोटा नाही. हवा आहे रचनाकार. पण तो येणार कुठून आणि कसा? एका शतकापूर्वी येऊन गेलेल्या संत एकनाथांनी ‘बया, दार उघड’ अशी निकराची हाक का दिली हे स्वामींच्या लक्षात
आले आणि मग त्या बयालाच त्यांनी थेट रोखठोक गाऱ्हाणे घातले-
‘तुझा तू वाढवी राजा।
शीघ्र आम्हाचि देखता
दुष्ट संहारिले मागे।
ऐसे ऊदंड ऐकतो
परंतु रोकडे काही। मूळ
सामर्थ्य दाखवी’
कथा-पुराणांतून
ऐकलेल्या राक्षस आणि दैत्यांच्या संहाराच्या कथांमध्ये समर्थांना काहीच रस नव्हता. ‘मला आज तू काय देणार आणि हा दुर्लभ असणारा योजक
कधी जन्माला घालणार’ हे ते
जगन्मातेला विचारत होते. स्वतःसाठी एक काडीही न मागणाऱ्या या भक्ताची प्रार्थना
बयेलाही ऐकावीच लागली आणि साऱ्या जगाला ललामभूत ठरू शकणारा इतिहास महाराष्ट्रात
घडला.
मराठी
राज्याच्या स्थापनेचा इतिहास हा महाराष्ट्राचा मानबिंदू आणि अभिमानबिंदू.
शिवछत्रपतींच्या या इतिहासावर अप्पांचेही अपार प्रेम. राजांच्या स्वराज्यस्थापनेला
आणि पुढेही राज्याच्या संरक्षण-संवर्धनाला समर्थांचा सक्रीय आशीर्वाद होता.
साहजिकच ‘दास....’मध्येही मराठी राज्याच्या या इतिहासाला उठाव
येतो. हे राज्य जोपासण्यातला समर्थांचा हात सहजच दिसू शकतो. त्यांची बद्रीकेदारची
यात्रा ही जणू याच कामाची पूर्वतयारी होती. मुलांची मने कशी घडवावीत, शरीरावर आपला ताबा असावा – शरीराचा आपल्यावर नव्हे हे कसे व्हावे, कुणाबरोबर बोलताना कशी भाषा कामाला येते, दैवाच्या हवाल्याने जीव जगवणारे हे लोक
रामोपासनेकडे, बलोपासनेकडे
कसे वळवावेत, कसे
कुणाला आपल्या नादी लावावे आणि कुणाचा नाद सोडून द्यावा, विवेके सदा स्वस्वरूपी कसे रहावे आणि कसा
यातनांची कितीही परमावधी झाली तरी मनी राम चिंतीत जावा तो कसा याचा सगळा स्वाध्याय
या उत्तरयात्रेत समर्थांनी केला होता. आता महाराष्ट्रात त्याची अंमलबजावणी सुरु
झाली. जनसामान्यांना आपले वाटणारे राज्य इथे आकाराला येत होते. त्याचा पाया
भगवंताच्या अधिष्ठानाने बळकट करायचे समर्थांनी आरंभले.
मुख्य हरिकथा निरूपण | दुसरे ते राजकारण
तिसरे ते सावधपण | सर्वांविषयी
याचे
समूर्त प्रात्यक्षिक समर्थांनी महाराष्ट्राला दाखवले. अप्पांच्या कादंबरीचा अर्धा
भाग समर्थांच्या याच कार्याला वाहिला आहे आणि अप्पांनी हे अतिशय डोळसपणे केले आहे.
