स्टेट बँक आणि जाहिरातीचे भारतीयत्व
आज फार काही लिहायचे नाही आहे. फक्त भारतीय स्टेट बँकेचे अभिनंदन करण्यासाठी हा छोटासा खटाटोप आहे. सध्या स्टेट बँकेची गृह कर्जाची जाहिरात सर्वच टीवी चनेलवर जोरदार झळकते आहे. त्यात खेळायला गेलेला मुलगा घरी जरा रागानेच परत येतो आणि खेळ झाला नाही कारण सर्व मित्र सुट्टी असल्याने बाहेर फिरायला गेले आहेत असे सांगतो. 'आपण कधी फिरायला जाणार' या त्याच्या प्रश्नाला त्याची बहीण 'मलाही जायचे आहे' असे म्हणत दुजोरा देते. त्यामुळे मग त्यांचे वडील 'आपणही जाऊ' असे आश्वासन देतात. मुलांचे या आश्वासनावर समाधान होते. पण त्यांची आई मात्र 'घर-कर्जाचा हप्ता दिल्यावर हाती काही राहते का' असा प्रश्न विचारते. त्याला बाबा उत्तर देतो कि 'मी आता आपले गृहकर्ज स्टेट बँकेत नेले आहे. त्यामुळे हप्ता कमी झाला आहे' ही खुशखबर ऐकल्यामुळे सर्वच जण फिरायला निघण्याची तयारी करायला सुरवात करतात, अशी ही जाहिरात आहे.
जाहिरातीचा मुद्दा बरोबर आहे हे सध्याच्या गृह कर्जाच्या बाजारावरून कळतेच आहे. पण स्टेट बँकेने ज्या कल्पकतेने या कुटुंबाचे भारतीयत्व जाहिरातीत सादर केले आहे ते अतिशय मनोरम आहे. कोणतीही अस्सल भारतीय पतिव्रता स्त्री नवरा काही बरोबर करू शकेल असे कधीच मानत नाही. त्यामुळे चारचौघात आणि त्यातही शक्यतो मुलं-बाळं समोर असताना आपल्या पती-परमेश्वराच्या अकलेचे वाभाडे काढण्याची कोणतीही संधी अशी आर्य पतिव्रता गमावणे कधीच शक्य नाही. या जाहिरातीतली महान पत्नीही याच सनातन नियमानुसार नवऱ्याला मुलांसमोरच 'तुम्ही खोटे आश्वासन का देताय' असा जाब विचारते. तिच्या या कृतीने सर्व आर्य संस्कृतीच्या पाईक भारतीय स्त्रियांची मान अभिमानाने आणि गौरवाने उंच झाली असणार यात काहीच संशय नाही. स्टेट बँकेच्या या जाहिरातीने भारतीय स्त्रियांच्या कर्तृत्वाचा झेंडा साऱ्या जगभर फडकला याचा आम्हाला आनंद आणि अभिमान वाटतो. म्हणूनच या जाहिरातीसाठी स्टेट बँकेचे हार्दिक अभिनंदन! (अर्थातच ही जाहिरात बनवणारे आणि ती स्वीकारणारे या सर्वांच्या कर्तृत्वाला सलाम!!!)
No comments:
Post a Comment