Friday, 5 July 2019


अंधत्वी निज शैशवास जपणे....
जी. एन देशपांडे
पंतप्रधान नरेंद्र मोदींना किती शत्रू आहेत हे सांगणे कठीण आहे. देशात आणि देशाबाहेरही मोदींना अनेक शत्रू आहेत हे उघड आहे. पण दिलदार आणि योग्यतेचे शत्रू किती आहेत, ज्यांच्याशी शत्रुत्वाचे का होईना पण नाते असल्याबद्दल धन्यता वाटावी असे शत्रू किती आहेत हे मात्र सहज सांगता येईल. ‘एका हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेही नाहीत’ हे त्याचे उत्तर आहे. आणि दुर्दैवाने हे उत्तर फक्त राजकीय नेतृत्वाची आकांक्षा असणाऱ्या नेत्यांपुरते मर्यादित नाही; वैचारिकतेचा वसा मिरवणाऱ्या राजकीय निरीक्षकांचाही समावेश त्यातच आहे. याचे कारण बहुधा हे दिसते की मोदींशी शत्रुत्व हे काही साधेसुधे काम नाही. मोदी हा बहुशः चाकोरीबाहेर (out of the box) विचार करणारा नेता आहे. त्यांची विचार करण्याची पद्धत अनेकदा समजत नाही. त्यांचे थेट जनतेशी इतके घट्ट नाते असण्याचे रहस्य उलगडत नाही. मग असे निरीक्षक हतबुद्ध होतात. याच्या जोडीला राजकीय घटना अशा का घडल्या असतील याचे काही स्पष्टीकरण देण्याची एक निरीक्षक म्हणून आपलीही काही जबाबदारी आहे हे मनोमन अमान्य केले की काम आणखी सोपे होते आणि प्रवाहाचे आकलन न होणे यात दोष आपला नसून प्रवाहाचा आहे असे सांगता येते. माझे वैचारिक गुरु कै. प्रा. नरहर कुरुंदकर यांनी कै. वि. स. खांडेकरांच्या ‘ययाती कादंबरीच्या संदर्भात मराठी समीक्षकांवर असा आरोपच केला आहे. ही कादंबरी इतकी वाचकप्रिय का याचे उत्तर देण्याची समीक्षकांची जबाबदारी होती, पण समीक्षकांनी ती साफ धुडकावून लावली असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. राजकीय क्षेत्रातही अशा समीक्षकांची काही वानवा नाही असे दिसते. दै. महाराष्ट्र टाईम्सच्या रविवार दि. ३० जून २०१९च्या अंकातला श्री. जम्मू आनंद यांचा ‘२०१९चा निकाल धक्कादायक कसा म्हणायचा ?’ अशा प्रश्नार्थक शीर्षकाचा लेख वाचला की याची खात्री पटते.
मी अगदीच अज्ञ माणूस आहे. त्यामुळे हे ‘जम्मू आनंद नाव खरे आहे की खरी ओळख लपवण्यासाठीचे इथून माझी सुरवात आहे. पण त्यावर एक तर लेखक किंवा प्रकाशक हेच दोघे काहीतरी प्रकाश टाकू शकतील. त्यामुळे हा विषय इतकाच चालवणे शक्य आहे. पण श्री. आनंद यांचे मुद्दे मात्र तसे नाहीत. उदाहरणार्थ मोदी सरकारच्या पाच वर्षांच्या काळात समाजाचा कोणताही घटक संतुष्ट होण्यासारखे काही झाले नाही असा त्यांचा दावा आहे. याला आधार म्हणून ‘रोजगारनिर्मिती नाही, महागाईवर नियत्रंण नाही, अर्थव्यवस्था सुरळीत नाही, शेती व्यवसाय संकटात आणि या सर्वांवर वरताण म्हणजे नोटबंदी. व्यापारीवर्ग आणि लहान उद्योगांना नोटाबंदीने अगदी उद्ध्वस्त केले’ असा ताळेबंद त्यांनी मांडला आहे. यापैकी ‘महागाईवर नियंत्रण नाही हे हास्यास्पद आहे. रिझर्व बँकेने पतधोरणात रेपो दर घटवताना जे तर्क दिले आहेत ते पाहिले तरी ही गोष्ट पुरेशी स्पष्ट होते. राहुलनी जसे निवडणूक प्रचाराच्या ओघात कोर्टाने चौकीदार चोर असल्याचे मान्य केले असे म्हटले होते तसेच वादाच्या ओघात श्री. आनंद हे म्हणत आहेत असे आपण समजू आणि हा मुद्दा सोडून देऊ.
नोटबंदीवरचा त्यांचा राग मात्र अनावर आहे. ‘व्यापारीवर्ग आणि लहान उद्योगांना नोटाबंदीने अगदी उद्ध्वस्त केले’ हे त्यांचे मत गांभीर्याने घेऊन ‘डावे विचारवंत व्यापारीवर्गाचे समर्थक कोणत्या सुमुहूर्तावर झाले?’ असा प्रश्न आपण विचारला तर श्री. आनंद काय उत्तर देतील हे कोडे मला अजून उलगडलेले नाही. त्यामुळे मी तात्पुरते त्याकडे दुर्लक्ष करणार आहे. पण एक हिशोब मांडणे गरजेचे आहे. नोटबंदी झाली नोव्हेंबर २०१६मध्ये. त्यापाठोपाठ २०१७ या वर्षात उत्तर प्रदेशसह एकूण ७ राज्यांत विधानसभांच्या निवडणुका झाल्या आणि पंजाबचा अपवाद सोडून सर्व राज्यांत भाजप सत्तेत आला. २०१८मध्ये ८ राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका झाल्या आणि तीन सोडता सर्व राज्यांत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. (मिझोरम, मेघालय या छोट्या राज्यांमध्ये फक्त स्थानिक पक्ष प्रभावी ठरले.) यावरून दोन गोष्टी स्पष्ट व्हायला हरकत नाही. एक म्हणजे २०१७च्या तुलनेत २०१८मध्ये भाजपचा आलेख घसरला. दुसरी म्हणजे २०१७ आणि २०१८ वर्षे मिळून देशात अर्ध्याहून जास्त राज्यांत निवडणुका झाल्या आणि त्यांत भाजपला एकूण मतदानापैकी सुमारे निम्मे मतदान झाले. उत्तर प्रदेशाने भाजपला तीन चतुर्थांश बहुमत दिले आणि राजस्थान-मध्यप्रदेशात भाजप पराभूत झाला याचाच अर्थ नोटबंदीच्या नजीक भाजपला प्रचंड यश मिळाले आणि नोटबंदीपासून दूर जावे तसतसा त्यांचा आलेख घसरला. भाजपच्या यशात कमी-अधिक समजू शकते. पण नोटबंदीचा -म्हणजे अनेक लोकांना उद्ध्वस्त करणाऱ्या एका मनमानी कृतीचा- परिणाम भाजपला अतिप्रचंड यश देण्यात होतो यावर श्री. आनंद यांच्यासकट एकाही बोलक्या-लिहित्या राजकीय निरीक्षकाने ‘असे कसे आणि का घडले असावे यावर मेंदू शिणवल्याचे माझ्या पाहण्यात आले नाही. विधानसभा ते लोकसभा सर्वत्र जनतेने नोटबंदीविरोधी प्रचार पूर्णपणे ठोकरून लावला आहे हे जर श्री. आनंद यांना अजूनही कळत नसेल तर कधी कळणार? आणि खरे तर त्याहूनही मोठा प्रश्न हाच आहे की जे घडले ते कसे याचे स्पष्टीकरण कोण देणार? काही थोडे प्रयत्न आता कुठे होत आहेत. शेखर गुप्ता, करण थापर आणि त्यांच्या कार्यक्रमात चर्चा करणारे श्री. दीपांकर गुप्ता असे काही प्रयत्न लक्षवेधी आहेत. मला स्वतःला नोटबंदीबद्दलचे दोन निष्कर्ष सर्वात महत्वाचे दिसतात. निव्वळ आर्थिक आणि प्रशासकीय अंगानेच नोटबंदीचा विचार करणारे सर्वजण अर्धाच विचार करीत होते हे पुरेसे स्पष्ट झाले आहे. नोटबंदी हा थोडा आर्थिक आणि बराचसा नैतिक प्रयत्न होता. ‘मी प्रयत्न करतो आहे, यश येते का पाहू. अर्थात एका प्रयत्नात इतका जुना रोग जाणे कठीण आहे हीच मोदींची तुकड्या-तुकड्यांनी वेगवेगळ्या वेळी सांगितलेली भूमिका होती. लोकांनी त्यांच्या प्रयत्नाला, त्यातल्या प्रामाणिकपणालाच दाद दिली आणि आजच्या अपयशाला उद्याच्या यशाचा पहिला प्रयत्न म्हणून मान्य केले. हेतूला परिणामापेक्षा जास्त महत्व दिल्यामुळेच लोकांनी नोटबंदी आपली मानली आणि नैतिक अर्थाने तिचा विचार केला. दुसरा मुद्दा जास्त सखोल आणि मूलगामी आहे. नोटबंदी हा देशातल्या ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ वर्गांमधल्या लढ्यातला एक भाग होता. मोदींनी नोटबंदीमुळे ‘आहे रे’ वर्गाला काही काळासाठी तरी ‘नाही रे’ वर्गाच्या बरोबरीला आणून बसवले आणि यावर ‘नाही रे’ वर्ग बेहद्द खुश झाला. मोदींनी हेही हेरले आणि ‘नामदार विरुद्ध ‘कामदार’ या मांडणीतून त्याला जिवंत रूप दिले. हे रूप ‘नाही रे’ वर्गाने ताबडतोब उचलून धरले आणि आपल्या हितशत्रूंना अद्दल घडवल्याबद्दल मोदींना भरघोस पाठींबा दिला. ही मीमांसा बरोबर आहे काय हे कालांतराने स्पष्ट होईल. पण मला स्वतःलाही नोटबंदीनंतर हैदराबादमध्ये दोन तास रांगेत उभा असूनही आणि नंबर यायला अजून वेळ असूनही हसत असणारा एक तरुण अभियंता भेटला होता. ‘तुम्हाला याचा राग येत नाही काय?’ या माझ्या प्रश्नाला त्याने स्पष्ट नकारार्थी उत्तर दिले आणि त्याचे कारण विचारता ‘मेरा बॉस और भी पीछे खडा है’ असे उत्तर दिले. तेव्हा मला या उत्तराचे आश्चर्य वाटले होते आणि हा गृहस्थ माझीच फिरकी घेतो आहे असे वाटले होते. पण त्याचे उत्तर एका वर्गाचे उत्तर होते असे आता दिसते आहे. हेच एकमेव उत्तर असेल असे आज म्हणता येत नाही. पण उपलब्ध पुरावा पाहून काही निरीक्षक विश्लेषणाचे प्रयत्न करताहेत. उलट आनंद यांचासारखे लोक फक्त तक्रारी करताहेत.
श्री. आनंद यांनी अशा तक्रारींची जंत्रीच दिली आहे. या यादीच्या शेवटी त्यांचा निष्कर्ष हा आहे की ‘पाच वर्षांत मोदी सरकारची जमेची बाजू वा उपलब्धी अशी काहीच नसताना ....... भाजपला या निवडणुकीत भरघोस यश मिळाले’. भरीत भर म्हणून त्यांनी ‘सगळेच जाणून होते की, २०१९च्या निवडणुकीच्या वेळी २०१४सारखी मोदी लाट नव्हती’ असेही म्हटलेले आहे. मला आता हेच कळेनासे झाले आहे की त्यांची (आणि त्यांच्यासारखे आकलन असणाऱ्यांची) लाटेची व्याख्या तरी काय आहे? माझी आजतागायत अशी समजूत होती की जेव्हा लोक कुणा नेत्याच्या विरुद्ध सांगितल्या जाणाऱ्या गोष्टी नजरेआड करून त्याला, तटस्थ निरीक्षकांनाही आश्चर्य वाटेल इतका भरघोस पाठींबा देतात, तेव्हा त्याला त्या नेत्याची ‘लाट’ असे म्हणतात. त्यामुळे तीन डझन राजकीय पक्षांची मोहीम नजरेआड करून लोकांनी मोदींना आणि भाजपला २०१४पेक्षाही मोठे बहुमत दिले, या घटनेचा अर्थ ‘२०१४मध्ये मोदी लाट होती, पण २०१९मध्ये नव्हती’ असा होऊच शकत नाही. आनंद यांच्यासारखे लोक जेव्हा अशी निरीक्षणे देतात तेव्हा त्याचा ‘पाहणारा जन्मांध आहे’ एवढा एक आणि एकच अर्थ होतो. राजदीप सरदेसाईने किमान निवडणुकीनंतर तरी मान्य केले की मोदी लाट होती आणि दिसतही होती. बाकीचे आपल्या अंधत्वाचे सत्य केव्हा पाहणार?
श्री. आनंद यांच्या सर्वच प्रतिपादनाला सविस्तर उत्तर द्यायचे तर हा लेख त्यांच्या लेखापेक्षाही मोठा होईल. कारण मूळ लेखात श्री. आनंद यांनी केवळ दुगाण्या झाडल्या आहेत. आकडेवारी आणि ठोस निरीक्षणे कुठेही दिलेली नाहीत. (अर्थात त्यामुळेच महागाईसारखे मुद्दे येतात.) पण काही ठळक गोष्टींचा प्रतिवाद व्हायलाच हवा. सांप्रदायिकतेचा जुनाट राग त्यांनी पुन्हा गायला आहे. ‘गेल्या पाच वर्षांत पक्षाला नव्या जोमाने पुन्हा उभे करण्यासाठी सर्वांत जास्त श्रम घेतलेत ते फक्त राहुल गांधींनी’ असे प्रशस्तीपत्र देत तरीही त्यांना अपेक्षित यश मिळू शकले नाही याबद्दलची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. काँग्रेसला उभे करण्याचे प्रयत्न म्हणजे मोठा देशसेवेचा वसा आहे अशी आनंद यांची भावना दिसते. त्यांनी लोकांसमोर कोणते चित्र ठेवले होते आणि ते कितपत विश्वासार्ह होते याबद्दल मात्र श्री. आनंद अवाक्षरही लिहीत नाहीत. १५ लाखांचा मुद्दा 'जुमला' म्हणून निकालात काढला गेला आहे याचे त्यांना वाईट वाटते आहे असे दिसते. पण प्रचार आणि वस्तुस्थिती यांचा ताळमेळ तपासणाऱ्या किमान अर्धा डझन लोकांनी (त्यात आपला पुण्याचा दै. सकाळ आहे) मोदींच्या भाषणाच्या चित्रफिती आणि वृत्तांत पाहून मोदींनी कधीही प्रत्येकी १५ लाख देण्याचे आश्वासन दिलेच नव्हते असा निष्कर्ष नोंदवला आहे याकडे ते दुर्लक्ष करतात. ‘हिंदुराष्ट्रवादाची वकिली करणारा आरएसएस उघडपणे सांगू शकत नाही की त्यांना संविधान का मान्य नाही’ असे म्हणताना संघ आणि भाजप यांचे ऐक्य ते गृहीत धरतात आणि कोणत्याही पुराव्याविना भाजपला संविधान मान्य नसल्याचेही गृहीत धरतात. काँग्रेसच्या आणि भाजपच्या सत्तेच्या काळात संविधानात झालेल्या दुरुस्त्यांची वार्षिक सरासरी जरी आनंद यांनी पाहिली तरी काँग्रेसपेक्षाही भाजपच संविधानाशी जास्त एकनिष्ठ राहिल्याचे त्यांना दिसून येईल. ‘डाव्यांनी दुसऱ्या यूपीए सरकारमधून आपले समर्थन काढून घेतल्यामुळे भारतीय राजकारणात भाजपच्या मार्ग अधिकच मोकळा, सोपा व सुकर झाला’ हे त्यांना मान्य आहे. पण डाव्यांनी ज्या मुद्द्यांवर यूपीए सरकारचे समर्थन मागे घेतले त्यात तत्व आणि देशहित कुठे आणि कोणते होते ते सांगणे त्यांना जमलेले नाही. ‘दबंग जातींची राजकारणातील पकड ढिली झाली आणि त्यांच्यावर आधारलेले पक्ष हळूहळू काठावर येऊन ठेपले’ असे मत मांडताना सर्वात तळागाळातल्या जातींचा राजकारणातला प्रभाव आणि वाटा वाढवण्याचे प्रशस्तीपत्रच आपण मोदींना देत आहोत याचेही त्यांना भान राहिलेले नाही. भाजपच्या निवडून आलेल्या खासदारांमध्ये कुणी मुस्लीम नाही याचा अर्थ ‘सबका साथ-सबका विकासमध्ये देशातील सर्वांत मोठ्या अल्पसंख्यांक समुदायाला भाजप सामील करू इच्छित नाही’ असा त्यांनी काढला आहे. पण आरिफ मोहम्मद खान यांनी याच तर्कशास्त्रावर ‘फक्त मुस्लिमच मुस्लिमांचे प्रतिनिधित्व करू शकतो, फक्त हिंदूच हिंदूंचे प्रतिनिधी असतात असे आपण मानणार काय? आणि तसे असेल तर त्याचा अर्थ आपण मागच्या दाराने जीनांचा द्विराष्ट्र सिद्धांतच स्वीकारत नाही काय? खासदार आपल्या मतदारसंघाचा प्रतिनिधी असतो की मतदारसंघातल्या त्याच्या धर्माच्या लोकांचा?’ असे प्रश्न उभे केले आहेत हे आनंद यांच्या गावीही नाही. लोकांची विचार करण्याची पद्धत आणि त्यांच्या प्राथमिकता बदलत आहेत या गोष्टीचा काही थांगपत्ता श्री. आनंद यांना असल्याचे दिसत नाही.
श्री. शेखर गुप्ता यांनी निवडणूक निकालांचे विश्लेषण करताना ‘स्कीम्सच्या नावाखाली काँग्रेस पक्षाने लोकांना वर्षानुवर्षे मूर्ख बनवले’ असा शेरा दिला आहे आणि ‘लोक अंमलबजावणीबाबत काँग्रेसवर विश्वास टाकायला आजीबात तयार नाहीत’ असा निष्कर्ष काढला आहे. मोदी-१च्या काळात लोकांना कल्याणकारी योजना खरोखरच दारापर्यंत येऊन पोचल्याचा अनुभव प्रथमच आला आणि लाच न देताही सरकारी योजनांचा लाभ मिळू शकतो हे समोर आले. सरकारी योजनेचा लाभ थेट लोकांपर्यंत पोचवताना मध्यस्थीला आळा घातल्याने योजनेच्या खर्चातही बचत झाली. जातीधर्मापलीकडे जाण्याचा एक प्रयत्न लोकांना मोदी-१मध्ये दिसू शकला. देशात आणि देशाबाहेर सामर्थ्य उभे करण्याचा आणि ते लोकांना अनुभवायला मिळण्याचा एक योग फार दिवसानंतर आला. थोरांचे सगळे नातेवाईकही थोरच असतात याचा व्यत्यास डोळ्यांसमोर दिसायला लागला. प्रस्थापित व्यवस्थेमध्ये कोणता मोठा बदल झाला नाही. पण बदलण्याचे प्रयत्न होताहेत असे वाटले. (ही सर्व निरीक्षणे वेगवेगळ्या निरीक्षकांनी गेल्या तीन महिन्यांत नोंदवली आहेत. यातल्या एकाही निरीक्षणाचे श्रेय माझे नाही. केवळ लेखनाचे शब्द माझे आहेत- मुद्दे त्यांचे.) श्री. आनंद यांना यातले काहीच दिसत नसेल तर त्याचा अर्थ गोष्टी घडल्या नाहीत असा होतो की कुणीतरी आपला अंधपणा मिरवतो आहे असा होतो हे समजणे कठीण नाही. अनेक वेळा अनेक प्रकारे बोलले गेलेले आणि कधीही नेमकेपणे कधीच सांगता न आलेले ‘विषमता शिगेला पोहोचली’ असे मोघम आरोप, वर्षानुवर्षे करदात्यांच्या पैशांची यथेच्छ उधळपट्टी होण्याबद्दल अवाक्षरही न बोलता फक्त खासगीकरणाचा दुस्वास,गेल्या दहा वर्षांत शेतकरी व कामकरीवर्गाची जितकी आंदोलने झालीत, तितकी स्वातंत्र्यानंतर कधीही झाली नाहीत’ अशी विधाने करताना आपण अतिव्याप्त आहोत आणि दोन स्वतंत्र राजवटींना एका विधानात बांधतो आहोत याचे सुटलेले भान अशा सगळ्या गोष्टींचा अर्थ एवढाच होतो की आपण विश्लेषण केले असा आव आणत त्यांनी फक्त पोरकट विधाने केली आहेत. लेख वाचून संपवताना श्री. आनंद यांनी लाजेकाजेखातर न लिहिलेला पण त्यांच्या मनात उमटलेला निष्कर्ष आपल्या मनाला मात्र स्पष्ट दिसू लागतो- ‘काय हे अडाणी लोक! विचारवंतांना न जुमानता काही भलतेच करत असतात. मूर्ख आहेत झालं.’ विचारांचे अंधपण आणि त्यावर फ्री मिळणारा विश्लेषणाचा पोरकटपणा याशिवाय इथे काय हाती लागले हा प्रश्नच आहे.



