Tuesday 5 June 2018


योगीकथामृत या पुस्तकाचा परिचय
अलौकिकाचे आत्मलेणे
(उत्तरार्ध)

परमहंस स्वामी योगानंद यांच्याAutobiography of a Yogi अर्थात योगीकथामृत या पुस्तकाबद्दल विचारांची सुरवात करतानाच आपल्या लक्षात आले होते की आपण आणि आपल्या भोवतीचे हे अनंत विश्व हा अनादी कालापासून माणसाच्या अमर्याद कुतूहलाचा विषय राहिला आहे. या कुतूहलाने जेव्हा बाहेरची दिशा घेतली तेव्हा निरीक्षण, निष्कर्ष, नियम आणि सिद्धांत अशा साखळीने आणि त्या साखळीद्वारे भौतिक शास्त्रांनी जन्म घेतला. पण याच कुतूहलाने जेव्हा अंतरंगाची दिशा धरली तेव्हा त्यातून तत्वज्ञान आणि धर्म जन्माला आले. भौतिक शास्त्रांमध्ये आपल्याला दिसणाऱ्या सृष्टीबद्दलच्या सर्वच शास्त्रांचा समावेश होतो.आपण सामान्यपणे या सर्व शास्त्रांना एकत्रितपणे विज्ञान म्हणून ओळखतो. मानवजातीचे भूत आणि भविष्य हा विज्ञानाचा कायमच्या कुतूहलाचा विषय आहे. आणि योग हा माणसाचा भूतकाळ जमेला धरून त्याचे भवितव्य घडवण्याचा मार्ग आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर ज्ञान-विज्ञान आणि धर्म-तत्वज्ञान या दोघांच्याही अभ्यासाचा विषय मूलतः एकच आहे. दोघे निरनिराळ्या पद्धतींनी एकाच गोष्टीचा शोध घेत आहेत. आपण आणि आपल्या भोवतीचे विश्व- त्याचा जन्म, त्याची दिशा, त्यातल्या क्रिया-प्रतिक्रिया आणि त्याचे अंतिम भवितव्य हा या दोघांच्याही अभ्यासाचा विषय आहे. मार्ग आणि पद्धती आज वेगळ्या दिसत असतील, पण विषय तोच. त्या अर्थाने विज्ञान आणि तत्वज्ञान हे सख्खे भाऊ आहेत.

परमहंसजींच्या या आत्मचरित्राचे दुसरे सामर्थ्य विज्ञानाबद्दलच्या याच भ्रातृभावात आहे. योग आणि अध्यात्माच्या क्षेत्रात आयुष्य वेचणाऱ्या अनेक योगी संतांची आत्मकथने आता उपलब्ध आहेत. अध्यात्म आणि योगाच्या आकर्षणाने भारताकडे ओढले गेलेल्या पॉल ब्रंटन यांच्यासारख्या अनेक पाश्चात्य लेखकांची पुस्तके आणि लिखाणही उपलब्ध आहे. भारतीय तर सोडाच, पण पाश्चात्य लिखाणातही हा वैज्ञानिक दृष्टीकोन अभावानेच दिसतो हे सत्य आहे. एकच ढळढळीत उदाहरण द्यायचे तर पॉल ब्रंटन यांच्या ‘A search in Secret India’ (मराठी भाषांतर- भारताच्या अध्यात्मिक रहस्याच्या शोधात किंवा आध्यात्मिक भारताचा रहस्यमय शोध) याच पुस्तकाचे देता येईल. पॉल ब्रंटन हे विसाव्या शतकाच्या सुरवातीला जन्मलेले ब्रिटीश गूढवादी. ते शाळेत स्थिरावत होते त्या वेळी अल्बर्ट आईनस्टाईन आपल्या ‘विशिष्ट सापेक्षतावादा’च्या सिद्धांतावर अखेरचा हात फिरवीत होते आणि ब्रंटनसाहेब पदवीधर झाले तेव्हाही क्वांटम मेकॅनिक्सच्या अंतिम सिद्धतेवर काम चालू होते. पण ब्रंटनसाहेब पडले ब्रिटीश; सूर्य कधीच न मावळणाऱ्या महान साम्राज्याचे नागरिक! त्यामुळे आपल्याला पटत नाही किंवा कळत नाही असे काहीही अस्तित्वातच नाही असे मानण्याचा त्यांना जन्मसिद्ध हक्कच जणू मिळालेला. अध्यात्माच्या गूढ रहस्यांच्या शोधात भारतात फिरतानाही आपला हा हक्क सोडायला ते तयार नव्हते. पुस्तकात स्पष्ट म्हटलेले नाही. पण आपण व्यवस्थितपणे परीक्षा वगैरे करूनच कुणातरी चांगल्या योग्याची आपल्या गुरुपदावर नियुक्ती करावी असा या साहेबब्रुवाचा विचार असावा अशी मला नेहमी शंका येते. (भारतीय पद्धतीत मात्र गुरुच आपला शिष्य शोधतात आणि त्याला ओळखतात.)  त्यामुळे सद्गुरुंच्या शोधात फिरताना जेव्हा त्यांना ‘प्रकाश हे एक परम गूढ आहे’ असे सांगितले गेले तेव्हा त्यांचा त्यावर विश्वासच बसला नाही. साहेबांना प्रकाश या विषयात काही समजायचे राहिले आहे असे वाटतच नव्हते. आणि त्याही पलीकडे जाऊन समजा चुकून काही माहीत व्हायचे अजून राहिले असेलच, तर ते या नेटिव्ह समाजात जन्मलेल्या अडाणी बुवाला माहीत असेल असे वाटण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळेच त्यांनी ‘आता प्रकाश या विषयात समजायचे काय आणखी शिल्लक आहे?’ असा प्रश्न या पुस्तकात विचारला.