मुख्य हरिकथा निरूपण हे खरे. पण या क्रमामागे विवेक पाहिजे. राजकारण पूर्ण बुडता
उपयोगी नाही. राजकारण सशक्त रहावे याचे तारतम्य राखलेच पाहिजे. तिथे जर नौका
बुडाली तर हरिकथा निरूपण तरी कसे चालेल? कुणाच्या बळावर? तेव्हा नेमून दिलेल्या कामाचे धारे शिस्तीने
सांभाळले पाहिजेत हे खरे. पण आपले राज्य –स्वराज्य- टिकणे
अत्यावश्यक आहे हे मनात पक्के पाहिजे. ‘सर्वनाशे समुत्पन्ने
अर्धं त्यजन्ति पण्डिताः’ हे तर
आम्हाला प्राचीन काळापासून माहित आहे. पण कोणत्या वेळी कोणत्या अर्ध्या भागाचा
त्याग करायचा हे देशकालपरिस्थिती पाहून ठरवायचे असते. केव्हा अस्तित्वाचा प्रश्न
सोडवण्यासाठी तत्वाला मुरड घालायची आणि केव्हा तत्वांसाठी पंचप्राणही पणाला
लावायला मागेपुढे पहायचे नाही हे समजणे हेच समर्थांचे शिक्षण होते. अप्पा
समर्थांचे हे कार्य नेमक्या शब्दांत नेटकेपणाने मांडतात. मराठी मुलुखातल्या सगळ्या
घडामोडींचे तपशील राजांना आणि स्वामींना कुठून, कसे मिळत होते याचे अप्पांनी या कादंबरीत
रेखाटलेले चित्र मनोरम तर आहेच, पण डोळे उघडणारेही आहे. अचूक माहिती, सूक्ष्म तारतम्य आणि नीरक्षीर विवेक याचे जागते
उदाहरण अप्पा इथे उभे करतात.
शिवछत्रपतींचा
राज्याभिषेक हा समर्थांसाठी कृतार्थतेचा क्षण होता. त्या अतीव रोमहर्षक अनुभवाचे
सार्थ वर्णन करण्यासाठी एकनाथांच्या प्रेरणांचे धागेदोरेच पुढे चालवणाऱ्या
समर्थांना नाथांनीच बनवलेला चपखल शब्द आठवला- ‘आनंदवनभुवन’. राज्याभिषेकाला समर्थ स्वतः उपस्थित नव्हते. पण
त्या प्रसंगाचे संपूर्ण वर्तमान कानी आल्यावर त्यांना कसे वाटले असेल याचे
अप्पांचे वर्णन अतिसुंदर म्हणावे असे आहे. तसेच दुसरे वर्णन शाहिस्तेखानाच्या
पारिपत्यासाठी महाराज स्वतः निवडक लढावांसह थेट लाल महालात शिरले यावर समर्थांची
उत्स्फूर्त प्रतिक्रिया सांगतानाचे आहे. महाराजांच्या निर्णयासाठी समर्थ ‘आगोचार’ असा शब्द वापरतात. या शब्दात कौतुक, अभिमान, काळजी अशा अनेक छटा सहज सामावतात.