(ज्यांचा मूळ लेख वाचायचा राहिला असेल त्यांच्यासाठी मूळ लेखाचीही लिंक देतो आहे-

Tuesday, 18 June 2019


लोकसभा निवडणुकांचे कवित्व

१७व्या लोकसभेसाठी सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या आणि गेल्या २३ तारखेला त्याचे निकालही आले. या निकालांनी उडवलेला धुरळा आता हळूहळू खाली बसतो आहे. तेव्हा चॅनेलीय चर्चा करणारे थोर विचारवंत, सर्वज्ञानी स्तंभ आणि ब्लॉगलेखक, कोणत्या तरी विचारसरणीचा संसर्ग झालेले वृतपत्रीय लिखाणांचे नेहमीचे यशस्वी अंधलेखक, कुणाचे ना कुणाचे प्रवक्ते यांच्या मतमतांच्या गदारोळात सामान्य माणसाचेही मत आणि चार निरीक्षणे यांची नोंद करावी इतकाच फक्त या लिखाणाचा हेतू आहे.

आधी निवडणुकीची निरीक्षणे. माझ्यासारख्या एका सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने ही निवडणूक चांगलीच लक्षवेधी ठरली यात आजीबात शंका नाही. त्यातले सर्वात महत्वाचे कारण म्हणजे या वेळी मोदी किंवा भाजपाच्या बाजूने कोणतीही लाट नाही आहे आणि प्रधानमंत्री मोदींची लोकप्रियता घसरली आहे यावर मराठीतल्या तमाम विश्लेषक आणि विवेचकांचे एकमत होते. मोदी आणि भाजपबद्दल भ्रमनिरास व्हायला सुरवात झाली आहे आणि त्यामुळे भाजप स्वबळावर बहुमत मिळवू शकणार नाही असे या धुरिणांचे स्पष्ट मत होते. प्रत्यक्षात भाजपनेही आणि NDAनेही मागच्या वेळेपेक्षा जास्त जागा मिळवल्या. आश्चर्य म्हणजे निकालानंतरच्या चर्चांमध्येही हे विवेचक-विश्लेषक ‘यावेळी कोणतीही लाट कुठे दिसत नव्हती’ असेच म्हणत राहिले. भाऊ तोरसेकरांना भाजप या वेळी ३००पेक्षा जास्त जागा जिंकू शकतो हे कशाच्या बळावर दिसत होते याचा विचार कुठेही झालेला दिसला नाही. आपल्याला कुठलीही लाट कुठे दिसत नव्हती ती आपल्या वैचारिक-मानसिक आंधळेपणामुळे असा संशय निखील वागळे ते कुमार केतकर व्हाया कुबेर-चावके-चोरमारे या संपूर्ण मार्गावर कुणालाही आल्याचे दिसले नाही. अर्थात नेहमी होते त्याप्रमाणेच याही वेळी अंधत्वात सर्वश्रेष्ठतेचा मुकुट हिंदीच्या पुण्यप्रसून वाजपेयी यांनीच पटकावला. त्यांनी एक तासाचा कार्यक्रम सादर करून एक्झिट पोलचे अंदाज या वेळी कसे आणि कुठे चुकणार आहेत याचे तपशीलवार सादरीकरण केले. प्रत्यक्षात मात्र एक्झिट पोल बरोबर आले आणि वाजपेयी हरले. निकालांनंतरच्या कार्यक्रमात त्यांनी आपण कोणत्या आधारावर आपले अंदाज बांधले होते ते सांगितले आणि ‘मी बरोबरच होतो, EVMने निकाल कसे काय चुकवले?’ असा पवित्रा घेतला. लाट होती व दिसतही होती हे फक्त राजदीप सरदेसाईने निकालांनंतर मान्य केले. इतरांनी तेही नाही.

दुसरे महत्वाचे निरीक्षण म्हणजे लोक राज्य पातळीवर आणि केंद्र पातळीवर वेगवेगळा विचार करू शकतील अशी शंका एकाही बोलघेवड्या निरीक्षकाला आलेली दिसली नाही. वास्तविक यापूर्वीही आंध्र प्रदेश, ओदिशा, कर्नाटक अशा राज्यांमध्ये असे घडलेले आहे. राजस्थानात तर गेल्या विधानसभा निवडणुकीतही ‘मोदी तुझसे बैर नही, वसुंधरा तेरी खैर नही अशी घोषणा लोकप्रिय होती हे वृत्तांकन करताना सगळ्यांनी सांगितले होते. पण लोक खरोखरी तसे करतील आणि वैभव गेहेलोतसारख्या उमेदवारालासुद्धा घरचा रस्ता दाखवतील अशी अपेक्षा कुणीच केली नाही. आजही मराठीतल्या सर्व वृत्तपत्रांचे (म्हणजे त्यांच्या बातमीदार-संपादकीय कंपू-ब्लॉगलेखक अशा सर्वांचे) हेच म्हणणे आहे की मुख्यमंत्रीपदांसाठी राहुल गांधींनी केलेली कमलनाथ-अशोक गेहेलोत यांची निवडच काँग्रेसचे ग्रह फिरण्यास जबाबदार आहे. अजूनही कुणाला सचिन पायलट–जोतिरादित्य सिंदिया मुख्यमंत्री असते तरी हेच झाले असते, कारण लोकसभेला आणि विधानसभेला वेगवेगळा मार्ग घेण्याचे लोकांनी ठरवलेलेच होते असे वाटलेले नाही. थोर गझलनवाझ सुरेश भटांचे शब्द उसने घ्यायचे तर ‘अद्यापही स्वयंमन्य टोळक्याला लोकांचा सराव नाही असेच म्हणावे लागेल.

तिसरे महत्वाचे निरीक्षण म्हणजे इंग्रजी, हिंदी आणि मराठी या मी पाहिलेल्या तीनही भाषांमधली सर्व प्रमुख वृत्तपत्रे, NDTVसारख्या वाहिन्या आणि निखील वागळे - सुहास पळशीकरांसारखे फ्री-लान्स विचारवंत आता ‘निवडणुका लोकांच्या आयुष्यातील प्रश्नांवर आणि दैनंदिन जीवनातल्या समस्यांवर लढवल्याच गेल्या नाहीत’ असा विलाप करीत आहेत. या लोकांचे अरण्यरुदन हास्यास्पद आहे. NDTVचे सर्वेसर्वा डॉ. प्रणय रॉय यांचे संशोधन आणि डॉक्टरेट भारतीय निवडणुकांच्या विश्लेषणावरच आधारित आहे असे मी ऐकले आहे. ते बरोबर असो वा नसो. पण निवडणूक निकालांचे विश्लेषण या गोष्टीचा पाया भारतात डॉ. रॉय यांनीच दूरचित्रवाणीवर घातला हे मान्य करावे लागेल. डॉ. रॉय यांचे विश्लेषणात प्रमुख योगदान Swing Analysis किंवा आंदोलन विश्लेषण हे आहे. या विश्लेषणात ‘विरोधकांच्या ऐक्याचा निर्देशांक उर्फ Index of Opposition Unity (IOU) हा एक प्रमुख घटक आहे आणि गेली अनेक वर्षे डॉ. रॉय या घटकाच्या आधारे निवडणूक विश्लेषण करताहेत. निकालावर परिणाम करणारा हा महत्वाचा घटक आहे ही समजूत भारतात रुजवण्यात डॉ. रॉय यांचा निर्विवादपणे मोठा वाटा आहे.