या मूर्खपणाला जणू काही उत्तर दिल्यासारखा एक प्रसंग योगीकथामृतात येतो. हा साधारण १८९५च्या आसपासचा प्रसंग असावा. परमहंसजींचे गुरु युक्तेश्वरगिरी महाराज त्यांचे गुरु लाहिरी महाशयांना भेटायला वाराणशीच्या आश्रमात गेले होते. गुरुजींच्या बैठकीच्या खोलीत ते शिरले तेव्हा लाहिरी महाशय त्यांना म्हणाले, “ये युक्तेश्वर, ये. खोलीच्या उंबरठ्यावर तुला आता बाबाजी दिसले का?” यावर आश्चर्याने युक्तेश्वरगिरी महाराजांनी ‘नाही’ असे उत्तर दिले. लाहिरी महाशयांनी युक्तेश्वरगिरी महाराजांना जवळ बोलावले आणि त्यांच्या भ्रूमध्याला हलकासा स्पर्श केला. त्याबरोबर दाराजवळ बाबाजी त्यांना दिसू लागले. इतर काही कामाचे बोलणे झाल्यावर बाबाजी युक्तेश्वरगिरी महाराजांना म्हणाले, ‘मुला, तू ध्यान जास्त करीत जा. तुझी दृष्टी अजून निर्दोष झाली नाही. सूर्यप्रकाशाच्या पाठीमागे दडलेल्या मला तू पाहू शकला नाहीस.” मला नेहमी प्रश्न पडतो की या प्रसंगाला ब्रंटनसाहेब जर साक्षीदार असते तर काय झाले असते? एखाद्या वस्तूवर प्रकाश पडून तो परावर्तित होतो. हा परावर्तित प्रकाश आपल्या डोळ्यात शिरतो तेव्हा आपल्याला ती वस्तू दिसते हे विज्ञानाने साहेबमजकूरांना शिकवले होते. जी गोष्ट स्वतः अदृश्य राहून माणसांना दिसण्याला मदत करते तिच्या पाठीमागे कुणी कसा लपू शकेल अशा समजुतीने त्यांनी थेट बाबाजींनाही वेड्यात काढले असते का? आपल्या ज्ञानावर आणि समजण्यावर वाजवीपेक्षा जास्त विश्वास असला की असे होत असते.

याच्या नेमके उलट योगीकथामृताची भूमिका आहे. विज्ञान आणि योग हे दोघेही एकाच गोष्टीच्या शोधात आहेत याचे भान परमहंसजी चुकूनही विसरत नाहीत आणि त्यामुळेच जिथे जथे शक्य आहे तिथे तिथे प्रत्येक गोष्टीचे किंवा प्रत्येक कृतीचे तर्कशास्त्र विज्ञानाला समजावून देण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. पूर्वसूरींनी पूर्वी स्थापित केलेल्या आणि बाबाजी-लाहिरी महाशय यांच्याकरवी नव्याने पुनःप्रवर्तित झालेल्या क्रियायोगाबद्दल तर त्यांची ही भूमिका आहेच. पण त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या बाबाजी, लाहिरी महाशय आणि युक्तेश्वरगिरी यांच्या इतर क्षेत्रातल्या चिंतनाबद्दलही ते याच पद्धतीने वागताना दिसतात. एक उदाहरण जरा तपशीलात जाऊन पाहण्यासारखे आहे.

