Tuesday, 23 July 2013

छत्रपती  शिवाजी  आणि  त्यांचे  गुरू
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवताच आहे. छत्रपती महाराष्ट्राचे आणि महाराष्ट्र छत्रपतींचा असे हे भक्कम अद्वैत आहे. त्यामुळे सामान्यपणे महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी हा वादविषय होऊच शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. पण बहुधा हीच गोष्ट कुठेतरी या सगळ्या विषयाला नजर लागायला कारणीभूत झाली असे दिसते. त्यामुळे 'छत्रपती नाहीत तर नाहीत, त्यांच्या गुरूंबद्दल भांडू' यावर एकमत झाले असावे अशा पद्धतीने वादंग सुरु झालेले दिसते. आजचे स्वार्थ आणि जातीय राजकारणाच्या गरजा यांच्यामुळे सुरु झालेले हे वादंग एकीकडून अस्थानी तर दुसरीकडून अडाणी आहे हे मात्र उघड दिसते आहे.

एक राजकारणी, एक राजा आणि एक नेता या सर्व अंगानी शिवाजी भोसले या पुरुषाचे मूल्यमापन अनेक जणांनी आपापल्या पद्धतीप्रमाणे आणि मगदुराप्रमाणे केले आहे. या सर्वांच्या प्रतिपादनात अनेक ठिकाणी वेगळेपणा आहे आणि अनेक तपशिलाच्या जागा प्रत्येकाने वेगवेगळ्या प्रकारे दिल्या आहेत. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेबद्दलचा प्रसंग घडला की नाही यावर दुमत आहे. शेलारमामा हा संपूर्णपणे काल्पनिक आहे यावर आता सामान्यपणे एकमत आहे. पण तरीही या मामाने मामा बनवलेले लोक अजूनही आहेत. अशा अनेक गोष्टींची एक जंत्री देता ये. पण प्रवृती म्हणून शिवाजी या व्यक्तीबद्दल मात्र फार मतभेद नाहीत ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी. वर दिलेले उदाहरणाच पुन्हा घ्यायचे तर कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेबद्दलचा प्रसंग घडला की नाही यावर दुमत आहे; पण असा प्रसंग छत्रपतीच्या आयुष्यात जर आला असता तर तो याच दिशेने गेला असता यावर सामान्यपणे एकमत आहे. असेच एकमत शिवाजी राजांचे कर्तृत्व युगप्रवर्तक होते याही गोष्टीवर आहे. शिवाजीवर अनेक इतिहासकारांनी आणि विचारवंत लेखकांनी लेहिले आहे आणि त्याच्या जीवनाचे अनेक पैलू उलगडून दाखवले आहेत. सर्व लेखकांची नावे देत बसता त्यातले महत्वाचे मुद्दे संक्षेपाने पाहता येतील. मुद्दाम ही गोष्ट पुन्हा सांगितली पाहिजे की या सर्व विवेचनात माझा वाटा अतिशय क्षुल्लक आहे. जागेच्या सोयीसाठी सर्व संदर्भ आणि नावे दिलेली नाहीत.

शिवाजीच्या आयुष्याचा अतिशय महत्वाचा घटक त्याचे नियोजन हा आहे. युद्ध, लूट, तह, स्वाऱ्या हे सारे तर नियोजनबद्ध आहेच आहे. पण बऱ्याच ठिकाणी माघार घेणेही नियोजनबद्ध असल्याचे दिसते. या नियोजनबद्धतेची सुरवात स्वराज्याच्या स्थापनेपासूनच झालेली दिसतेपुण्याजवळचा, विजापूरच्या वाटेवरचा, लक्ष ठेवायला आणि मदत पोचवायला सोपा आणि किल्लेदार ओळखीचा असल्याने जरा सहज असा पुरंधर किल्ला ताब्यात घेणे, त्याचा अतिशय योग्य वापर करून आदिलशाही फौजांना टक्कर देणे, सिंहगड ताब्यात घेणे आणि मग प्रकरण फार वाढू  देण्यासाठी सिंहगड परत करणे हे सारे कसे सूत्रबद्ध दिसते. दीर्घकालीन योजनेच्या आधारे असे नियोजन ही शिवाजीपर्यंत हिंदू राजांची पद्धत नाही. अकराव्या शतकातल्या सिंधच्या राजा दाहीरपासून सोळाव्या शतकातल्या विजयनगरच्या रामराजापर्यंत कोणीही याला अपवाद नाही. हे सर्व राजे मुख्यतः प्रतिक्रिया देणारे आहेत, पश्चात बुद्धीचे धनी आहेत. आपण होउन पुढाकार घेणे, शत्रूंबद्दलचेअनुभव जमेला धरून त्याचे नियोजन करणे अशा काही  गोष्टी गोष्टी त्यांच्या आसपासही येत नाहीत. शिवाजी या बाबतीत पूर्णपणे स्वतंत्र आणि  परंपरेपेक्षा वेगळा आहे. त्याला कुणी पूर्वसूरी नाहीच आहे. हीच गोष्ट दगा, धोका या बाबतीत झाली आहे. दगे द्यायचे, तह मोडायचे आणि  आक्रमण करायचे ते फक्त शत्रूने; आपण दगा खावा, तो देणाऱ्या शत्रूबद्दल वांझ चीड मनात ठेवावी आणि दग्याने केलेल्या आक्रमणातून शिल्लक राहिलोच तर पुन्हा पुढच्या वेळी दगा खावा या मार्गाने भारतीय राजांची वाटचाल शिवाजी आधी शेकडो वर्षे चालली होती. साधारण रीत अशी की एतद्देशीय राजे चैन-विलासात मग्न असत. शत्रू त्यांच्यावर चाल करून येणार, तो शे-पन्नास मैल आत आल्यावर हे लोक जागे होणार. त्यामुळे लढाई यांच्याच प्रदेशात. कोणीही जिंको आणि कोणीही हारो, यांचा प्रदेश तर बरबाद होणारच. आपण आक्रमण करणे वगैरे तर फारच लांबच्या गोष्टी. त्यामुळे लढाईत विजय मिळाला तरी नुकसान आहेच. म्हणजे विजय मिळाला तर कमजोर होऊन जिवंत राहायचे पण पराभव झाला तर समूळ नाश हीच भारतीय राजांची तोपर्यंतची पद्धत होती. पण शिवाजीपासून शत्रूंनी दगा खाण्याची सुरवात होते. शिवाजी दगा देतो ते शत्रूला बेसावध पकडायला. दगा हा शेवट नव्हे, ती सुरवात. शत्रू भानावर येण्याच्या आत शिवाजीने आक्रमण करून नवीन प्रदेश राज्याला जोडलेला असायचा. त्यामुळे शत्रूचा जोर खरेच जास्त असेल तर या नव्याने जिंकलेल्या प्रदेशातला काही भाग परत देऊन तह होतो. अफझलखानाच्या वधानंतर १८ दिवसात शिवाजीने वाई ते पन्हाळा हा पट्टा हस्तगत केला आणि जौहरला वाकुल्या दाखविल्यानंतर शाहिस्तेखानाशी लढण्यावर लक्ष द्यायला पाहिजे म्हणून पन्हाळा किल्ला आदिलशाहीला देऊन त्यांच्याशी तह केला. आता हा असा सल्ला शिवाजी कुणाकडून घेणार? होतेच कोण अशा गोष्टी शिवाजीला शिकवायला

शिवाजीचे अद्वितीयत्व हा अनेक गोष्टींचा एक समुच्चय आहे. त्याचा स्वतःचा मृत्यू झाला १६८०मध्ये. संभाजीचा मृत्यू १६८९चा तर राजारामाचा १७००मध्ये. त्यामुळे १७०२-०३ची परिस्थिती कशी आहे पहा. शिवाजी-संभाजी-राजाराम मरण पावले होते, येसूबाई आणि संभाजीचा मुलगा शाहू मोगलांच्या कैदेत होते आणि महाराष्ट्रात ताराबाई आणि काही सरदार फक्त होते. पण याही परिस्थितीत कोणी शरण जाण्याचा फार गंभीरपणे विचार केल्याचे दिसत नाही. ज्याला जसे सुचेल तसा तो लढत होता. याच स्थितीला उद्देशून औरंगझेबाने त्याचे ते सुप्रसिद्ध उद्गार इथे गवताला भाले फुटतात असे दिसते काढले होते. हे सर्व लोक मिळेल तसे मिळेल तिथे कशासाठी लढत होते? शिवाजीच्या नावासाठी आणि रयतेच्या राज्यासाठी हेच या प्रश्नाचे उत्तर नाही काय?