‘दास डोंगरी राहातो’ ही अप्पांची कादंबरी मला आवडते हे खरे. पण याचा
अर्थ इथे सर्व काही अगदी साजिरे, गोजिरे आहे असे नव्हे. कधीकधी वाटते अप्पा गोष्टी अतीच सोप्या करीत
जातात. अप्पा स्वतः सरळसोट निर्मळ स्वभावाचे. त्यामुळेच ते सगळ्या गोष्टी सोप्या
करतात की काय समजत नाही. समर्थांच्या उत्तर भारताच्या यात्रेत अप्पा एक प्रसंग
वर्णन करतात. समर्थांची गाठ वाटमाऱ्यांच्या एका टोळीशी पडते. बरोबरचे यात्रेकरू
प्राणभयाने पळू पाहतात. पण समर्थ त्यांना थांबवतात आणि थेट वाटमाऱ्यांच्या नायकाशी
बोलतात. स्वधर्म आणि धर्माचे कर्म यांची त्याला आठवण करून देतात. त्यामुळे
वाटमाऱ्यांचे हृदय परिवर्तन होते आणि ते वाटमारी सोडून जंगलातून जाणाऱ्या
वाटसरूंना सुरक्षित जंगलापार पोचवण्याचे काम अंगिकारतात. प्रसंग मोठा हृदयस्पर्शी
आहे. पण वाचताना मला काही प्रश्न पडतात. वाटमाऱ्यांनी तर त्यांच्या उपजीविकेचे
साधनच त्यागले. आता त्यांच्या पोटापाण्याचे काय? घोड्याने गवताशी मैत्री करायला हरकत नाही. पण मग
घोड्याची उपजीविका कशी चालणार? आता हे वाटमारे नेमके काय करतील? शेती किंवा शिलेदारी हीच दोन उत्तरे शक्य आहेत, पण यांपैकी काहीही त्यांनी निवडले तरी मग हे
वाटसरूंना जंगलापार पोचवण्याचे काम ते कसे करणार? आणि स्वतः त्यांच्यावर धाडी येतील, इतर सर्वसामान्य माणसांसारखे तेही निर्नायकी
अवस्थेला सामोरे जातील तर त्यांचे धैर्य आणि हे अंगीकृत कार्य किती काळ चालणार? आपल्यासमोर यांची काहीही उत्तरे येत नाहीत.
अप्पांकडे याची काही उत्तरे असावीत असे वाटतही नाही. मग इथे गांधीजींची आठवण
आल्याशिवाय रहात नाही. महात्मा गांधी एकदा रवीन्द्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतनात
गेले होते. सकाळी सूर्योदयाआधी गांधीजी आणि टागोर फेरफटका मारायला गेले. हलके हलके
उजाडू लागलेले होते. झाडांवर पक्षी किलबिलत होते, वाऱ्याच्या मंद झुळुका वाहात होत्या. त्या शांत, थंड वातावरणाने सारा आसमंत आनंदी झाल्यासारखा
वाटत होता. कविराज त्या वातावरणाने उल्हासित होत गांधीजींना म्हणाले, ‘बापू, तुमच्या सत्याग्रहाच्या तत्वज्ञानात पक्षांच्या
या गीतांना काय स्थान आहे? काही
आहे का?’ महात्म्याने
तितक्याच सहजतेने कविराजांना उत्तर दिले, ‘अहो स्थान काय म्हणता? हे पक्षांचे गाणे सत्याग्रहाच्या तत्वज्ञानाचे
अधिष्ठानच आहे. त्यांच्या गाण्यासाठीच तर ते तत्वज्ञान आहे. फक्त सत्याग्रहाचे
तत्वज्ञान पक्षांच्या गाण्यापासून सुरु होत नाही. सकाळी उठून त्यांना मोकळेपणाने
गाण्याची तान घ्यावीशी वाटावी यासाठी आदल्या रात्री झोपताना त्यांची पोटे भरलेली
असावीत याचीही काळजी सत्याग्रहाचे तत्वज्ञान घेते.’ अप्पांच्या कादंबरीतला प्रसंग मला तीव्रतेने
याचीच आठवण करून देतो. वाटमारे नव्या सात्विक जीवनक्रमात टिकतील याची काहीच हमी
अप्पा देत नाहीत, देऊ
शकत नाहीत.
‘दास डोंगरी राहातो’ वाचताना ही कादंबरी आहे याचे भान विसरायचे नाही.
समर्थांच्या आयुष्याची ही ऐतिहासिक मांडणी नव्हे. हे समर्थांचे अप्पांना भावलेले, अप्पांनी निर्माण केलेले रूप आहे. अप्पांना
समर्थ कसे असावेत असे वाटत होते याचे हे दर्शन आहे.या अप्पांच्या मताला ऐतिहासिक
आधार कुठे आणि किती हा प्रश्न इथे गैरलागू आहे. हे समर्थ रामदासांचे इतिहासात
सिद्ध होणारे रूप नव्हे. मग एक प्रश्न उरतोच. समर्थांचे हे रूप ऐतिहासिक म्हणता
येत नाही. अप्पा अनेक गोष्टी जरा जास्तच सोप्या करीत जातात हेही दिसते. तरीही ‘दास डोंगरी राहातो’ मला पुन्हा पुन्हा वाचावाशी का वाटते?
