Thursday 2 October 2014

खरा अजेंडा हिंदुत्वहाच!
Apr 15, 2014, 03.53AM IST

डॉ. भालचंद्र मुणगेकर, राज्यसभा खासदार
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आदेशानुसार भारतीय जनता पक्षाने नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केल्यानंतर ते संसदीय लोकशाही झुगारून अध्यक्षीय लोकशाहीचे संकेत असल्याचा ऊहापोह होत असला, तरी प्रत्यक्षात त्याचा प्रवास हुकूमशाही किंवा फॅसिझमकडे कसा वेगाने सुरू झाला आहे, त्याचा गंभीरपणे विचार व्हायला हवा...

मॅथ्यु एन. लीऑस या विचारवंताने फॅसिझमची सर्वसाधारपणे पुढीलप्रमाणे लक्षणं सांगितली आहेतः अति उजवी आर्थिक आणि सामाजिक-राजकीय विचारसरणी, राष्ट्राव्यतिरिक्त बाकी सर्व निष्ठा दुय्यम, राष्ट्राचा पुनर्जन्म किंवा पुनरुत्थान, समाजात एकजिनसीपणा निर्माण करण्यासाठी 'परक्या' सांस्कृतिक-वांशिक-धार्मिक समूहांचा निःपात, लोकांना भावनिक आवाहन करून उद्दीपित करणं, प्रत्येक बाबतीत फक्त आपणच लोकांची इच्छा व्यक्त करतो असा दावा, सर्वंकष सत्ता हातात केंन्द्रित झालेला एकच सर्वोच्च नेता, सगळ्या संघटनांच्या माध्यमाद्वारे सत्ता हस्तगत करणे, आवश्यक तेव्हा हिंसेचा अवलंब करणे आणि सर्व प्रकारचा विरोध दडपशाहीने/ हिंसेने मोडून काढणे अशी ती लक्षणं आहेत.

आज राष्ट्रवादाची मक्तेदारी सांगणाऱ्या रा. स्व. संघ परिवाराने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि गांधीजींच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला नाहीच, उलट हिंदू राष्ट्रवादाच्या संकुचित संकल्पनेने छेद देऊन सर्वसमावेशक 'भारतीय राष्ट्रवादाला' विरोधच केला. ज्यांनी गोळवलकरांची 'विधान' 'आम्ही किंवा आमची राष्ट्रवादाची कल्पना' आणि सावरकरांचे 'हिंदुत्व' ही पुस्तके वाचली असतील, त्यांना हिंदू राष्ट्रवादाची चार मुख्य लक्षणे ध्यानात येतील. त्यानुसार पहिले, भारत हे अनादी काळापासून हिंदूराष्ट्र म्हणून अस्तित्वात आहे. (प्रत्यक्षात राष्ट्र ही संकल्पना सतराव्या शतकात प्रथम युरोपमध्ये अस्तित्वत आली). दुसरे लक्षण, एकचालकानुवर्तित्व म्हणजे एका व्यक्तीच्या हातात सर्व प्रकारच्या सत्तेचे केंद्रीकरण करणे. तिसरे, संसदीय किंवा कोणत्याही प्रकारच्या लोकशाहीला आणि समाजवादी विचारसरणीला विरोध. चौथे, गोळवलकर आणि सावरकर या दोघांच्याही मते, व्यक्तीला राष्ट्रीयत्व प्राप्त करण्यासाठी मातृभूमीबरोबरच पितृभूमी आणि पूज्यभूमी असली पाहिजे. या शेवटच्या निकषानुसार संघ-सावरकरांच्या हिंदू राष्ट्रवादाच्या संकल्पनेत या देशातील मुस्लिम आणि ख्रिश्चन बसत नाहीत.

उदारमतवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाहीला सरळ छेद देणारा संघ परिवाराचा महत्वाचा प्रयोग म्हणजे १९८९चा रामजन्मभूमीचा वाद. लालकृष्ण अडवाणींनी आक्रमक हिंदुत्वाचा पुरस्कार करून राम जन्मभूमीचा प्रश्न उपस्थित केला. सर्वसामान्य हिंदूंच्या भावनेला हात घालून अयोध्येतील सुमारे ४५० वर्षांची जुनी बाबरी मशीद उध्वस्त केली गेली. ते व्यापक आणि सर्वसमावेशक भारतीय राष्ट्रवादाला दिलेले एक आव्हान होते आणि आहे. दुसरीकडे परिवाराने राम जन्मभूमी प्रकरणाला लोकशाही प्रक्रियेत बसवून लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. यातूनच १९९९ साली सत्ता आल्यानंतर आक्रमक हिंदू राष्ट्रवादाचे पुरस्कर्ते अडवाणी यांना तूर्तास बाजूला करून 'एनडीए'ची मोट बांधण्यासाठी अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारख्या सर्वमान्य नेत्याला पंतप्रधानपदी बसविले. कदाचित लोकशाही प्रक्रियेमध्ये आपली चौकट घट्ट करण्याची ही संधी मानून संघपरिवाराने आपले एक पाऊल मागे घेतले.

पुढे हिंदू राष्ट्रवादाची सैल झालेली पकड आणि सत्तेवरून पायउतार व्हावे लागण्याचा दुहेरी फटका संघाला बसला. २००४ ते २०१० पर्यंत भाजप आणि एकूणच संघपरिवार अंतर्मुख राहिला. मात्र याच वेळी गुजरातमध्ये मोदी नावाचे नवीन रसायन तयार होत होते. आपले राजकीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी मोदींमध्ये असल्याची गेल्या दहा-बारा वर्षांच्या काळात रा. स्व. संघाची खात्री पटत गेली. त्यामुळे अत्यंत जाणीवपूर्वक सर्व मार्गांनी संघाने मोदींचे देशव्यापी नेतृत्व उभे करण्याची मोहीम सुरू केली.

सर्वप्रथम मोदींचे प्रत्यक्षात नसलेले गुजरातचे आभासी 'विकासाचे मॉडेल' निर्माण करून मोदी म्हणजे 'विकास पुरुष' अशी प्रतिमा निर्माण केली. महाराष्ट्राप्रमाणे गुजरातला विकासाची प्रदीर्घ परंपरा असल्याचे ध्यानात घेतले, तर इतर काही मागासलेल्या राज्यांनी प्रतिकूल परिस्थितीत मोदींपेक्षा उत्तम कामगिरी केली आहे. मोदींच्या या तथाकथित विकासाच्या मॉडेलवर टीका झाल्यानंतर मोदी म्हणजे खंबीर आणि उत्तम प्रशासक असे चित्र उभे करून त्यांना 'छोटे सरदार' असे संबोधण्यात येऊ लागले आणि त्यांच्यासारख्या खंबीर प्रशासकाची देशाला गरज आहे अशी हवा पसरवली. त्यासाठी संघ परिवारातील सर्व संघटनांनी संबंध देशभरच नव्हे, तर जागतिक पातळीवर एक जबरदस्त नेटवर्किंग सुरू केले. या सर्व प्रक्रियेत कॉर्पोरेट सेक्टरमधील बड्या लोकांनी आणि सोशल मीडियाने फार मोठी भूमिका बजावली. आता देशाला फक्त मोदीच वाचवू शकतात असे वातावरण निर्माण करण्यात आले.

या पार्श्वभूमीवर भाजपअंतर्गत दुफळी असतानाही संघाच्या आदेशानुसार मोदींना प्रथम लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराचे प्रमुख आणि नंतर पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले. संघाच्या पाठिंब्याने मोदींनी सुरुवातीपासूनच अडवाणी, सुषमा स्वराज, जसवंत सिंग, यशवंत सिन्हा, मुरली मनोहर जोशी इ. राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांचे पद्धतशीरपणे खच्चीकरण केले.

गुजरातेत सत्तेवर आल्यापासून मोदी यांनी स्वतःचा एकछत्री अंमल प्रस्थापित केला आहे. २००२च्या गोध्रा जळीतकांडाचा तपास यंत्रणा, न्यायालये, राजकीय पक्ष, प्रसार माध्यमे व एकूणच जनतेमध्ये खूप ऊहापोह झाला, यापुढेही होत राहील. परंतु गुजरातेतील मुस्लिम हत्याकांडाची नैतिक जबाबदारी अगदी वाजपेयींसकट सामान्य जनतेने मोदींवरच टाकली आहे, ही वस्तुस्थिती आहे.

