Friday 14 June 2013

दिवस कोवळे, काळे काळे ……

जिया खान नावाच्या एका कोवळ्या आत्महत्येनं आपण सारे हादरून गेलो आहोत. ही गोष्ट पचवायला फार जड जाते आहे. म्हणून मग वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताहेत. एका टोकाला जियाचे कृत्य चुकीचे, आततायी आणि अतिरेकी ठरवणाऱ्या प्रतिक्रिया आहेत तर दुसऱ्या टोकाला याला जबाबदार कोण याची post-mortem चर्चा आहे. लोकसत्ताच्या १४ जूनच्या अंकात सोनाली कुलकर्णीनं तिच्या 'सो कूल' या सदरात ऋतुपर्णो घोषबद्दल लिहिताना तळमळून जियाबद्दलही लिहिले आहे. जियानं हे पाऊल का उचललं हा प्रश्न तिलाही अस्वस्थ करतोय.तू जियाबद्दल फार मनापासून लिहिलं आहेस सोनाली! मान्य! पण तुझ्या मनापासून. तुझी अस्वस्थता आणि तुझं दुःख कळतंय. पण तुझं लिहिणं तुझ्या मनाचं प्रतिबिंब आहे सोनाली. जियाच्या मनाचं काय? तुझं आयुष्य कसं गेलं आणि तुला आयुष्याचा कसा आणि किती अनुभव आहे मला माहित नाही. मला तर तुझं वयही माहीत नाही. पण आयुष्याच्या या वाटा कळणं फार फार कठीण आहे सोनाली. आजही आपल्याला हे कठीण जातं. लैला-मजनू, हीर-रांझा ही आपल्याला फक्त नावं आहेत. आपल्याला ते समजले नाहीच आहेत गं. काय आहे ना सोनाली, देशासाठी फाशी जाणारा भगतसिंग समजणं सोपं आहे, पण सूरजसाठी फाशी जाणारी जिया समजणं कठीण आहे. त्यासाठी लैला-मजनू आणि हीर-रांझा जगण्यातच यावे लागतात. 'भावना नावाच्या कवितांना तू राक्षस का मानलंस जिया? क्षणिक फोलपणाला तू गळ्याभोवती बांधलंस? निसर्गाच्या विरुद्ध जाण्याचा निर्णय तू का घेतलास गं' असे प्रश्न तू तळतळून विचारले आहेस. मला माफ कर सोनाली. पण यातला तुझा फक्त शेवटचा प्रश्न मला थेट भिडला. कदाचित तुझ्या मनातल्यापेक्षा वेगळ्या अर्थानं, पण भिडला. जियानं निसर्गाच्या विरुद्ध जाण्याचा निर्णय घेतला हे निर्विवाद! माणूस आणि त्याच्या उत्क्रांतीबद्दल अभ्यास करणारे असं सांगतात की टिकून रहाण्याची इच्छा हा उत्क्रांतीतला सर्वात महत्वाचा घटक आहे. असेलही ते खरं. मी नाही म्हणत नाही. पण एकदा माणूस उत्क्रांत होऊन 'माणूस' झाला ना, तेव्हापासूनच त्यानं आपल्या या टिकून रहाण्याच्या इच्छेला आव्हान द्यायला सुरवात केली आहे. दर वेळी हा माणूस त्याला निरनिराळी कारणं शोधतो. कधी देश, कधी देव, कधी श्रद्धा आणि कधी कधी प्रेम. यातलं कुठलं दैवत माणसाच्या मनात सगळ्यात मोठं असावं हे कुणी ठरवायचं सांग. आपल्या पुलंनी 'तुझे आहे तुजपाशी' नाटकात प्रश्न विचारला आहे बघ- '…. देशासाठी हसत हसत फासावर जाणारा क्रांतिकारक आणि सुरांच्या मस्तीत राजाची इतराजी स्वीकारणारी गाणारीण यात लहान-मोठं कुणी आणि कसं ठरवायचं?' सोनाली, तुला सापडलंय या प्रश्नाचं उत्तर?