वर केलेल्या चर्चेवरून राजा म्हणून शिवाजीकडे काही असामान्य गुणविशेष होते हे पुरेसे स्पष्ट झाले आहे. पण ज्या वादाच्या संदर्भात हा प्रश्न आपण उपस्थित करतो आहोत, त्याचाच संदर्भ पुढे चालवायचा तर फक्त हे गुणविशेष आणि शिवाजीचे असामान्यत्व दाखवून देणे पुरेसे नाही. त्यामुळेच इथे हेही स्पष्टपणे म्हणावे लागेल की या सर्व गुणांच्या क्षेत्रात, खुद्द शिवाजीचा पिता शहाजी किंवा त्याचे आजोबा मालोजी आणि लखुजी हेही त्याचे पूर्वसूरी ठरू शकत नाहीत. शहाजी हा शिवाजीची पार्श्वभूमी आहे हे उघडच दिसते. पण शिवाजी अशा पार्श्वभूमीवरही उठून दिसण्याइतका कर्तृत्ववान आहे हेही स्पष्ट आहे आणि शिवाजीची बरीचशी विचारप्रक्रिया ही त्याची स्वतःची आहे हेही मान्य करावे लागते.

आणि हे सर्व मान्य केल्यानंतरही मानवी जीवनाच्या सर्व मर्यादा शिवाजीलाही लागू आहेत हे विसरता येत नाही. अबिबी बिकिला, जेसी ओवेन्स, कार्ल लुईस आणि ह्युसेन बोल्ट हे जगातले त्यांच्यात्यांच्या काळातले सर्वोत्कृष्ट धावपटू होते यावर वाद असण्याचे काहीच कारण नाही. पण त्या अवस्थेत पोचण्याआधी त्यांना कुणीतरी हाताला धरून चालायला शिकवलेच होते हेही विसरू नये. आजचा सचिन तेंडूलकर आपोआप तयार झालेला नाही. तसेच शिवाजीला न्यायाच्या तत्कालीन कल्पना, राज्यकारभाराची अंगे, राजाच्या कामाच्या मर्यादा आणि राजाकडून अपेक्षा, समकालीन सामाजिक आणि राजकीय परिस्थिती या सर्वच गोष्टींबद्दल कुणीतरी सांगितले असेलच ना?

औरंगजेब दीर्घकाळ दक्षिणेचा मोगल सुभेदार असल्याने इथल्या परिस्थितीचा चांगला माहितगार होता. त्याच्या मते दक्षिणेत जमीन महसूल, न्याय आणि कज्जे-खटले या क्षेत्रात दादोजी कोंडदेव हा फार कर्तृत्ववान माणूस आहे. शिवाजीच्या सदरेवर सारे आयुष्य काढलेल्या या माणसाकडून शिवाजी काहीच शिकला नसेल असे मानायचे का? तसे मानले तर ते शिवाजीचे कर्तृत्व नव्हे, अपयश ठरेल याचे भान आपण असू द्यावे. आणि इतका अप्रत्यक्ष वळसा तरी कशाला घ्यायचा? १६६५ला मिर्झाराजे जयसिंग यांच्यासमोर शरणागती पत्करावी लागल्यावर शिवाजीला एकदा आग्र्याला जाऊन यावे लागले हा इतिहास आपण सर्व जण जाणतो. औरंगजेबाच्या कैदेतून सुटून आल्यानंतर लगेचचा काही काळ शिवाजीने स्वस्थ बसून काढला. त्याला मधल्या काळातल्या सर्व घटनांचे धागेदोरे जुळवून घ्यायचे होते. या मोकळ्या वेळात त्याने जमीन महसुलाच्या आणि कर वसुलीच्या आपल्या मनातल्या कल्पना मांडल्या आणि अंमलातही आणल्या. या महसुली सुधारणा आणि दादोजी कोंडदेवाच्या कारभारातले महसुली नियम आणि कायद्यांचे स्वरूप या दोन गोष्टीत फारसा फरक दिसतच नाही. दादोजीच्याच कल्पना परिस्थितीनुरूप किंचित सुधारून शिवाजीने अंमलात आणल्या हे अगदी स्पष्ट दिसते. शिवाजी सदरेवर बसून दादोजीकडून बरेच काही शिकला ही गोष्ट अगदी उघड स्पष्ट दिसते.

महसुलाचे कायदे, नियम आणि दर यांचे हे उदाहरण यासाठी दिले की या गोष्टीवर कागदोपत्री पुरावा दाखवता येतो. पण ज्याला स्पष्ट नोंदीचा प्रत्यक्ष पुरावा एका मर्यादेतच देता येईल अशा आणखी अनेक गोष्टी सांगता येतील. शिवाजीला लिहिणे-वाचणे शिकवायला शिक्षक नेमले होते अशी नोंद दाखवता येते. पण शिवाजी त्यांच्याकडून नेमके काय काय शिकला आणि लिहिणे-वाचणे त्याला कितपत जमत होते हे प्रत्यक्ष पुराव्याने कसे दाखवणार? तीच गोष्ट युद्धकलेबद्दलची. या क्षेत्रातल्या शिवाजीच्या कर्तृत्वाची काही उदाहरणे फारतर दाखवता येतील. पण ती गोष्ट कुणाकडून आणि कशी शिवाजीने आत्मसात केली हे सिद्ध करायला काय मार्ग आहे? प्रत्यक्ष पुरावा सहजासहजी अशा व्यवहारांमध्ये मिळताच नाही.

या सर्व विचारात आणखी एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. ज्या क्षेत्रात शिवाजीचे कार्य पुराव्याने सिद्ध आहे आणि जे प्रत्यक्ष आणि थेटपणे शिवाजीशी नेऊन भिडवता येते अशा गोष्टींमध्ये ही परिस्थिती आपल्याला दिसते. पण राजा म्हणून अनेक गोष्टींचे शिवाजीशी असे थेट नाते दाखवता येणार नाही. तिथे आपण काय करणार आहोत? लाल महालावर छापा घालण्याचा किंवा कार्तलबखानाला उंबरखिंडीत गाठण्याच्या योजनेचा  तपशील नेमका कुणी ठरवला हे कळणार तरी कसे? शिवाजीच्या नेतृत्वाचा आवाका आणि अनपेक्षित पण हमखास यश देणारे डाव टाकण्याचे त्याचे इतर ठिकाणाचे कौशल्य पाहूनच आपण निर्णय देणार ना? एका माणसाच्या असण्याने आणि नसण्याने परिस्थिती आणि परिणाम या गोष्टींवर जो फरक पडतो तोच त्या माणसाच्या दर्जाकडे बोट दाखवतो. शिवाजीच्या असण्याने इतिहासाच्या प्रवाहाची दिशाच बदलली गेली ही गोष्ट नाकारताच येत नाही. या परिणामाला कारणीभूत असणाऱ्या शिवाजी या माणसाचे मूल्यमापन काही प्रमाणात तरी परिणाम पाहूनच करावे लागते. जी गोष्ट राजकीय कर्तृत्वाच्या बाबतीत खरी आहे तीच इतर घटना आणि तपशील यांच्याही बाबतीत खरी आहे. महसुली व्यवस्था आणि कायदे यात दादोजी कोंडदेव शत्रूंनी दाद द्यावी इतक्या दर्जाचा तज्ञ होता. शिवाजीच्या व्यवस्थेत जर या गोष्टी तत्कालीन सत्तांच्या तुलनेत ढळढळीतपणे उठून दिसत असतील तर त्याचे श्रेय मोठ्या प्रमाणावर दादोजीकडे जायला पाहिजे हे सहज स्पष्ट असायला हवे.