या निवडणुकीच्या वेळी त्यात भर पडली २०१८-१९ मधल्या काही निवडणुकांची. मार्च २०१८मध्ये उत्तर प्रदेश विधानसभांच्या पोटनिवडणुका झाल्या. या निवडणुकांसाठी एक निकराचा प्रयत्न म्हणून समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांनी युती केली. या पोटनिवडणुकांमध्ये उप्रचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे घर म्हटल्या जाणाऱ्या गोरखपूर मतदारसंघात भाजपला पराभव पत्करावा लागला. विरोधी पक्षांच्या मनातल्या अपेक्षेला त्यामुळे अचानक पालवी फुटली. २०१४च्या लोकसभा ते २०१८च्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकांपर्यंत विरोधक सर्वत्र पराभूत होत होते. काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षापासून समाजवादी पक्षासारख्या प्रादेशिक पक्षापर्यंत कुणाचा टिकाव लागत नव्हता. अशा वेळी दोन प्रामुख्याने प्रादेशिक पक्षांच्या युतीने थेट मुख्यमंत्र्यांच्या घरातच विजय मिळवल्यामुळे खरोखरच IOU या घटकाचे सामर्थ्य फार मोठे आहे असे अनेकांना वाटू  लागले, राज्याबाहेर राष्ट्रीय पातळीवर महत्वाकांक्षा बाळगणाऱ्या चंद्राबाबू नायडू, ममता बॅनर्जी आणि मायावती यांना जास्तच. मोदी हेही राज्यातून राष्ट्रीय पातळीवर आल्याने जे त्यांना शक्य होते ते आपल्याला का नाही जमणार असे या सर्वांना वाटणे फार चूक म्हणता येणार नाही. याचा परिणाम म्हणून सुमारे २५ विरोधी पक्ष एकत्र झाले आणि त्यांनी ‘महागठबंधन’ ही आघाडी जन्माला घातली.

या आघाडीने काही महान चुका केल्या. त्यातली सर्वात महत्वाची घोडचूक म्हणजे फार पूर्वी -१९७०-७१ मध्ये- तत्कालीन विरोधी पक्षांनी केलेली ‘बडी आघाडी’ आणि १९७१च्या निवडणुका यांचा अनुभव याकडे त्यांनी संपूर्ण दुर्लक्ष केले. ‘इंदिरा हटाओ, देश बचाओ’ या आघाडीच्या घोषणेला इंदिराजींनी ‘वो कहते है इंदिरा हटाओ, मै कहती हूँ गरिबी हटाओ असे दिलेले प्रत्युत्तर आणि बड्या आघाडीचा उडालेला धुव्वा यातून काहीच धडा त्यांनी घेतल्याचे दिसले नाही. एका व्यक्तीविरोधात अनेक पक्ष एकवटले की ज्याच्या विरोधात ते उभे रहातात त्यालाच लोकांच्या सहानुभूतीचा लाभ होतो याचे गठबंधनला विस्मरण झाले. आणि ही गोष्ट काही फक्त युत्त्या आणि आघाड्यांच्या बाबतीतच खरी आहे असे नाही. १९८४च्या प्रख्यात निवडणुकीत भाजपला लोकसभेत फक्त दोन जागा मिळाल्या होत्या. त्यात एक जागा गुजरातमधल्या मेहसाणामधून मिळाली होती आणि ही जागा भाजपच्या वाट्याला जाण्यात तिथे अटलबिहारी वाजपेयी यांच्यावर झालेल्या दगडफेकीचा मोठा वाटा होता. भारतात एखाद्याला अन्याय्य पद्धतीने लक्ष्य केले जात आहे असे वाटले तर त्याला जनतेची सहानुभूती मिळते असा अनुभव पुन्हा पुन्हा आला आहे. मोदीविरोधासाठी एकत्र आलेल्या विरोधकांचे या गोष्टीकडे दुर्लक्ष झाले.

मोदींना विरोध करण्यासाठी गठबंधन करणेही एक वेळ चालले असते. परंतु या पक्षांनी मोदींना सत्तेवर येण्यापासून रोखणे हाच आपला एकमेव उद्देश असल्याचे उच्च स्वरात सांगायला सुरवात केली. त्या नादात नेता कोण, कार्यक्रम काय, कारभार कसा करणार, प्राथमिकता कोणत्या, गठबंधन टिकेल याची हमी काय यापैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देण्याचा कुणी प्रयत्नही केला नाही. प्रचाराच्या ओघात मोदीविरोध या मुद्द्याचा इतका अतिरेक झाला की दिल्लीचे वाचाळ मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एका सभेत ‘या वेळी मोदी पुन्हा जिंकले तर ते पाकिस्तान नष्ट करण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे या वेळी मोदींना जिंकू देता उपयोगी नाही असे सांगितले. समाजमाध्यमांवर हे भाषण वेगाने पसरले. याचा परिणाम म्हणजे गठबंधित पक्षांना पाकिस्तानचे एवढे प्रेम का हा प्रश्न लोकाना पडला. या काळात गठबंधनच्या घटक पक्षांनी वेळोवेळी त्यांच्या आजच्या सहकारी पक्षांच्या विरोधात बोललेल्या गोष्टीही वेगाने समाजमाध्यमांवर पसरत होत्या. राजकीय पावित्र्याचे स्वयंघोषित सम्राट अरविंद केजरीवाल यांचा त्यातही सिंहाचा वाटा होता. त्यांनी ममतादी, लालूप्रसाद, शरद पवार, काँग्रेस आणि गांधी परिवार यांच्यासाठी वापरलेले निवडक शब्द फेसबुक-ट्विटरवरून वणव्यासारखे पसरत गेले आणि कधीतरी ज्यांच्यासाठी हे शब्द वापरले त्यांच्यासह हात उंच करणारे केजरीवाल फक्त हास्यास्पद नाही तर अविश्वासार्ह होत गेले. भ्रष्टाचाराचा गुन्हा सिद्ध झाल्याने तुरुंगात असणारे लालू आणि शारदा घोटाळ्यातल्या ममता यांनाही मोदीविरोधाखातर पवित्र करून घेणारे गठबंधन अखेरीस बुडाले. जसजसा प्रचार पुढे गेला तसतसा IOU हाच गठबंधनच्या गळ्यातली धोंड बनत गेला. त्यांची एकी हीच त्यांची मुख्य अडचण ठरली. जनतेच्या आयुष्यातल्या खऱ्या प्रश्नांवर निवडणुका झाल्या नाहीत असे जर खरोखर घडले असेल तर आज हा आक्रोश करणाऱ्या मंडळींच्या गळ्यातले ताईत असणाऱ्या आणि जो कुणी येईल त्याला स्वीकारत मोदीविरोधाचा एककलमी कार्यक्रम कंठरवाने घोषित करणाऱ्या नेहमीच्या लाडक्या नेत्यांच्याच माथी त्याचे पाप आहे.

चौथे महत्वाचे निरीक्षण काँग्रेस आणि राहुल गांधींबाबत आहे. राहुल गांधींनी निवडणुका जाहीर होण्याच्या आधीपासून ‘मोदी भ्रष्ट आहेत, चौकीदार चोर है हा प्रचाराचा प्रधान मुद्दा बनवला होता. पण तो त्यांनी ज्या पद्धतीने चालवला ती पद्धत वावदूकपणाची होती. एक म्हणजे त्यांनी आपल्या आरोपांच्या पुष्ट्यर्थ अखेरपर्यंत एकही पुरावा कधीच दिला नाही. उलट ‘सर्वोच्च न्यायालयानेही चौकीदार चोर असल्याचे आता मान्य केले आहे’ असे बोलून आणि नंतर त्याबद्दल सपशेल क्षमायाचना करून तो सगळाच प्रकार हास्यास्पद केला. याच काळात अनिल अंबानी यांच्या कंपन्या बिकट अवस्थेतून जात होत्या आणि त्यांना बंधू मुकेश यांनी वाचवले अशा स्वरूपाच्या बातम्या वृत्तपत्रात येत होत्या. त्यामुळे मग राफेलचे ते तीस हजार कोटी काय झाले असा प्रश्न लोकांना पडू लागला आणि राहुलचे आरोपच संशयास्पद वाटू लागले. त्यातच त्यांनी या आरोपासह उद्योगपतींचे कर्ज मोदींनी माफ केल्याचा एक नवा आरोप केला. किती कर्ज माफ केले याचे ५-६ निरनिराळे आकडे दिले आणि १५-१६ उद्योगपतींचेच कर्ज माफ झाले असा आरोप करीत असताना एकदाही त्या उद्योगपतींची किंवा त्या बँका किंवा एजन्सीजची नावे समोर ठेवली नाहीत. सुमारे वर्षभर सातत्याने ठराविक आरोप करताना आरोपांना काही किमान विश्वासार्हता यावी याची काळजी काँग्रेस किंवा राहुल यांनी घेतली नाही. परिणामी शेवटी ते आरोप निरर्थक ठरू लागले. या निवडणुकांच्या निकालांचे विश्लेषण करणाऱ्या ब्रूकिंग्ज इन्स्टिट्युशन, वॉशिंग्टनच्या चर्चासत्रात डॉ. वैष्णव यांनी प्रतिपादन केले की निवडणुकीचा सर्व प्रचार मोदींविरुद्ध एकवटणे ही मोठी strategic चूक होती. ‘चौकीदार चोर है सारखा प्रचार यशस्वी होण्याची पूर्वअट ही आहे, की बोलणाऱ्याला ‘हे शक्य आहे असे लोकांना दाखवून देता आले पाहिजे. राहुल ही पूर्वअट पूर्ण करू शकले नाहीत. त्यामुळे हा प्रचार त्यांच्यावरच उलटला आणि त्याचा परिणाम न्याय योजनेला भोगावा लागला. तिलाही शेवटपर्यंत विश्वासार्हता येऊ शकली नाही.

माझे शेवटचे महत्वाचे निरीक्षण सर्वच विरोधी पक्षांबाबत आहे. मी आधी म्हटले आहे की महागठबंधन स्थापन करणाऱ्या पक्षांनी ‘हे एवढे पक्ष एका माणसावर चालून आले आहेत’ असे चित्र निर्माण करून आधीच परिस्थिती मोदींना अनुकूल करून ठेवली होती. अर्थात प्रचारमोहिमेच्या सुरवातीला हे त्यांना माहित असणे शक्य नव्हते हे कबूल. पण याच सुरवातीच्या काळात यच्चयावत देशी आणि विदेशी पत्रकारांचे असेच मत होते की मोदी निवडणुका जिंकतील. प्रश्न एवढाच होता सत्तेवर भाजप येईल की NDA. त्यामुळे लोकमत आपल्यापेक्षा मोदींना जास्त अनुकूल आहे हे सुरवातीपासून महागठबंधनलाही माहित होते आणि काँग्रेसलाही. कोणताही शहाणासुरता नेता अशा वेळी काय करेल? तो प्रचारमोहीम शक्य तितकी आपल्या मुद्द्यांवर केंद्रित ठेवण्याचा प्रयत्न करेल. या प्रचारमोहिमेत मोदींचे मुद्दे आक्रमक राष्ट्रवाद, मोदींनी अनेक राष्ट्रनेत्यांशी बनवलेले वैयक्तिक संबंध, त्यांचे आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि त्यामुळे वाढलेला देशाचा सन्मान, पाकिस्तान-पुरस्कृत दहशतवाद, उज्वला, जनधन, स्वच्छता, विमा, अक्षय ज्योती, गंगा सफाई यांसारख्या योजना आणि शेवटी ‘मी खालच्या जातीत, गरीब कुटुंबात, सामान्य परिस्थितीत वाढलेला चहावाला पंतप्रधान’ हेच होते. खरे तर त्यांचे मुद्दे हे असणार हे अगदी उघड होते. उलट विरोधकांचे मुद्दे फसलेली नोटाबंदी, अर्धवट तयारीने रेटलेली GSTची अंमलबजावणी, मोदी-शहांनी केलेले सत्तेचे केंद्रीकरण, संघ परिवाराचे हिंदुत्व, २०१४च्या वेळच्या प्रचारात आश्वासन दिलेले २ कोटी रोजगार, २०२२पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे मार्ग, काळ्या पैशाला आळा घालण्यातले अपयश हे असायला हवे होते. अपेक्षेप्रमाणे मोदींनी उरी-सर्जिकल स्ट्राईक आणि पुलवामा-बालाकोट प्रचारात मोठ्या प्रमाणावर आणले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या पवित्र्याने विरोधक भांबावले. हे खरे तर त्यांना अपेक्षित असायला हवे होते. सर्जिकल व एअरस्ट्राईकचा फायदा मोदींना मिळणार हे उघड होते. त्याला विरोध करण्याचा विरोधकांकडे काही मार्गच नव्हता. पण मोदींना फायदा या विचाराने सैरभैर झालेल्या मंडळींनी एअरस्ट्राईकचेही पुरावे मागायला सुरवात केली. वस्तुतः अशा स्वरूपाच्या गोष्टीचे पुरावे मागणे याला ‘वेडेपणा’ याशिवाय कोणतेही नाव देणे अवघड आहे. जी गोष्ट रात्रीच्या अंधारात शत्रूदेशाला आणि त्यांच्या लष्कराला चाहूलही न लागू देता गुपचूप आणि वेगाने करायची आहे आणि जिथे पुरावे मागे न ठेवणे हीच गरज आहे अशी सामान्य माणसाची खात्री आहे तिथे कुठे कसलेही पुरावे मागे नाहीत ही अभिमानाची बाब असायला पाहिजे. या वेळी तर एअरस्ट्राईकची वाच्यताच पाकिस्तानने केली होती, मोदींनी नव्हे. पाकिस्तान ‘आमचे काहीही नुकसान झाले नाही असे म्हणणार हेही अपेक्षितच होते. अशावेळी ५ लोक मारले गेले की ५०० यावर चर्चा आणि वाद करणे आत्मघातकच ठरणार होते. तसेच झाले.
वास्तविक करायला हवे होते ते वेगळेच. मोदींचे नाव न घेता लष्कराचे कौतुक करीत लष्कराचा आम्हाला अभिमान आहे हेच पुन्हा पुन्हा म्हणायला हवे होते. या गोष्टीवर वाद करायचाच नाही. लष्कराच्या नावाने मते मागणे कसे चूक आहे याचे पाढे वाचणे वेडेपणाचे होते. त्या गोष्टींवर वाद न घालता आणि लष्कराच्या कौतुकात कोणतीही कुचराई न करता पुन्हा पुन्हा आर्थिक-सामाजिक मुद्द्यांवर परत येणे अशीच पद्धती विरोधकांच्या फायद्याची ठरण्याची शक्यता होती. युद्धाचा महत्वाचा नियमच आहे की आपल्या शक्तीस्थळांचा पुरेपूर सुयोग्य वापर करा आणि विरोधकांच्या शक्तीस्थळांवर प्रहार करा. इथे तर विरोधी पक्षांनी ना आपल्या फायद्याच्या मुद्द्यांचा वापर केला, ना मोदींच्या कच्च्या दुव्यांचा फायदा घेतला. उलट लष्करी कर्तृत्वाचे पुरावे मागून मोदींना विरोधकांच्या देशभक्तीबद्दलच संशय निर्माण करण्याची सुवर्णसंधी देऊ केली. मोदी आणि भाजपने याचा दोन्ही हातांनी फायदा उठवला नसता तरच नवल.