‘ग्रहांवरती मात’ या १६व्या प्रकरणात परमहंसजी गुरु युक्तेश्वरगिरी यांची संवत्सरचक्राची संकल्पना विस्तृत स्वरूपात विषद करून सांगतात. योगदा सत्संग सोसायटीने प्रकाशित केलेल्या ‘द होली सायन्स’ या पुस्तकात या कल्पनेचे पूर्ण विवेचन आहे. स्वामीजी लिहितात, ‘श्री. युक्तेश्वर यांनी २४००० वर्षांचे संवत्सरचक्र किंवा कल्प कल्पून काही गणिती पद्धतीने त्याचा आधुनिक युगाशी संबंध जोडून दाखविला आहे. प्रत्येक चक्राचे त्यांनी दोन भाग केले. प्रत्येक भाग १२००० वर्षांचा. पहिला आरोह-कमान आणि दुसरा अवरोह-कमान. प्रत्येक कमानीत चार युगे. कली, द्वापर, त्रेता व सत्य. ही चार युगे ग्रीक कल्पनेप्रमाणे लोहयुग, ब्राँझयुग, रौप्ययुग व सुवर्णयुग या चार युगांशी जुळतात.

गुरुजींनी काही निरनिराळ्या गणिती आकड्यांवरून असे शोधून काढले की आरोह-कमानीतील शेवटले कलियुग हे इस ५००च्या सुमारास सुरू झाले. हे कलियुग १२०० वर्षे टिकले. ह्या युगामध्ये भौतिकवादास, जडवादास भर आला होता. ह्या युगाची समाप्ती इस १७०० मध्ये झाली. त्या वर्षी द्वापरयुगास सुरवात झाली. द्वापरयुगाचा काळ २४०० वर्षे. ह्या युगात विद्युत आणि अणुशक्ती या शक्तींचा विकास घडून येणार आहे. हे युग म्हणजे दूरसंदेशवहन (टेलिग्राफ), आकाशवाणी (रेडिओ), हवाई जहाजे (विमाने) व आकाशावर मात करणारी इतर मानवनिर्मित यंत्रे यांचे युग.

याच्यापुढील जे त्रेतायुग ते ३६०० वर्षांचे असेल. त्याची सुरवात इस ४१००ला होणारी आहे. या युगामध्ये मनोविज्ञानाने होणारे संदेशवहन व इतर काळावर मात करणारी मानव-निर्मित यंत्रसाधने ह्याचे ज्ञान अगदी सर्वसामान्य ज्ञान होईल. नंतर आरोह-कमानीमधील शेवटचे युग जे सत्ययुग- ते येईल. त्याचा कालावधी ४८०० वर्षांचा असेल. ह्या युगामध्ये मनुष्याची बुद्धिमत्ता फारच विकसित व प्रगल्भ होईल. ह्या युगात तो परमेश्वरी योजनेनुसार किंवा ह्या योजनेशी सुसंगत असेच कार्य करील.

अवरोह-कमानीतील १२००० वर्षांचे गणित असे: पहिली सुरुवात उतरत्या कमानीतील सुवर्णयुगापासून. हे सुवर्णयुग ४८०० वर्षांचे. ह्या कमानीची सुरवात इस १२५०० मध्ये होणार. ह्या युगात मनुष्य हळूहळू ज्ञानविहीन होत जाणार. ही संवत्सरचक्रे म्हणजे मायेचे निरंतर खालीवर होत असलेले फेरे होत. या कालावधीत भौतिक विश्वात परस्परविरोध व सापेक्षता यांचे साम्राज्य माजणार. माणसे एकापाठीमागून एक अशी या सृष्टीच्या द्वैतमूल बंदीतून बंधनमुक्त होत जातील आणि तशी ती होत असताना कारणीभूत म्हणून त्यांच्या ठिकाणी विधात्याची दिव्य, कधीही अलग न होणारी अशी सायुज्यतेची, एकत्वाची जागृत झालेली जाणीवही व्यक्त होईल.’