मुद्दा इतकाच, की शिवाजीसारखा युगपुरुष या दर्जाचा माणूस जवळजवळ सर्वच क्षेत्रात असामान्य असतो. पूर्वसूरींपेक्षा त्याचे वेगळेपण हेच त्याला असामान्यत्व प्राप्त करून देते. पण या असामान्य मानवालाही इतर सर्वसामान्यांप्रमाने काही जडणघडणीच्या काळातून जावेच लागते. या त्याच्या घडणीत अनेकांचा वाटा असतोच असतो. त्यांच्यामुळेच हा असामान्य युगपुरुषठरला हे म्हणणे अतिशयोक्तीचे असेल तर त्यांचा या असामान्याच्या बनण्यात काहीच वाटा नाही, ते याचे गुरु किंवा शिक्षक नव्हेतच, हे म्हणणे करंट्या संकुचितपणाचे आहे. दत्तात्रेयांना २४ गुरु होते हेही खरे आणि दत्तात्रेय स्वयंभू होते हे ही खरे. अद्वितीय किंवा युगप्रवर्तक या जीवनात अनुभवाला येणाऱ्या गोष्टी आहेत. पण म्हणून त्यांचे अर्थ पूर्णपणे आहेचआणि नाहीच मुळीअशा दोन्ही टोकांना खेचण्यात आपण आपल्याच अडाणीपणाचे प्रदर्शन करत असतो हे लक्षात ठेवणे बरे. सत्य या दोन्ही टोकांच्या मध्ये कुठेतरी आहे. स्वतः शिवाजीला दादोजीच काय पण लाठी-तलवारीचे डाव शिकवणाऱ्यालाही गुरुचे स्थान द्यायला संकोच वाटला नसता. ज्याचे स्वतःचे कर्तृत्व वादातीत आहे त्याला या असल्या श्रेयाच्या वादाशी काहीच देणेघेणे नसते. कर्तृत्वशून्य, अडाणी आणि स्वार्थी मंडळीचा हा खेळ असतो. 'नाव शिवाजीचे आणि काम माझ्या तूप-पोळीचे' याशिवाय या वादाला वेगळे काही नाव देणे कठीण आहे.

Wednesday, 17 July 2013

On Sardar Patel not becoming
the first Prime Minister of India….


Socio-political netspace, these days, is overflowing with Shri. Narendra Modi. He has almost been the single biggest subject matter today. Some of his supporters even have gone to the extent of projecting him as the 'New Sardar of Gujrat'. They obviously are referring to Sardar Vallabhbhai Patel and see Modi as a reincarnation of the old Sardar. One person has gone to the extent of saying that Gujrat missed the chance of having the Prime Minister of India in 1946, largely owing to Gandhiji; now it should not lose this chance. Every Gujarati must support the reincarnated Sardar of Gujrat to be the Prime Minister of India. A couple of voices are seen talking about Morajee Desai. But it appears like nobody takes him seriously when Prime Ministers of India are counted. Personally I also agree with this view and hence am not counting it seriously. In this context, I propose to view the reasons why Sardar was not chosen as the Prime Minister.

One site has described the sequence of events that took place at the time of choosing the first prime minister of India. It has some impressions and perceptions also. But overall, this is what the site has to say about the events, sequentially.

How Sardar Patel did not become first PM of India?


It was a meeting in Delhi to decide new president of Congress and Gandhiji said that whoever would be a new congress president will take an oath as a first prime minister of India. Jawaharlal Nehru, Sardar Patel and other Congress leader were present in this crucial meeting.
Gandhiji declared in this meeting that out of 15, 12 regional Congress committees had suggested Sardar patel’s name as a president (and thus as the first prime minister of India) and only one had suggested Shri Krupalaniji’s name who took his name back in favor of Jawaharlal Nehru. So Gandhiji said that now there were two candidates Jawaharlal Nehru and Sardar Patel.
Gandhi asked Jawaharlal ‘Jawahar none of the regional committees has suggested your name and only working committee has suggested your name, what do you think?’ Jawaharlal Nehru wanted to become prime minister so he did not answer this question and just kept looking at the floor. Gandhiji immediately understood what Jawaharlal’s wish was. Gandhiji wrote a note on a paper and gave it to Sardar Patel who was siting just next to him. Sardar read that note and imidietly took his name back.
Thus Jawaharlal Nehru became first prime minister of India instead of deserving Shri Sardar Vallabhbhai Patel. This was major major injustice to Gujarat and India. Jawaharlal gave us Kashmir problem, China war, wrong socialist development model and his daughter, daughter’s son, his wife and her children to rule India.

Prof. Makkhan Lal, Senior Fellow at Vivekanand International Foundation in fact goes to saying that Talking about the death of party democracy and High Command culture has become far too common now a days. There is an impression that this High Command culture began in the Congress with Mrs. Indira Gandhi and since then it has spread in other parties as well…….. Maulana Azad’s India Wins Freedom, K.M. Munishi’s Pilgrimage to Freedom, N. V. Gadgil’s Government From Inside, D.  P. Mishra’s Living an Era (in three volumes) and above all Sardar Patel’s Correspondence (Edited by Durga Das in 12 Vols.) throw light on how the process of all powerful High Command and the death of internal party democracy began in the Congress during the pre-Independence days itself in the Congress. Three episodes – namely choosing the First Prime Minister, Electing the First President of India and Ousting the Elected President of the Congress (Purushottam Das Tandon) – throw ample light on it.

Shri. Anurag Ranjan provides this information. “(In 1946) Azad was also interested in fighting and winning election for  the Congress president’s post  as he, too, had ambitions to become the PM,  but he was told in no uncertain terms by Mahatma Gandhi that he does not approve of a second term for a sitting Congress president and Azad had to fall in line ,albeit reluctantly. Not only this, Gandhi made it very clear to everybody that Nehru was his preferred choice for the Congress president’s position.” This piece is corroborated by Vallabhbhai’s biographer Shri. Balaraj Krishna. According to him, it was only on protracted insistence by Gandhiji that Azad stepped down as Congress President. Azad himself wanted to be the Prime Minister of India. But at the time of election, 12 out of 15 PCCs had suggested the name of Vallabhbhai Patel. Nobody had suggested the name of Nehru for presidentship. But Gandhiji, defying all norms of democracy, prevailed on Patel to withdraw his name, in favour of Nehru. Shri. Krishna wonders why Gandhiji did not support his most loyal lieutenant of three decades though he confirms that socialist leaders like Jayprakash Narayan and muslim leaders including Maulana Azad were against Patel.

Personal Secretary of Maulana Azad Humayun Kabir, however, exonerates Mahatmaji of any interference. According to him, Gandhiji was in favour of Patel only. But the outgoing president, Maulana Azad, always felt Patel had a narrow vision. He, therefore, suggested Nehru’s name when it became clear to him that its not going to be him. However, this claim seems to have no takers. An overwhelming majority of analysts are sure on Gandhiji’s open support of Jawaharlal Nehru. According to Prof. Makkhan Lal, Gandhiji had made his choice known in the favour of Jawaharlal Nehru on 20thApril, 1946. This was not the first time that Gandhiji spoke about his choice of Nehru; even before the process of election was set in motion. He had been speaking about it from the last several years. But Maulana’s desire for re-election and newspaper reports about it upset Gandhiji and on 20.04.1946 he wrote to Maulana Azad, who had already been President of Congress for the last six years: “Please go through the enclosed cuttings.… I have not spoken to anyone of my opinion. When one or two Working Committee members asked me, I said that it would not be right for the same President to continue…. If you are of the same opinion, it may be proper for you to issue a statement about the cuttings [the news item Gandhiji had sent him] and say that you have no intention to become the President again…. In today’s circumstances I would, if asked, prefer Jawaharlal. I have many reasons for this. Why go into them?”

However, the reasons for this choice of Gandhiji are not clear. The space of net and written material is buff with speculations. Prof. Makkhan Lal states, only after Gandhiji was informed that “Jawaharlal will not take the second place” he asked Patel to withdraw. Dr. Rajendra Prasad lamented that Gandhiji “had once again sacrificed his trusted lieutenant for the sake of the ‘glamorous Nehru’ and further feared that “Nehru would follow the British ways.” That fear of Nehru not being amenable to Gandhiji was the prime reason. On the other hand, Anurag Ranjan provides at least two reasons. “We can conclude that Gandhi chose Nehru over Patel because of two main reasons: 1. Gandhi believed a foreign educated Nehru with modern thoughts had an edge over Patel who, according to him, was orthodox in his thoughts. 2. Gandhi feared Nehru would revolt in case he was denied PM’s post and that would give the British an excuse to delay transfer of power. On the other hand, he was fully convinced of Sardar Patel’s loyalty. He knew Sardar Patel was a true patriot and would never play a spoilsport. It must be accepted here that the decision to prefer Nehru over Patel has been criticised by two known critics of Sardar Patel who took the decision to be correct when it was taken but later realised the folly. Maulana Abul Kalam Azad confessed in his autobiography that was published posthumously in 1959, “It was a mistake on my part that I did not support Sardar Patel. We differed on many issues but I am convinced that if he had succeeded me as Congress President he would have seen that the Cabinet Mission Plan was successfully implemented.” Similarly, C Rajgopalachary who blamed Sardar Patel for depriving him  of the first Presidentship of independent India,  wrote, “Undoubtedly it would have been better if Nehru had been asked to be the Foreign Minister and Patel made Prime Minister. I too fell into the error of believing that Jawaharlal was the more enlightened person of the two…” Admitting the honesty of the two gentlemen, it seems possible that while the PCCs were overwhelmingly in favour of Sardar Patel, the top Congress leadership was not so sure about him, may be including M. K. Gandhi. It may be recalled here that Patel was the only Congress leader to say openly that Jinah’s call would be taken heads on and “swords will meet swords”, if Jinah insisted on his adamant ways. If Maulana Azad, who was willing to accept anything and everything for keeping the united India intact, saw this as raw arrogance and aggression, it can be understood.