निवडणुकीच्या काळात विरोधकांनी प्रदर्शित केलेल्या या बौद्धिक दिवाळखोरीत अद्याप काही फार फरक पडलेला नाही. बुआ-बबुआ पुन्हा विभक्त झाले आहेत आणि ममतादी वेगाने आपली स्थानिक पकड गमावत आहेत अशी शंका येते आहे. चंद्राबाबू आंध्रातही बेघर आहेत आणि पवारांनी वावदूक विदुषकाची भूमिका घेतली आहे. आधी बारामतीत पराभवाच्या भीतीने EVM वर pre-emptive शंका, मग VVPAT आणि EMV मधली मते mismatch होण्याचे एकही उदाहरण मिळाले नाही तेव्हा निवडणूक अधिकाऱ्यांना लक्ष्य करणे असे अनेक विदुषकी उदयोग त्यांनी चालवले आहेत. (पवारांनी नवे चेहरे देण्याची घोषणा केल्यावर ‘पवारांना नातू तरी किती आहेत?’ अशी चर्चा महाराष्ट्रात होते आहे असे ऐकतो.) सारंग दर्शनेंसारख्या लोकांनी कागदी मतपत्रिकांच्या पद्धतीचा कसा गैरवापर केला जायचा याचे असंख्य मार्ग दाखवणारे लेख लिहिल्यानंतर सामान्य माणसालाही आता बॅलटची मागणी नेमकी कशासाठी होते आहे असा प्रश्न पडू लागला आहे. राहुल गांधींनी आपल्याच पक्षाच्या वयस्क नेत्यांवर स्वार्थीपणाचा आरोप करताना आपण कोणत्या न्यायाने पक्षाध्यक्ष आहोत याचे काही उत्तर दिलेले नाही. त्यांना बहुधा आपण प्रश्न विचारावेत आणि पंतप्रधानांसकट सर्वांनी धावून धावून उत्तरे द्यावीत अशी रचना हवी असावी. आपल्या पायाखाली काय जळते आहे हे पाहण्याची त्यांची आजही तयारी नाही. मग अशावेळी वर उल्लेख केलेल्या ब्रूकिंग्ज इन्स्टिट्युशनच्या चर्चासत्रात व्यक्त झालेले ‘नेहरू काळापासून चालत आलेले सेक्युलॅरिझमचे मॉडेल अविश्वासार्ह ठरले आहे (The whole construct of Neharuvian Secularism has been completely discredited)’ या मताची दखल घेऊन त्यावर विचार होणे तर फारच दूर राहिले. विरोधी पक्षांनी स्वतःलाच इतके दीन केले आहे की त्यांना पराभूत करण्यासाठी मोदींची खरेच गरज आहे का?

Tuesday, 5 June 2018


योगीकथामृत या पुस्तकाचा परिचय
अलौकिकाचे आत्मलेणे
(उत्तरार्ध)

परमहंस स्वामी योगानंद यांच्याAutobiography of a Yogi अर्थात योगीकथामृत या पुस्तकाबद्दल विचारांची सुरवात करतानाच आपल्या लक्षात आले होते की आपण आणि आपल्या भोवतीचे हे अनंत विश्व हा अनादी कालापासून माणसाच्या अमर्याद कुतूहलाचा विषय राहिला आहे. या कुतूहलाने जेव्हा बाहेरची दिशा घेतली तेव्हा निरीक्षण, निष्कर्ष, नियम आणि सिद्धांत अशा साखळीने आणि त्या साखळीद्वारे भौतिक शास्त्रांनी जन्म घेतला. पण याच कुतूहलाने जेव्हा अंतरंगाची दिशा धरली तेव्हा त्यातून तत्वज्ञान आणि धर्म जन्माला आले. भौतिक शास्त्रांमध्ये आपल्याला दिसणाऱ्या सृष्टीबद्दलच्या सर्वच शास्त्रांचा समावेश होतो.आपण सामान्यपणे या सर्व शास्त्रांना एकत्रितपणे विज्ञान म्हणून ओळखतो. मानवजातीचे भूत आणि भविष्य हा विज्ञानाचा कायमच्या कुतूहलाचा विषय आहे. आणि योग हा माणसाचा भूतकाळ जमेला धरून त्याचे भवितव्य घडवण्याचा मार्ग आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर ज्ञान-विज्ञान आणि धर्म-तत्वज्ञान या दोघांच्याही अभ्यासाचा विषय मूलतः एकच आहे. दोघे निरनिराळ्या पद्धतींनी एकाच गोष्टीचा शोध घेत आहेत. आपण आणि आपल्या भोवतीचे विश्व- त्याचा जन्म, त्याची दिशा, त्यातल्या क्रिया-प्रतिक्रिया आणि त्याचे अंतिम भवितव्य हा या दोघांच्याही अभ्यासाचा विषय आहे. मार्ग आणि पद्धती आज वेगळ्या दिसत असतील, पण विषय तोच. त्या अर्थाने विज्ञान आणि तत्वज्ञान हे सख्खे भाऊ आहेत.

परमहंसजींच्या या आत्मचरित्राचे दुसरे सामर्थ्य विज्ञानाबद्दलच्या याच भ्रातृभावात आहे. योग आणि अध्यात्माच्या क्षेत्रात आयुष्य वेचणाऱ्या अनेक योगी संतांची आत्मकथने आता उपलब्ध आहेत. अध्यात्म आणि योगाच्या आकर्षणाने भारताकडे ओढले गेलेल्या पॉल ब्रंटन यांच्यासारख्या अनेक पाश्चात्य लेखकांची पुस्तके आणि लिखाणही उपलब्ध आहे. भारतीय तर सोडाच, पण पाश्चात्य लिखाणातही हा वैज्ञानिक दृष्टीकोन अभावानेच दिसतो हे सत्य आहे. एकच ढळढळीत उदाहरण द्यायचे तर पॉल ब्रंटन यांच्या ‘A search in Secret India’ (मराठी भाषांतर- भारताच्या अध्यात्मिक रहस्याच्या शोधात किंवा आध्यात्मिक भारताचा रहस्यमय शोध) याच पुस्तकाचे देता येईल. पॉल ब्रंटन हे विसाव्या शतकाच्या सुरवातीला जन्मलेले ब्रिटीश गूढवादी. ते शाळेत स्थिरावत होते त्या वेळी अल्बर्ट आईनस्टाईन आपल्या ‘विशिष्ट सापेक्षतावादा’च्या सिद्धांतावर अखेरचा हात फिरवीत होते आणि ब्रंटनसाहेब पदवीधर झाले तेव्हाही क्वांटम मेकॅनिक्सच्या अंतिम सिद्धतेवर काम चालू होते. पण ब्रंटनसाहेब पडले ब्रिटीश; सूर्य कधीच न मावळणाऱ्या महान साम्राज्याचे नागरिक! त्यामुळे आपल्याला पटत नाही किंवा कळत नाही असे काहीही अस्तित्वातच नाही असे मानण्याचा त्यांना जन्मसिद्ध हक्कच जणू मिळालेला. अध्यात्माच्या गूढ रहस्यांच्या शोधात भारतात फिरतानाही आपला हा हक्क सोडायला ते तयार नव्हते. पुस्तकात स्पष्ट म्हटलेले नाही. पण आपण व्यवस्थितपणे परीक्षा वगैरे करूनच कुणातरी चांगल्या योग्याची आपल्या गुरुपदावर नियुक्ती करावी असा या साहेबब्रुवाचा विचार असावा अशी मला नेहमी शंका येते. (भारतीय पद्धतीत मात्र गुरुच आपला शिष्य शोधतात आणि त्याला ओळखतात.)  त्यामुळे सद्गुरुंच्या शोधात फिरताना जेव्हा त्यांना ‘प्रकाश हे एक परम गूढ आहे’ असे सांगितले गेले तेव्हा त्यांचा त्यावर विश्वासच बसला नाही. साहेबांना प्रकाश या विषयात काही समजायचे राहिले आहे असे वाटतच नव्हते. आणि त्याही पलीकडे जाऊन समजा चुकून काही माहीत व्हायचे अजून राहिले असेलच, तर ते या नेटिव्ह समाजात जन्मलेल्या अडाणी बुवाला माहीत असेल असे वाटण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळेच त्यांनी ‘आता प्रकाश या विषयात समजायचे काय आणखी शिल्लक आहे?’ असा प्रश्न या पुस्तकात विचारला.

या मूर्खपणाला जणू काही उत्तर दिल्यासारखा एक प्रसंग योगीकथामृतात येतो. हा साधारण १८९५च्या आसपासचा प्रसंग असावा. परमहंसजींचे गुरु युक्तेश्वरगिरी महाराज त्यांचे गुरु लाहिरी महाशयांना भेटायला वाराणशीच्या आश्रमात गेले होते. गुरुजींच्या बैठकीच्या खोलीत ते शिरले तेव्हा लाहिरी महाशय त्यांना म्हणाले, “ये युक्तेश्वर, ये. खोलीच्या उंबरठ्यावर तुला आता बाबाजी दिसले का?” यावर आश्चर्याने युक्तेश्वरगिरी महाराजांनी ‘नाही’ असे उत्तर दिले. लाहिरी महाशयांनी युक्तेश्वरगिरी महाराजांना जवळ बोलावले आणि त्यांच्या भ्रूमध्याला हलकासा स्पर्श केला. त्याबरोबर दाराजवळ बाबाजी त्यांना दिसू लागले. इतर काही कामाचे बोलणे झाल्यावर बाबाजी युक्तेश्वरगिरी महाराजांना म्हणाले, ‘मुला, तू ध्यान जास्त करीत जा. तुझी दृष्टी अजून निर्दोष झाली नाही. सूर्यप्रकाशाच्या पाठीमागे दडलेल्या मला तू पाहू शकला नाहीस.” मला नेहमी प्रश्न पडतो की या प्रसंगाला ब्रंटनसाहेब जर साक्षीदार असते तर काय झाले असते? एखाद्या वस्तूवर प्रकाश पडून तो परावर्तित होतो. हा परावर्तित प्रकाश आपल्या डोळ्यात शिरतो तेव्हा आपल्याला ती वस्तू दिसते हे विज्ञानाने साहेबमजकूरांना शिकवले होते. जी गोष्ट स्वतः अदृश्य राहून माणसांना दिसण्याला मदत करते तिच्या पाठीमागे कुणी कसा लपू शकेल अशा समजुतीने त्यांनी थेट बाबाजींनाही वेड्यात काढले असते का? आपल्या ज्ञानावर आणि समजण्यावर वाजवीपेक्षा जास्त विश्वास असला की असे होत असते.

याच्या नेमके उलट योगीकथामृताची भूमिका आहे. विज्ञान आणि योग हे दोघेही एकाच गोष्टीच्या शोधात आहेत याचे भान परमहंसजी चुकूनही विसरत नाहीत आणि त्यामुळेच जिथे जथे शक्य आहे तिथे तिथे प्रत्येक गोष्टीचे किंवा प्रत्येक कृतीचे तर्कशास्त्र विज्ञानाला समजावून देण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. पूर्वसूरींनी पूर्वी स्थापित केलेल्या आणि बाबाजी-लाहिरी महाशय यांच्याकरवी नव्याने पुनःप्रवर्तित झालेल्या क्रियायोगाबद्दल तर त्यांची ही भूमिका आहेच. पण त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या बाबाजी, लाहिरी महाशय आणि युक्तेश्वरगिरी यांच्या इतर क्षेत्रातल्या चिंतनाबद्दलही ते याच पद्धतीने वागताना दिसतात. एक उदाहरण जरा तपशीलात जाऊन पाहण्यासारखे आहे.

‘ग्रहांवरती मात’ या १६व्या प्रकरणात परमहंसजी गुरु युक्तेश्वरगिरी यांची संवत्सरचक्राची संकल्पना विस्तृत स्वरूपात विषद करून सांगतात. योगदा सत्संग सोसायटीने प्रकाशित केलेल्या ‘द होली सायन्स’ या पुस्तकात या कल्पनेचे पूर्ण विवेचन आहे. स्वामीजी लिहितात, ‘श्री. युक्तेश्वर यांनी २४००० वर्षांचे संवत्सरचक्र किंवा कल्प कल्पून काही गणिती पद्धतीने त्याचा आधुनिक युगाशी संबंध जोडून दाखविला आहे. प्रत्येक चक्राचे त्यांनी दोन भाग केले. प्रत्येक भाग १२००० वर्षांचा. पहिला आरोह-कमान आणि दुसरा अवरोह-कमान. प्रत्येक कमानीत चार युगे. कली, द्वापर, त्रेता व सत्य. ही चार युगे ग्रीक कल्पनेप्रमाणे लोहयुग, ब्राँझयुग, रौप्ययुग व सुवर्णयुग या चार युगांशी जुळतात.

गुरुजींनी काही निरनिराळ्या गणिती आकड्यांवरून असे शोधून काढले की आरोह-कमानीतील शेवटले कलियुग हे इस ५००च्या सुमारास सुरू झाले. हे कलियुग १२०० वर्षे टिकले. ह्या युगामध्ये भौतिकवादास, जडवादास भर आला होता. ह्या युगाची समाप्ती इस १७०० मध्ये झाली. त्या वर्षी द्वापरयुगास सुरवात झाली. द्वापरयुगाचा काळ २४०० वर्षे. ह्या युगात विद्युत आणि अणुशक्ती या शक्तींचा विकास घडून येणार आहे. हे युग म्हणजे दूरसंदेशवहन (टेलिग्राफ), आकाशवाणी (रेडिओ), हवाई जहाजे (विमाने) व आकाशावर मात करणारी इतर मानवनिर्मित यंत्रे यांचे युग.

याच्यापुढील जे त्रेतायुग ते ३६०० वर्षांचे असेल. त्याची सुरवात इस ४१००ला होणारी आहे. या युगामध्ये मनोविज्ञानाने होणारे संदेशवहन व इतर काळावर मात करणारी मानव-निर्मित यंत्रसाधने ह्याचे ज्ञान अगदी सर्वसामान्य ज्ञान होईल. नंतर आरोह-कमानीमधील शेवटचे युग जे सत्ययुग- ते येईल. त्याचा कालावधी ४८०० वर्षांचा असेल. ह्या युगामध्ये मनुष्याची बुद्धिमत्ता फारच विकसित व प्रगल्भ होईल. ह्या युगात तो परमेश्वरी योजनेनुसार किंवा ह्या योजनेशी सुसंगत असेच कार्य करील.