खरं तर इतक्या लांब जायची सुद्धा काही गरज नाही. फार दिवसांपूर्वी मी एक गझल लिहिली होती. फक्त गझलांसाठीच्या एका वेबसाईटवर ती आहे. तिचा मतला होता-
                           'शुद्ध रक्ताचा सडा हाकाल हा ताजाच होता
                            कापला जो काल मीतोही गळा माझाच होता'
मी माझे श्वास झुगारून नाही दिले सोनाली! मी अजूनही आहे आणि हे लिहितो आहे. पण तिथे जो लिहिला तोही माझा प्रेमातलाच अनुभव होता. आजही माझ्या गळ्यावर कापल्याच्या जखमांचे व्रण आहेत आणि आता ते माझ्याबरोबरच जाणार. माझं आयुष्य त्या अनुभवानं आमूलाग्र बदलून टाकलं. आता त्या जखमातून रक्त नाही येत. पण जियासारख्या कुणाचा तिथे अभावितपणे स्पर्श झाला तर आजही तिथे हुळहुळतं, गळा आणि डोळे ओले होतात. पण मी आहे. याला माझा शहाणपणा म्हणायचं का?

'जियानं परिस्थितीला धैर्यानं तोंड द्यायला पाहिजे होतं' असं म्हणणाऱ्या धैर्यधरांना तर माझा मनापासून प्रामाणिक सलाम. धैर्य-धैर्य म्हणजे नेमकं काय असतं गं सोनाली? मी आहे हे धैर्याचं प्रतीक समजायचं का? का माझं गळ्यावरचं प्रेम इतक्या मर्यादेपर्यंतच होतं आणि स्वतःवरचं प्रेम जास्त होतं असं गृहीत धरायचं? खांडेकरांच्या 'अमृतवेल' मधला तो उतारा मी शाळेत असल्यापासून वाचतोय गं. पण अजूनही कळत नाहीये  की ते काय आहे. माणसाच्या जीवनाला त्यानं अर्थ येत असेल तर शिवाजीला त्याची सख्खी आई का बरं खानाच्या भेटीला पाठवते? भगतसिंगची आई त्याच्या शेवटच्या भेटीकडे का पाठ फिरवते? कास्वप्नांना मोडू द्यायचं आणि मग आपण दुसऱ्या स्वप्नामागे धावायचं असं नेहमीच चालत नाही; कधी तरी पाय एका जागी घट्ट रोवून एखाद्या स्वप्नासाठी प्राण पणाला लावण्याची आणि स्वतःला झोकून देण्याची तयारीही ठेवावी लागते, म्हणूनच ना? सर्वात जास्त उत्क्रांत झालेले प्राणी दर वेळी निराळ्या स्वप्नामागे धावतात. पण या प्राण्यांना ‘माणूस’ बनवणारे चार-दोन वेडे स्वप्नांसाठी जिवावर उदार होतात- कधी बाजीप्रभू देशपांडे या नावानं, कधी प्रतापराव गुजर म्हणून, कधी मोहनदास करमचंद गांधी म्हणवत तर कधी लैला, पेनिलोपी आणि जिया खान अशा रूपांनी. सोनाली, संस्कृती- संस्कृती आपण म्हणतो ना - ती त्यांच्यामुळे घडते आणि वाढते, उदंड संख्या माजवणाऱ्या माझ्यासारख्यांमुळे नाही.