Rajmohan Gandhi suggests that the primary reason for Gandhiji not to select Patel was the age. Patel was 71 in 1946 as against Nehru, who was 56 only. “The main reason why Gandhi could not name Patel Prime Minister was Patel was very ill, he was very old. Patel belonged to Gandhi’s generation, Jawaharlal was leading to next generation.” I, personally, believe this could be the most important reason. For a nation getting independence after centuries of old fashioned backward looking and apathetic rule, the leadership, at least in the initial period, has to be consistent, modern in outlook, compassionate and charming. Due to his age as well as background, Patel had none of these while Nehru had all.

The issue, however, doesn’t stop there. Many writers, based on their set of information, aired other possibilities. Broadly they move along the border of being negative, anti-Congress and anti-Nehru and one-sided. Prof. Makkhan Lal, as already seen above, suggests that Gandhiji was informed that Nehru will not take second place. So Gandhiji had to offer him the post of the PM. Anurag Ranjan suggests that Gandhi feared Nehru would revolt in case he was denied PM’s post and that would give the British an excuse to delay transfer of power. Some analysts go to the extent of saying ‘It is believed that Nehru blackmailed Mahatma Gandhi by saying that he would dissolve Congress if he is not sworn in as the Prime Minister. Another view supporting this blackmail theory suggests that Nehru had threatened to split Congress. As an observer standing over six decades away, it seems possible that Nehru may have refused to play a second fiddle to Sardar Patel. That would have deprived the newly liberated India of his services. But it this does not look like the reason for Gandhiji switching over his preference to favour Nehru. As has already been seen above, even before the nominations for the post of Congress President were open, Gandhiji had written to Maulana, supporting Nehru for the post. The theory of blackmail sounds hollow on account of two more reasons. Gandhi was not used to keep lying down even in cases of open defeats. Like in case of Netaji Subhash becoming Congress President, much to the embarrassment of Gandhi, in all likelihood, he would have fought the betrayer whosoever it be. On the other hand, Nehru’s name was not brought up by any PCC. As Shri. Balraj Krishna often asserts, Patel had a steely grip on the Congress Party. Many times he pushed his agenda even though almost no other senior leader favoured him. That being the case, how Nehru could have split Congress, standing against the Patel-Gandhi duo is hard to fathom today. Officially, Nehru was not even the then President of Congress. Maulana Azad was the outgoing President while the incoming was being decided. In the circumstances, the talk of blackmail and Bapu succumbing to a firm and adamant Nehru sounds untrue. It seems most likely that Gandhiji was always in favour of Jawaharlal, owing to the modern outlook and charm of the latter. Some times, I even feel that the polished personality, poetic nature and the romantic fabian that Nehru was, made Gandhi believe that it could help India attain a respectable position in the international fraternity in the shortest possible time. I can’t see Patel, as Prime Minister of India, taking up ventures like Non-Aligned Movement (NAM). He would have, in all probabilities, confined himself to India and, at best, South East Asia.

Some of the reactions suggest that there is a large scale impression across the board that had Sardar been the PM, Kashmir issue has been solved then and there only. The mess, in which India finds itself today, would not have arisen at all. Similar is the impression on issues with China. One of the posts (not by a Gujrati) says ‘History has proved it beyond doubt that had Patel been the PM in place of Nehru, the country wouldn’t have faced humiliation of 1962 war. Days before his death, Patel had written to Nehru warning him about China’s nefarious designs but Nehru didn’t pay any attention to that letter. Even Kashmir would not have become a thorn in the flesh for India, had Patel and not Nehru been the first prime minister of India.’ How Sardar would have handled Kashmir and China? What can we say on this impression?

Friday, 14 June 2013

दिवस कोवळे, काळे काळे ……

जिया खान नावाच्या एका कोवळ्या आत्महत्येनं आपण सारे हादरून गेलो आहोत. ही गोष्ट पचवायला फार जड जाते आहे. म्हणून मग वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताहेत. एका टोकाला जियाचे कृत्य चुकीचे, आततायी आणि अतिरेकी ठरवणाऱ्या प्रतिक्रिया आहेत तर दुसऱ्या टोकाला याला जबाबदार कोण याची post-mortem चर्चा आहे. लोकसत्ताच्या १४ जूनच्या अंकात सोनाली कुलकर्णीनं तिच्या 'सो कूल' या सदरात ऋतुपर्णो घोषबद्दल लिहिताना तळमळून जियाबद्दलही लिहिले आहे. जियानं हे पाऊल का उचललं हा प्रश्न तिलाही अस्वस्थ करतोय.तू जियाबद्दल फार मनापासून लिहिलं आहेस सोनाली! मान्य! पण तुझ्या मनापासून. तुझी अस्वस्थता आणि तुझं दुःख कळतंय. पण तुझं लिहिणं तुझ्या मनाचं प्रतिबिंब आहे सोनाली. जियाच्या मनाचं काय? तुझं आयुष्य कसं गेलं आणि तुला आयुष्याचा कसा आणि किती अनुभव आहे मला माहित नाही. मला तर तुझं वयही माहीत नाही. पण आयुष्याच्या या वाटा कळणं फार फार कठीण आहे सोनाली. आजही आपल्याला हे कठीण जातं. लैला-मजनू, हीर-रांझा ही आपल्याला फक्त नावं आहेत. आपल्याला ते समजले नाहीच आहेत गं. काय आहे ना सोनाली, देशासाठी फाशी जाणारा भगतसिंग समजणं सोपं आहे, पण सूरजसाठी फाशी जाणारी जिया समजणं कठीण आहे. त्यासाठी लैला-मजनू आणि हीर-रांझा जगण्यातच यावे लागतात. 'भावना नावाच्या कवितांना तू राक्षस का मानलंस जिया? क्षणिक फोलपणाला तू गळ्याभोवती बांधलंस? निसर्गाच्या विरुद्ध जाण्याचा निर्णय तू का घेतलास गं' असे प्रश्न तू तळतळून विचारले आहेस. मला माफ कर सोनाली. पण यातला तुझा फक्त शेवटचा प्रश्न मला थेट भिडला. कदाचित तुझ्या मनातल्यापेक्षा वेगळ्या अर्थानं, पण भिडला. जियानं निसर्गाच्या विरुद्ध जाण्याचा निर्णय घेतला हे निर्विवाद! माणूस आणि त्याच्या उत्क्रांतीबद्दल अभ्यास करणारे असं सांगतात की टिकून रहाण्याची इच्छा हा उत्क्रांतीतला सर्वात महत्वाचा घटक आहे. असेलही ते खरं. मी नाही म्हणत नाही. पण एकदा माणूस उत्क्रांत होऊन 'माणूस' झाला ना, तेव्हापासूनच त्यानं आपल्या या टिकून रहाण्याच्या इच्छेला आव्हान द्यायला सुरवात केली आहे. दर वेळी हा माणूस त्याला निरनिराळी कारणं शोधतो. कधी देश, कधी देव, कधी श्रद्धा आणि कधी कधी प्रेम. यातलं कुठलं दैवत माणसाच्या मनात सगळ्यात मोठं असावं हे कुणी ठरवायचं सांग. आपल्या पुलंनी 'तुझे आहे तुजपाशी' नाटकात प्रश्न विचारला आहे बघ- '…. देशासाठी हसत हसत फासावर जाणारा क्रांतिकारक आणि सुरांच्या मस्तीत राजाची इतराजी स्वीकारणारी गाणारीण यात लहान-मोठं कुणी आणि कसं ठरवायचं?' सोनाली, तुला सापडलंय या प्रश्नाचं उत्तर?

खरं तर इतक्या लांब जायची सुद्धा काही गरज नाही. फार दिवसांपूर्वी मी एक गझल लिहिली होती. फक्त गझलांसाठीच्या एका वेबसाईटवर ती आहे. तिचा मतला होता-
                           'शुद्ध रक्ताचा सडा हाकाल हा ताजाच होता
                            कापला जो काल मीतोही गळा माझाच होता'
मी माझे श्वास झुगारून नाही दिले सोनाली! मी अजूनही आहे आणि हे लिहितो आहे. पण तिथे जो लिहिला तोही माझा प्रेमातलाच अनुभव होता. आजही माझ्या गळ्यावर कापल्याच्या जखमांचे व्रण आहेत आणि आता ते माझ्याबरोबरच जाणार. माझं आयुष्य त्या अनुभवानं आमूलाग्र बदलून टाकलं. आता त्या जखमातून रक्त नाही येत. पण जियासारख्या कुणाचा तिथे अभावितपणे स्पर्श झाला तर आजही तिथे हुळहुळतं, गळा आणि डोळे ओले होतात. पण मी आहे. याला माझा शहाणपणा म्हणायचं का?