अवरोह-कमानीतील १२००० वर्षांचे गणित असे: पहिली सुरुवात उतरत्या कमानीतील सुवर्णयुगापासून. हे सुवर्णयुग ४८०० वर्षांचे. ह्या कमानीची सुरवात इस १२५०० मध्ये होणार. ह्या युगात मनुष्य हळूहळू ज्ञानविहीन होत जाणार. ही संवत्सरचक्रे म्हणजे मायेचे निरंतर खालीवर होत असलेले फेरे होत. या कालावधीत भौतिक विश्वात परस्परविरोध व सापेक्षता यांचे साम्राज्य माजणार. माणसे एकापाठीमागून एक अशी या सृष्टीच्या द्वैतमूल बंदीतून बंधनमुक्त होत जातील आणि तशी ती होत असताना कारणीभूत म्हणून त्यांच्या ठिकाणी विधात्याची दिव्य, कधीही अलग न होणारी अशी सायुज्यतेची, एकत्वाची जागृत झालेली जाणीवही व्यक्त होईल.’

वर दिलेला उतारा पुस्तकातून शब्दशः घेतला आहे. उताऱ्याचे अवलोकन केले तर सहजच लक्षात येईल की ही विज्ञानाची पद्धती आहे. तुलनेसाठी उदाहरण सापेक्षतावादाच्या सिद्धांताचे घेता येईल. १९०५ साली अल्बर्ट आईनस्टाईन यांनी विशिष्ट सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडला तेव्हा त्यात गुरुत्वाकर्षणाचा समावेश नव्हता. कारण गुरुत्वाकर्षण जे कार्य करते त्याचे सूत्र न्यूटनने दिले आहे. या सूत्राचे वैशिष्ट्यच हे आहे की गुरुत्वाकर्षणाचे बल तत्काळ प्रभावाने कार्य करते. उलट सापेक्षतावादानुसार विश्वात कोणतेही कार्य प्रकाशाच्या वेगापेक्षा अधिक वेगाने होऊ शकत नाही. प्रकाशाचा वेग ही विश्वाच्या कार्य करण्याच्या वेगाची मर्यादा आहे. ती कुणालाच ओलांडता येत नाही. या पेचातून आईनस्टाईन यांनी मार्ग काढला तो गुरुत्वाकर्षणाला बल नव्हे तर गुणधर्म मानून. आईनस्टाईन यांच्या मते मूळ गुणधर्म अवकाशाची वक्रता हा आहे. त्याचे दिसणारे, व्यक्त होणारे स्वरूप गुरुत्वाकर्षण हे आहे. या विचाराला अनुसरून आईनस्टाईन यांनी अवकाशाची वक्रता मोजण्याचे सूत्रही मांडले. त्याचा पडताळा पाहण्यासाठी शास्त्रज्ञांनी सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्यकिरणांचे होणारे वक्रीभवन मोजले. प्रत्यक्ष आढळून आलेले वक्रीभवन आईनस्टाईन यांनी गणिताने मांडलेल्या वक्रीभवनाशी तंतोतंत जुळले आणि आईनस्टाईन यांचे सूत्र सिद्ध झाले.

एक क्षणभर असा विचार करून पहा की प्रत्यक्ष आढळून आलेले वक्रीभवन आणि गणिताने मांडलेले वक्रीभवन जर अचूक जुळले नसते तर? तर आईनस्टाईन यांनी आपल्या संपूर्ण प्रतिपादनाचे पुनरावलोकन केले असते आणि आपले सूत्र सुधारून घेतले असते. म्हणजेच आपण सुरवातीला म्हटलेली निरीक्षण, निष्कर्ष, नियम आणि सिद्धांत ही भौतिक शास्त्रांची साखळी संपूर्ण नाही. प्रत्येक सिद्धांताचा पडताळा प्रत्यक्ष जगात पहावा लागतो आणि जिथे प्रत्यक्षातले निरीक्षण सिद्धांताशी जुळणार नाही तिथे सिद्धांताचा पुनर्विचार करून सिद्धांत सुधारावा लागतो. पृथ्वीकेंद्रित विश्वाच्या कल्पनेपासून सूर्यकेंद्रित विश्वाचा कल्पनेपर्यंत प्रवास करताना खगोलविज्ञानाने अनेक वेळा त्या वेळी अस्तित्वात असलेले सिद्धांत प्रत्यक्ष निरीक्षणांना अनुसरून सुधारून घेतले आहेत. इथे युक्तेश्वरगिरी महाराज तेच करताना दिसत आहेत. योगीजी या प्रकरणात थोडी अधिक माहिती पुरवताना लिहितात की हिंदू धर्मग्रंथांनुसार आपल्या ग्रहमालेची वयोमर्यादा ४३० कोटी वर्षांपेक्षा जास्त आहे तर अखिल विश्वाची वयोमर्यादा ३,१४,१५९ अब्ज वर्षांची आहे. या संख्या एका गणिताने काढलेल्या असून ते गणित वर्षाचा अवधी आणि ग्रीकमधली  पाय् ही संख्या यावर आधारले आहे. इथे उघडच दिसते की युक्तेश्वरगिरी यांचे संवत्सरचक्र आणि धर्मग्रंथांमधली गणिते यात फारच मोठा फरक आहे. परमहंसजींनी या फरकाचे कारण स्पष्टपणे दिलेले नाही किंवा त्याचे काही स्पष्टीकरणही दिलेले नाही. त्यामुळेच प्रामुख्याने इथे दोन शक्यता जाणवतात. एक म्हणजे हा विषय अद्याप क्रियायोग्यांच्या विचाराधीन आहे आणि हे गणित अधिकाधिक निर्दोष बनवण्याचे प्रयत्न अजूनही सुरु आहेत. यथाकाल जेव्हा हे गणित पूर्ण सुटले आहे असे वाटेल तेव्हा ते आपल्यासमोर ठेवले जाईल. दुसरी अशी शक्यताही आहे की विश्वाचा एकूण आयुर्मर्यादेत अनेक संवत्सरचक्रे होणार असतील आणि प्रत्येक चक्राचे विवक्षित नियत कार्य असेल. परंतू यापैकी कोणतीही शक्यता बरोबर असली तरी हा सारा विज्ञानाच्याच पद्धतीने सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न आहे हे अगदी स्पष्ट आहे. जे डोळ्यांसमोर दिसते आहे ते अंतिम आहे. आपले सिद्धांत जर त्याच्याशी विसंगत असतील तर अधिक खोलात जाऊन अभ्यास व्हायला हवा. या अभ्यासात कधी आपली निरीक्षणपद्धती अधिक निर्दोष बनेल आणि परिणामी आपली निरीक्षणे अधिक अचूक होतील. कधी आपले सिद्धांत सुधारावे लागतील आणि ते प्रत्यक्षाशी अधिक सुसंगत बनवावे लागतील. पण या सर्वाचा शेवट प्रत्यक्षातले सत्य आकलन करणे हाच असायला हवा हाच विज्ञानाचा आग्रह आहे. परमहंस योगानंदही इथे याच पद्धतीने काम करताना दिसतात. विज्ञान आणि क्रियायोग यांच्यातल्या भातृभावाशी परमहंस योगानंदजी किती घट्ट जोडलेले आहेत  हे इथे प्रत्ययाला येते.

गंधबाबांचे चमत्कार प्रदर्शन या ५व्या प्रकरणात परमहंसजी विज्ञानाला एका नव्या दिशेची दीक्षा देतात तीही वैज्ञानिक पद्धतीनेच. गंधबाबा एका वस्तूचे दुसऱ्या वस्तूमध्ये रूपांतर करू शकत असत किंवा हवेतून वस्तू निर्माण करू शकत असत. या सामर्थ्याचे रहस्य सांगताना ते म्हणतात, स्पर्श, रूप, चव, श्रवण व गंध या विषयींच्या ज्ञानेंद्रियांनी निर्माण केलेल्या सगळ्या प्रेरणा इलेक्ट्रॉन व प्रोटॉन यांच्या स्पंदनातील कमी जास्त फरकामुळे उत्पन्न झालेल्या असतात. हे स्पंदन पुनः प्राणा (lifetrons) करवी नियंत्रित केले जाते. Lifetrons किंवा प्राण म्हणजे सूक्ष्म जीवशक्ती किंवा अणुशक्तीहूनही सूक्ष्म अशी पाच विवक्षित संवेदनशील कल्पनावस्तूकरवी बुद्धिपूर्वक प्रेरित झालेली अशी उर्जा. गंधबाबा काही योगसाधनांच्या सामर्थ्याने ह्या प्राणशक्तीशी एकसुर, एकताल होऊन ह्या lifetronsच्या स्पंदनांच्या स्थितीत फरक घडवून आणीत व त्यांच्याकरवी आपल्याला पाहिजे ती वस्तू निर्माण करीत. ही lifetronsची कल्पना अद्याप विज्ञानाला परिचित नाही. जॉन डाल्टन आणि रुदरफोर्ड यांच्यापासून अणूच्या रचनेवर शास्त्रीय संशोधन होत आले आहे आणि विज्ञानाने अणू हा अभेद्य मानण्यापासून अणूच्या घटकांच्या घटकांचे घटक असतात इथपर्यंत मजल मारलेली आहे. परंतू प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन यांचे अणूच्या रचनेत एकत्र असतानाचे संबंध नेमके कसे असतात, त्यांच्या स्थानात किंवा त्यांच्या उर्जेच्या पातळीत होणारे फरक कसे होतात आणि त्याचे नियंत्रण करण्याची काही व्यवस्था अणूच्या अंतरंगात असते काय यावर अजून नक्की माहिती उपलब्ध नाही. योगानंदजींचे विवेचन वाचल्यानंतर एकीकडून या विषयात विज्ञानाला किती गोष्टी कळणे अजून बाकी आहे याचीही पुन्हा एकदा जाणीव होते आणि परमहंसजींच्या तर्कनिष्ठतेचेही दर्शन होते. पण गोष्टी एवढ्यावर थांबत नाहीत. सजीव आणि निर्जीव यांच्यातली सीमारेषा नेमकी कुठे आहे हा आजही विज्ञानाच्या क्षेत्रातला एक गूढ प्रश्न आहे. अजून तरी विज्ञानाला ही सीमारेषा ठरवता आलेली नाही. परमहंसजींनी या कोड्यात आणखी भर टाकली आहे. जर सर्वच अणूंमधल्या प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची स्पंदने आणि त्यांच्यामध्ये ओणारे फरक lifetronsद्वारे नियंत्रित होत असतील तर सजीव आणि निर्जीव यातला भेद जवळपास समाप्तच होऊन जातो. हे एक नवीन आव्हान विज्ञानासमोर योगीजींनी उभे केले आहे. आणि यासाठी त्यांनी वापरलेली विवेचनाची पद्धत पूर्णपणे वैज्ञानिकच आहे. सजीव आणि निर्जीव यांच्यातला फरक प्रत्यक्ष अनुभवाच्या पातळीवर दिसतो. त्याचे तात्विक पातळीवर स्पष्टीकरण कसे द्यावे हे ठरवणे हे आपल्या धाकट्या भावाला त्याच्याच पद्धती वापरून योगीजींनी दिलेले काम आहे.

हेच विज्ञानभ्रातृत्व योगीकथामृतात ठायीठायी प्रत्ययाला येते. ज्या १६व्या प्रकरणाचा वर उल्लेख केला आहे त्याच प्रकरणात फलज्योतिषाबद्दल विवेचन येते. फलज्योतिष्याचा हेतू आणि त्याच्या दिशेबद्दल हे विवेचन खूप काही सांगून जाते. स्वामी युक्तेश्वरगिरी यांचे या विषयावरचे प्रतिपादन परमहंसजींनी विस्ताराने दिले आहे. “दांभिक लोकांनी (या) प्राचीन ज्योतिष्यशास्त्राची मोठी विटंबना करून सोडली आहे” हे गुरुजींचे मत उधृत करून गुरुमत सांगताना स्वामीजी म्हणतात, “एखादे मूल त्याच दिवशी व वेळेला जन्माला येते ज्या वेळी आकाशस्थ प्रकाशकिरण त्याच्या वैयक्तिक गतकर्माशी गणितानुसार सुसंबद्ध असतात. त्याची कुंडली म्हणजे आव्हान देणारे एक चित्रच होय. त्या कुंडलीमध्ये ज्यात काही फरक होऊ शकत नाहीत असा त्याचा भूतकाळ दर्शविला जातो तसाच त्याचा संभाव्य भविष्यकाळही दर्शविला जातो. पण ही कुंडली फक्त अंतःस्फूर्तीची माणसेच बरोबर वर्तवू शकतात. अशी माणसे अर्थात फार थोडीच असतात....... जन्माच्या वेळी अंतरिक्षाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जो संदेश उजळपणे प्रकाशित केला जातो त्याचा हेतू त्याचे नशीब, त्याचे पूर्वार्जित पाप-पुण्य निश्चित करण्याचा नसून, त्याच्या इच्छाशक्तीस उद्दीपित करण्याचा असतो- की ज्या इच्छाशक्तीच्या जोरावर तो ह्या विश्वाच्या गुलामगिरीतून मुक्त होऊ शकतो. त्याने जे कर्म केले असेल ते त्याला नष्ट करता येते. ज्या कारणाचे परिणाम त्याला सध्याच्या आयुष्यात भोगावे लागतात, ती कारणे व तशी कार्ये त्याने स्वतःच करून ठेवलेली असतात, दुसऱ्या कोणी नव्हे. तो कोणतीही मर्यादा उल्लंघू शकतो. कारण ती मर्यादा आपल्या स्वतःच्या कर्माने प्रथम त्यानेच घातलेली असते आणि त्याच्या ठिकाणी अशी काही अध्यात्मिक साधनसामग्री असते की जी ग्रहांच्या शुभाशुभ दृष्टीला जुमानीत नाही. माणसाला ज्योतिषशास्त्राची त्याच्या भोळसरपणामुळे भीती वाटते आणि त्यामुळे तो एक निर्जीव यंत्रच बनतो व त्या यांत्रिक सहाय्यावरच गुलामासारखा सर्वस्वी अवलंबून राहतो. परंतू जो मनुष्य शहाणा आहे तो ह्या ग्रहांना जुमानीत नाही... आपल्या पूर्वकर्मांनी खचून जात नाही. तो आपली निष्ठा सृष्टीवरून काढून सृष्टीकर्त्याच्या ठायी अर्पण करतो..... तो ग्रहांवर व आपल्या पूर्वकर्मावर मात करू शकतो. परमात्वतत्वाशी सायुज्यतेचा जसाजसा अनुभव येत असतो तसतसा त्या सृष्ट पदार्थांचा वरचष्मा कमीकमी होत जातो. आत्मा हा सदैव मुक्तच असतो. त्याला मरण नाही. कारण त्याला जन्मही नाही. ग्रह त्याला आपल्या अधिकाराच्या चौकटीत बसवू शकत नाहीत.”