वर दिलेला उतारा पुस्तकातून शब्दशः घेतला आहे. उताऱ्याचे अवलोकन केले तर सहजच लक्षात येईल की ही विज्ञानाची पद्धती आहे. तुलनेसाठी उदाहरण सापेक्षतावादाच्या सिद्धांताचे घेता येईल. १९०५ साली अल्बर्ट आईनस्टाईन यांनी विशिष्ट सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडला तेव्हा त्यात गुरुत्वाकर्षणाचा समावेश नव्हता. कारण गुरुत्वाकर्षण जे कार्य करते त्याचे सूत्र न्यूटनने दिले आहे. या सूत्राचे वैशिष्ट्यच हे आहे की गुरुत्वाकर्षणाचे बल तत्काळ प्रभावाने कार्य करते. उलट सापेक्षतावादानुसार विश्वात कोणतेही कार्य प्रकाशाच्या वेगापेक्षा अधिक वेगाने होऊ शकत नाही. प्रकाशाचा वेग ही विश्वाच्या कार्य करण्याच्या वेगाची मर्यादा आहे. ती कुणालाच ओलांडता येत नाही. या पेचातून आईनस्टाईन यांनी मार्ग काढला तो गुरुत्वाकर्षणाला बल नव्हे तर गुणधर्म मानून. आईनस्टाईन यांच्या मते मूळ गुणधर्म अवकाशाची वक्रता हा आहे. त्याचे दिसणारे, व्यक्त होणारे स्वरूप गुरुत्वाकर्षण हे आहे. या विचाराला अनुसरून आईनस्टाईन यांनी अवकाशाची वक्रता मोजण्याचे सूत्रही मांडले. त्याचा पडताळा पाहण्यासाठी शास्त्रज्ञांनी सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्यकिरणांचे होणारे वक्रीभवन मोजले. प्रत्यक्ष आढळून आलेले वक्रीभवन आईनस्टाईन यांनी गणिताने मांडलेल्या वक्रीभवनाशी तंतोतंत जुळले आणि आईनस्टाईन यांचे सूत्र सिद्ध झाले.

एक क्षणभर असा विचार करून पहा की प्रत्यक्ष आढळून आलेले वक्रीभवन आणि गणिताने मांडलेले वक्रीभवन जर अचूक जुळले नसते तर? तर आईनस्टाईन यांनी आपल्या संपूर्ण प्रतिपादनाचे पुनरावलोकन केले असते आणि आपले सूत्र सुधारून घेतले असते. म्हणजेच आपण सुरवातीला म्हटलेली निरीक्षण, निष्कर्ष, नियम आणि सिद्धांत ही भौतिक शास्त्रांची साखळी संपूर्ण नाही. प्रत्येक सिद्धांताचा पडताळा प्रत्यक्ष जगात पहावा लागतो आणि जिथे प्रत्यक्षातले निरीक्षण सिद्धांताशी जुळणार नाही तिथे सिद्धांताचा पुनर्विचार करून सिद्धांत सुधारावा लागतो. पृथ्वीकेंद्रित विश्वाच्या कल्पनेपासून सूर्यकेंद्रित विश्वाचा कल्पनेपर्यंत प्रवास करताना खगोलविज्ञानाने अनेक वेळा त्या वेळी अस्तित्वात असलेले सिद्धांत प्रत्यक्ष निरीक्षणांना अनुसरून सुधारून घेतले आहेत. इथे युक्तेश्वरगिरी महाराज तेच करताना दिसत आहेत. योगीजी या प्रकरणात थोडी अधिक माहिती पुरवताना लिहितात की हिंदू धर्मग्रंथांनुसार आपल्या ग्रहमालेची वयोमर्यादा ४३० कोटी वर्षांपेक्षा जास्त आहे तर अखिल विश्वाची वयोमर्यादा ३,१४,१५९ अब्ज वर्षांची आहे. या संख्या एका गणिताने काढलेल्या असून ते गणित वर्षाचा अवधी आणि ग्रीकमधली  पाय् ही संख्या यावर आधारले आहे. इथे उघडच दिसते की युक्तेश्वरगिरी यांचे संवत्सरचक्र आणि धर्मग्रंथांमधली गणिते यात फारच मोठा फरक आहे. परमहंसजींनी या फरकाचे कारण स्पष्टपणे दिलेले नाही किंवा त्याचे काही स्पष्टीकरणही दिलेले नाही. त्यामुळेच प्रामुख्याने इथे दोन शक्यता जाणवतात. एक म्हणजे हा विषय अद्याप क्रियायोग्यांच्या विचाराधीन आहे आणि हे गणित अधिकाधिक निर्दोष बनवण्याचे प्रयत्न अजूनही सुरु आहेत. यथाकाल जेव्हा हे गणित पूर्ण सुटले आहे असे वाटेल तेव्हा ते आपल्यासमोर ठेवले जाईल. दुसरी अशी शक्यताही आहे की विश्वाचा एकूण आयुर्मर्यादेत अनेक संवत्सरचक्रे होणार असतील आणि प्रत्येक चक्राचे विवक्षित नियत कार्य असेल. परंतू यापैकी कोणतीही शक्यता बरोबर असली तरी हा सारा विज्ञानाच्याच पद्धतीने सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न आहे हे अगदी स्पष्ट आहे. जे डोळ्यांसमोर दिसते आहे ते अंतिम आहे. आपले सिद्धांत जर त्याच्याशी विसंगत असतील तर अधिक खोलात जाऊन अभ्यास व्हायला हवा. या अभ्यासात कधी आपली निरीक्षणपद्धती अधिक निर्दोष बनेल आणि परिणामी आपली निरीक्षणे अधिक अचूक होतील. कधी आपले सिद्धांत सुधारावे लागतील आणि ते प्रत्यक्षाशी अधिक सुसंगत बनवावे लागतील. पण या सर्वाचा शेवट प्रत्यक्षातले सत्य आकलन करणे हाच असायला हवा हाच विज्ञानाचा आग्रह आहे. परमहंस योगानंदही इथे याच पद्धतीने काम करताना दिसतात. विज्ञान आणि क्रियायोग यांच्यातल्या भातृभावाशी परमहंस योगानंदजी किती घट्ट जोडलेले आहेत  हे इथे प्रत्ययाला येते.