'जियानं परिस्थितीला धैर्यानं तोंड द्यायला पाहिजे होतं' असं म्हणणाऱ्या धैर्यधरांना तर माझा मनापासून प्रामाणिक सलाम. धैर्य-धैर्य म्हणजे नेमकं काय असतं गं सोनाली? मी आहे हे धैर्याचं प्रतीक समजायचं का? का माझं गळ्यावरचं प्रेम इतक्या मर्यादेपर्यंतच होतं आणि स्वतःवरचं प्रेम जास्त होतं असं गृहीत धरायचं? खांडेकरांच्या 'अमृतवेल' मधला तो उतारा मी शाळेत असल्यापासून वाचतोय गं. पण अजूनही कळत नाहीये  की ते काय आहे. माणसाच्या जीवनाला त्यानं अर्थ येत असेल तर शिवाजीला त्याची सख्खी आई का बरं खानाच्या भेटीला पाठवते? भगतसिंगची आई त्याच्या शेवटच्या भेटीकडे का पाठ फिरवते? कास्वप्नांना मोडू द्यायचं आणि मग आपण दुसऱ्या स्वप्नामागे धावायचं असं नेहमीच चालत नाही; कधी तरी पाय एका जागी घट्ट रोवून एखाद्या स्वप्नासाठी प्राण पणाला लावण्याची आणि स्वतःला झोकून देण्याची तयारीही ठेवावी लागते, म्हणूनच ना? सर्वात जास्त उत्क्रांत झालेले प्राणी दर वेळी निराळ्या स्वप्नामागे धावतात. पण या प्राण्यांना ‘माणूस’ बनवणारे चार-दोन वेडे स्वप्नांसाठी जिवावर उदार होतात- कधी बाजीप्रभू देशपांडे या नावानं, कधी प्रतापराव गुजर म्हणून, कधी मोहनदास करमचंद गांधी म्हणवत तर कधी लैला, पेनिलोपी आणि जिया खान अशा रूपांनी. सोनाली, संस्कृती- संस्कृती आपण म्हणतो ना - ती त्यांच्यामुळे घडते आणि वाढते, उदंड संख्या माजवणाऱ्या माझ्यासारख्यांमुळे नाही.

'किती मोठ्या गोष्टी तू कुठे ताणतो आहेस? तुलना करायला आणि उदाहरणं द्यायलाही काही मर्यादा पाहिजे की नको?' हा प्रश्नही मला पाठ आहे सोनाली. म्हणूनच मी पुलंनी दिलेली ढाल आधीपासूनच घट्ट पकडून ठेवली आहे. आपल्या मनात कुठली गोष्ट किती मोठी असावी हे कोण ठरवतं सांग. कशानं आपलं सारं आयुष्य मचूळ होऊन जातं आणि काय झालं की आपण शरीरापासून एका पावलानं लांब जातो, तुला माहीत आहेएका कार्यक्रमात मिथिलेश पाटणकरांनी गायलेली एक गझल माझ्या मनात फार खोल रुतून बसली आहे.
                            'तू दरी होतीस आणिक मी कड्यावरती उभा
                            काय चुकले त्यात माझे जर दिले झोकून मी'
तू या 'काय चुकले'चं काय उत्तर देशील सोनालीआपण सगळे मुर्दाड मनानं मेलेलं आयुष्य सांभाळत जगत असतो, जिवंत असतोच असं नाही. पण सगळ्यांनी असंच जगावं असं आपण कसं ठरवू शकतोफासानं गळ्याला जखडावं तसं वाटेल त्या आणि वाटेल तसल्या आयुष्याला जखडून-पकडून बसणं हा एकच एक हट्ट सगळ्यांसाठी आपण का धरावा? ज्याच्यावाचून आयुष्य असह्य होतं तो आपला कोण असावा- देश की देव की प्रियकर, हे आपल्या हातात नसतं आणि हे असह्य होणं किती जीवघेणं असावं हेही आपण ठरवू शकत नाही. सगळ्यांनी जिया बनावं असं कुणी म्हणू नये आणि म्हणणारही नाही. पण जियाचं काय चुकलं हे तरी आपण कसं ठरवू शकतोतिचं प्रेमतिची निष्ठा आणि तिची आयुष्याची आस कुठल्या जातकुळीची असावी हे तिनंच ठरवावंनाही काक्रांतिकारक आणि फितूर, पोलीस आणि गुन्हेगार, सारं आयुष्य वाहून टाकणारे आणि आयुष्यभर वहात जाणारे असे आपण सगळे जण  एकाच वेळी एकाच समाजात राहतो की नाहीतसंच मी आणि जिया यांनीही एकाच समाजात राहावं हवं तर. जियानं भावना नावाच्या कवितांना राक्षस मानलं किंवा क्षणिक फोलपणाला गळ्याभोवती बांधलं असं खरच तुला वाटतंभावनांना जियानं राक्षस नाही मानलं सोनाली. तिनं तर त्यांना आपले श्वास मानलं. पण जब कदम ही साथ ना दे तो मुसाफिर क्या करेंसाँस ही जब साथ ना दे तो जिया भी क्या करें सोनाली? आपल्या श्वासांनी आपली साथ सोडली की काय गळ्याशी येतं सांग. तेच जियाचं झालं.

जियाचं आयुष्य अकाली संपलं हे खरं आहे. पण मूल्यांचे ठोकळे रचून तिची समाधी बनवण्याची किंवा 'तिच्या चुकांमधून आजच्या आणि उद्याच्या पिढीला धडे देण्याची' काही गरज नाही. त्यापेक्षा सारं आयुष्यभर न मिळालेलं शांतपण आता तरी तिला भोगू द्यावं. आणि त्यातूनही कधी फुलण्याआधीच कुस्करल्या गेलेल्या कोवळ्या दिवसातल्या जियाची आठवण अगदी अनिवार आलीच तर फक्त मनातल्या मनात तिला जवळ घ्यावं, तिची एक छान पापी घ्यावी आणि सूरजबद्दल कणभरही आढी मनात न आणता तिला सांगावं 'सॉरी राणा, अगदी सॉरी. यावेळी नाही जमलं सोनिया! पण पुढल्या जन्मी माझ्या छायेत येऊन रहा. तुला कधी कधी ऊन लागू नये याची मी काळजी घेईन. प्रॉमिस! पक्का!! बाय जिया!!!'


Friday, 7 June 2013

असंगाशी संग आणि चीनशी व्यापार

मी शिक्षण संपवून नवीनच कामाच्या शोधात होतो तेव्हाची गोष्ट आहे. तेव्हा या शोधासाठी बरेच हिंडणे व्हायचे. त्या काळात प्रवासात अनेकदा ट्रक समोर येत. या ट्रकच्या मागे कधी कधी काही छान वाक्ये लिहिलेली असायची. त्यातले एक अनेकदा दिसणारे अत्यंत लोकप्रिय वाक्य म्हणजे "शब्द हे शस्त्र आहे, जपून वापरा." स्वतः ट्रकवाले ते किती पाळायचे ते सोडून द्या. पण आज हे वाक्य आवले ते भारत आणि चीन या दोन देशातल्या व्यापाराच्या संबंधात. फक्त परिस्थितीत थोडा फरक झाला आहे. चीनने आपल्या देशाला शिकवलेले वाक्य आहे, "व्यापार हे शस्त्र आहे, बिनदिक्कत वापरा". तसे पाहता भारत आणि चीनमधला व्यापार भारताच्या फ़ायद्याचा सहसा कधी नव्हता. पण आता हा प्रश्न ऐरणीवर येऊ पाहतो आहे. चीनचे नुकतेच भारताच्या दौऱ्यावर आलेले प्रधानमंत्री ली केकियांग आणि भारतीय नेते यांच्या भेटीत तर हा एक महत्वाचा मुद्दा होताच. पण त्या पाठोपाठ भारताचे एक शिष्टमंडळ चीन दौऱ्यावर गेले; त्यांचाही चर्चेचा मुख्य प्रश्न हाच होता. यावरून या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात यायला हरकत नाही.