सहा महिन्यांपूर्वीपासून सर्वात अगोदर प्रचार सुरू करूनसुद्धा भाजपचा निवडणूक जाहीरनामा अजून प्रसिद्ध होऊ शकला नाही, याचे कारणही मोदीच होते. आत्ता तर 'तुमची मते थेट माझ्यापर्यंत पोहोचतील' असे देशातील मतदारांना आवाहन करून मोदींनी भाजपला पूर्णपणे गुंडाळून ठेवले. थोडक्यात, 'मी म्हणजे भाजप' अशी मोदींची भूमिका आहे. वरवर पाहता आर्थिक विकास, भ्रष्टाचार इ. मुद्दे मोदींच्या निवडणूक प्रचारात असले, तरी खरा अजेंडा 'हिंदुत्व' हाच आहे आणि मोदींचे सर्वंकष व एकमुखी नेतृत्व संघाला मान्य असण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे ते संघाच्या 'एकचालनुवर्तित्वा'शी सुसंगत आहे. मोदी यांनी गेल्या बारा वर्षांत गुजरातमध्ये आणि गेल्या सात महिन्यांत पक्षामध्ये जे वातावरण तयार केले आहे, ते वर सांगितलेल्या फॅसिझमच्या व्याख्येशी तंतोतंत जुळते. 'अब की बार, मोदी सरकार' या घोषणेमागे फॅसिझमचे हेच मॉडेल देशव्यापी करण्याचा रा.स्व. संघाचा मानस आहे, असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही.


अजेंडा- हिंदुत्वाचा आणि हिंदूविरोधाचा
गेल्या शतकात मराठीत दाजी पणशीकर यांनी महाभारत- एक सूडाचा प्रवास असे एक अतिशय विचारप्रवर्तक पुस्तक लिहिले. त्याची प्रस्तावना विख्यात आणि वंदनीय विचारवंत कै. प्रा. नरहर कुरूंदकर यांनी लिहिली आहे. प्रस्तावनेत त्यांनी दाजींच्या विचारांची, मांडणीची आणि मुळात महाभारताच्या संदर्भात या सर्व गोष्टी कशा दिसतात आणि कुठे बसतात याची जी चिकित्सा केली आहे, ती मुळातूनच वाचायला हवी. कुरूंदकर आपल्या विवेचनात लिहितात, परंपरेच्या विरोधकांची गोष्ट तर सोडूनच द्या. पण परंपरेचे समर्थकसुद्धा परंपरेच्या मूल्यांनुसारही जेव्हा परंपरेची चिकित्सा करायला बसतात तेव्हा कसा अनवस्था प्रसंग ओढवतो याचे हा ग्रंथ हे एक उत्तम उदाहरण आहे. आज ही गोष्ट आठवण्याचे कारण म्हणजे मटाच्या १५ एप्रिल २०१४ च्या अंकातला डॉ. भालचंद्र मुणगेकर यांचा खरा अजेंडा हिंदुत्व हाच हा लेख. रा. स्व. संघ, भाजप आणि श्री. नरेंद्र मोदी ही फासिस्ट, हुकुमशाही आणि परागतिशील विचारसरणी यांची प्रतीके आहेत असे पुरोगामी विचारवंत श्री. मुणगेकर यांना वाटत असेल तर त्यांनी तसे जरूर मानावे आणि त्यावर आपला दृढ विश्वास ठेवावा. पण तो विश्वास कसा तर्कशुद्ध आहे आणि पुराव्याने सिद्ध होऊ शकतो हे दाखवण्यासाठी लेख लिहिण्याच्या फंडात पडू नये. कारण मग आपणच बनवलेल्या तार्किक विचारांच्या जंजाळात फसण्याचा धोका आहे. मुणगेकरांच्या लेखात याचा जागोजागी प्रत्यय येतो.