दोन
कारणे मला दिसतात. एक कारण असे की कादंबरीत समर्थांचे व्यक्तिमत्व उभे करताना
अप्पांनी ‘अपार मेहनतीने जनमानसाची मशागत करणारा’ हे त्यांचे रूप नेमके पकडले आहे. ‘केल्याने होत आहे रे, मराठा तितुका मेळवावा, उदंड जाहले पाणी, शिवरायास आठवावे जीवित तृणवत मानावे, जनांचा प्रवाहो चालिला म्हणजे कार्यभाग आटोपला, शाहाणे करून सोडावे सकळ जन’ असे समर्थांचे अनेक उद्गार आपल्याला अगदी
लहानपणापासून माहिती असतात. पण त्या सगळ्या विचारांना सामावून घेणारे एक
व्यक्तिमत्व अप्पांच्या कादंबरीत आकार घेताना दिसते. आणि हे व्यक्तिमत्व नुसते
उपदेश करीत नाही. काय हवे आहे ते सांगताना ते कसे कमवायचे, जमवायचे हेही ते सांगतात. रामाचा दास
म्हणवणाऱ्या समर्थांनी रामापेक्षा हनुमानाची मंदिरेच जास्त संख्येने उभी केली याचे
काहीतरी कारण तर आहेच. शक्तीचा सुयोग्य वापर करणारे आणि बुद्धी वापरून अचूक कार्य
साधणारे एक दैवत समर्थांनी मारुतीच्या रूपाने महाराष्ट्राला दिले. हनुमंताची उपासना
इतक्या प्रदीर्घ प्रयत्नांनी उभे करण्याचे कारण ‘रामदासां शक्तीचा शोध’ घ्यायचा होता हेच आहे. मराठी संत समाजविन्मुख
होते या आक्षेपाला अप्पा इथे एक सणसणीत उत्तर देताना दिसतात. मला हे उत्तर आवडते.
आणि हे सगळे प्रयत्न जेव्हा फळाला येत असतात, शिवछत्रपती जेव्हा सिंहासनाधीश्वर होत असतात
त्या क्षणी मात्र समर्थ तिथे नसतात. समाजाला आपले सर्वस्व देणारा हा अवलिया स्वामी
अंतरंगी संपूर्ण निस्संग, विरक्त
आहे. साऱ्या समाजाचा संसार तो मांडतो. पण असला अप्रूपाचा संसार मांडणारा स्वतः
मात्र एकांतप्रिय आहे. धर्मयज्ञाची मुहूर्तमेढ तो रोवतो. पण समारंभाच्या वेळी
मात्र ‘दास डोंगरी राहातो, यात्रा देवाची पाहातो.’समर्थांच्या व्यक्तिमत्वातला हा निस्संग
वैराग्याचा हृदयंगम धागाही अप्पांनी अचूक हेरला आहे. मला हे फार आवडते आणि
समाधानाचे वाटते.
एक
दुसरेही लहानसे कारण आहे. आपल्याला गुंतागुंतीच्या वाटणाऱ्या असंख्य गोष्टी या
कादंबरीत अप्पा सोपेपणाने मांडतात असे वर म्हटले आहे. आयुष्य हे आपल्याला वाटते
तितके गुंतागुंतीचे नाही हा मनाला एक मोठाच दिलासा असतो. अप्पा हा दिलासा फार
मोकळेपणाने देतात. आपल्या लेखनाने वाचणाऱ्याला शांत वाटावे, दिलासा वाटावा याहून वेगळे अप्पांना तरी काय हवे
असणार?
No comments:
Post a Comment