Thursday 14 July 2011

मुंबईचे 'स्पिरीट' आणि इतर कथा


मुंबई ही महाराष्ट्राची राजकीय आणि भारताची आर्थिक राजधानी आहे असे म्हणतात. प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे? माधव जुलियन यांनी अनेक वर्षांपूर्वी मराठी भाषेची स्थिती वर्णन करताना 'नसो आज ऐश्वर्य या माउलीला, यशाची पुढे दिव्य आशा असे' असे शब्द वापरले होते. मराठी ही महाराष्ट्राची भाषा आणि मुंबई हे त्याच महाराष्ट्राची राजधानी. त्यामुळे या दोघांचीही स्थिती एकसारखीच असेल तर त्यात काहीच आश्चर्य नाही. बडा घर पोकळ वासा ही म्हण आज सर्वात जास्त कुणाला लागू पडत असेल तर मुंबईला.
१९९३मध्ये मुंबईने पहिल्यांदा बॉम्बस्फोट अनुभवले. बॉम्बस्फोटाच्या दिवशीच संध्याकाळी मुंबईने रक्तपेढ्या भरून टाकल्या आणि त्याचे साऱ्या देशाने कौतुकही केले. 'मुंबईचे स्पिरीट' ही गोष्ट तेव्हा सर्वाना दिसली. तेव्हापासून हा शब्द रूढ झाला आणि आजपर्यंत सरसहा वापरलाही गेला. तेव्हापासून आजपर्यंत गेल्या १८ वर्षात अशा अनेक वेळा मुंबईच्या आयुष्यात आल्या आणि गेल्या. प्रत्येक वेळी मुंबई हादरली, एक क्षणभर थांबली आणि पुन्हा पुढे चालू लागली. पण २६ ऑक्टोबर नंतर मात्र जरा गोष्टी वेगळ्या दिसायला लागल्यात. हा खरच परिस्थितीतला फरक आहे का माझी नजर फक्त बदलली आहे - माहित नाही. पण आज मला प्रश्न पडतोय - मुंबईची ही वागणूक हे मुंबईचे स्पिरीट की तिची संवेदनहीनता? आपण खरेच कसे आहोत? लवचिक की मुर्दाड? शांत की हतबल? धीरगंभीर की पळपुटे?
आपल्या अध्यात्मात एक कल्पना आहे. पूर्ण ज्ञानी आणि जडभरत हे दोघेही दिसायला सारखेच असतात. बहुधा ही कल्पना खरी असावी. त्यामुळेच जडभरत असणारे आपण ज्ञानी दिसतो आहोत. मुंबईवर झालेल्या इतक्या हल्ल्यातल्या किती हल्ल्यांचा तपास पूर्ण झाला? त्यात कोणकोण दोषी ठरले? आणि त्याना त्यांच्या कृत्यांची काय शिक्षा मिळाली? अशी तुलना करू नये - पण अमेरिकेत एक /११ झाल्यावर अमेरिकेच्या सर्व अध्यक्षाना पुरेपूर कल्पना होती की पुन्हा अशी गोष्ट जर अमेरिकन भूमीवर घडली तर आपल्याला रस्त्यावरून सरळपणे चालताही येणार नाही. घराबाहेर तोंड काढायची चोरी होईल. मग पुन्हा लोकांसमोर जाण्याची तर गोष्टच सोडा. अमेरिकन लोक आणि वृत्तपत्रे या दोघांनीही त्याना जीव नको करून टाकला असता. या तुलनेत आपण कुठे आहोत?
मुंबईवर झालेल्या सर्वात निर्घृण हल्ल्यातला शिक्षा झालेला गुन्हेगार अजूनही सरकारी खर्चाने बिर्याणी झोडतो आहे. आणि त्याचे साथीदार त्याच्या वाढदिवशीच मुंबईवर पुढचा हला करताहेत! कसे दिसते हे चित्र? आमचे नेते आता येतील, घटनास्थळाची पाहणी करतील, दहशतवाद्यांना आणि त्यांना हरतऱ्हेने मदत करणाऱ्यांना कडक शब्दात इशारे देतील आणि परत जातील. मुंबईही उद्या सकाळपर्यंत आजचा प्रकार विसरेल आणि पुन्हा कामाला लागेल.
आपल्या काळातले सर्वश्रेष्ठ इतिहासकार अर्नोल्ड टोयनबी यांनी एकदा लिहिले होते, "Those who forget history are bound to repeat it". आपण त्यांच्या इशाऱ्यातले लोक होऊन गेलो आहोत का? आणि तसे असेल तर याला मुंबईचे स्पिरीट म्हणायचे का? प्रश्न आपला आहे, उत्तर आपणच दिले पाहिजेमात्र हे उत्तर देताना एका गोष्टीचे भान ठेवलेले बरे. जगातले सर्वात स्थितीस्थापक रबरही एका मर्यादेनंतर तुटतेच!

No comments:

Post a Comment