मुळात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. कोणतेही निष्कर्ष तर्कशुद्ध केव्हा म्हणता येतील? जर समान पद्धतीने समान निकष लावून येणारे उत्तर हेच निष्कर्षाचा आधार असेल तेव्हाच ना? म्हणजे उदाहरणार्थ, समजा ने आणि ने एकाच क्षमतेचे रस्ते बांधायला वेगवेगळा काळ लावला आणि वेगवेगळा खर्च केला तर त्या रस्त्यांचा दर्जा तरी वेगवेगळा असला पाहिजे किंवा या कामात भ्रष्टाचार तरी झाला असला पाहिजे. आता आपण उपलब्ध सर्व निकष लावून सिद्ध करून दिले की दोन्ही रस्त्यांचा दर्जा एकसारखाच आहे, तर ज्याने जास्त खर्च दाखवला त्याने या कामात भ्रष्टाचार केला असे म्हणण्याचे धैर्य आपण दाखवले पाहिजे. निकष जे काही सांगतील ते मान्य करायची तयारी असेल तरच निकष लावण्याचा उपद्व्याप करण्यात अर्थ आहे. अन्यथा ते निकष कुणाला लावले आहेत यावरून जर निष्कर्ष काढायचे असतील, तर निकष लावण्याचे ढोंग तरी कशाला करायचे? आपले आधी ठरलेले निष्कर्ष ठोकून द्यावेत आणि मोकळे व्हावे.

आता थेट लेखाकडे वळायचे ठरले तर काय दिसते? काही अनंत काळापासून चालत आलेली असत्ये आणि मर्यादित सत्ये पुन्हा एकदा ठोकून दिली जात आहेत हे तर सुरवातीलाच दिसते. संघ परिवाराने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि गांधीजींच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला नाही हे असेच एक ठाशीव विधान. आजवर असंख्य लेखकांनी आणि चिकित्सकांनी पुन्हा पुन्हा दाखवून दिले आहे की हे विधान असत्य आहे. सत्य हे आहे की संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांनीच नव्हे तर इतरही अनेक स्वयंसेवकांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला. तो सहभाग संघाच्या नावावर नोंदला जावू शकत नाही कारण हे सर्व स्वयंसेवक त्या काळात काँग्रेस कार्यकर्ते या नात्याने लढ्यात भाग घेत होते. १९२५ मध्ये रा. स्व. संघाची स्थापना होईपर्यंत काँग्रेस आणि रा. स्व. संघ या दोन्ही ठिकाणी काम करणार्‍या कार्यकर्त्यांची संख्या हरो होती. फार कशाला कॉंग्रेस आणि हिंदुसभा यात काम करणाऱ्या सामाईक कार्यकर्त्यांची संख्याही शेकड्यात होती हे दाखवून देता येते. १९३० नंतर मात्र संघ कार्यकर्त्यांचा कॉंग्रेसमधला सहभाग आटत गेला हे सत्य आहे आणि त्याचे कारण डॉ. हेडगेवारांच्या मनात तात्कालिक उपाय विरुद्ध दीर्घकालीन आणि कायमस्वरूपी उपाय हे द्वंद्व उभे राहिले हेच आहे. आता अशा परिस्थितीत हाती होत्या तेवढ्या शक्तिनिशी का होईना, डॉक्टरांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घ्यायला पाहिजे होता असे म्हणणे शक्य आहे आणि असे कुणाचे मत असेल तर त्याच्यापुरते ते योग्य म्हणता येईल. पुरेशी शक्ती नसणे हे कारण राष्ट्रीय चळवळीत भाग न घेण्यासाठी योग्य आहे काय हा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे आणि तो रास्तही आहे. पण हा फक्त मतभेदांचा प्रश्न राहील. मूळच्या विधानातून जसे स्वातंत्र्यलढयाशी बेईमानी केल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न होतो तसा तो रहाणार नाही. पण प्रश्न तर तोच आहे ना! मुणगेकरांना काय साधायचे आहे? खर्‍या-खोट्याची चाड न बाळगता फक्त कुणाला तरी झोडपायचे आहे की खरोखर काही विचार मांडायचा आहे?