स्वामीजींना परंपरेने मिळालेले आणि त्यांना मान्य असलेले हे मत काही गोष्टी स्पष्ट करते. एक म्हणजे ज्योतिषशास्त्र हे रूढ भौतिक शास्त्रांच्या अर्थाने शास्त्र नाही. कर्म आणि त्याचे व्यक्तिनिरपेक्ष फळ हे नाते आजच्या भौतिक शास्त्रांच्या चौकटीत बसत नाही. आपल्यासाठी कर्म आणि फळ हे नाते सामाजिक आहे, शास्त्रीय नाही. त्यामुळे कर्मफलाची पद्धत प्रामुख्याने न्यायाच्या कल्पना आणि सुसंस्कृततेच्या कसोट्या या सामाजिक मूल्यांवर आधारलेली आहे. त्यामुळेच न्यायालयांचे ब्रीदवाक्य ‘दहा दोषी सुटले तरी चालेल पण एकाही निर्दोष्याला शिक्षा होता कामा नये’ असे असते. या पद्धतीने ईश्वरी न्यायालयाचे काम चालूच शकणार नाही. तिथे ब्रीदवाक्य ‘एकही दोषी सुटता कामा नये आणि एकाही निर्दोष्याला शिक्षा होता कामा नये’ हे असते. त्यामुळे कर्म हे स्वतःच फळ निर्माण करण्यास सक्षम असणे ही गरजेची गोष्ट आहे. कर्म आणि फळाचे हे नाते जोवर भौतिक शास्त्रांच्या आवाक्यात येत नाही तोवर भौतिक शास्त्रांच्या कसोट्यांवर ज्योतिष हे शास्त्र असल्याचे सिद्ध करणे अशक्य आहे.
दुसरी गोष्ट भविष्यकाळाबद्दल आहे. ज्योतिषशास्त्राने वर्तवलेला भविष्यकाळ हा फक्त एक संभावना असतो, ज्याला संख्याशास्त्रे ‘most likely scenario’ म्हणून ओळखतात तशा स्वरूपाची एक शक्यता. पण आपल्या इच्छाशक्तीच्या आणि प्रयत्नाच्या जोरावर तो बदलणे शक्य आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर कुंडलीने वर्तवलेले भविष्य हा त्या व्यक्तीसाठी घटनाप्रवाहाचा कमीतकमी विरोधाचा पट्टा असतो आणि हेच भविष्य हवे असेल तर त्याला ते तुलनेने सहज आणि कमी कष्टांत मिळणे शक्य असते. यापेक्षा वेगळे काही घडवायचे असेल तर मात्र मूळ घटनाप्रवाहाशी जितकी फारकत घ्यायची आहे, त्या प्रमाणात सशक्त इच्छाशक्ती आणि प्रयत्न यांची गरज असते. पण असे वेगळे भवितव्य घडवणे शक्य आहे. ज्योतिष हे दिशादर्शक शास्त्र आहे, घटनादर्शक नव्हे हे इथे स्पष्ट होते. अर्थातच कुंडलीच्या आधारे दिसणारे भविष्य अचूक सांगणे आणि त्याला आव्हान देऊन त्यावर मात करणे या दोन्ही गोष्टींना जबरदस्त मानसिक शक्ती लागते, हेही योगीजी स्पष्ट करतात.

तिसरी महत्वाची गोष्ट कर्तव्यांबद्दलची आहे. दुःख, दैन्य आणि कष्ट भोगत असलेली व्यक्ती तिच्या पूर्वकर्माचे फळ भोगीत असते हे जरी खरे असले तरी अशा व्यक्तीबाबत इतरांचे काय कर्तव्य आहे? अशा व्यक्तीचा पापी म्हणून तिरस्कार करणे प्रथमदर्शनी स्वाभाविक आणि सोपे दिसते खरे. पण असा तिरस्कार करणारे आपली निर्णयशक्ती तिरस्काराच्या दिशेने वापरीत असतात आणि कर्माच्या नियमानुसार पाप करीत असतात. ‘तिरस्कार पापाचा करावा, पाप्याचा नव्हे’ हेच सामाजिक व्यवहाराचे सूत्र असले पाहिजे असा सुस्पष्ट निष्कर्ष स्वामीजींच्या या विवेचनातून निघतो.

तर्कशुद्ध निष्कर्ष, शक्य असेल त्या प्रत्येक ठिकाणी भौतिकशास्त्रांना मार्गदर्शन आणि जिथे भौतिक शास्त्रांची आजची अवस्था क्रियायोगाच्या आकलनाला कोणत्याही कारणाने अपुरी पडत असेल तिथे आकलनाच्या दिशेचे सुस्पष्ट दिग्दर्शन हे स्वामीजींच्या निवेदनपद्धतीचे या पुस्तकात सर्वत्र आढळणारे विशेष आहेत.  १६व्या प्रकरणाचे उदाहरण हे दाखवण्यासाठी इथे विस्ताराने मांडलेच आहे. पण हे विशेष पुस्तकात असंख्य ठिकाणी दिसतात. कोबीच्या चोरीचे विज्ञान सांगणारे १५वे प्रकरण, क्रियायोगाचे शास्त्र समजावणारे २६वे प्रकरण, चमत्कारांचे नियम मांडणारे ३०वे प्रकरण, शिष्यांचे देहविकार गुरू कसे स्वीकारतात याचे तत्व विषद करणारे २१वे प्रकरण ही अशा पद्धतीची काही उदाहरणे आहेत. याखेरीज आज भौतिक शास्त्रांच्या कल्पनेच्याही बाहेर असणाऱ्या ‘परलोक’ या खास संपूर्ण भारतीय चिंतनाचा भाग असणाऱ्या संकल्पनेबद्दलही विवेचन इथे येते आणि गंधबाबांच्या चमत्कारी शक्तीबद्दल माहिती देतानाच अशा सिद्धींचे निरुपयोगित्वही इथे साफसूफ शब्दांत सांगितले जाते. ‘आज’बद्दल योगमार्ग मान्य करू इच्छिणाऱ्या सर्वाना एक निश्चित मार्गदर्शन आणि बाकीच्या सर्वानाही कोणत्याही मार्गाने गेले तरी उद्या इथेच पोचायचे आहे अशी एक स्पष्ट अध्याहृत जाणीव असे एक मोठे हृदयंगम चित्र या आत्मकथेच्या रूपात स्वामीजींनी इथे उभे केले आहे. ख्रिश्चन धर्मासकट सर्व धर्म एकाच सत्याच्या आकलनाचे वेगवेगळे प्रयत्न आहेत हेही स्वामीजी स्पष्ट करतात. अॅडम आणि ईव्ह यांच्या कथेमागचे रूपक उलगडून दाखवून स्वामीजी आकलनाची एक दिशाही मांडतात. हेच रूपक पुढे अधिक तपशीलवार स्वरूपात योगी अरविंदांनी मांडले. योगीकथामृतासोबत आपल्या प्रवासाची सुरवात करताना शिवमहिम्न स्तोत्राच्या ज्या ‘रुचीनाम् वैचिद्र्याद्रुजुकुटिलनानापथजुषाम् | नृणामेको गम्यस्त्वमसि पयसामर्णवव’ या निःसंदिघ्ध ग्वाहीचा आधार आपण घेतला आणि जी ग्वाही एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस विश्व सर्वधर्म संमेलनाच्या व्यासपीठावरून स्वामी विवेकानंदानी घोषित केली तीच ग्वाही सर्व भारतीय तत्वज्ञानाचा मूलाधार आहे हे इथे अधोरेखित होते.

१९५०च्या दशकाच्या सुरवातीपर्यंतचा काळ योगीकथामृतात परमहंसजींनी मांडला आहे. राजकीयदृष्ट्या भारत स्वतंत्र होण्याचा हा काळ होता. भारताच्या पुनरुत्थानातील स्वातंत्र्य ही एक महत्वाची उपलब्धी होती. ‘उद्धरेदात्मनात्मानम्’ हे ऋषीवचन प्रत्यक्ष आचरणात आणण्यासाठी स्वातंत्र्य हे आवश्यकच होते. पण अखेरीस हे स्वातंत्र्य उद्धारासाठी साधनरूप बनवण्याची जबाबदारी जशी राजकीय नेतृत्वावर होती तशीच लोकमानसाला वळण लावू इच्छिणाऱ्या नैतिक नेतृत्वावरही होती. इंग्रजांचे पाय आता उखडू लागले आहेत हे दिसू लागण्याच्या काळात एकदा योगी अरविंद म्हणाले होते, ‘स्वातंत्र्य हे आता रोखताच येणार नाही. ते निर्विवाद आहे. पण भारत आपल्या स्वातंत्र्याचा उपयोग कशा प्रकारे करणार हे ठरवण्याची ही वेळ आहे.’ परमहंसजींचे कार्यही याच काळात घडत होते. स्वातंत्र्याच्या सुरवातीला अशा नैतिकतेचा मानदंड ठरणाऱ्या महापुरुषांचे कार्य देशाच्या पायाभरणीत सामावले जावे ही ईश्वरी योजनाच होती असे दिसते आणि या दर्शनाने आपलेही मन भरून येते. पुस्तकाचा समारोप करताना परमहंस योगानंद लिहितात, “मी पुष्कळदा कृतज्ञ बुद्धीने विचार करू लागतो- परमेश्वरा, तू ह्या बैराग्याला केवढे मोठे कुटुंब दिले आहेस!” पुस्तक संपवताना परमहंसजींच्या या विशाल कुटुंबात आपल्यालाही परमेश्वराने सामावून घेतले याबद्दल कृतज्ञतेचे अश्रू आपल्यालाही अनावर झाले तर त्यात काय आश्चर्य?

योगीकथामृत या पुस्तकाचा परिचय 
अलौकिकाचे आत्मलेणे
(पूर्वार्ध)

आपण आणि आपल्या भोवतीचे हे अनंत विश्व हा अनादी कालापासून माणसाच्या अमर्याद कुतूहलाचा विषय राहिला आहे.  नजर पोचेल तिथपर्यंत सोबत करणाऱ्या या विश्वासोबतचे नाते माणसाला खोलवर जाणवते. त्यामुळे माणसाने डोळे उघडून आजूबाजूला नजर टाकली त्याच क्षणापासून हे नाते जन्माला आले आणि मग दिवसेंदिवस वाढतच गेले. या कुतूहलाने जेव्हा बाहेरची दिशा घेतली तेव्हा निरीक्षण, निष्कर्ष, नियम आणि सिद्धांत अशा साखळीने आणि त्याद्वारे भौतिक शास्त्रांनी जन्म घेतला. पण याच कुतूहलाने जेव्हा अंतरंगाची दिशा धरली तेव्हा त्यातून तत्वज्ञान आणि धर्म जन्माला आले. अर्थातच कुतूहल जितके सार्वत्रिक आहे तितकाच तत्वविचारही सार्वत्रिक आहे. जुन्या जगात माणसामाणसातला संपर्क फारसा नव्हता आणि जगाबद्दलची माहितीही मर्यादित होती. त्यामुळे अनेक ठिकाणी आपापल्या पद्धतीने माणसांनी धर्म आणि त्यांचे तत्वज्ञान निर्माण केले आणि तरीही एकमेकांच्या विशेष संपर्काविना निर्माण झालेल्या या सगळ्या तत्वज्ञानांमध्ये काही बाबतीत तरी आश्चर्यजनक म्हणावे असे साम्य आहे.
जी गोष्ट सर्व जगाबद्दल खरी आहे ती भारताबद्दल खरी नसण्याचे काही कारण नाही. इथेही एक तत्वज्ञान आणि धर्म जन्माला आला. पण एका बाबतीत भारताची निर्मिती असलेला हा वैदिक धर्म सगळ्या जगापेक्षा वेगळा ठरला. आणि ती जागतिक तत्वज्ञानांच्या मांदियाळीत अलौकिक असणारी गोष्ट म्हणजे म्हणजे अद्वैत तत्वज्ञान. अद्वैत ही खास भारताचीच निर्मिती आहे. अन्यत्र कोणाही तत्वज्ञ-विचारवंताची झेप इथपर्यंत पोचलेली दिसत नाही. सारे विश्व ही एकाच तत्वाची वैविध्याने नटलेली रूपे आहेत ही भूमिका तत्वज्ञानांच्या जगात अद्वितीय आहे. वैविध्य हे अरूपाचे रूप धारण करण्याचे सूत्र मानल्यामुळे त्याचा नैसर्गिक परिणाम ‘रुचीनाम् वैचिद्र्याद्रुजुकुटिलनानापथजुषाम् | नृणामेको गम्यस्त्वमसि पयसामर्णवव’ ही भूमिका निर्माण होण्यात होतो.

विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापासून पौर्वात्य आणि त्यातही मुख्यतः भारतीय तत्वज्ञानाबद्दल बाहेरच्या जगात जे अनिवार कुतूहल निर्माण झाले त्याचे प्रमुख कारणही हे अद्वैत तत्वज्ञान हेच आहे. सर्वसामान्य लोक, त्यांच्या आशाआकांक्षा आणि त्यांच्या कल्याणासाठी चालणारे राज्य हाच समाजकारण-राजकारणांचा मूलाधार आहे आणि या लोकांच्यासाठी चालवल्या जाणाऱ्या राज्यावर लोकांचा अंकुश असणेही योग्य आहे या भूमिकेतून जगात लोकशाहीचा उदय झाला. समाज विविधतेने शोभतो. उलट शासनव्यवस्था नैसर्गिकपणे प्रमाणीकरणाकडे (standardisation कडे) झुकते. वरपांगी परस्परविरोधी दिसणाऱ्या या दोन गोष्टींचा मेळ घालणे हा लोकशाहीचा गाभा आहे. त्यामुळे विविधतेचा आदर लोकशाही व्यवस्थेचा एक अविभाज्य घटक ठरतो. आधुनिक लोकशाहीच्या या वैशिष्ट्याशी सुसंगत असणारे तत्वज्ञान म्हणून पाश्चात्य समाज प्रथमतः अद्वैत तत्वज्ञानाकडे आकर्षित झाला. परिणामतः अनेक भारतीय योगी आणि साधक पाश्चात्य समाजाला अद्वैताचा मार्ग दाखवायला उद्युक्त झाले. अशा योगी-साधकांचे मुकुटमणी म्हणजे परमहंस योगानंद. ‘Autobiography of a Yogi’ हे त्यांचे आत्मचरित्र हा अनेक अर्थांनी एक अद्वितीय ग्रंथ आहे. याच आत्मनिवेदनाचा श्री. ग. नी. पुरंदरे यांनी केलेला मराठी अनुवाद म्हणजे आज आपल्या समोर असणारा ‘योगीकथामृत’ हा ग्रंथ.