गंधबाबांचे चमत्कार प्रदर्शन या ५व्या प्रकरणात परमहंसजी विज्ञानाला एका नव्या दिशेची दीक्षा देतात तीही वैज्ञानिक पद्धतीनेच. गंधबाबा एका वस्तूचे दुसऱ्या वस्तूमध्ये रूपांतर करू शकत असत किंवा हवेतून वस्तू निर्माण करू शकत असत. या सामर्थ्याचे रहस्य सांगताना ते म्हणतात, स्पर्श, रूप, चव, श्रवण व गंध या विषयींच्या ज्ञानेंद्रियांनी निर्माण केलेल्या सगळ्या प्रेरणा इलेक्ट्रॉन व प्रोटॉन यांच्या स्पंदनातील कमी जास्त फरकामुळे उत्पन्न झालेल्या असतात. हे स्पंदन पुनः प्राणा (lifetrons) करवी नियंत्रित केले जाते. Lifetrons किंवा प्राण म्हणजे सूक्ष्म जीवशक्ती किंवा अणुशक्तीहूनही सूक्ष्म अशी पाच विवक्षित संवेदनशील कल्पनावस्तूकरवी बुद्धिपूर्वक प्रेरित झालेली अशी उर्जा. गंधबाबा काही योगसाधनांच्या सामर्थ्याने ह्या प्राणशक्तीशी एकसुर, एकताल होऊन ह्या lifetronsच्या स्पंदनांच्या स्थितीत फरक घडवून आणीत व त्यांच्याकरवी आपल्याला पाहिजे ती वस्तू निर्माण करीत. ही lifetronsची कल्पना अद्याप विज्ञानाला परिचित नाही. जॉन डाल्टन आणि रुदरफोर्ड यांच्यापासून अणूच्या रचनेवर शास्त्रीय संशोधन होत आले आहे आणि विज्ञानाने अणू हा अभेद्य मानण्यापासून अणूच्या घटकांच्या घटकांचे घटक असतात इथपर्यंत मजल मारलेली आहे. परंतू प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन यांचे अणूच्या रचनेत एकत्र असतानाचे संबंध नेमके कसे असतात, त्यांच्या स्थानात किंवा त्यांच्या उर्जेच्या पातळीत होणारे फरक कसे होतात आणि त्याचे नियंत्रण करण्याची काही व्यवस्था अणूच्या अंतरंगात असते काय यावर अजून नक्की माहिती उपलब्ध नाही. योगानंदजींचे विवेचन वाचल्यानंतर एकीकडून या विषयात विज्ञानाला किती गोष्टी कळणे अजून बाकी आहे याचीही पुन्हा एकदा जाणीव होते आणि परमहंसजींच्या तर्कनिष्ठतेचेही दर्शन होते. पण गोष्टी एवढ्यावर थांबत नाहीत. सजीव आणि निर्जीव यांच्यातली सीमारेषा नेमकी कुठे आहे हा आजही विज्ञानाच्या क्षेत्रातला एक गूढ प्रश्न आहे. अजून तरी विज्ञानाला ही सीमारेषा ठरवता आलेली नाही. परमहंसजींनी या कोड्यात आणखी भर टाकली आहे. जर सर्वच अणूंमधल्या प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची स्पंदने आणि त्यांच्यामध्ये ओणारे फरक lifetronsद्वारे नियंत्रित होत असतील तर सजीव आणि निर्जीव यातला भेद जवळपास समाप्तच होऊन जातो. हे एक नवीन आव्हान विज्ञानासमोर योगीजींनी उभे केले आहे. आणि यासाठी त्यांनी वापरलेली विवेचनाची पद्धत पूर्णपणे वैज्ञानिकच आहे. सजीव आणि निर्जीव यांच्यातला फरक प्रत्यक्ष अनुभवाच्या पातळीवर दिसतो. त्याचे तात्विक पातळीवर स्पष्टीकरण कसे द्यावे हे ठरवणे हे आपल्या धाकट्या भावाला त्याच्याच पद्धती वापरून योगीजींनी दिलेले काम आहे.