भारत हे अनादी काळापासून हिंदूराष्ट्र म्हणून अस्तित्वात आहे या विधानावरची टीकाही अशीच सत्याचा विपर्यास करून करण्यात आलेली आहे. राष्ट्र ही संकल्पना सतराव्या शतकात प्रथम युरोपमध्ये अस्तित्वात आली ही गोष्ट संघ परिवारासकट कुणीही नाकारत नाही. पण संघ परिवार राष्ट्र या कल्पनेचे दोन भाग मानतो. एक- इहलौकिक जीवनाला अग्रस्थान मिळाल्यानंतरच्या काळात मान्य झालेली भौतिक आणि आज राष्ट्र या शब्दाने बोधित होणारी संकल्पना. दुसरी- पारलौकिक आणि धार्मिक जीवनाला अग्रस्थान असलेल्या काळात एकत्वाची भावना जन्माला घालणारी अर्ध-धार्मिक आणि सांस्कृतिक राष्ट्रसंकल्पना. आता मुणगेकरांना ही दुसरी संकल्पना मान्य नसेल तर त्यांनी तसे म्हणावे हवे तर. पण सांस्कृतिक राष्ट्रवादाची कल्पना मला मान्य नाही हे म्हणणे निराळे आणि संघ परिवार अस्तित्वात नसलेल्या गोष्टी बोलत आहे हे म्हणणे निराळे. मुणगेकरांना जे मान्य नाही ते कुठे अस्तित्वातच नाही हा केवळ हट्टीपणा झाला. मुणगेकरांना काय हवे आहे?

आता मुणगेकरांच्या लेखातील मॅथ्यु एन. लीऑस या विचारवंताने सांगितलेल्या फॅसिझमच्या लक्षणांकडे वळले तर काय दिसते? अति उजवी आर्थिक आणि सामाजिक-राजकीय विचारसरणी हे पहिले लक्षणच घ्या ना. ही काय संघ परिवाराची मक्तेदारी आहे काय? मुळात अति उजवी आर्थिक विचारसरणी अशी काही गोष्ट आज अस्तित्वात तरी आहे काय? मार्क्सवादाच्या दबावा-प्रभावाखाली भांडवलशाही हीच मुळी आज मूळ अवस्थेत राहिलेली नाही. कल्याणकारी राज्याच्या संकल्पना, दर ठराविक काळाने सत्ता जनतेकडून मान्य करून घेणे (दुसर्‍या शब्दात म्हणजे निवडणूकप्रधान लोकशाही), निर्वाह भत्ता आणि जीवनावश्यक अन्न-पाणी-निवारा-औषधोपचार यांसारख्या गोष्टी सर्व नागरिकांना कोणत्या ना कोणत्या मार्गाने पुरवण्याचा प्रयत्न या सर्व गोष्टी म्हणजे मार्क्सवादी भाषेतल्या शोषणाचा विस्तार कमी करण्याचे प्रयत्न नाही आहेत काय? अति उजवी विचारसरणी सामाजिक असंतोष नियंत्रणाबाहेर जाऊ नये या कारणासाठी का होईना, पण आर्थिक विषमताही मर्यादेत राखण्यासाठी धडपडत आहेत. जागतिक भांडवलदारीची संरक्षक अमेरिका जगातlली सर्वात  मोठी सामाजिक सुरक्षितता योजना राबवते. तथाकथित अति-उजवी आर्थिक विचारसरणी राबवू पहाणारा एकतरी देश आज जगाच्या पाठीवर मुणगेकरांना दिसतो आहे काय? युरोप-अमेरिका तर सोडाच, पण अगदी आशिया-आफ्रिकेत तरी? अगदी हुतू, रवांडा आणि त्या जातकुळीतली काही नावे सोडली (तीही सोडायची ती अति-उजवे आहेत म्हणून नव्हे, तर विचारसरणी या गोष्टीपासूनच ते अति-दूर आहेत म्हणून) तर जगातले सर्व देश आज याच मार्गावर नाहीत काय? आणि अमेरिकेपासून झिम्बाब्वेपर्यन्तच्या संपूर्ण जगाची दिशा बदलण्याइतकी शक्ती संघ परिवारात आहे असे मुणगेकरांना म्हणायचे आहे काय? मुणगेकर कुणाला आणि काय सांगू पहात आहेत?