या पुस्तकाचे अद्वितीयत्व अनेक क्षेत्रांमध्ये निर्विवाद प्रस्थापित झालेले आहे. जगातल्या ३५ पेक्षा जास्त भाषांमध्ये हा ग्रंथ अनुवादित झाला आहे. जगातल्या सर्वाधिक विक्री झालेल्या आत्मचरित्रांमध्ये याची गणना होते. मराठीतसुद्धा ‘योगीकथामृत’ हा सर्वाधिक खपाच्या ग्रंथांमध्ये समाविष्ट आहे. पाश्चात्य जगात आध्यात्मिक क्रांतीची लाट आणणारा म्हणून हा ग्रंथ ओळखला जातो. विसाव्या शतकातल्या १०० सर्वोत्कृष्ट आत्मकथनांमध्ये या पुस्तकाचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. पुस्तकाच्या छापलेल्या प्रतीवर अनुवादकाचे नाव सहसा सापडत नाही. मराठी पुस्तकक्षेत्रात गुलबकावलीच्या फ़ुलाइतकीच दुर्मिळ असणारी अकारविल्हे सूची या ग्रंथात पहिल्यापासून समाविष्ट आहे आणि ७०० पेक्षा जास्त पाने असलेले हे पुस्तक आजही १५० रुपयांच्या आसपास उपलब्ध आहे. पुस्तकाच्या बाह्य रूपातच इतके अद्वितीयत्व आहे.

पण या पुस्तकाचे खरे सामर्थ्य त्याच्या रचनेत आहे आणि तिथेच त्याचे खास स्वतःचे उठून दिसणारे अस्सल अद्वितीयत्व आहे. सहसा आत्मचरित्रांमध्ये न दिसणारी अशी या पुस्तकाची दोन महत्वाची शक्तिस्थाने आहेत. आपण त्यांचा क्रमाने परिचय करून घेण्यासाठी, प्रथम त्यापैकी योगीजींच्या आयुष्यक्रमाकडे एक नजर टाकू.

परमहंस योगानंद हे जन्माने मुकुंदलाल घोष. वडिलांचे ते चौथे अपत्य आणि द्वितीय पुत्र. या मुकुंदलाल घोष अवस्थेपासून परमहंस योगानंद या अवस्थेपर्यंतचा सारा प्रवास या पुस्तकात स्वामीजींनी रेखाटला आहे. हा प्रवास जितका रसाळ तितकाच थक्क करणारा आहे. आश्चर्याचा पहिला धक्का पुस्तकाच्या पहिल्याच पानात बसतो. स्वामीजी लिहितात, “माझ्या अगदी लहानपणच्या आठवणी म्हणजे माझ्या पूर्वजन्मीच्या, सध्याच्या कालमानास न जुळणाऱ्या अशा गूढ स्मृती. एका पूर्वजन्मी हिमालयाच्या हिमप्रदेशात योगी म्हणून मी जीवन व्यतीत करीत होतो, हे मला अगदी स्पष्ट आठवते. भूतकाळाच्या त्या अवशिष्ट स्मृतींनी जणू एखाद्या अक्षहीन-अदृश्य सूत्राने करावे तशी मला भविष्यकाळाची कल्पना करून दिली.” आपल्यासारख्या सामान्य वाचकांना हे कल्पनेपलीकडचे ठरते. जन्मोजन्मी काम करणारे एकच एक सूत्र ही कल्पना भारतीय मनात नित्य असते. परंतू आपल्यादृष्टीने ती माहीती असते, अनुभूती नव्हे. पण इथे काही वेगळेच आहे. आणि या पुस्तकाच्या वेगळेपणाची ही तर फक्त सुरवात आहे.

स्वामीजींचे निवेदन पुढे चालूच रहाते. “शैशवकालीन असहाय्य, दीन अवस्थेचे प्रसंग मला अजून आठवतात. त्यावेळी मला धडपणे चालताही येत नसे आणि स्पष्टपणे बोलताही येत नसे याचा मला त्यावेळी फार खेद वाटे. माझ्या शारीरिक असमर्थतेबद्दल खंत वाटून मनामध्ये प्रार्थनारूपी भाव उचंबळून येत असत. माझ्या तीव्र मानसिक भावनेची अभिव्यक्ती नाना भाषांच्या शब्दात येत असे.’ मागच्या जन्मातल्या गोष्टी स्वामीजींना स्पष्ट आठवतात तर हे काही विशेष नाही हे आपल्यालाही कळते. पण इथे मिळणारा धक्का आश्चर्याचा नाही, चिंतनाचा आहे. योगीजी लिहितात, “.... बालमनाचा ठाव मोठ्या माणसांना घेता येत नाही. मुलांचे मन खेळणी व अंगठा चोखण्यातच आनंद मानून राहते असे ते समजतात.” स्वामीजींचे माता-पिता हेही अध्यात्मिक प्रकृतीचे लोक होते असे या आत्मचरित्रावरून आपल्याला समजते. पण आपल्या घरी एक असामान्य बालक जन्म घेणार आहे याची काही कल्पना त्यांना होती काय हे कुठे स्पष्ट झालेले नाही. एकूण आत्मचरित्राचा  सूर अशी काही निश्चित कल्पना योगीजींच्या जन्माआधी त्यांना नव्हती असाच आहे. (स्वामीजींच्या जन्मानंतर लाहिरी महाशयांनी ‘तुझा मुलगा योगी होईल’ असे स्वामीजींच्या आईला सांगितले होते. हेच भविष्य इतरही अनेक लोकांनी नंतर स्वामीजींच्या आईला पुन्हा पुन्हा सांगितले.) आपल्या पालकत्वाला मिळालेला हा एक धडाच आहे. मुलांना समजून घेण्यासाठी थोडे अधिक प्रयत्न, सद्भावना, विचार आणि औदार्य वापरणे आवश्यक आहे हा इथे आपला धडा आहे. स्वतःच्या ज्ञानी असण्यावरचा आपला विश्वास जरासा अनाठायी तर नाही ना यावर पालक म्हणून आपण काही चिंतन केले तर बरे पडेल असा इशारा स्वामीजी इथे आपल्याला देतात.

स्वामीजींनी आपल्या आयुष्याचा जो प्रवास इथे मांडला आहे त्याचे स्वरूप कसे आहे याची कल्पना या सुरवातीपासूनच आपल्याला यायला लागते आणि पुस्तक वाचून संपेपर्यंत कुठेही अपेक्षाभंग होत नाही. आपल्या योगी म्हणून व्यतीत केलेल्या पूर्वजन्माच्या आठवणी ज्याच्या मनात जाग्या आहेत असा बालक हेच योगीजींचे स्वरूप पुस्तकभर आपल्यासमोर येत राहते. (स्वामीजींचा जन्म योगी आदित्यनाथांची कर्मभूमी असलेल्या गोरखपूरचा. हे आपले सहज आठवले म्हणून लिहिले.) उच्चपदस्थ, अधिकारी, बुद्धिवादी, घरंदाज आणि सामान्यतः शांत वडील आणि धार्मिक, श्रद्धाळू आणि प्रेमळ आई या वातावरणात त्यांचे बालपण गेले. या सर्व काळात आईवडिलांच्यातल्या निव्वळ मतभेदाचाही  फक्त एकच प्रसंग आपल्याला पहायला मिळाला असे योगीजींनी नमूद केले आहे. लग्नानंतर लवकरच योगीजींच्या आईवडीलांनी वाराणसीच्या लाहिरी महाशयांचे शिष्यत्व स्वीकारले. त्यामुळे भौतिक फायद्याकडे आणि शारीरिक आरामाकडे फारशी दृष्टी नसणे आणि त्याऐवजी आपल्या अंतरंग उन्नतीकडे सतत लक्ष पुरवणे हे त्या दोघांच्याही अंगवळणी पडले होते. योगीजींच्याही मनावरही तोच संस्कार होत गेला. आणि विचक्षण कुतूहल ही तर योगीजींची मूळप्रवृत्तीच होती. या दोन्हींच्या संगमामुळे पूर्वजन्माच्या स्मृतींनी घातलेला अध्यात्मिक पाया वेगाने बळकट होत गेला आणि मुकुंदाचा प्रवास झपाट्याने योगाच्या दिशेने होत गेला.

योगीजींच्या या प्रवासाचे रूप ही आत्मकथा वाचताना आपल्या डोळ्यांसमोर अनेक प्रकारे उलगडत जाते. अगदी बालवयातच आईवडिलांचे गुरु असलेले श्री श्यामाचरण लाहिरी उर्फ लाहिरी महाशय आपल्या तसबिरीतून बाहेर येऊन समोर बसले आहेत असे त्याना दिसे. या दर्शनामुळे ते शरीराने जिवंत राहिले नसल्याचा जो शोक सुरवातीला वाटत असे, तो हळूहळू नाहीसा झाला. बालपणीच हिमालयात तपाचरण करणाऱ्या योग्यांचे मानसिक दर्शन त्यांना झाले. अध्यात्मिक शक्तीसंपन्न व्यक्तीचे शब्द हे केवढे ताकदवान शस्त्र असतात आणि प्रार्थनेत किती सामर्थ्य असते हे त्यांना अनुभवता आले. भौतिक जन्माआधीच निश्चित झालेली त्यांच्या आयुष्याची दिशा स्वामीजींना सुलभपणे घेता यावी म्हणून वेळोवेळी दैवी हस्तक्षेपही झाला. अर्थात स्वामीजींच्या मनाची ओढही पारलौकिक आणि अलौकिक गोष्टींकडेच होती. घर सोडण्याचे प्रयत्न त्यांनी अनेक वेळा केले. ते शक्य झाले नाही हे वेगळे. पण भौतिक जड सृष्टीपलीकडचे जग वेळोवेळी त्यांच्या नजरेसमोर येतच राहिले. दोन देह धारण करणारे संत प्रणवानंद, लाहिरी महाशयांनी ज्यांच्यासाठी ‘ऋषी’ असे संबोधन वापरले ते संस्कृतपंडित स्वामी केवलानंद, ईश्वराच्या शक्ती लोकांच्या निदर्शनाला आणून देण्यासाठी काही विशिष्ट प्रकारचे चमत्कार दाखवणारे गंधबाबा, भौतिक शक्तींच्या मर्यादा एका आश्चर्यजनक पद्धतीने समजून गेलेले व्याघ्रबाबा, हवेत तरंगू शकणारे भादुरी महाशय अशा अनेक सिद्धपुरुषांनी जो ठसा त्यांच्या मनावर उमटवला तो कधीच न पुसला जाणारा होता. सर्वसामान्य जीवनाच्या भौतिक मर्यादा तोडून पलीकडे निघून जाण्याच्या पद्धतींबद्दल स्वामीजींना वाटणारे कुतूहलच त्यांच्या जीवाला ओढ लावीत होते.

परमहंसजींच्या तोपर्यंत थोड्याशा विस्कळित असलेल्या या आयुष्याला एक निर्णायक वळण लागले ते त्यांचे सद्गुरू श्री युक्तेश्वरगिरी यांच्याशी झालेल्या भेटीमुळे. पण त्या भेटीची जणू थोडी पूर्वतयारी म्हणून माध्यमिक शिक्षण संपवल्यावर स्वामीजी काही काळ वाराणसीला श्री भारत धर्म महामंडळ आश्रमात राहिले. अन्य कोणत्याही गोष्टीपेक्षा ईश्वरावरची श्रद्द्धा हीच महत्वाची आहे हा धडा इथे त्यांच्याकडून घटवून घेतला गेला आणि मगच त्यांना त्यांचे गुरु युक्तेश्वरगिरी महाराज यांच्या स्वाधीन केले गेले. ‘आयुष्यातील अत्युत्तम काळ’ अशा शब्दात ज्याचे स्वामीजींनी वर्णन केले तो दहा वर्षांचा काळ सेरामपुरच्या स्वामी युक्तेश्वर गिरी महाराज यांच्या आश्रमात त्यांनी घालवला. इथेच ते परमहंसत्वाला पोचले.

आश्रमातल्या वास्तव्याच्या पहिल्याच दिवशी आपले गुरुजी हे लाहिरी महाशयांचेच शिष्य आहेत हे समजल्यानंतर स्वामीजींची प्रतिक्रिया ईश्वराच्या या योजकतेपुढे नतमस्तक होणे हीच असावी यात काहीच आश्चर्य नाही. मुख्यतः आत्मिक आणि त्याला आवश्यक असेल तेवढ्या प्रमाणात भौतिक-शारीरिक अशी त्यांची सर्वंकष जडणघडण गुरुसान्निध्यात झाली. गुरुजींचा उपदेश, त्यांच्याबरोबरच्या चर्चा, वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आणि अशा साऱ्या गोष्टींना आधारभूत असणारी क्रियायोगाची साधना यांचा मिलाफाने स्वामीजींचे व्यक्तिमत्व घडत गेले. अमेरिकेत क्रियायोगाचा प्रसार करणे हे आपल्या आयुष्याचे कार्यही इथेच त्यांना गवसले. पतंजलीच्या योग तत्वज्ञानाचे अंतरंग गुरुंच्या द्वारे त्यांना उलगडत गेले आणि कार्य आणि कारण यांचा अध्यात्मिक पातळीवरचा संबंधही स्पष्ट होत गेला. सांघिक जबाबदारीने अध्यात्मिक कार्य करण्याचे प्रशिक्षणही गुरुजींनी त्यांना दिले. व्यक्तिगत आवडीनिवडी आणि मूल्यांचे शिक्षण यांच्यातला फरक जाणण्याची सूक्ष्म अंतर्दृष्टी विकसित झाली. गुरुशारण्य आणि गुरुकृपा यांचे सूक्ष्म धागेदोरे समजून आले.एका समर्पित कळीचा विकास होऊन तिचे सर्व विश्व सुगंधित करू शकणाऱ्या फुलात परिवर्तन झाले.