आपल्या आयात-निर्यात व्यापाराची २०१२-१३ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीची तपशीलवार आकडेवारी आता उपलब्ध आहे. या आकड्यांनुसार एप्रिल २०१२ ते सप्टेंबर २०१२ या सहा महिन्यांच्या काळात भारताने साधारण २३५ अब्ज डॉलर्सच्या एकूण आयातीपैकी तब्बल ८० अब्ज डॉलर्स फक्त तेल आणि तेलजन्य पदार्थांच्या आयातीवर खर्च केले. याचा अर्थ हा की आपला एक तृतीयांशापेक्षा जास्त खर्च फक्त तेल आयातीवरच झाला. त्या पाठोपाठ नंबर लागला सोने-चांदी, मोती आणि इतर मौल्यवान खड्यांचा. हौसेला मोल नसल्यामुळे आपण या खरेदीसाठी ३१ अब्ज डॉलर्स मोजले. इलेक्ट्रॉनिक वस्तू घेतल्या ११ अब्ज डॉलर्सच्या. त्यात मुख्यतः मोबाईल फोन, संगणक आणि त्याचे भाग, दूरचित्रवाणी संच अशा वस्तूंचा समावेश होता. या तुलनेत अत्याधुनिक यंत्रसामुग्री, लोखंड-पोलाद आणि रसायने वगळून इतर सर्व औद्योगिक वापराच्या गरजांची आपली खरेदी आपण सुमारे ५५ अब्ज डॉलर्समध्ये आटोपली. सोने-चांदीच्या आयातीत मागच्या वर्षाच्या तुलनेत घट होऊनही परिस्थिती अशी होती.

आता हे आकडे चांगले का वाईट, अर्धा देश दुष्काळात होरपळत असताना आपण जवळपास एक सप्तमांश परकी चलन सोने आयातीवर घालवणे हा कोणता शहाणपणा आहे असे अडचणीचे प्रश्न आपण सध्यापुरते बाजूला ठेवू. पण हे आकडे पहाता आपण सर्वात जास्त आयात कोणाकडून करत असू असा अंदाज करता येईल? म्हणजे यात देशांचा गट विचारात घ्यायचा नाही. देशांचा गटही एकत्र धरला तर या प्रश्नाचे उत्तर ओपेक (OPEC) हेच येणार हे अगदी उघड आहे. म्हणून एकेक देश मोजायचा. तर काय अंदाज असेल? अमेरिका? जपान? इराण?

प्रत्यक्षात भारताची सर्वात जास्त आयात होते चीनकडून. २०१२-१३ च्या पहिल्या सहामाहीत आपण 'हिंदी-चीनी भाई भाई' चा नारा देत चीनकडून २८ अब्ज डॉलर्सची आयात केली. आपल्या सहामाही आयातीत चीनचा वाटा होता जवळ जवळ १२ टक्के. संयुक्त अरब अमिराती (१९.६ अब्ज डॉलर्स, ८.३४%) , सौदी अरबस्तान (१६ अब्ज डॉलर्स, ६.८१%), अमेरिका (१२.२ अब्ज डॉलर्स, ५.२०%) आणि स्वित्झर्लंड (१०.७ अब्ज डॉलर्स, ४.५ ५%) हे नंतरचे चार क्रमांक होते. याच सहामाहीत आपली चीनला झालेली निर्यात संपूर्ण ६.४ अब्ज डॉलर्सची होती आणि आपल्या एकून निर्यातीत चीनचा वाटा साडेचार टक्क्यांपेक्षा कमीच होता. आणि या सर्व उद्योगात आपला तोटा होता साडेएकवीस अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त.

वरची आकडेवारी पाहता चीनबरोबरच्या व्यापाराची अवस्था हा भारताच्या चिंतेचा विषय आहे यात काहीच आश्चर्य नाही. चिंतेची दुसरी बाब ही आहे की भारत-चीन व्यापारातली वाढ इतक्या झपाट्याने झाली आहे की सरकारी गतीने त्यावर काही उपाय करण्याइतका वेळही आपल्याला मिळाला नाही. डम्पिंगविरोधी कर लावण्यासारख्या काही मलमपट्ट्या लावण्याचा प्रयत्न आपण कधी कधी करून पाहिला हे खरे. पण त्याने फार काही साध्य झाले नाही. त्यामुळे १९९०-९१ मध्ये ५ कोटी डॉलर्सच्याही आतच थबकलेला भारत-चीन व्यापार  २००६-०७ मध्ये साडेपंचवीस अब्ज डॉलर्सच्याही पलीकडे पोचला. याचा अर्थ हा की सुमारे १७ वर्षात भारत आणि चीन यांच्यातला व्यापार ५२२ पट वाढला. धरण फुटून पाण्याचा लोंढा यावा तसा हा प्रकार झाला. याचा घातक परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होणे अपरिहार्यच होते. कारण या सतरा वर्षांपैकी पंधरा वर्षे भारताने चीनबरोबरच्या व्यापारात तोटाच सोसला आणि १९९०-९१  मध्ये सव्वा कोटी डॉलर्सच्या घरात असणारा हा तोटा २००६-०७ मध्ये ९ अब्ज डॉलर्सच्याही पलीकडे पोचला. आज उपलब्ध प्राथमिक अंदाजांनुसार २०११-१२ मध्ये आपण चीनशी ७३.३३ अब्ज डॉलर्सच्या व्यवहारात सुमारे २४ अब्ज डॉलर्सचा तर २०१२-१३ मध्ये ६७.८३ अब्ज डॉलर्सच्या उलाढालीत जवळपास ४१ अब्ज डॉलर्सचा घाटा केला. या अतिरक्तस्रावाने अर्थव्यवस्था अशक्त होण्याच्या मार्गाला लागण्याआधीच काहीतरी करणे भारताला गरजेचे होते. या वर्षीच्या मे महिन्यात अखेर ही पावले उचलली गेली.

मे महिन्याच्या उत्तरार्धात भारत दौऱ्यावर आलेल्या चिनी प्रधानमंत्र्यांकडे भारताने हा विषय उपस्थित केला आणि त्यांच्याकडून चीनच्या बाजारपेठा भारतीय मालासाठी अधिक स्वागतोत्सुक करण्याचे आश्वासनही मिळवले. "दोन्ही बाजूंना फायदेशीर आणि स्थिर व्यापारी संबंधांचे महत्व चीन जाणतो. त्याचबरोबर स्थिर, शांत आणि प्रगतिशील दक्षिण आशिया हाच चीनच्या हिताचा आहे हेही आम्ही मानतो" अशा शब्दात चिनी पंतप्रधान ली केकियांग यांनी भारताला आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. पाठोपाठ भारताचे वाणिज्य सचिव एस. आर. राव यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ मेच्या शेवटच्या आठवड्यात बीजिंगला गेले. त्यांनी चीनचे वाणिज्य सचिव, चिनी योजना आयोगाचे अधिकारी आणि चीनच्या उद्योग मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी यांच्याशी दीर्घ चर्चा केली. मुख्यतः भारताचे शक्तिस्थान असलेल्या औषधे आणि माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रांची दारे भारतीय कंपन्यांसाठी उघडण्याचा विचार करू असे आश्वासन चिनी बाजूकडून मिळवण्यात भारताला यश आले खरे. पण हे यश मर्यादितच म्हणावे लागेल.

चीनशी व्यवहार करण्यात आपल्या काही अडचणी आहेत, पण त्या आर्थिक कमी आणि  व्यावहारिक जास्त आहेत. इतर देशांशी वागण्याची चीनची एक पद्धत असते. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठातल्या सेंटर फॉर ईस्ट एशियन स्टडीजमधले चीन विषयक प्राध्यापक श्री. गो. पु. देशपांडे यांनी एक छान निरीक्षण नोंदवले आहे. ते म्हणतात, "चीनबरोबर कुणालाही संघर्ष घेता येत नाही, कोणतेही दावे संघर्षाने मिटवता येत नाहीत. रशियाचा चीनबरोबर सीमावाद होता. त्यात रशियाने बरीच आदळ आपट केली. पण शेवटी चीनचीच भूमिका रशियाला मान्य करावी लागली. आग्नेय आशियात चीनबरोबर संघर्ष घेणारांनाही अद्याप तरी माघारच घ्यावी लागली आहे. त्यामुळे आपण या देशाबरोबरचे संबंध फार काळजीपूर्वक प्रस्थापित केले पाहिजेत." चीन आजही आग्नेय आशियात कडोनिकडीच्या संघर्षात गुंतला आहे. त्याचे नेमके काय फलित निघेल आज सांगणे कठीणच आहे.