हेच विज्ञानभ्रातृत्व योगीकथामृतात ठायीठायी प्रत्ययाला येते. ज्या १६व्या प्रकरणाचा वर उल्लेख केला आहे त्याच प्रकरणात फलज्योतिषाबद्दल विवेचन येते. फलज्योतिष्याचा हेतू आणि त्याच्या दिशेबद्दल हे विवेचन खूप काही सांगून जाते. स्वामी युक्तेश्वरगिरी यांचे या विषयावरचे प्रतिपादन परमहंसजींनी विस्ताराने दिले आहे. “दांभिक लोकांनी (या) प्राचीन ज्योतिष्यशास्त्राची मोठी विटंबना करून सोडली आहे” हे गुरुजींचे मत उधृत करून गुरुमत सांगताना स्वामीजी म्हणतात, “एखादे मूल त्याच दिवशी व वेळेला जन्माला येते ज्या वेळी आकाशस्थ प्रकाशकिरण त्याच्या वैयक्तिक गतकर्माशी गणितानुसार सुसंबद्ध असतात. त्याची कुंडली म्हणजे आव्हान देणारे एक चित्रच होय. त्या कुंडलीमध्ये ज्यात काही फरक होऊ शकत नाहीत असा त्याचा भूतकाळ दर्शविला जातो तसाच त्याचा संभाव्य भविष्यकाळही दर्शविला जातो. पण ही कुंडली फक्त अंतःस्फूर्तीची माणसेच बरोबर वर्तवू शकतात. अशी माणसे अर्थात फार थोडीच असतात....... जन्माच्या वेळी अंतरिक्षाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जो संदेश उजळपणे प्रकाशित केला जातो त्याचा हेतू त्याचे नशीब, त्याचे पूर्वार्जित पाप-पुण्य निश्चित करण्याचा नसून, त्याच्या इच्छाशक्तीस उद्दीपित करण्याचा असतो- की ज्या इच्छाशक्तीच्या जोरावर तो ह्या विश्वाच्या गुलामगिरीतून मुक्त होऊ शकतो. त्याने जे कर्म केले असेल ते त्याला नष्ट करता येते. ज्या कारणाचे परिणाम त्याला सध्याच्या आयुष्यात भोगावे लागतात, ती कारणे व तशी कार्ये त्याने स्वतःच करून ठेवलेली असतात, दुसऱ्या कोणी नव्हे. तो कोणतीही मर्यादा उल्लंघू शकतो. कारण ती मर्यादा आपल्या स्वतःच्या कर्माने प्रथम त्यानेच घातलेली असते आणि त्याच्या ठिकाणी अशी काही अध्यात्मिक साधनसामग्री असते की जी ग्रहांच्या शुभाशुभ दृष्टीला जुमानीत नाही. माणसाला ज्योतिषशास्त्राची त्याच्या भोळसरपणामुळे भीती वाटते आणि त्यामुळे तो एक निर्जीव यंत्रच बनतो व त्या यांत्रिक सहाय्यावरच गुलामासारखा सर्वस्वी अवलंबून राहतो. परंतू जो मनुष्य शहाणा आहे तो ह्या ग्रहांना जुमानीत नाही... आपल्या पूर्वकर्मांनी खचून जात नाही. तो आपली निष्ठा सृष्टीवरून काढून सृष्टीकर्त्याच्या ठायी अर्पण करतो..... तो ग्रहांवर व आपल्या पूर्वकर्मावर मात करू शकतो. परमात्वतत्वाशी सायुज्यतेचा जसाजसा अनुभव येत असतो तसतसा त्या सृष्ट पदार्थांचा वरचष्मा कमीकमी होत जातो. आत्मा हा सदैव मुक्तच असतो. त्याला मरण नाही. कारण त्याला जन्मही नाही. ग्रह त्याला आपल्या अधिकाराच्या चौकटीत बसवू शकत नाहीत.”