स्वामी योगानंदांच्या गाढ गुरुभक्तीचा प्रत्यय या पुस्तकातल्या जवळपास १६२ पानांच्या सेरामपुर आश्रमातले दिवस वर्णन करणाऱ्या भागात वारंवार येतो. पण सद्गुरूंनी दिलेला समाधीचा दिव्य अनुभव वर्णन करणारे १४वे प्रकरण हा त्याचा, किंबहुना या पुस्तकाचाच, कळसाध्याय म्हणावा लागेल. (एक आश्चर्यकारक योगायोग म्हणजे गुरुभक्तीचे सारभूत तत्व अशा सरस्वती गंगाधर विरचित गुरुचरित्रातही १४वा अध्याय हाच संपूर्ण ग्रंथाचा मेरुमणी मानला जातो.) चराचर सृष्टीच्या पूर्णस्वरूपाशी तादात्म्य हे योगसाधनेचे उद्दिष्ट असते. निर्विकल्प समाधी मिळाल्यानंतर साधकाला आणखी मिळवण्यासारखे फारसे काही उरतच नाही. आणि तरीही कर्मक्षय हे काम शिल्लक रहातेच. त्यासाठी कर्तव्यकर्म चालूच राहावे लागते. स्वामीजी लिहितात. ‘ते (युक्तेश्वर) मला संथपणे म्हणाले, “ह्या परमानंदामुळे तू बेहोष होऊन जाऊ नकोस. तुला ह्या जगात अजूनही पुष्कळ काम करायचे आहे.” विसाव्या शतकातल्या भारताच्या पुनरूत्थानाचे अग्रदूत स्वामी विवेकानंद यांना त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांनी केलेल्या उपदेशाची आठवण येणे इथे अपरिहार्यच आहे. पण आपला विचार इथे थांबत नाही. एक विस्मयकारक आणि तितकीच रोमहर्षक गोष्ट इथे आपल्या नजरेसमोर उलगडते आहे. भौतिक विद्यांच्या अभावी पराजित आणि पतित झालेल्या भारताच्या पुनरुत्थानाची सुरवात विसाव्या शतकात झाली. या पुनरुत्थानाचे नेतृत्व बंगाल आणि महाराष्ट्राने केले हा आता सर्वज्ञात असलेला इतिहास आहे. पुनरुत्थानाच्या सुरवातीच्या काळाचे आपल्याला दिसणारे चित्र काय आहे? महर्षी रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद या गुरुशिष्यांच्या जोडगोळीने याचा पाया घातला. स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली आणि अध्यात्माचा सामाजिक आशय आघाडीवर आणला. त्यांचा जन्म १८६३चा, तर परमहंस योगानंदांचा जन्म १८९३चा. स्वामीजींचे अवतारकार्य दक्षिणेश्वरपासून सुरू झाले तर परमहंसजींचे सेरामपूर इथून. एक क्षणभर आपली नेहमीची पुराव्यांचा शोध घेणारी तार्किकता थोडी मागे ढकलली तर स्पष्टपणे वाटू लागते की अत्यंत योजनापूर्वक कुणीतरी विसाव्या शतकातल्या भारतीय पुनरुत्थानाच्या नैतिक बाजूचे नेतृत्व बंगालकडे सोपवले होते आणि महायोगी अरविंदांच्या माध्यमातून तिचा सांधा भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामाशी अगदी घट्टपणे जोडला होता. प्रकांड शक्तीचा हा दिव्य वारसा योगानंदजींनी लीलया पेलला.

या आत्मचरित्रात योगीजींनी आपल्या समोर ठेवलेल्या सर्व तपशीलांवर आपण इथे चर्चा करू शकणार नाही. पण महावतार बाबाजी आणि त्यांनी पुनःप्रवर्तित केलेली परंपरा यावर काही न लिहिणे हा ‘योगीकथामृता’वरही अन्याय ठरेल आणि योगाच्या महान परंपरेवरही. महावतार बाबाजी क्रियायोग परंपरेचा तर आत्माच आहेत. पण दत्तात्रेय परंपरेत त्यांचा सर्वत्र संचार आहे आणि दत्त परंपरेचे साधक असलेल्या सर्वांशी कुठे ना कुठे त्यांचा संबंध असतोच असे दिसते. कोल्हापूरचे कृष्ण सरस्वती दत्त स्वामी महाराज, पुण्याचे श्री गुळवणी महाराज, दिव्यस्पर्शी साधक डॉ. राम भोसले यांच्या परंपरेत बाबाजींना दत्तगुरुंप्रमाणेच स्मर्तृगामी मानले जाते. बाबाजींचे दर्शन झालेल्या सर्वांचे काही तपशिलांवर एकमत आहे. ते २५-३० वर्षे वयाच्या तरुणासारखे दिसतात आणि काही विशिष्ट कामासाठी देह टिकवून आहेत, महावतार या स्थानी ते एकमेव आहेत अशासारख्या गोष्टी यात येतात. त्यांच्या कामाचे स्वरूप आणि पद्धती समजणे योग्यांनाही कठीण असल्याचे मानले जाते. महावतार बाबाजी हेच मुनी मतंग आहेत असाही एक विचारप्रवाह आहे. महाराष्ट्रातली दत्त परंपरा मुख्यतः शक्तिपात दीक्षेच्या मार्गाने कार्य करते. ही शक्तिपात दीक्षा किमान ७२ वेगवेगळ्या प्रकारांनी देता येते असे सांगितले जाते. क्रियायोगाच्या तुलनेत शक्तिपात ही अधिक सोपी आणि सुरक्षित साधनापद्धती असल्याचेही जाणकार सांगतात. पण क्रियायोग आणि शक्तिपात यांच्याव्यतिरिक्त शक्तीचे संक्रमण घडवण्याच्या आणखी ७ पद्धती आहेत आणि महावतार बाबाजी या सर्व ९ पद्धतींमध्ये तज्ज्ञ आहेत असे सर्वच दत्त सांप्रदायिक मान्य करतात. आपल्यासारख्या आयुष्यात नजरेच्याही पलीकडे असणाऱ्या या महात्म्यापुढे अचंब्याने नतमस्तक होण्यापलीकडे आपण काय करणार?

सद्गुरूंची शिकवण आणि आयुष्यातल्या असंख्य अनुभवांचा पेटारा यातली निवडक रत्ने वेचून स्वामीजींनी योगीकथामृतात मांडली आहेत. रंजकतेचे भान ठेवून स्वामीजींनीही इथे अनुभवांचे शक्य तितके वैविध्य राखण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या डोळ्यांनी स्वामी श्री. युक्तेश्वरांचे सामर्थ्य पाहूनही वागण्यात तोल न राखता आलेला शशी, आपल्या ज्ञानावर वाजवीपेक्षा जास्त विश्वास असणारा पशुडॉक्टर, अपघाताने सिद्धी मिळालेला आणि त्यांचा दुरुपयोग करून नंतर पश्चात्ताप करणारा अफझल, साध्या संसारी माणसांमधून परिवर्तन होऊन साधकाच्या पातळीला पोचलेले स्वामीजींचे ताई-मेहुणे अशा अनेक पात्रांच्या आणि त्यांच्या आयुष्यातल्या प्रसंगांच्या कथा सांगत परमहंसजी वाचकाला रंगवीत आणि रंजवीत ठेवतात. नर्मविनोदाची पखरण करीत आणि प्रांजळपणे कथा सांगत स्वामीजी वाचकाला गुंतवतात. आपल्या बीए होण्याबद्दल स्वामीजींना कधीच खात्री नव्हती असे ते सांगतात.पण त्यांच्या गुरूंनी, युक्तेश्वरांनी त्यांना ‘एखादे वेळी सूर्य व चंद्र आकाशामधली आपली स्थाने बदलतील; पण तुला पदवी मिळणार नाही असे होणार नाही’ अशा शब्दांमध्ये आश्वासन दिले होते. जेव्हा स्वामीजी बीएची परीक्षा पास झाले तेव्हा गुरुजींनी ‘परमेश्वराला सूर्य व चंद्र यांची परस्परांची स्थाने बदलण्यापेक्षा तुला पदवीधर करून टाकणे अधिक सोयीचे वाटले, दुसरे काय?’ अशा शब्दात त्यांना, पुन्हा एकदा परमेश्वरी कृपाप्रसाद असे स्वरूप पदवीला देत, आशीर्वाद दिला. स्वामीजी हे सर्व अगदी रंगवून सांगतात.

स्वामीजींची ही पोतडी त्यांचे अनुभव आणि त्यातून क्षणाक्षणाने-कणाकणाने घडत गेलेले त्यांचे व्यक्तिमत्व तर आपल्यासमोर उलगडत नेतेच. पण त्यासोबतच अनेक अनुषंगिक विषयांना स्पर्श करीत आपल्यासमोर माहितीचा एक खजिनाही खुला करते. १५व्या प्रकरणात आश्रमातल्या एका भजन-नामसंकीर्तनाचा अनुभव सांगताना प्राचीन काळापासून चालत आलेल्या भारतीय शास्त्रीय संगीताबद्दल सामवेदापासूनची सविस्तर माहिती ते देतात. २४व्या प्रकरणात संन्यासाश्रम व्यवस्थेबद्दल अशीच विस्तृत सखोल माहिती येते. वाचक म्हणून स्वामीजींचे अनुभव जास्त चांगले समजून यायला त्यामुळे मदत होतेच. पण इथे-तिथे सहजपणे विखुरलेल्या छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये दडलेली काही वैशिष्ट्येही अशा  माहितीमुळे अधिक प्रकाशित होतात. एक छोटेसे उदाहरण द्यायचे तर जवळजवळ संपूर्ण पुस्तकभर अध्यात्मिक व्यवस्थेतल्या गुरु-शिष्य संबंधांबद्दल भाष्य येत रहाते. आधी वरती म्हटल्याप्रमाणे २४व्या प्रकरणात संन्यासाश्रम व्यवस्थेबद्दल माहिती येते. गुरुशिष्य ही याच अध्यात्मिक व्यवस्थेतली अतिशय मजबूत आणि महत्वपूर्ण व्यवस्था आहे हे आपल्या नजरेला येतेच. पण ४२व्या प्रकरणात आपल्या भौतिक व्यवस्थेपासूनचे तिचे वेगळेपण अगदी स्पष्ट होते. या प्रकरणात स्वामीजींनी आपल्याला ‘परमहंस’ ही पदवी मिळाल्याची हकीकत सांगितली आहे. परमहंसजी सांगतात की त्यांचे गुरुजी युक्तेश्वरगिरी यांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि संन्यासधर्माची आणखी वरची परमहंस ही पदवी दिली. ते म्हनाले, ‘तुझ्या पूर्वीच्या पदवीपेक्षा ही पदवी वरची आहे. पूर्वीची पदवी वापरण्याचे आता कारण नाही.’ गंमत म्हणजे स्वतः गुरुजी युक्तेश्वरजी या वेळीही गिरी याच श्रेणीत होते. अध्यात्मिक योग व्यवस्थेत गुरू हाच शिष्याचे सर्वस्व असतो. गुरू शिष्याला फक्त मार्गदर्शनच करतो असे नव्हे तर त्याची वेळोवेळी परीक्षाही करीत असतो आणि त्याचे स्थान ठरवीत असतो. तिथे महत्व गुरु या व्यक्तीला नव्हे तर गुरुतत्वाला असते. शिष्याला कोणते स्थान द्यायचे हे सर्वस्वी गुरूच ठरवतो आणि खऱ्या साधकाला या स्थान-मानाचे काही अपरूप नसते. योगानंदांचे गुरुजी त्यांच्या समोर होते आणि त्यामुळे त्यांना परमहंस ही पदवी देऊ शकत होते. पण युक्तेश्वरांचे गुरुजी लाहिरी महाशय देह सोडून गेले होते. त्यामुळे युक्तेश्वरांना वरची पदवी कोण देणार? पण या पदवी असण्या-नसण्याचे ना युक्तेश्वरांचे काही वाटले, ना योगानंदांना. गुरु ही व्यक्ती असते आणि ती शिष्याला परमपूजनीयही असते. पण गुरु या व्यक्तीच्या माध्यमातून एक तत्व कार्य करीत असते आणि हे व्यक्तीच्या लहानमोठेपणाचे नियम त्याला लागत नाहीत. तिथले नियम एका वेगळ्या पातळीवर आणि वेगळ्याच पद्धतीने काम करतात. ते जग आपल्या भौतिक जगापेक्षा सर्वस्वी वेगळे आहे. योगीकथामृत वाचताना हे अगदी ठसठशीतपणे आपल्या नजरेसमोर येते.

योगीकथामृत या पुस्तकाची दोन महत्वाची शक्तिस्थाने आहेत हे आपण सुरवातीला पाहिले. यापैकी ग्रंथकर्त्याचे जीवन आणि त्याचे पुस्तकातून होणारे दर्शन या शक्तीस्थानाचा सविस्तर परिचय आपण करून घेतला. एका योग्याचे जीवन सामान्य सांसारिक माणसापेक्षा निराळे असणार हे आपण गृहीत धरलेले असते. ते आपले गृहीतक बरोबरच होते याची खात्री या पुस्तकात स्वामीजींच्या जीवनाचे जे दर्शन आपल्याला होते, त्यावरून पटायला काहीच हरकत नाही. पूर्वजन्माच्या आठवणी, बालपणातल्या आवडीनिवडी, व्यक्तिगत स्वभाव या सर्वच अंगांनी परमहंसजींचे जीवन वेगळेपणाने उठून दिसते. व्यक्तिगत जीवनाची जी समाजमान्य चाकोरी आपण गृहीत धरलेली असते, ती उधळून लावतच स्वामीजींचे जीवन मार्गक्रमण करते. त्यामुळे स्वामीजी समाजात वेगळे दिसले तर त्यात काहीच आश्चर्य नाही. परंतू आपण योग्यांचे-साधकांचे एक चित्र आपल्या मनाशी गृहीत धरलेले असते. त्यात योगी म्हणजे समाजविन्मुख, जगाच्या कसल्याच भानगडींमध्ये रस नसलेला आणि सांसारिक गोष्टींपासून दूर असणाराच गृहीत धरलेला असतो. समर्थ रामदासांनी केलेला ‘शहाणे करून सोडावे, सकळ जन’ हा उपदेश फारसा मनावर न घेणारे हेच आपल्या मनातले त्यांचे चित्र असते. त्यामुळेच स्वामी विवेकानंदांसारखा अध्यात्माचा सामाजिक आशय प्राधान्याने आणि जोरकसपणे मांडणारा योगी हा एक अपूर्व योग आहे. परमहंस योगानंद हे तर स्वामी विवेकानंदांचे उत्तरकालीन वारस. त्यामुळे त्यांनी स्वामी विवेकानंदांचा वारसा आधीच पचवलेला होता. दुसरी गोष्ट म्हणजे स्वामी विवेकानंदांच्या कामाचा मुख्य भाग भारतातच झाला. परमहंसजींच्या कार्याचा मुख्य भाग अमेरिकेत घडला. त्यामुळे नव्या जगाचा वैचारिक वारसाही परमहंसजींना त्याच्या मूळ स्रोतापासूनच – अमेरिकेकडूनच - मिळाला होता. परिणामतः ते स्वामी विवेकानंदांच्याही एक पाऊल पुढे गेले आणि योगीकथामृतचे ते दुसरे शक्तिस्थान ठरले. उत्तरार्धात  त्याचाच सविस्तर परिचय आपल्याला करून घ्यायचा आहे.