आपला स्वतःचा अनुभव जमेला धरायचा तर स्थिती आणखीनच कठीण होते. ज्या भारताकडून आत्ताच संपलेल्या वर्षात आपण चाळीस अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त नफा मिळवला त्या भारतावर नंतरच्या दीडच महिन्यात बेधडक आक्रमण करताना चीनला काहीही वाटत नाही. याचे कारण बहुधा हे नसावे की चीनच्या विदेश व्यापारात भारत फार महत्वाचा भागीदार नाही. २०११ या कॅलेंडर वर्षात चीनने युरोपशी ५६७ अब्ज डॉलर्सचा, अमेरीकेशी ४४७ अब्ज डॉलर्सचा, आसियान देशांशी ३६३ अब्ज डॉलर्सचा, जपानशी ३४३ अब्ज डॉलर्सचा, हॉंगकॉंगशी २८३.५ अब्ज डॉलर्सचा (हॉंन्गकॉंन्गशी 'एक देश, दोन व्यवस्था' अशा नावाने चीन डॉलर्समध्येही व्यापार करतो), दक्षिण कोरियाशी २४६ अब्ज डॉलरचा, तैवानशी १६० अब्ज डॉलर्सचा तर भारताशी फक्त ७४ अब्ज डॉलर्सचा व्यापार केला. पण व्यापारातले कमी महत्वाचे स्थान हे काही या प्रश्नाचे उत्तर नसावे. भारताच्या कितीतरी वर असलेल्या जपान, कोरिया किंवा तैवानशी तरी चीनचे नाते प्रेमाचे कुठे आहे? जपानशी रोजच आणि कोरियाशी अधून मधून त्याच्या कुरबुरी चालूच असतात. वरच्या यादीतल्या, चीनचाच भाग असलेल्या, हॉंन्गकॉंन्गचा अपवाद वगळल्यास चीनचे प्रेमाचे तर सोडाच, पण समजुतदारपणाचेही संबंध कुणाशीच नाहीत. हे दृश्य पाहता फक्त एकच निष्कर्ष निघू शकतो. आपले वर्चस्व मान्य न करणाऱ्या कुणाशीही चीन समंजसपणाने राहू शकत नाही, राहणार नाही.

हे असे वागण्यात चीनला एक फायदा नक्कीच मिळतो. चीनची राजकीय व्यवस्था अशी आहे की चिनी नेतृत्व कुणाचीही पत्रास न बाळगण्याचा विचार करू शकते. या 'कुणाचीही'मध्ये त्यांच्या स्वतःच्या जनतेचाही समावेश आहे. हा फायदा भारत, जपान, अमेरिका या कुणालाच उपलब्ध नाही. कुणालाही कोणताही प्रश्न विचारण्याची परवानगी नसणे ही गोष्ट फक्त चीनमध्येच शक्य आहे. ल्हासापासून हार्बिनपर्यंत कुणीच याला अपवाद नाही. (हार्बिन हे चीनचे सर्वात उत्तरपूर्वेचे शहर आहे.) त्यामुळे चीनच्या सत्तेवर कोणताही बाह्य अंकुश तर चालत नाहीच, पण अंतर्गत जोरही तिथे फारसे नाहीत. प्रख्यात कादंबरीकार जॉर्ज ऑर्वेल यांच्या १९८४ या गाजलेल्या कादंबरीतल्यासारखी अवस्था चीनमध्ये प्रत्यक्ष अस्तित्वात असू शकते. या एकाच गोष्टीमुळे चीन अत्यंत बेभरवशाचा आणि अंदाज घ्यायला किंवा विश्वास टाकायला कठीण होतो. ही अवस्था कशी समजणार?

गो. पु. देशपांडे यांचे या संदर्भात मत लक्षणीय आहे. त्यांच्या मते चीनच्या लेखी कोणत्याही देशाशी असणाऱ्या संबंधात स्वतंत्र, वेगवेगळे किंवा सुटेसुटे विषय किंवा विचार असे काही नसतात. "उदाहरणच द्यायचे तर (भारताच्या मते द्विपक्षीय ठरणाऱ्या मुद्द्यांव्यतिरिक्त) भारत-अमेरिका संबंध कसे असावेत याचीही चीनची काही एक अपेक्षा असते. भारत, रशिया, चीनच्या रणनीतीविषयक भूमिका परस्परपूरक असाव्यात अशी अपेक्षा चीन करतो. …… त्यामुळेच अशी परस्परपूरक भूमिका न घेतल्यास आपण काय करू शकतो हे चीन अशा आगळिकीतून दाखवून देतो." चिनी पद्धतीनुसार याही नियमाला कोणी अपवाद नाही. त्यामुळे सीमारेषेबद्दल आपले मत मान्य न करणाऱ्या भारताला चीन जबरदस्त दबाव आणून व्हिएतनामबरोबरच्या तेल उत्खननातून माघार घ्यायला भाग पाडतो. तसाच पूर्व चिनी समुद्रातल्या बेटांवर चीनचा अधिकार मान्य न करणाऱ्या जपानला धडा शिकवण्यासाठी, जपानबरोबरच्या व्यापाराचाच वापर करतो. जपानच्या मालाची चीन ही जगातली सर्वात मोठी बाजारपेठ आहे. त्याचा व्यवस्थित उपयोग करून जपानवर दबाव आणण्यासाठी चीनने गेल्या सप्टेंबरपासून जपानी मालावर अघोषित बहिष्कारच टाकला आहे. "व्यापार ही बाब चीनसाठी फक्त आर्थिक नसून, आपले भू-सामरिक हितसंबंध आणि महत्वाकांक्षा साध्य करण्याचा मार्गच आहे" हे विख्यात सैद्द्धान्तिक तज्ञ ब्रह्मा चेल्लानी यांचे मत चीनच्या या पद्धतीवर अचूक बोट ठेवते. चीन जेव्हा आयात करत असतो तेव्हा तो वेळप्रसंगी निर्यातदार देशाचा गळाही धरू शकतो आणि जेव्हा तो निर्यात करत असतो तेव्हा आपला स्वस्त माल वापरणाऱ्या देशाने आपल्या ताटाखालचे मांजर म्हणून वावरले पाहिजे अशी त्याची अपेक्षा असते. जग एककेंद्रिअसायला चीनची काहीच हरकत नाही. फक्त जगाचे ते केंद्र अमेरिका नव्हे तर चीन असले पाहिजे एवढीच त्याची माफक अपेक्षा आहे.