जी गोष्ट आर्थिक विचारसरणीची तीच सामाजिक-राजकीय विचारसरणीची. संघ परिवाराचा प्रत्येक सदस्य असामान्य आहे, सार्‍या जगाची दिशा बदलू शकत आणि पहात आहे, किमान जगातल्या या सर्व बदलांपासून स्वतःला संपूर्णपणे अलिप्त राखू शकत आहे, वातावरणाचे आणि जीवनशैलीचे काही संस्कार आजही त्याच्यावर आजीबात होत नाही आहेत असे मुणगेकर सुचवू पहात आहेत काय? आणि तसे आहे तर ती मोठीच मनोरंजक गोष्ट आहे. कारण सर्व डाव्या विचारसरणीचे पक्ष आणि त्यातले विचारवंत संघ परिवार मुस्लिम-ख्रिश्चन समाजाबद्दल असा विचार करतो अशी ओरड करीत असतात. मग संघ परिवार मुस्लिम-ख्रिश्चनांबद्दल जसा विचार करतो (आणि म्हणून तो प्रतिगामी आहे) अगदी तस्साच विचार संघ परिवाराबद्दल करणारे कोणत्या अर्थाने पुरोगामी आहेत? अधिक अ-व्यक्तीगत पद्धतीने सांगायचे तर अ ने ब बद्दल एका पद्धतीने विचार करणे हे जर प्रतिगामी आहे तर फ ने अ बद्दल तशाच पद्धतीने विचार करणे पुरोगामी कसे असू शकते? म्हणजे मुणगेकर स्वतःलाही भाजप- संघाच्याच जागी नेऊन बसवत आहेत आणि तेही संघ परिवाराच्याच माळेचे मणी आहेत काय?

एक मोठी गमतीची गोष्ट आहे. आपण आज कुणाला लोकांना भावनिक आवाहन करून उद्दीपित करणं, प्रत्येक बाबतीत फक्त आपणच लोकांची इच्छा व्यक्त करतो असा दावा, सर्वंकष सत्ता हातात केंन्द्रित झालेला एकच सर्वोच्च नेता याव्याख्येत बसणारा स्वातंत्र्योत्तर भारतातला एक नेता निवडायला सांगितला तर कोणते नाव फारसा विचार न करता चटकन पुढे येईल? बरोबर- इंदिरा गांधी. आता वर एकेरी अवतरणात दिलेली सर्व लक्षणे मुणगेकरांच्या फॅसिझमच्या लक्षणांमधूनच घेतली आहेत. राजीव गांधींनी इंदिरा हत्येनंतर शिखांच्या हत्याकांडाची जी संभावना केली तीही सर्वश्रुतच आहे. मग आता फॅसिझमकडे झुकणारा नेता कोण? ज्यांचे आयुष्य आप्लायासमोर आहे आणि ज्याला ही लक्षणे लागू पडतात त्या इंदिरा गांधी की ज्याच्याबद्दल मुणगेकरांना पुरावाहीन संशय आहे ते नरेंद्र मोदी? खरी पण सर्वच मुणगेकरांना न आवडणारी गोष्ट अशी आहे, कि समाजच मागास असतो तिथे समाजातूनच उभे राहिलेले नेतृत्व ही सर्व लक्षणे कमी-अधिक प्रमाणात दाखवतच असते. फरक प्रमाणाचा असतो, प्रकाराचा नव्हे. त्यामुळे असे शिक्के हातात धरून या नेतृत्वाकडे पहाताच येत नाही. पण मुणगेकरांना हे कोण आणि कसे समजावणार?


मुणगेकरांच्या या लेखाबद्दल एक गंमत करून पहाण्यासारखी आहे. या संपूर्ण लेखात नरेंद्र मोदी या नावाच्या जागी इंदिरा गांधी हे नाव घालायचे आणि मग इतर अनुषंगिक बदल करायचे (म्हणजे उदा. अडवानी याऐवजी निजलिंगप्पा हे नाव घालायचे असे.) आणि मग हा लेख पुन्हा संपूर्ण वाचायचा. लेख आतापेक्षा जास्त उचित, अचूक आणि पुराव्यावर आधारित वाटेल. सर्व मुद्दे जसेच्या तसे ठेवूनही. मुणगेकर स्वतःचे तर्कशास्त्र स्वतःच मारायला सज्ज झाल्यासारखे दिसताहेत असे त्यांच्या मूळ लेखाबद्दल माझे मत झाले हे आता पटायला हरकत नाही.

(श्री मुणगेकरांचा लेख एप्रिलमधला असताना त्याचा प्रतिवाद आता कशाला असा प्रश्न कदाचित मनात येईल. त्याचे उत्तर हे आहे  प्रतिवाद निवडणुकीच्या वातावरणात करण्याची  इच्छा नव्हतॆ.  प्रतिवाद मुद्द्यांच्या आधारे पाहिला जावा, प्रचाराच्या आधारे नव्हे हेच मला अभिप्रेत आहे.)

No comments:

Post a Comment