स्वामीजींना परंपरेने मिळालेले आणि त्यांना मान्य असलेले हे मत काही गोष्टी स्पष्ट करते. एक म्हणजे ज्योतिषशास्त्र हे रूढ भौतिक शास्त्रांच्या अर्थाने शास्त्र नाही. कर्म आणि त्याचे व्यक्तिनिरपेक्ष फळ हे नाते आजच्या भौतिक शास्त्रांच्या चौकटीत बसत नाही. आपल्यासाठी कर्म आणि फळ हे नाते सामाजिक आहे, शास्त्रीय नाही. त्यामुळे कर्मफलाची पद्धत प्रामुख्याने न्यायाच्या कल्पना आणि सुसंस्कृततेच्या कसोट्या या सामाजिक मूल्यांवर आधारलेली आहे. त्यामुळेच न्यायालयांचे ब्रीदवाक्य ‘दहा दोषी सुटले तरी चालेल पण एकाही निर्दोष्याला शिक्षा होता कामा नये’ असे असते. या पद्धतीने ईश्वरी न्यायालयाचे काम चालूच शकणार नाही. तिथे ब्रीदवाक्य ‘एकही दोषी सुटता कामा नये आणि एकाही निर्दोष्याला शिक्षा होता कामा नये’ हे असते. त्यामुळे कर्म हे स्वतःच फळ निर्माण करण्यास सक्षम असणे ही गरजेची गोष्ट आहे. कर्म आणि फळाचे हे नाते जोवर भौतिक शास्त्रांच्या आवाक्यात येत नाही तोवर भौतिक शास्त्रांच्या कसोट्यांवर ज्योतिष हे शास्त्र असल्याचे सिद्ध करणे अशक्य आहे.
दुसरी गोष्ट भविष्यकाळाबद्दल आहे. ज्योतिषशास्त्राने वर्तवलेला भविष्यकाळ हा फक्त एक संभावना असतो, ज्याला संख्याशास्त्रे ‘most likely scenario’ म्हणून ओळखतात तशा स्वरूपाची एक शक्यता. पण आपल्या इच्छाशक्तीच्या आणि प्रयत्नाच्या जोरावर तो बदलणे शक्य आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर कुंडलीने वर्तवलेले भविष्य हा त्या व्यक्तीसाठी घटनाप्रवाहाचा कमीतकमी विरोधाचा पट्टा असतो आणि हेच भविष्य हवे असेल तर त्याला ते तुलनेने सहज आणि कमी कष्टांत मिळणे शक्य असते. यापेक्षा वेगळे काही घडवायचे असेल तर मात्र मूळ घटनाप्रवाहाशी जितकी फारकत घ्यायची आहे, त्या प्रमाणात सशक्त इच्छाशक्ती आणि प्रयत्न यांची गरज असते. पण असे वेगळे भवितव्य घडवणे शक्य आहे. ज्योतिष हे दिशादर्शक शास्त्र आहे, घटनादर्शक नव्हे हे इथे स्पष्ट होते. अर्थातच कुंडलीच्या आधारे दिसणारे भविष्य अचूक सांगणे आणि त्याला आव्हान देऊन त्यावर मात करणे या दोन्ही गोष्टींना जबरदस्त मानसिक शक्ती लागते, हेही योगीजी स्पष्ट करतात.

तिसरी महत्वाची गोष्ट कर्तव्यांबद्दलची आहे. दुःख, दैन्य आणि कष्ट भोगत असलेली व्यक्ती तिच्या पूर्वकर्माचे फळ भोगीत असते हे जरी खरे असले तरी अशा व्यक्तीबाबत इतरांचे काय कर्तव्य आहे? अशा व्यक्तीचा पापी म्हणून तिरस्कार करणे प्रथमदर्शनी स्वाभाविक आणि सोपे दिसते खरे. पण असा तिरस्कार करणारे आपली निर्णयशक्ती तिरस्काराच्या दिशेने वापरीत असतात आणि कर्माच्या नियमानुसार पाप करीत असतात. ‘तिरस्कार पापाचा करावा, पाप्याचा नव्हे’ हेच सामाजिक व्यवहाराचे सूत्र असले पाहिजे असा सुस्पष्ट निष्कर्ष स्वामीजींच्या या विवेचनातून निघतो.