त्यामुळे आजचा खरा तातडीचा प्रश्न 'उद्याचे काय' असा नाहीच. आधी मूळ मुद्दा आहे तो चीनच्या आश्वासनांचे काय करायचे हा आहे. या वेळी भारताने व्यापारी तोट्याचा प्रश्न जरा जोरकसपणे विचारला हे खरे. पण हा प्रश्न आपण आज पहिल्यांदाच उपस्थित करतो आहोत अशी स्थिती नाही. २००१-०२ पासून म्हणजे आपला तोटा सुमारे एक अब्ज डॉलर्सच्या आसपास असल्यापासून आपण चीनचे लक्ष या प्रश्नाकडे वेधायला बघतो आहोत आणि वेळोवेळी चीनने या प्रश्नाकडे लक्ष देण्याची आश्वासनेही आपल्याला दिली आहेत. पण आजपर्यंत तरी त्याचा काही फायदा झालेला दिसत नाही. आपला तोटा वाढतच गेला आहे. म्हणजेच अंमलबजावणी होईपर्यंत चीनच्या आश्वासनांचे काही खरे नाही. या वेळची आश्वासने सर्वोच्च पातळीवरून आली आहेत हे खरे, पण एका तोंडाने आश्वासने येताना दुसऱ्या तोंडाने काही अचाट तर्कशास्त्रही समोर येत आहे. Chinese Academy of International Trade and Economic Co-operation या चीनच्या सरकारी संस्थेतले सहयोगी संशोधक श्री. मेई झिन्यू यांच्या मते, चीनला भरघोस नफा मिळवून देणारा चीनचा भारताबरोबरचा व्यापार, हा खरे तर भारतीय अर्थव्यवस्थेचा फायदाच करून देतो आहे. "संरक्षक धोरणांमुळे बाहेरच्या उद्योगांना भारतात पाय रोवता येत नाही. यामुळे भारतीय उद्योगांना मोजक्याच प्रतिस्पर्ध्यांचा सामना करावा लागतो. पण त्यामुळे स्थानिक कंपन्याना उत्पादनांचा दर्जा वाढवण्यासाठी उत्तेजन मिळत नाही. चीनच्या स्वस्त वस्तूंसाठी बाजारपेठ खुली केल्यामुळे निकोप स्पर्धा येईल. त्यामुळे भारतीय उत्पादक क्षेत्राचा दर्जा उंचावेल.………… आपण हे विसरू नये की चीनमधून येणारा माल म्हणजे तयार वस्तू नव्हेत तर स्वस्त कच्चा माल आहे. भातीय उत्पादनांची किंमत स्वीकार्य पातळीवर राहते ती त्यांच्याचमुळे," असा झिन्यू यांचा युक्तिवाद आहे. या तर्काला हसावे की रडावे हे कळणे मोठेच कठीण आहे. आपल्या देशाच्या वागण्याची तरफदारी करणे समजू शकते. पण ते करताना वस्तुस्थितीचा धडधडीत विपर्यास करणे हे चिनी विचारवंतच करू शकतात. कारण संयुक्त राष्ट्रसंघाच्या डाटाबेसमधले आंतरराष्ट्रीय व्यापाराचे आकडे काही निराळीच कथा सांगतात. श्री. तोर्स्तेन कुंझ यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार भारताच्या चीनला होणाऱ्या निर्यातीपैकी ५८% निर्यात कच्ची खनिजे (मुख्यतः लोहखनिज) आणि उद्योगांचा शेवटी उरणारा साका आणि राख (slag and ashes) यांची होते. कापूस आणि सेंद्रिय रसायने (Organic Chemicals) यांचा वाटा अनुक्रमे ८% आणि ५% आहे. क्षार, गंधक, चुनखडी, सिमेंट यांचा वाटा आहे ३% आणि इतर सर्व वस्तू मिळून २६% निर्यात होते. याउलट चीनकडून भारत जी आयात करतो त्यात २७% वाटा असतो इलेक्ट्रोनिक आणि विजेच्या उपकरणांचा. (आपल्याला मिळणारे स्वस्तात स्वस्त मोबाईल फोन याच गटात येतात.) १९% भाग यंत्रसामुग्री, बॉयलर, अणुवीज निर्मितीसाठी लागणारे यंत्रे, उपकरणे आणि त्यांचे सुटे भाग, संगणक यांचा असतो. १५% आयात लोखंड आणि पोलाद, रसायने यांची असते. वंगणे आणि इतर पेट्रोलियम पदार्थ ५% असतात आणि इतर सर्व पदार्थ ३४% आयातीचे घटक असतात. हा अभ्यास २००८-०९ च्या आयात-निर्यातीच्या आकड्यांवर आधारलेला आहे हे खरे! पण गेल्या तीन वर्षात या परिस्थितीत फार मोठा गुणात्मक बदल झाला असेल असे मानायला फारशी जागा नाही हेही तितकेच खरे आहे. त्यामुळे भारत-चीन व्यापारातली वस्तुस्थिती श्री झिन्यू सांगतात त्याच्या बरोबर उलट आहे. सरकारी क्षेत्रातले चिनी तज्ञच जर अशी स्वच्छ दिशाभूल करू पहात असतील तर चिनी आश्वासनांवर आपण किती विश्वास ठेवणार?

उलट Chinese Academy of Social Sciences चे संशोधक श्री. लिऊ झिओझू चायना डेली या चिनी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत स्पष्टच सांगतात की चीन आणि भारत यांच्यातल्या व्यापाराचे सध्याचे स्वरूप लक्षात घेतल्यास त्यात संतुलन आणणे हे चटकन शक्य होईल असे दिसत नाही. त्यांच्या मते खऱ्या अर्थाने या व्यापारात संतुलन यायला किमान आठ ते दहा वर्षांच्या अथक प्रयत्नांची गरज आहे. चिनी पंतप्रधानांबरोबर भारतात आलेले 'तज्ञ' संशोधक वस्तुस्थितीची मोडतोड करून भारताला चिनी आयातीची उपयुक्तता पटवून देण्यासाठी आपली बुद्धी राबवतात आणि चीनमधले दुसरे तितकेच 'तज्ञ' संशोधक आहे या परिस्थितीत बदल होणे संभवत नाही असे सांगत असतात, याचा आपल्यासारख्या पामरांनी काय अर्थ घ्यायचा?

अर्थात जगाच्या बाजारात कोणतेही सोंग फार दीर्घकाळ घेता येत नाही. २०१३-१४ मध्ये या परिस्थितीत बदल होऊ लागल्याच्या काही खुणा दिसताहेत. आपल्या उत्पादनांच्या किंमती कृत्रीमरीत्या खाली ठेवणे आता ड्रगनला अवघड व्हायला लागले आहे असे दिसते. कागद आणि स्टेशनरी, धागे, खेळणी, विजेशी संबंधित वस्तू अशा अनेक क्षेत्रात चिनी वस्तूंच्या किंमती वाढत आहेत आणि त्यात चीनला फायद्याची असणारी अवस्था कमी होते आहे. गेली दोन वर्षे आयटीसी ही कंपनी कागद, पेन्सिली, कंपास पेट्या अशा वस्तूंची आपली संपूर्ण गरज चीनमधून भागवत होती. यावर्षी मात्र आयटीसीची चिनी आयात ५० टक्क्यांनी कमी होईल. भारताच्या खेळण्यांच्या बाजारातला चिनी हिस्सा गेल्या वर्षीच्या ७०% या पातळीवरून या वर्षी ५०% टक्क्यांवर घसरेल. चिनी कापड आणि धागे यांची आयात गेल्या वर्षीपेक्षा दहा टक्के कमी होईल आणि विजेच्या माळा, सीएफ़एल दिवे या क्षेत्रात तर चीनचा भारतीय बाजारपेठेतला हिस्सा ५० टक्क्यांवरून थेट १५ टक्क्यांपर्यंत घसरेल अशी लक्षणे दिसताहेत.

याच्याच जोडीला चीनच्या आर्थिक चमत्काराचा फुगाही आता मर्यादेपलीकडे फुगला आहे आणि तो कोणत्याही क्षणी फुटू शकतो असा इशारा त्या क्षेत्रातले तज्ञ देत आहेत. २०१२च्या उत्तरार्धात चीनच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग जवळपास ७.६ टक्क्यांपर्यंत घसरला याचा हवाला काही लोक देत आहेत. चिनी उच्चपदस्थांचा भ्रष्टाचार आणि घटती मागणी यांनी आता अर्थव्यवस्थेला ग्रासायला सुरुवात केली आहे अशा बातम्या येत आहेत. Standard and Poorचे हॉंगकॉंगचे प्रतिनिधी ऱ्यान त्सांग यांच्या मते चीनमधल्या ३८०० बँका वेगाने वाढणाऱ्या अनुत्पादक कर्जांमुळे हवालदिल झाल्या आहेत. चनोज या युरोपियन अर्थतज्ञाच्या मते तर चिनी आर्थिक अवस्थेचा खरा चेहरा दिसू शकला तर त्याच्यासमोर ग्रीस आणि स्पेन म्हणजे पोरखेऴच वाटेल. या परिस्थितीत भारताने चीनच्या सद्भावनेवर विश्वास टाकण्यापेक्षा आणि भारताकडून मिळणाऱ्या व्यापारी फायद्यामुळे चीनची कृतज्ञताबुद्धी जागी होण्याची वाट पहात बसण्यापेक्षा काही ठोस उपाय करणे अत्यंत आवश्यक आहे. जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे डम्पिंगविरोधी कराचे अस्त्र वापरले जायला हवे. त्यायोगे चीनचा भारतीय बाजारपेठेतला वावर ताबडतोब कमी करता येईल. याच्याच जोडीला एक दीर्घकालीन उपाय म्हणून ज्या वस्तू जगात चीनखेरीज कुणी फारसे बनवीतच नाही अशा वस्तू आपल्या देशात बनवल्या जाव्यात यासाठी प्रयत्न करायला हवेत. अशा क्षेत्रात चिनी वस्तूंवर भारतीय उत्पादक सर्वस्वी अवलंबून असणे हे मध्यम आणि दीर्घ कालावधीत अत्यंत अडचणीचे ठरू शकते. आणि तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे 'व्यापार हे शस्त्र आहे; बिनदिक्कत वापरा' हा चीनने घालून दिलेला धडा आपण सहीसही गिरवायला हवा. सीमाप्रश्न आणि चीनमधून वहात येणाऱ्या नद्यांच्या पाण्याचा प्रश्न हा व्यापाराशी बांधल्याखेरीज सुटण्याची चिन्हे आज तरी दिसत नाहीत याची नोंद आपल्या मनाशी असू द्यावी. दुसरा एखादा सोपा उपाय सापडला तर छानच! पण तोपर्यंत हातावर हात धरून स्वस्थ बसण्याची काय जरूर आहे?