'किती मोठ्या गोष्टी तू कुठे ताणतो आहेस? तुलना करायला आणि उदाहरणं द्यायलाही काही मर्यादा पाहिजे की नको?' हा प्रश्नही मला पाठ आहे सोनाली. म्हणूनच मी पुलंनी दिलेली ढाल आधीपासूनच घट्ट पकडून ठेवली आहे. आपल्या मनात कुठली गोष्ट किती मोठी असावी हे कोण ठरवतं सांग. कशानं आपलं सारं आयुष्य मचूळ होऊन जातं आणि काय झालं की आपण शरीरापासून एका पावलानं लांब जातो, तुला माहीत आहेएका कार्यक्रमात मिथिलेश पाटणकरांनी गायलेली एक गझल माझ्या मनात फार खोल रुतून बसली आहे.
                            'तू दरी होतीस आणिक मी कड्यावरती उभा
                            काय चुकले त्यात माझे जर दिले झोकून मी'
तू या 'काय चुकले'चं काय उत्तर देशील सोनालीआपण सगळे मुर्दाड मनानं मेलेलं आयुष्य सांभाळत जगत असतो, जिवंत असतोच असं नाही. पण सगळ्यांनी असंच जगावं असं आपण कसं ठरवू शकतोफासानं गळ्याला जखडावं तसं वाटेल त्या आणि वाटेल तसल्या आयुष्याला जखडून-पकडून बसणं हा एकच एक हट्ट सगळ्यांसाठी आपण का धरावा? ज्याच्यावाचून आयुष्य असह्य होतं तो आपला कोण असावा- देश की देव की प्रियकर, हे आपल्या हातात नसतं आणि हे असह्य होणं किती जीवघेणं असावं हेही आपण ठरवू शकत नाही. सगळ्यांनी जिया बनावं असं कुणी म्हणू नये आणि म्हणणारही नाही. पण जियाचं काय चुकलं हे तरी आपण कसं ठरवू शकतोतिचं प्रेमतिची निष्ठा आणि तिची आयुष्याची आस कुठल्या जातकुळीची असावी हे तिनंच ठरवावंनाही काक्रांतिकारक आणि फितूर, पोलीस आणि गुन्हेगार, सारं आयुष्य वाहून टाकणारे आणि आयुष्यभर वहात जाणारे असे आपण सगळे जण  एकाच वेळी एकाच समाजात राहतो की नाहीतसंच मी आणि जिया यांनीही एकाच समाजात राहावं हवं तर. जियानं भावना नावाच्या कवितांना राक्षस मानलं किंवा क्षणिक फोलपणाला गळ्याभोवती बांधलं असं खरच तुला वाटतंभावनांना जियानं राक्षस नाही मानलं सोनाली. तिनं तर त्यांना आपले श्वास मानलं. पण जब कदम ही साथ ना दे तो मुसाफिर क्या करेंसाँस ही जब साथ ना दे तो जिया भी क्या करें सोनाली? आपल्या श्वासांनी आपली साथ सोडली की काय गळ्याशी येतं सांग. तेच जियाचं झालं.

जियाचं आयुष्य अकाली संपलं हे खरं आहे. पण मूल्यांचे ठोकळे रचून तिची समाधी बनवण्याची किंवा 'तिच्या चुकांमधून आजच्या आणि उद्याच्या पिढीला धडे देण्याची' काही गरज नाही. त्यापेक्षा सारं आयुष्यभर न मिळालेलं शांतपण आता तरी तिला भोगू द्यावं. आणि त्यातूनही कधी फुलण्याआधीच कुस्करल्या गेलेल्या कोवळ्या दिवसातल्या जियाची आठवण अगदी अनिवार आलीच तर फक्त मनातल्या मनात तिला जवळ घ्यावं, तिची एक छान पापी घ्यावी आणि सूरजबद्दल कणभरही आढी मनात न आणता तिला सांगावं 'सॉरी राणा, अगदी सॉरी. यावेळी नाही जमलं सोनिया! पण पुढल्या जन्मी माझ्या छायेत येऊन रहा. तुला कधी कधी ऊन लागू नये याची मी काळजी घेईन. प्रॉमिस! पक्का!! बाय जिया!!!'


No comments:

Post a Comment