तर्कशुद्ध निष्कर्ष, शक्य असेल त्या प्रत्येक ठिकाणी भौतिकशास्त्रांना मार्गदर्शन आणि जिथे भौतिक शास्त्रांची आजची अवस्था क्रियायोगाच्या आकलनाला कोणत्याही कारणाने अपुरी पडत असेल तिथे आकलनाच्या दिशेचे सुस्पष्ट दिग्दर्शन हे स्वामीजींच्या निवेदनपद्धतीचे या पुस्तकात सर्वत्र आढळणारे विशेष आहेत.  १६व्या प्रकरणाचे उदाहरण हे दाखवण्यासाठी इथे विस्ताराने मांडलेच आहे. पण हे विशेष पुस्तकात असंख्य ठिकाणी दिसतात. कोबीच्या चोरीचे विज्ञान सांगणारे १५वे प्रकरण, क्रियायोगाचे शास्त्र समजावणारे २६वे प्रकरण, चमत्कारांचे नियम मांडणारे ३०वे प्रकरण, शिष्यांचे देहविकार गुरू कसे स्वीकारतात याचे तत्व विषद करणारे २१वे प्रकरण ही अशा पद्धतीची काही उदाहरणे आहेत. याखेरीज आज भौतिक शास्त्रांच्या कल्पनेच्याही बाहेर असणाऱ्या ‘परलोक’ या खास संपूर्ण भारतीय चिंतनाचा भाग असणाऱ्या संकल्पनेबद्दलही विवेचन इथे येते आणि गंधबाबांच्या चमत्कारी शक्तीबद्दल माहिती देतानाच अशा सिद्धींचे निरुपयोगित्वही इथे साफसूफ शब्दांत सांगितले जाते. ‘आज’बद्दल योगमार्ग मान्य करू इच्छिणाऱ्या सर्वाना एक निश्चित मार्गदर्शन आणि बाकीच्या सर्वानाही कोणत्याही मार्गाने गेले तरी उद्या इथेच पोचायचे आहे अशी एक स्पष्ट अध्याहृत जाणीव असे एक मोठे हृदयंगम चित्र या आत्मकथेच्या रूपात स्वामीजींनी इथे उभे केले आहे. ख्रिश्चन धर्मासकट सर्व धर्म एकाच सत्याच्या आकलनाचे वेगवेगळे प्रयत्न आहेत हेही स्वामीजी स्पष्ट करतात. अॅडम आणि ईव्ह यांच्या कथेमागचे रूपक उलगडून दाखवून स्वामीजी आकलनाची एक दिशाही मांडतात. हेच रूपक पुढे अधिक तपशीलवार स्वरूपात योगी अरविंदांनी मांडले. योगीकथामृतासोबत आपल्या प्रवासाची सुरवात करताना शिवमहिम्न स्तोत्राच्या ज्या ‘रुचीनाम् वैचिद्र्याद्रुजुकुटिलनानापथजुषाम् | नृणामेको गम्यस्त्वमसि पयसामर्णवव’ या निःसंदिघ्ध ग्वाहीचा आधार आपण घेतला आणि जी ग्वाही एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस विश्व सर्वधर्म संमेलनाच्या व्यासपीठावरून स्वामी विवेकानंदानी घोषित केली तीच ग्वाही सर्व भारतीय तत्वज्ञानाचा मूलाधार आहे हे इथे अधोरेखित होते.

१९५०च्या दशकाच्या सुरवातीपर्यंतचा काळ योगीकथामृतात परमहंसजींनी मांडला आहे. राजकीयदृष्ट्या भारत स्वतंत्र होण्याचा हा काळ होता. भारताच्या पुनरुत्थानातील स्वातंत्र्य ही एक महत्वाची उपलब्धी होती. ‘उद्धरेदात्मनात्मानम्’ हे ऋषीवचन प्रत्यक्ष आचरणात आणण्यासाठी स्वातंत्र्य हे आवश्यकच होते. पण अखेरीस हे स्वातंत्र्य उद्धारासाठी साधनरूप बनवण्याची जबाबदारी जशी राजकीय नेतृत्वावर होती तशीच लोकमानसाला वळण लावू इच्छिणाऱ्या नैतिक नेतृत्वावरही होती. इंग्रजांचे पाय आता उखडू लागले आहेत हे दिसू लागण्याच्या काळात एकदा योगी अरविंद म्हणाले होते, ‘स्वातंत्र्य हे आता रोखताच येणार नाही. ते निर्विवाद आहे. पण भारत आपल्या स्वातंत्र्याचा उपयोग कशा प्रकारे करणार हे ठरवण्याची ही वेळ आहे.’ परमहंसजींचे कार्यही याच काळात घडत होते. स्वातंत्र्याच्या सुरवातीला अशा नैतिकतेचा मानदंड ठरणाऱ्या महापुरुषांचे कार्य देशाच्या पायाभरणीत सामावले जावे ही ईश्वरी योजनाच होती असे दिसते आणि या दर्शनाने आपलेही मन भरून येते. पुस्तकाचा समारोप करताना परमहंस योगानंद लिहितात, “मी पुष्कळदा कृतज्ञ बुद्धीने विचार करू लागतो- परमेश्वरा, तू ह्या बैराग्याला केवढे मोठे कुटुंब दिले आहेस!” पुस्तक संपवताना परमहंसजींच्या या विशाल कुटुंबात आपल्यालाही परमेश्वराने सामावून घेतले याबद्दल कृतज्ञतेचे अश्रू आपल्यालाही अनावर झाले तर त्यात काय आश्चर्य?

No comments:

Post a Comment